मी सुपारी घेतो. माणसं मारण्याची !...
पण एक सांगतो , मी असं उगाच कोणाला मारत नाही . तर मी पैसे घेऊन खून पाडतो .आता कळलंच असेल तुम्हाला, मी एक मुडदे पाडणारा धंदेवाईक खुनी आहे म्हणून.
लोकांचे वेगवेगळे धंदे असतात. उल्टे – सीधे ! समाजाला ते माहितीही असतं . त्यांना छुपी मान्यताही असते .मग आम्हीच काय घोडं मारलंय ? माझाही हा धंदाच आहे.
असाच एक डॉन आहे ,त्याची मोठी गॅंग आहे, त्याचे अनेक धंदे आहेत. त्यातलाच हा एक - माणसं मारायचा . त्याचंही रुटीन असतं. तो काय करतो, रुटीनपेक्षा वेगळं काम आलं तर तो त्याच्या गँगच्या पोरांना सांगत नाही .मग तो माझ्यासारख्यांना अशी कामं देतो. मी त्याच्या गँगमध्ये नाही. मला तशा प्रकारचं जीवन आवडत नाही. त्यात मोकळेपणा नाही.
आपलं काम सुमडीत करायचं अन गप आपलं आयुष्य जगायचं. मला असं आवडतं.
बरं मी कामाशी काम ठेवतो. फार घोळ घालत नाही .कामगिरी पार पाडण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढंच .अन ज्यांना मी मारतो, ती माणसं गुन्हेगार नसतात . तर साधी असतात . सामान्य . तुमच्यासारखी !
पण तरी त्यावेळी, मनात खुटखुट असतेच .माहिती नसलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उडी मारण्यासारखं वाटतं.
घरी मी फार थोडा रहातो. हं ! घरच्यांना आणि मला, दोघांनाही डोक्याला त्रास कमी व्हावा म्हणून . दुसरीकडे माझी एक छोटी खोली आहे . साधी. भितींचा रंग डल पडलेली . तिथे मी एकटाच रहातो. मी हट्टाकट्टा तरुण आहे. दिसायला अगदी सर्वसामान्य. पोरांसारखेच कपडे घालणारा. पाठीला सॅक लावून फिरणारा . मी लोकांमध्ये फार मिसळत नाही. इतर वेळी मी एका क्लबमध्ये जुगार खेळायला जातो. म्हणायला क्लब . भंगार आहे . रंग गेलेल्या विटक्या भिंती. माणसंही तशीच. मला बरं पडतं. वेळ जातो अन वरखर्च निघतो. तिथेही मी ठराविक वेळीच जातो. रोज जात नाही . मी एक फिरता विक्रेता आहे असं मी तिथे सांगतो .
असंच मी लोलितालाही सांगतो.
ती माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला खूप छान वाटलं होतं !
असं वाटलं होतं की - माझं आयुष्य एखाद्या रिकाम्या फुलदाणीसारखं आहे आणि ती म्हणजे त्यातली सुवासिक , मन प्रसन्न करणारी, रंगीबेरंगी फुलं !
ती एका फ्लॉरिस्टच्या दुकानात काम करते .तिलाही माझा खरा उद्योग माहिती नाही. काही गोष्टी पाळाव्याच लागतात… मी कुठेही बाहेरगावी जात नाही .पण मी तिला तसं सांगतो. म्हणून मी तिला सारखं भेटत नाही.एखादा फोन तेवढा करतो . कामगिरी असताना तर मी तिच्या संपर्कातच नसतो. हे करावंच लागतं. शहरातच असतो तेव्हा मला बराच वेळ मिळतो, असं मी तिला सांगतो.
मग आम्ही माझ्या त्या दुसऱ्या घरी भेटतो .ती त्या दुकानातून सुटल्यावर .रात्रीच्या वेळी. निवांत ! तिला फिकट गुलाबी रंगाची ,देशी गुलाबाची फुलं आवडतात. ती माझ्यासाठी तसा एक गुलाब घेऊन येते. तिच्या देहालाही मंद सुगंध येत असतो – गुलाबांचा. मला तो खूप आवडतो. तीही एखाद्या टवटवीत गुलाबपुष्पासारखीच आहे. पण साधी . मलाही तो साधा देशी गुलाब आवडतो . तिच्या पाकळ्यांसारख्या मुलायम स्पर्शासहित .
पण आताशा तिच्या सहवासातही मन लागेनासं झालं होतं .
आजकाल राहून राहून मनात जास्त पैशांचा विचार मनात यायला लागला होता . आणि - एक काटाही आडवा यायला लागला होता.
एक नवा कॉम्पिटिटर ! माझ्याच धंद्यात .
-----
अर्थातच मला रोज काम नसतं .पण आजकाल माझं काम कमी झालंय. आमच्या क्षेत्रातही राजकारण आहे आणि स्पर्धाही !
शूटर माझी कामं ओढायला लागलाय. शूटर - माझा कॉम्पिटिटर. अर्थात, हे त्याचं खरं नाव नाही .
तो कधीतरी मला आडवा येणार याची खबर माझ्या कानावर आलीये. कुठेतरी धक्का देण्याचा , मला गोत्यात आणण्याचा , मला खच्ची करण्याचा प्रयत्न तो करणार , असं माझ्या मनाला वाटतंय. माझ्यापेक्षा तो तरुण आहे अन त्यामुळे उतावीळ . त्यामुळे फुकटची दुश्मनी करतोय स्साला !
असं वाटतं - साल्याला उडवावं. त्याची कोणीतरी सुपारी द्यावी – मलाच! त्याची खोपडी उडवायला मला आवडेल .
तो शूटर असेल तर मी शार्प शूटर आहे !
कॅरमची सोंगटी नीट अँगल मध्ये असेल तर ती जशी सटकन पॉकेटमध्ये जाते ,तसं शिकार नीट अँगल मध्ये असेल तर माझीही गोळी सटकन त्याच्या कपाळामध्ये जाते ! अगदी सरळ .
मला उतावीळपणा जमत नाही, म्हणून तर मी टिकून आहे. धंद्याचे उसूल पाळायला लागतात .
-----
असे विचार यायचं कारण म्हणजे आवक कमी झाली ना माझी . अन असंच होत राहिलं तर ? ...
लोलीताही म्हणते, तिला कामाचे पैसे खूप कमी मिळतात. जास्तीचे पैसे कमवायलाच हवेत .
खरं तर आणखी एखादं पार्टटाईम काम तिने केलं असतं. तशी तिची इच्छा आहे ; पण दुकानाच्या कामातून तिला तेवढा वेळच मिळत नाही.
म्हणून असं वाटायला लागलं की दोनचार मोठी कामं यावीत . भरपूर पैसा एकदमच मिळावा . मग आपण या लाईन मधून आऊट ! साला झंझटच नको.
म्हणून माझं एक स्वप्न आहे . मला तिच्यासाठी एक दुकान काढायचंय. फुलांचं . मग आम्ही दोघे मिळून ते चालवू . विविध रंगसंगतीचे ,विविध आकारांचे बुके बनवण्यात तिचा हात धरणारं कोणी नाही. आणि ती दुकान उत्कृष्टरित्या चालवेल यात मला शंका नाही. कारण अलीकडेच मला तिच्या गुलाबसुगंधाचं रहस्य उलगडलं होतं. ती रोझ नावाचं अत्तर मंदसं लावते. दुकानात आल्यावर लोकांना गुलाबांचा वास जास्त यावा म्हणून .
-----
एक सुपारी आली अन मी उत्तेजित झालो . खुश झालो . खिसा जरा रिकामाच झाला होता .
काम कुठून आलंय ?कशासाठी ? कोणासाठी ?कोणाला मारायचंय?, अशा गोष्टींच्या मागे मी जात नाही . ये हाथसे गोली वो हाथसे पैसा ! बस , विषय संपला .
मी क्लबमध्ये पत्ते खेळायला गेलो होतो . साला पत्ते ही मनासारखे पडत होते. पण मी पत्त्यांवर विश्वास ठेवत नाही .कधीही उल्टे पडतात !
तिथे एका माणसाने मला एक बंद पाकीट आणून दिलं. दरवेळी वेगळा माणूस असतो.
क्लबमध्ये प्रचंड उकडत होतं. ते पाकीट पाहताच मला मंद हवेची झुळूक आल्यासारखं वाटलं.
घरी गेल्यावर पाकीट फोडून पाहिलं . आत एक फोटो होता . एका मध्यमवयीन माणसाचा . काळाशार, अर्धटकला . कॉमन चेहरा असलेला. फोटोच्या मागे डिटेल्स होते . ते म्हणजे सावज त्या वेळेस भेटणार होतं. त्या जागी. माझ्यासाठी सुरक्षित. एकटंच.
चेहरा आणि पत्ता डोक्यात फिट झाल्यावर मी तो फोटो जाळून टाकला.
-----
मी ठरलेल्या दिवशी तिथे गेलो. उशिरा रात्रीची वेळ. वारं पडलेलं . सगळीकडे अंधार. एक साधी बिल्डिंग होती . सिमेंटची . तशीच, रंगही न दिलेली. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका आडगल्लीत. आजूबाजूला कोणीही नव्हतं .
मी बिल्डिंगमध्ये शिरलो. तीन मजली जुनाट इमारत होती. पायऱ्याही धड नव्हत्या. जिन्यामध्ये खूप डिम लाईट. तिसऱ्या मजल्यावर पोचलो . ऑईलपेंट उडालेलं दार वाजवलं. खिशात पिस्तूल तयारच होतं . सायलेन्सर लावलेलं.
दार उघडायला वेळ लागला . दार उघडताच मी चपळाईने आत घुसलो . आतला माणूस माझ्याकडे आश्चर्याने पाहतच राहिला.
तो तोच होता- काळाशार ,अर्धटकल्या.
मी पिस्तूल रोखलं. गोळी सुटली . थेट त्याच्या कपाळात. मध्यभागी !
तो उभ्याउभ्याच खाली कोसळला .
आणि आत हालचाल जाणवली . आत कोणीतरी होतं ...
सावज एकटं नव्हतं तर !
म्हणजे मला चुकीची खबर दिलेली होती . आत एक साक्षीदार होता की मला अडकवण्यासाठी जाळं ? प्रिप्लॅन्ड ?...की शूटरने?...
प्रसंग अवघड होता . अशा वेळी विचार करायला वेळच नसतो.
मी चटकन आत घुसलो ,पिस्तूल रोखून. आत नाईटलॅम्पचा मंद प्रकाश होता. नीट दिसत नव्हतं . पण नजर स्थिरावली. अन -
ती एक तरुणी होती. बेडवर बसलेली . अर्धवस्त्रांत.
" लाईट लाव ", मी अधिकारवाणीने तिला म्हणालो.
ती बटनाकडे वळली . अन - गुलाबाचा तोच मंद, परिचित सुवास आला...
अन मला आठवलं , मी खलास केलेल्या त्या टकल्याला कुठे पाहिलंय ते ... फुलांच्या दुकानात . तो लोलिताच्या मालकिणीचा भाऊ होता .दुकानात क्वचित, कधीतरी येणारा .
लोलिताने दिवा लावला.
भावनातिरेकाने तिने खालची उशी हाताने दाबली होती, तर मी पिस्तूल !
आम्ही दोघेही काळीजचिरल्या नजरेने एकमेकांकडे पहात राहिलो.
माझ्या मनातली गुलाबपुष्पं कोमेजायला लागलेली ...
-----------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
4 May 2020 - 2:50 pm | कानडाऊ योगेशु
खर्तनाक! क्रमशः आहे का? कारण अपूर्ण वाटतेय.
4 May 2020 - 3:51 pm | शेर भाई
End च आहे, पण थोडा Open ended आहे.
4 May 2020 - 7:51 pm | अर्धवटराव
प्रथमदर्शनी दोन शक्यता जाणवल्या...
लोलीताने 'असा' नवीन पार्ट टाईम बिझनेस सुरु केला, किंवा लोलीताने आपल्या मालकिणीच्या धंद्यात भागिदारी मिळावी म्हणुन तिच्या भावाचा खुन करवला... दुसरी शक्यता कमी, कारण लोलीताने सुपारी दिली असती तर तिने स्वतः क्राईमसीन वर उपस्थीती टाळली असती...
4 May 2020 - 7:51 pm | अर्धवटराव
प्रथमदर्शनी दोन शक्यता जाणवल्या...
लोलीताने 'असा' नवीन पार्ट टाईम बिझनेस सुरु केला, किंवा लोलीताने आपल्या मालकिणीच्या धंद्यात भागिदारी मिळावी म्हणुन तिच्या भावाचा खुन करवला... दुसरी शक्यता कमी, कारण लोलीताने सुपारी दिली असती तर तिने स्वतः क्राईमसीन वर उपस्थीती टाळली असती...
4 May 2020 - 9:33 pm | सौंदाळा
थरारक, मला पण सेम प्रश्न आहे टकल्याची सुपारी कोणी दिली होती नक्की, शेवटावरून वाटतंय लोलिताचा काही संबंध नाही, निव्वळ योगायोग
4 May 2020 - 9:56 pm | जेम्स वांड
आवडला ट्विस्ट एकदम.
4 May 2020 - 11:03 pm | गामा पैलवान
बिपीन सुरेश सांगळे,
छान कथा आहे. हिच्यावरनं फ्रेडरिक फॉरसिथची नो कमबॅक्स ही कथा आठवली. पण तुमचा शेवट बराच वेगळा आहे.
आ.न.,
-गा.पै.
10 May 2020 - 12:29 pm | बिपीन सुरेश सांगळे
योगेश आभार
कथा इथे पूर्ण झालीये , मी थांबलो .
पण पुढे असू शकते , अशी शक्यता आहे
10 May 2020 - 12:30 pm | बिपीन सुरेश सांगळे
राजन
आपली प्रतिक्रिया योग्य आहे
आभार
10 May 2020 - 12:32 pm | बिपीन सुरेश सांगळे
अर्धवटराव
एक - लॉलिताने खून करवला नाही
दोन - तिने पार्ट टाइम बिझनेस सुरु केला नाहीये
तिने - पण ती नाईलाज म्हणून तिथे आलीये ,असं अपेक्षित आहे
आभार
10 May 2020 - 12:35 pm | बिपीन सुरेश सांगळे
सौंदाळा
आभारी आहे
टकल्याची सुपारी कोणी दिली , हा भाग इथे गुलदस्त्यात आहे
पण लोलीता तिथे आली , हा योगायोग असल्याचा तुमचा अंदाज , बरोबर आहे
10 May 2020 - 12:35 pm | बिपीन सुरेश सांगळे
जेम्स वांड
थँक्स
10 May 2020 - 12:43 pm | बिपीन सुरेश सांगळे
गामाजी
खूपच आभारी आहे
आपली प्रतिक्रिया एका जाणकाराची प्रतिक्रिया आहे
खूप वर्षांपूर्वी एक अनुवादित कथा वाचली होती . त्यामध्ये मूळ कथेचं आणि मूळ लेखकाचं नाव नव्हतं . कदाचित तुम्ही म्हणता ती हीच कथा असू शकेल .
ती कथा आता नीटशी आठवत नाही .
पण माझी हि कथा आपल्याला नक्कल न वाटता पात्र , प्रसंग , त्यांच्या भावना आणि शेवट याने वेगळी भासावी अशी अपेक्षा .
आपल्याकडून आणखी ऐकायला आवडेल
पुन्हा आभार
10 May 2020 - 3:05 pm | गामा पैलवान
बिपीन सुरेश सांगळे,
नो कमबॅक्सची कथा थोडक्यात सांगतो.
लेखक अविवाहित तरुण असून इंग्लंडमध्ये मंत्री असतो. त्याला एक सुंदर व सालस पण विवाहित ललना भेटते आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. तो तिला लग्नाचं विचारतो. ती म्हणते की तिचं लग्न झालेलं असून तिचा नवरा पंगु व आजारी असल्याने बिछान्यास खिळून आहे. त्याला सोडून मी तुझ्याकडे येऊ शकंत नाही. यावर मंत्रीमहोदय आपले संबंध वापरून तिच्या नवऱ्याला उडवायची सुपारी देतात. मारेकरी काम फत्ते करतात, पण त्यांच्याकडून निरोप येतो की सोबत एका बाईलाही उडवावं लागलं. ती बाई म्हणजे नेमकी मंत्र्याची प्रेमिका असते.
तुमच्या कथेचा शेवट बराच वेगळा आहे.
आ.न.,
-गा.पै.
10 May 2020 - 9:08 pm | बिपीन सुरेश सांगळे
गामाजी
खूपच आभारी आहे
12 May 2020 - 2:26 am | एस
बिपीनजी, तुमचे लेखन सध्याच्या लेखनामध्ये जास्त ठळक उठून दिसते. लिहीत रहा. फारच छान!
12 May 2020 - 9:00 pm | बिपीन सुरेश सांगळे
एस
बिपीनजी, तुमचे लेखन सध्याच्या लेखनामध्ये जास्त ठळक उठून दिसते. लिहीत रहा. फारच छान!
---
आपल्या प्रतिक्रियेचा नम्र स्वीकार
अन मनापासून आभार