क्षितिजावरती पहाट होता..... !!!

अमोल_००३'s picture
अमोल_००३ in जे न देखे रवी...
1 Jun 2020 - 5:30 pm

क्षितिजावरती पहाट होता अचानक मज आज ये जागृती |
गिरिशिखरांच्या वाटेवरूनि अन् पाऊले मग घेती गती ||

फिरता फिरता असा थबकलाे पाहुनी सुंदर तो देखावा |
मुग्धपणाने अनिमिष नेत्रे तृषार्तापरी पिऊनच घ्यावा ||

पर्वतराजींमधूनि हिरव्या, सूर्यबिंब ते प्रकटत जाई |
झाडे, वेली, फुले, पाखरे, आसमंतही प्रकाशित होई ||

दूर कपारीतुनि एखाद्या, ये धावत फेसाळत धार |
शांत, संयमी, गंभीरपणे अन् विस्तारीतसे तनमनी अपार ||

स्तब्ध उभ्या त्या वृक्षावरती कुणी एखादा येई पक्षी |
दोन क्षणातच अवरोहाची फुलवूनि जाई अद्भुत नक्षी ||

असाच उभा असता मी तेथे, सृष्टीचे न्याहाळीत रूप |
चाहूल लागे मजला काही, व्यक्त करी कोणी अप्रूप ||

घेऊन स्फूर्ती त्या दृश्यातून, चालू लागला होता एक |
साकारीत होते नकळत त्याच्या मनीमानसी नवकथानक ||

ऐकून संगीत जललहरींचे, कुणा अचानक स्फुरली तान |
गाऊ लागला अन् स्वच्छंदे, नुरले त्याला कसले भान ||

पाहून लीला या अफलातून आणि उगवता बालरवी |
जागृत झाला होता कोण्या अंतर्मनातील सुप्त कवी ||

सूक्ष्म दृष्टीने टिपून अलगद निसर्गाची ही चित्रकला |
सरसर चालू लागे एका हाती असलेला कुंचला ||

कशी जाहली विश्वनिर्मिती, काय असावे रहस्य तयाचे |
हरवूनि बसला गूढ विचारी कोणी वैज्ञानिक स्वयाते ||

मधुर सुरांनी बरसे कोणा ओठी असलेली बासरी |
सप्तस्वरांच्या चांदण्यातुनि तो स्वानंदे विहार करी ||

प्रतिभेच्या या अमाप गर्दीत येई असा कुणी एक भिकारी |
"दिवस उगवला" मनी म्हणतसे, "शोधायाची आहे भाकरी" ||

कविता

प्रतिक्रिया

गणेशा's picture

1 Jun 2020 - 11:14 pm | गणेशा

छान