जिवंत निसर्ग

मीनल's picture
मीनल in कलादालन
18 Nov 2008 - 8:02 am

भरधाव रस्त्याच्या कडेला एक सर्विस व्हॅन सावकाश येऊन थांबली.एक गोरा अमेरिकन माणूस खाली उतरला. अंगात खाकी युनिफॉर्म,शर्ट,पँटच्या खिशातून डोकावणारे काही घडी केलेले कागद आणि जाडसर पेन,आणि एलेक्ट्रिक केबल, हातात वॉकी टॉकी .कुठेतरी काम करणारा सरकारी कामगार असावा.
मला म्हणाला,`` हॅलो मॅम, आर यु ऑल राईट?``
मी उत्तर दिले,`` येस.आय एम फाईन``
पुढे विचारले,`` आर यु शुअर ?ऑल ईज ओके विथ यु? मे आय नो व्हेअर डु यु लिव्ह``?
मी डोक्याला आठ्या पाडून चमकून म्हटले,`` येस्.ऍब्सोल्युटली ओके. आय लिव्ह इन द सबडिव्हिजन ऍट द एंड ऑफ द रोड.
तो हात उंचावत निघाला. निघताना म्हणाला ,`` दॅट्स ग्रेट. टेक केअर.बाय.``
सर्विस व्हॅन समोरून निघून गेली.मी पाठमोरी व्हॅन जरा वेळ पाहत राहिले.दिसेनाशी झाल्यावर पुन्हा चालत निघाले त्याच रस्त्याच्या कडेच्या वॉक वे वरून .
आश्चर्यातून बाहेर येत भानावर आले. त्याला मी नक्की क्रेझी वाटले असेन असा पुसटसा विचार मनात आला आणि लागलेच मला खात्री झाली. त्याला ना मी नक्कीच वेडी वाटले असेन.मनाशीच (वेड्यासारख)हसून पुन्हा चालू लागले.

खर.अगदी खर!
वेडच लागल होत आज मला.नेहमी गाडीतून भूरकन जाणारी मी, आज चक्क चालत निघाले होते.
रस्त्याच्या कडेने का होईना,चालणारी मी एकटीच.आणि वर खाली पाहत,मधेच खाली वाकून पाने, ती सुध्दा कच-यातली सुकलेली पाने उचलणारी मी. मला पाहून कुणालाही मी वेडी नव्हे ठार वेडी वाटणे स्वाभाविक होते.
वेड्यांचा काही भरोसा नसतो .ते आपल्याच धुंदीत एकटेच भरकटलेले असतात.तशीच, अगदी तशीच मी भरकटलेले होते.आपल्याच अनोख्या धुंदीत होते आज.

जॉर्जिया.अमेरिकेतला आग्नेय भागाकडले राष्ट्र्. उत्तरेकडल्या थंडीच्या तुलनेत इथे थंडी तशी उशीराच सुरू होते आणि कमी ही असते.क्वचीत स्नो फॉल ही होतो.पण तो ही नाममात्रच.
या जॉर्जियामधे चार ऋतू स्पष्टपणे दिसतात.थंडी (वींटर)च्या आधी येतो फॉल. समरमधे डवरलेल्या हिरव्या गच्च झांडांवर सप्टेंबर पासून सुरू झालेली इतर रंगाची उधळण नजरेने आधिच टिपली होती पण जरा अलिकडेच प्रकर्षाने जाणवली ,मनाला भावली.
म्हणून आज त्या रंगांच्या दुनियेत आपणहून भटकायला बाहेर पडले .एकटीच.चालत.दारूड्या जसा आपण होऊन जाणून बूजून दारू पितो आणि बेहोशीची मजा चाखतो ना अगदी तस्सच.
धुंद करून टाकल त्या निसर्गातल्या रंगसंगतीने. वर निळे निरभ्र आभाळ. त्याला स्पर्श कारायला उंचावलेले ते झाडांचे शेंडे.काही हिरवी झाडे तर काही रंगीत ठिपक्यांनी सजलेली.

पिवळ्या लिंबू कलर पासून ते केशारी,लाल ,मरून,मातेरी,चॉकलेटी ,काळा असे अनेकविध रंग आणि त्यांच्या छटा पाहायला मिळाल्या. त्याही एकाच वेळी.
डोळे हा रंग पाहू तो पाहू असे अधाश्यासारखे इकडे तिकडे फिरत होते. क्षणभर विसावत होते एके जागी.की पुन्हा चाळावल्यासारखे दुसरी कडे सौंदर्य न्याहाळायला वळत होते.माझ्या ताब्यातच नव्हते ते.
खरतर मानावरचा ताबाच सुटल्यागत पिसाटल्यासारख झाल होत त्या रंगांच्या दुनियेत.तिथे डोळ्यांची काय कथा?
` यापेक्षा सौंदर्य असूच शकत नाहीं.पिऊन घे हव तेवढ.संधी सोडू नकोस.उद्याच कुणी पहिलय? `... मन डोळ्याला बजावत होत...
डोळेही आपणहूनच मंत्रमुग्ध झाले होते.त्या जिवंत अप्रतिम सुंदरतेची नजरेनेच दृष्ट काढून टाकली होती.

काही बुंध्यांकडे पसरट झाड तर काही वरपर्यंत उभी, काही तिरकस तर काही सरळ्सोट वाढलेली.
त्यातून अधून मधून डोकावणा-या आणि टोकाकडे बारिक होत जाणा-या काळ्या फांद्या.सर्वात दिलखेचक होते ते त्यांचे रंग.निरनिराळ्या प्रकारची झाड.त्यामुळे त्यांचे रंग ही अनेक.एकापेक्षा एक सरस.आपापसात स्पर्धा लावलेले.पार भिन्न असून ही एकमेकांना अधिक शोभिवंत करणारे.

प्रत्येक झाडात काही तरी वैशिष्ठ्य.नाविन्य.एकमेकात गुंतलेले असून ही आपले आगळे वेगळे अस्तित्व प्रदर्शित करणारे प्रत्येक झाड.त्या रानातही आपले देखणेपण बघणा-यांच्या डोळ्यात ठसवणारे.

काही झाड होती सोनेरी पिवळी ,अशी---

काही झाड होती पिवळी आणि केशरी. तशी --

काही फक्त केशरी.--

काही आतून हिरवी आणि टोकाची पाने लाल झालेली.मज्जेशीर!--

काही उभी अर्धी लाल तर अर्धी उभी हिरवी .अर्ध नारीनटेश्वर सारखी.--

काही चक्क्क मातेरी.चॉकलेटी पानांची.--

काही कूंकाच्या रंगाइतकी लाल भडक.--

काही पोपटी.एकदम फ्रेश रंगाची.--

याच झाडांवर दिसली आसक्ती आणि अवती भोवती दिसली ती निरासक्ती.
जमीनीवर अनेक पानापाचोळा पडलेला होता.हीच पाने काही काळाआधी दिमाखात झाडावर डोलत होती.झाडावर खुलत होती किंवा झाडं त्यांच्यामुळे खुलत होती म्हणा.
आता झाडावर असलेली पाने खाली पडून गेलेल्या पानांकडे जाणून बूजून दूर्लक्ष करत होती.तर काहींना आपल भविष्य तिथे दिसत होते.अस्वस्थ मनाने ती स्तब्ध झाली होती.
पाळण्यातल बाळ चुळबुळ करायला लागल्यावर त्याची आई त्या पाळण्याला जरासा झोका देते आणि त्या वास्तवतेत शिरणा-या बाळाला पुन्हा हलकेच हस-या स्वप्नात लोटते त्याप्रमाणे वा-याची बारिकशी झुळूक त्या झाडाच्या काळ्या काटक्यांना हलकासा झोका देऊन गेली.
काही पाने आनंदाने डोलू लागली.तर काही झाडाची साथ सोडून माझ्या पायाशी पडली. अगतिकतेने,असहायपणे.
बिचारी पानं! आसक्ती कडून निरासक्ती कडे जाणं त्यां पानांना फार कठिण जात होत.
निसर्गाच्या चक्रात येणा-या घडामोडींना सामोरी जाण्याची तयारी झाडात मात्र होती.जगण्याची उमेद होती.जिद्द होती.
गळून पडलेल्या त्या पानांना मी न्याहाळलं. खाली वाकून काहींना उचललं आणि माझ्या ओंजळीत घेतल.
ती पान हसली.खुशीत आली.
झाडावरच्या पानांनी ते पाहिल .त्यांनाही जरा धीर आला आणि क्षणभरातच झाडाला निष्पर्ण करीत माझ्या आजूबाजूला अनेक पानांचा थर जमा झाला . `टूडेज फॉल इज टूमॉरोज राईज` याची खात्री आता पानांनाही झाली होती.

मी अजून काही पाने ओंजळीत गोळा केली.त्यांना घरी आणल.माझ्या फुलदाणीत नव्हे नव्हे पानदाणीत ठेवल.
ती पाने आता स्वतः सुंदर सजली होती आणि माझं घर ही सजवित होती.
खूप खूप वेळ ती पाने सुखावली होती आणि मला ही सुखावत होती.

भूगोल

प्रतिक्रिया

शितल's picture

18 Nov 2008 - 8:17 am | शितल

फोटो मस्त आहेत,
आणी तुम्ही लिहिले ही सुंदर आहे. :)

विसोबा खेचर's picture

18 Nov 2008 - 8:22 am | विसोबा खेचर

के व ळ अ प्र ती म...!

सर्व छायाचित्र संग्राह्य.

मीनल, तू लिहिलंही मस्तच आहेस.. :)

जियो..!

तात्या.

प्राजु's picture

18 Nov 2008 - 8:28 am | प्राजु

पानगळीला एक वेगळंच हळूवार वळण दिलं आहेस मीनल. लेख अतिशय सुंदर आणि अलंकारीक झाला आहे.
फोटो तर मस्तच. आमच्या इकडे आता फॉल संपला आणि सगळ्या झाडांचे खराटे झाले आहेत..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वर्णन वाचून आणि चित्रे बघून पुन्हा एकदा छोटासा फॉल अनुभवला! :)

चतुरंग

मदनबाण's picture

18 Nov 2008 - 9:57 am | मदनबाण

ताई फोटू मस्त आहेत्...मला ते केशरी झाड फार आवडल.. :)

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

वेताळ's picture

18 Nov 2008 - 10:41 am | वेताळ

सुंदर लेख व अप्रमित फोटो..............डोंगरात,झाडाझुडपात फिरण्याची मज्जा काय औरच असते.तिला शब्दरुप देणे खुप अवघड कला आहे.आपल्याला ती साध्द झाली आहे.फोटो पाहताना डोळे मंत्रमुग्ध झाले..मस्तच
वेताळ

अभिरत भिरभि-या's picture

18 Nov 2008 - 11:06 am | अभिरत भिरभि-या

चित्रे आवडली.
हे सगळे कधितरी याची देही याची डोळा पाहाय्ची इच्छा आहे.

सुक्या's picture

18 Nov 2008 - 11:42 am | सुक्या

खुप सुंदर लेख. फोटो तर एकदम सुरेख !! हिवाळ्याच्या अगोदर झाडांची ही नेत्रसुखद रंगपंचमी पहायला मजा आली.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

पुष्कर's picture

18 Nov 2008 - 11:58 am | पुष्कर

अतिशय सुंदर फोटो आहेत. ती झाडं कोणती आहेत ह्याच्यापेक्षा तू जे वर्णन लिहिले आहेस, ते वाचण्यात जास्त उत्सुकता आहे. सुंदर शब्दांकन. प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा झाली.
-पुष्कर

पिवळा डांबिस's picture

18 Nov 2008 - 12:05 pm | पिवळा डांबिस

तू जॉर्जियात रहातेस?
एकदा आमच्या अथेन्सला भेट देऊन ये...
त्याहीपेक्षा आमच्या युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियाने मेनटेन केलेल्या लेकपार्कला भेट देउन ये....
लालभडक पासून पेल पिवळ्या रंगापर्यंत सर्व रंग मिळतील तिथे......
आमी तिथे असताना दर फॉलमध्ये रोज तिथे जात असू.....

अथेन्सची अजून एक मज्जा माहितिये?
लेट स्र्प्रिंगमध्ये तिथे जायचं....
सगळ्या झाडांची सुवासिक फुलं खाली पडतात आणि पावसाने त्या फुलांचा चिखल होतो....
अख्खं गाव त्या सुवासाने सुगंधित होतं....
सुवासिक चिखलामधुन चालण्याचं भाग्य फार थोड्या लोकांच्या नशिबी असतं.....

युनि.ऑफ जॉर्जियाचा बुलडॉग,
पिवळा डांबिस

यशोधरा's picture

18 Nov 2008 - 12:18 pm | यशोधरा

सुरेखच लिहिलय! अतिशय आवडलं आणि झाडांचे फोटोही दृष्ट लागावी असे!

मनीषा's picture

18 Nov 2008 - 1:32 pm | मनीषा

दोन्ही खूप छान ...

सहज's picture

18 Nov 2008 - 1:52 pm | सहज

वर्णन, फोटो आवडले.

दिपोटी's picture

18 Nov 2008 - 2:32 pm | दिपोटी

मीनल,

तुझं लेखन जितकं छान झालंय, तितकीच सुंदर निसर्गाने केलेली आणि तू टिपलेली ही रंगांची उधळण !

- दिपोटी

मीनल's picture

19 Nov 2008 - 1:56 am | मीनल

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
पुठल्या वर्षी जॉर्जियातली ही रंगांची उधळण पहायला नक्की या.

मीनल.

सूर्य's picture

19 Nov 2008 - 4:20 am | सूर्य

रंगीबेरंगी झाडे खुप आवडली.

- सूर्य.

आनंद घारे's picture

19 Nov 2008 - 8:09 am | आनंद घारे

सुदैवाने मी त्याच परिसरात सध्या राहतो आहे आणि रोज निरनिराळ्या रस्त्यांवर दोन तीन मैल पायपीट करून येतो. त्यामुळे यातली कांही झाडे ओळखीची वाटली. अमेरिकेत आल्यानंतर मला पहिली आगळी वेगळी गोष्ट दिसली ती पानगळ. लगेच त्यावर माझ्या ब्लॉगवर तीन लेख लिहून टाकले. पण माझ्या प्रकृतीनुसार ते कांहीसे विश्लेषणात्मक होते.
आपल्या सचित्र लेखात निसर्ग जीवंत होतो आणि मनाला भुरळ पाडतो.
आनंद घारे
कृपया इथेसुद्धा भेट द्यावी.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/