विराणी- गझल

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in जे न देखे रवी...
5 Aug 2020 - 4:59 pm

गझल एक संवेदनशील काव्यप्रकार ! ज्याची मोहिनी जितकी गझलकाराला असते तितकीच तिचा आस्वाद घेणाऱ्याला असते. जेव्हा गझल लिहिण्याचा प्रयत्न करायचं ठरलं तेव्हा खुपच जुजबी माहिती होती. म्हणजे गझलेत प्रामुख्याने विरोधाभासी प्रतिकांचा वापर केला जातो. उदा.भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, सुगंधी जखमा,लाघवी खंजीर यांसारख्या. पण अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी गुगलुन बघितलं तर ब्रह्मांडच हाती आलं.
गझल इतकी तंत्रशुद्ध असते याची कल्पनाच नव्हती. गझलेत पाच ते सतरा द्विपदी असतात. त्यातील पहिल्या द्विपदीला मतला असे म्हणतात तर बाकीच्यांना शेर. शेर हे जरी आधीच्या किंवा नंतरच्या शेराशी जोडलेले असले तरी ते स्वतंत्र पण अर्थाच्या दृष्टीने पूर्ण असतात.
प्रत्येक द्विपदी ही मात्रावृत्तात ( गझलेच्या प्रत्येक ओळीतील मात्रांची एकुण संख्या समान,जी माझ्या गझलेत 28 आहे) किंवा अक्षरगणवृत्तातच (लघु गुरु अक्षरांचा क्रम प्रत्येक ओळीत समान )असायला हवी. अक्षरछंदवृत्तात (केवळ अक्षरांची संख्या समान) गझल कधीच नसते.
मतल्यामध्ये रदीफ़ (एकाच शब्दाचा,शब्दसमुहाचा दोन्ही ओळींमध्ये वापर) नसेल तरी साैंदर्याच्या दृष्टीने फरक पडत नाही, तिला गैरमुर्रद्दफ़ गझल म्हणतात. मात्र काफ़ियाशिवाय गझल असूच शकत नाही. काफ़िया म्हणजे यमक जे स्वराने,अक्षराने किंवा शब्दाने साधले जाते. ज्याचे यमक योजिले असते, त्याला आधीच्या स्वराशी जोडल्यास अलामत म्हणतात. उदा.माझ्या रचनेत ना हा काफ़िया; जो सर्वच पदांच्या अंती समान आहे तर अलामत प्रत्येक द्विपदीसाठी भिन्न आहे. सोसवेना-पोसवेना यात तर ए हा स्वर म्हणजे अलामत ) जो गझलेला अधिक साैंदर्य देतो.
हे झालं गझलेचं मला समजलेलं तंत्र.गझलेतुन प्रामुख्याने जरी प्रेम,विरह,व्यथा,सामाजिक दृष्टिकोन यावर जरी भाष्य केलं जात असलं तरी तिचं साैंदर्य मात्र वेदनेचा सोहळा करण्यात आहे.

.

कविता

प्रतिक्रिया

प्रशांत's picture

5 Aug 2020 - 5:41 pm | प्रशांत

आणि हो गझल आवडेश..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Aug 2020 - 5:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह ! गझलही मस्त. तांत्रिकदृष्ट्या गझलेचा आमचाही अभ्यास जेमतेमच आहे. त्यामुले दिलेली माहितीही आवडली.
बाकी, मतला म्हणून आलेल्या वरच्या दोन ओळी आणि शेवटच्या दोन ओळी तालात म्हणता येतात
आणि अर्थांच्या दृष्टीनेही त्या ओळी आवडल्या.

लिहिते राहावे.

-दिलीप बिरुटे

सौन्दर्य's picture

5 Aug 2020 - 11:20 pm | सौन्दर्य

गझलही छानच. मी कधीतरी कविता करतो पण गझलेच्या वाटेला अजून तरी गेलो नाही, तरी तुमच्या वरील लेखावरून एकदा तरी प्रयत्न करीन म्हणतो.

प्रचेतस's picture

6 Aug 2020 - 8:44 am | प्रचेतस

खूप सुरेख.

गणेशा's picture

6 Aug 2020 - 8:49 am | गणेशा

आवडली गझल..

थांबलो आहे कधीचा, चालणे संपेचना
जखम होती--जाहला व्रण; वाहणे थांबेचना

दाह तुझिया फुंकरेचा मज आता तो सोसवेना
बेगडा आहे दिलासा, रात्र सारी पोसवेना

उजळुनी अंधार आणी दशदिशांना पांगताना
जवळूनी मी पाहिल्या त्या सावल्याही लांबताना

मीच काही आरशाला पाहण्यासाठी धजेना
चेहरा माझाच मजला नीट काही ओळखेना

सैल झाले बंध सारे, मागचे आणी स्मरेना
सुचली अशी ओठी विराणी, डोळिया पाणी ठरेना

मी-दिपाली's picture

6 Aug 2020 - 1:13 pm | मी-दिपाली

वाईट वाटण्याचा प्रश्नच नाही. उलट नवीन काही शिकायला आवडेलच.
वृत्तदुष्ट म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे कळाले नाही.
वर म्हटल्याप्रमाणे ही गझल मात्रावृत्तात आहे. ज्यात प्रत्येक ओळींत २८ मात्रा आहेत.

उदा.

थांबलो मी कधीच तरीही, चालणे संपेचना
२१२ २ १२१ १२२ २१२ २२१२ = २८
व्रण झाला जखमेचा, तरी वाहणे थांबेचना
२१ २२ ११२२ १२ २१२ २२१२ = २८

धष्टपुष्ट's picture

6 Aug 2020 - 9:52 pm | धष्टपुष्ट

जसं तर्कदुष्ट असतात असा वृत्तदुष्ट असा नवीन शब्द मी बनवलेला दिसतोय. थोडक्यात म्हणजे वृत्तात न बसणारा

गजल मराठीमध्ये तरी अक्षरगणवृत्त मध्ये जास्ती लिहिली जाते. फक्त एका ओळीतल्या सगळ्या मात्रांची बेरीज करून 28 येत असतील तर ते गेय होत नाही, तालात बसत नाही.

मी केलेल्या प्रयत्नांमध्ये गालगागा गालगागा गालगागा गालगा अशा प्रकारचे वृत्त आहे. कधीकधी दोन लघूंचे एक गुरु अशी मोकळीक घेतली आहे.

धष्टपुष्ट's picture

6 Aug 2020 - 9:59 pm | धष्टपुष्ट

खरं तर शेवटच्या ओळी मध्ये "ओठी अशी सुचली विराणी" हे जास्त चांगलं बसेल. भ्रमणध्वनीवर टंकलेखन केलं असल्यामुळे काही लघुगुरूच्या चुका झाल्या आहेत (उदा: आता ऐवजी अता असा असायला हवं होतं इत्यादी). चूभूद्याघ्या.

बाकीच्या ठिकाणी तुमच्या रचनेला कुठेही धक्का न लावायचा प्रयत्न केला आहे.

सत्यजित यांच्या रदीफ, अलामत आणि काफियाच्या सूचना पण योग्य आहेत

सत्यजित...'s picture

6 Aug 2020 - 3:44 pm | सत्यजित...

गझल लिहिण्याचा विचार आणि प्रयत्न करताहात त्याबद्दल स्वागत,अभिनंदन!
मात्रा ही उच्चारासाठी लागणार्‍या वेळेवरुन र्‍हस्व कींवा दीर्घ ठरविली जाते.
उदा.१) व्रण शब्दाच्या मात्रा '२ १' न होता,'१ १' अश्या होतील.
२) 'प्रयत्न' मध्ये प्र ची १,य एकटाच असला तरी समोरचा 'त्' त्यासह उच्चारला जात असल्याने २,व शेवटी न ची १,अश्याप्रकारे,'१२१' होतील.

काफियाबद्दल—
पहिल्या द्विपदीत आपण,संपेचना आणि थांबेचना असे कवाफी योजले आहेत. इथे 'पे' आणि 'बे' मधील 'ए' ही अलामत निश्चित होते आहे.
त्यामुळे पुढील सर्व कवाफीमध्ये 'ए' ही अलामत व त्यानंतरचा 'चना' हा सबंध असणे आवश्यक होईल.
उदा.भेटेचना, उगवेचना, वेच ना ई.

शुभेच्छा!

मी-दिपाली's picture

6 Aug 2020 - 5:49 pm | मी-दिपाली

अलामत बाबतीतला नियम माहिती आहे, परंतू काही उदाहरणांत गझलकारांनी थोडी मुभा घेतल्याची उदाहरणं आहेत त्यामुळे मी ती घेतली.
व्रण मधीला 'व्र' वा स्मरेनातला 'स्म' यातली चूक आधीच लक्षात आल्याने संपादकांना सुधारणा कळवली आहे.

सत्यजित...'s picture

6 Aug 2020 - 3:55 pm | सत्यजित...

आपण कदाचित वाचली असेलही,पण नसेल वाचली तर,भट साहेबांची 'गझलेची बाराखडी' जरुर अभ्यासायला हवी.

धन्यवाद, सुरेश भटांची बाराखडी वाचली आहे.

सत्यजित...'s picture

6 Aug 2020 - 10:49 pm | सत्यजित...

अलामतीनंतर चा भाग,केवळ कवाफींचा किंवा रदीफेसहही,जसाच्या तसा असणे अपेक्षित असते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Aug 2020 - 4:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या धाग्यात माधव ज्युलीयन अर्थात माधव त्रिंबक पटवर्धन यांचं छंन्दोरचना हे पुस्तक इथे टाकून ठेवतो.
कधी वृत्तांचा अभ्यास करायला लागला तर आपल्या सर्वांनाच उपयोगी पडेल.

भटसाहेबांची गझलेची बाराखडी इथे डकवून ठेवतो. आपल्या सर्वांनाच उपयोगी पडेल.

-दिलीप बिरुटे

बिपीन सुरेश सांगळे's picture

7 Aug 2020 - 11:23 am | बिपीन सुरेश सांगळे

गझल छान

गझलेच्या तंत्राविषयी केलेलं विवेचन अगदी खरं आहे. आपली गझल रचना अप्रतिम आहे. वाह वाह क्या बात है!

कर्नलतपस्वी's picture

9 Sep 2022 - 10:18 am | कर्नलतपस्वी

एवढ्यातच सुरेश भटांचे एल्गार आणी रंग माझा वेगळा दोन कविता संग्रह वाचायला घेतले आहेत.
आपण,धष्टपुष्ट व सत्यजित यानी केलेले विश्लेषण खुप सुदंर आहे.

थांबलो आहे कधीचा, चालणे संपेचना

पोहचायचे कुठे आहे, तेवढे कळेचिना

अशीच अवस्था पण जोपर्यंत गंतव्य स्थान येत नाही तोवर चाललेच पाहीजे.

चक्रव्युह एक माझा प्रयत्न आपल्या पुढे ठेवण्याचे धाडस करत आहे.

आता विसाव्याचे क्षण,स्वानंदा करता लिहीतो. पुन्हा नव्याने सुरूवात करणे शक्य नाही पण अशक्य सुद्धा नाही.

ही कुठली वसुंधरा ही तर मयसभा
जागो जागी इथे छ्द्मवेषी उभा

सापळे इथे माणसाचे माणसाला धरावया
वैखरीतून पेरती मोती सावजाला घेरावया

अठरा औक्षहिणी सेना यांची, चक्रव्युह मांडला
घेरूनी महारथीनी वीर अभिमन्यू कोडंला

जाहला रक्तबंबाळ परी ओटिपी अस्त्र न सोडले
कपटींनी कपट करून भ्रमणध्वनी- तुन चोरले

भेदिले शुन्यमंडळा रिता केला भाता
अभिमन्युचे...
राहीला न वाली कोणी राहीला न त्राता.....
२-९-२०२२

विवेकपटाईत's picture

13 Sep 2022 - 8:59 am | विवेकपटाईत

गझल आवडली.