पान खाता खाता आठवतं काहीबाही..
हिरव्या कंच पानाचा देठ नखंलताना आज्जी म्हणायची,
"स्वस्ताई होती तेव्हा... दोन रुपयांना हेss पोतंभर तांदूळ. ओंजळीनं घ्यायचो तपेल्यात... वाटी वगैरे नाही आत्तासारखं.."
पान मांडीवर पसरायची, सुरकतलेल्या हातात अडकित्ता घ्यायची,
"चोर पकडले जायचे, शिक्षा व्हायच्या... आत्तासारखं नाही."
चंचीतली सुपारी आडकित्त्यावर अलवार कातरायची ती..
पानावर चुन्याचं अल्लद बोट लागायचं, त्यावर कात सुपारी मांडत म्हणायची,
"इंग्रज गेले आणि सगळी शिस्त गेली.
शिस्त गेली तशी स्वस्ताई गेली."
पानाची घडी करून ती तोंडांत सारून ती पुढे सांगायची,
"पूर्वी पानात केशर घालायचे मी. तुझे आजोबा मुंबई वरून केशराची अख्खी पेटी आणायचे माझ्यासाठी."
आज्जीचे डोळे धुरकट व्हायचे..
आत आईच्या हातून पडलेल्या तांब्याचा ठणठणाणठण आवाज यायचा.
आज्जी माझ्याकडे बघून हळूच डोळे मिचकवायची.
"आताही सगळं सुखंच म्हणा.
पण अंथरुणावर पाठ टेकल्या टेकल्या डोळे मिटले तर ते खरं सुख"
मी हात पुढे करायचे. लुसलुशीत पोपटी पान माझ्या हातावर ठेवत ती म्हणायची,
"अन् पानात मांडलेलं चाटून पुसून खाल्लं तरच ती खरी भूक "
पान तोंडांत कोंबत मी हळूहळू काढता पाय घ्यायचे.
आज्जीची बडबड तरीही चालूच असायची......
पान खाता खाता आठवतं असंच काहीबाही..
विड्याचा रंग काही उगाचच चढत नाही..
प्रतिक्रिया
10 Aug 2020 - 1:26 pm | अनिरुद्ध.वैद्य
आवडली!
10 Aug 2020 - 3:21 pm | Bhakti
क्या बात!!
पान खाता खाता आठवतं असंच काहीबाही..
विड्याचा रंग काही उगाचच चढत नाही..
भारीच !!
10 Aug 2020 - 3:32 pm | माहितगार
सुरेख व्यक्ती-क्षण चित्रण !
10 Aug 2020 - 9:38 pm | रातराणी
आजी अगदी डोळ्यांसमोर उभी राहिली..
10 Aug 2020 - 10:27 pm | सत्यजित...
एवढं सहज सोप्पं लिहिणं!
माझी आज्जीही पान खात असे.तिच्यासोबत घालवलेलं माझं बालपण भर्रकन डोळ्यासमोर येवून तरळत राहिलं.
11 Aug 2020 - 1:16 am | वीणा३
मस्तच !!!
11 Aug 2020 - 10:22 am | चांदणे संदीप
ह्याला ललित म्हणणं जास्त योग्य राहिल.
सं - दी - प
11 Aug 2020 - 4:05 pm | एस
सुंदर!
11 Aug 2020 - 4:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लै भारी लिहिता. आवडलं.
-दिलीप बिरुटे
13 Aug 2020 - 9:35 am | महासंग्राम
काल तब्बल ४ महिन्यांनी आमचा नेहमीचा पानवाला उघडला होता त्याच्याकडे पान खातांना हेच आठवलं नेमकं
13 Aug 2020 - 10:33 am | प्राची अश्विनी
:)
13 Aug 2020 - 10:33 am | प्राची अश्विनी
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
13 Aug 2020 - 11:26 am | Jayant Naik
प्रसंग आणि व्यक्ती समोर उभे करायची ताकद तुमच्या लेखणीत आहे. मस्त .
20 Aug 2020 - 11:11 am | शिंदेकिरण
अप्रतिम