बाईची जात

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
1 May 2020 - 12:59 pm

बाईची जात
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळची वेळ होती. हवेत धुकं होतं अन गारवा . अंगाला गार लागत होतं. शांताबाईने गरमागरम चहा केला होता. नऊवारी नेसणारी ,काळी सावळी शांताबाई कृश होती. पन्नाशीची असूनही परिस्थितीमुळे जास्त वाटायची बिचारी !
बंटी मोबाईल बघत होता. आजकाल तो सारखाच मोबाईलवर असे. कोणीतरी हाक मारली म्हणून तो चुकून मोबाईल तसाच ठेवून बाहेर गेला. शांताबाईने त्याच्या जागेवर चहाचा कप ठेवला. आणि तिचं लक्ष मोबाईलकडे गेलं . ती चपापली.
मोबाईलमध्ये एक स्त्री - पुरुष हसत खिदळत, जुगत होते.
तिचे डोळे विस्फारले. तिला धक्का बसला. तिने असं दृश्य कधी पाहिलं नव्हतं. गावाकडची बाई ती . अनेक पावसाळे पाहिलेली . तिला ते काय नवीन होतं ? - पण इतकं थेट ? इतकं उघडं -बागडं !
त्यात पोरगं सकाळच्या पारी हे असलं बघतंय म्हणून तिला पोराला जाब विचारावासा वाटला; पण ती गप्प बसली.
तिला वाटलं,’ हे वंगाळ काम आहे. पोरगं वयात आलंय. त्याचं लग्न लावून द्यावं हे उत्तम. बाप असता तर त्याने बघितलं असतं. नवरा गेला तेव्हापासून आपण संसाराचा गाडा हाकला. मोलमुजरी करून पोराला वाढवलं. कुठं स्वतःचा पाय घसरू दिला नाही. कोणाचा बोल कधी ऐकून घेतला नाही . स्वतःचा आब राखून राहिलो.
आता पोराच्या लग्नासाठी पुन्हा कंबर कसून उभं राहायला पाहिजे. एकदा त्याचं लग्न झालं, की आपण सुटलो. फार काही अपेक्षा करायला नको. एक चांगली पोरगी आली, दोन घास सुखाने मिळायला लागले की झालं. हवं -नको बघायला, बोलायला घरात बाईमाणूस पाहिजे. बस ! आणि –नातवंडं ! आपलं हे साधं मातीचं घर आनंदाने भरून जाईल ‘
-----

बंटीने लवकरच शाळा सोडली होती. तो रिक्षा चालवू लागला. दोन पैसे कमवून आणू लागला. शांताबाईला आधार झाला ,तसं तिला बरं वाटलं. दिसायला साधा , काळसर अन किरकोळ असणारा बंटी, पैसे हातात आल्यावर छाती फुगवून चालायला लागला होता .
बंटीचं गाव म्हणजे पाच-सहाशे घरांची वस्ती होती. अगदी टुमदार . तिथून अर्ध्या तासाच्या अंतरावर तालुक्याचं गाव होतं. तो शाळेची वर्दी करायचा. गावातली मुलं शहरात सोडायचा. त्यांची शाळा सुटेपर्यंत मग तो शहरातच वडाप करायचा. एखाद्या पोराने कधी वेळेवर पैसे दिले नाहीत तर तो म्हणायचा, ‘ चालंल, पण तुज्या बापाला सांग हा लवकर पैशे द्यायला. लेकानो, तुम्ही शाळा शिकताय. पैश्यासाठी शाळा नको चुकायला. शिकला नाय तर माज्यावानी रिक्षा चालवायला लागंल.’
पोरांना शाळेत सोडलं की आधी तो अक्ष्याबरोबर नाश्तापाणी करायला जायचा. तोही रिक्षावालाच . अक्ष्या आणि तो एकाच वयाचे होते. त्यांचं एकमेकांशी लय पटायचं. त्यांचं एकमेकांशी चांगलं शेअरिंग होतं.
सकाळच्या चहा - नाश्त्यापासून ते रोजच्या पॉर्न क्लिप्सपर्यंत.
-----

त्यांच्या गावात एक पोरगी होती , नेहा . पैसेवाल्या घरातली .गोरीपान. हसली की गालावर खळी पडणारी. दिसायला सुंदर अन हुशार. घरातली तिची लाडकी गाय बाळंतपणात अडली न दगावली. तेव्हापासून तिच्या मनाने घेतलं होतं की आपण जनावरांचं डोक्टर व्हायचं म्हणून. तिची खूप स्वप्नं होती .तिच्या आई वडलांच्याही खूप अपेक्षा होत्या पोरीकडून.
ती बंटीच्या मनात भरली होती. तो तिच्या हात धुवून मागेच लागला. तिचा तो पाठलाग करायचा , छेडायचा .एकदा त्याने तिला स्पष्ट सांगूनही टाकलं; पण तिने प्रतिसाद दिला नाही .उलट वडलांना सांगितलं . त्यांनी बंटीला दम भरला.
बंटी येडा झाला .त्याला नजरेसमोर फक्त नेहा आणि नेहाच दिसू लागली . तिचं हसणं आणि तिची गालावरची खळी दिसू लागली . मनातच तो त्या खळीवर ओठ ठेवायचा अन विरघळून जायचा …
त्यानंतरही त्याने तिला दोन तीन वेळा अडवायचा प्रयत्न केला .पण तिने त्याला दाद दिली नव्हती.
त्यानंतर मात्र तिच्या वडलांनी त्याला सक्त ताकीद दिली , ' पुन्हा माझ्या पोरीला त्रास दिलास ;तर लय वाईट परिणाम होईल ! '
बंटीच्या डोक्यात त्याची तिडीक गेली होती.
-----

एकदा संध्याकाळचे बंटी आणि अक्षय मोकळया माळावर बसले होते. गार वाऱ्यात . मोबाइलच्या टॉर्चच्या प्रकाशात , पार्टी करत. बियर पित. बंटी हृदयातली आग कडवट बियरमध्ये बुडवून थंड करत होता . अक्षयने चढलेल्या तारेत बंटीला त्याच्या मोबाईलमधला एक पॉर्न क्लिप दाखवली. अन तो म्हणाला, “ बंट्या ,यार ही पोरगी नेहासारखीच दिसते !”
त्यावर बंटी चवताळलाच. त्याने अक्ष्याला तिथेच धु धु धुतला. पिण्याच्या तारेत त्याने कदाचित अक्ष्याचा जीवही घेतला असता. पण त्यांचा एक दोस्त ,तिसरा रिक्षावाला मध्ये पडला. तो म्हणाला,” अरे दे सोडून ! आपण एवढे जवळचे दोस्त अन...”
त्यावर गुटख्याची पिंक थुंकत बंटी म्हणाला, “ मी असा सोडून देत नसतो.एखादी गोष्ट मनात धरली की धरली. मग आर या पार !”
अक्षय बंटीशी बोलायचा बंद झाला.
-----

मकरसंक्रांतीच्या आसपासचे दिवस होते. गॅदरिंगचा पहिला दिवस होता. सकाळची वेळ होती.नेहा कॉलेजला निघाली होती .
पोपटी रंगाची सेमी सिल्क साडी नेसून . त्यावर मॅचिंग ब्लाउज, त्याला लटकन ,सँडल्स, आणि पर्स, सारंच मॅचिंग. अगदी अस्मानीची परी दिसत होती ती. तिला साडीची मजा वाटत होती आणि वाऱ्यावर उडणारा पदर सावरण्याचीही.
ती एसटी मधून उतरली. चालत कॉलेजकडे निघाली. तोच एका पिंपळाच्या झाडामागून अचानक बंटी उगवला. एखाद्या खविसासारखा. त्याच्या हातात पेट्रोलची बाटली होती. त्याने क्षणार्धात तिच्या अंगावर ती बाटली उपडी केली. पेट्रोलच्या त्या अचानक हल्ल्याने व वासाने नेहा गडबडली. आणि ती ओरडली. जिवाच्या भयाने किंचाळू लागली. तिला बंटी दिसला होता. तिला धोक्याची जाणीव झाली अन ती ‘नको नको’ म्हणत असताना त्याने झटक्यात काडी टाकून तिला पेटवलं.
तिची साडी सरसरून पेटली. हवेत आधी पेट्रोलचा वास पसरला. मग कापड जळण्याचा आणि मग कातडी जळण्याचा दुर्गंध सुटला.नेहा रडू लागली. ओरडू लागली.वेदनेने किंचाळू लागली. तिचे हात, पाय, पोट, छाती आणि तिचा सुंदर चेहरा जळू लागला. तिचं शरीर म्हणजे एक जळणारं झाड झालं जणू . तिची जळालेली कातडी लोंबू लागली. मऊ मुलायम केस कापरासारखे चरचर जळू लागले. ती सैरावैरा पळू लागली आणि एकदम ती धाडदिशी जमिनीवर पडली. जळतच. एक विचित्र जळक्या देहाचा आकार धारण करून. मानवी कोळसाच जणू!...
-----

गावात ही बातमी आली तेव्हा गावात एकाच हलकल्लोळ माजला. गावकरी शांताबाईंच्या घरासमोर जमले. आरडाओरडा करू लागले. लोक तिच्या आणि पोराच्या नावाने शिव्या देत होते. त्यांचं अख्खं खानदान उद्धरत होते.
तो गलका ऐकून ती बाहेर आली आणि प्रसंग ऐकून तिचं पायातलं त्राणच गेलं. ‘ अगो बया !-’ म्हणत ती खालीच बसली . ’गावातल्या एका चांगल्या ,गोड पोरीवर असा प्रसंग आणि त्यात आरोपी आपलाच मुलगा ?... एकुलता एक ! ’
तिला कशाचा कशाला थांगच लागत नव्हता.
एक बाई म्हणाली, “ काय केलं गं शांते हे तुझ्या पोराने ? त्यापेक्षा वांझोटीच राहिली असती तरी चाललं असतं !...“ हा वार तिच्या जिव्हारीच लागला.
नेहाची तब्येत गंभीर होती. तिची मृत्यूशी झुंज चालू होती.
गाव सोडून पळून जाणाऱ्या बंटीला पोलिसांनी धरलं होतं.
लोक यायच्या आधी तिचा स्वैपाक चालू होता . ती पुन्हा घरात आली . पेटलेली चूल विझायला आलेली , तरी शांताबाईचं त्याकडे लक्ष नव्हतंच. ती थपाथपा बाजरीच्या भाकरीचं पीठ थापत होती, भान विसरून. तिच्या लक्षात आलं तेव्हा तिने फुंकणीने फुंकायची सुरवात केली. खूप फुंकल्यामुळे लाकडं सरसरून पेटली. मोठा जाळ धरला आणि तिच्या हातावर आला. तिला थोडासा चटका बसला आणि ती भानावर आली.
तिला वाटलं –‘बाईची जात ! चटक्याचं काय मोठंसं ? चुलीपुढे कधी ना कधी चटका बसतोच. चटका सहन करण्यासाठीच बाई जन्माला येते. असा नाही तर तसा !... चुलीचा नाहीतर परिस्थितीचा . पण एखादा चटका ?...
... त्या पोरीचं काय झालं असेल ? तिच्या पूर्ण देहाला ज्वाळांनी वेढलं असेल. तिच्या अंगाची काय लाही लाही झाली असेल. तिला किती - किती वेदना झाल्या असतील. असहाय्य ! हाताला तापल्या भांड्याचा चटका बसणं वेगळं आणि अख्ख्या देहाचं चुलाण होणं वेगळं .
लहानपणी साध्या उदबत्तीचा चटका बसला तर बंटी किती रडला होता !
काय भोग आला हा नशिबाला ! - कळेना. का असं झालं ?का केलं असं पोरानं ? का हे पोरगंबी बापावर गेलंय ?’ तिला नवऱ्याची आठवण झाली. ‘तो ही असाच आपल्याला छोट्या - नाट्या कारणावरून मारायचा.बाई ही दासीच का पुरुषाची ? तिने त्याच्या भोवती फिरावं. त्याची सेवा करावी. त्याची शेज सजवावी. मग इच्छा असो की नसो.
कधी संगाला नकार दिला तरी तो मारहाण करायचा…
पुरुषाला बाईचा नकार खपत नाही का ? पुरुष हा कर्ता असतो म्हणून तो बाईला गृहीतच धरतो का ? ’
आज प्रथमच तिला स्वतःच्या गेलेल्या नवऱ्याचा राग आला. त्यानेही दारूपायी तिला कधी प्रेमाने वागवलं नव्हतं का कधी जवळ घेतलं नव्हतं. तिला तिच्या जगण्याचा राग आला. तिने पाहिलेल्या नातवंडांच्या स्वप्नाचा राग आला .
‘नवरा दारुतच गेला .अकाली .आणि आता पोरानेही एका चांगल्या पोरीला पेटवून - स्वतःचीच राखरांगोळी करून घेतली .
नवरा जगातून अन पोरगा हातातून गेला !
काय उरलंय आता आपल्या आयुष्यात ? ‘
फिरून तिच्या मनात पोराचा विचार आला.
‘पोरगं आता पोलिसाचा मार खात असेल. आपण तर जिंदगीमध्ये पोराला कधी साधी चापट मारली नाही. हे आपलं चुकलं का ?....
गावातले लोक बहकले आहेत.गुन्हेगाराला आमच्या ताब्यात द्या, त्याला ठेचून मारा, असंच जाळून मारा ,असं बोलत आहेत. ओळखीचेच लोक जीवावर उठले आहेत.
पण आपला पोरगाही त्या पोरीच्या जीवावर उठला. तोही तिच्या ओळखीचाच होता ना ?’
एकदा तिला पोराची आठवण यायची, माया दाटून यायची. तर एकदा संताप-संताप !...
चूल विझली.भाकरीचं पीठ तसंच राहिलं अन स्वैपाकही. ती तशीच बसून राहिली. चुलीपुढेच. सुन्न. बधिर...उपाशीच .
चुलीतली लाकडं विझल्यासारखं तिचं मनही विझू विझू झालं होतं . तरी मधूनच त्यामध्ये विचारांच्या ज्वाला लसलसत होत्या !...
-----

नेहाच्या आयुष्याच्या दोरीचा एक -एक पीळ सुटत चालला होता. आणि एके दिवशी ती वाईट बातमी आलीच-तिची प्राणज्योत मालवल्याची.
तिच्या आईची अवस्था बिकट होती, म्हणत होती –‘ माझ्या पोरीला जनावरांची डॉक्टर व्हायचं होतं. पण नाही. आणि जरी झाली असती तरी माणसातल्या असल्या जनावरावर ती उपचार करू शकली नसती !…’
शांताबाईनं स्वतःला चार भिंतीच्या आत कोंडून घेतलं होतं. पण तिच्या मनात काय आलं. ती बाहेर पडली. नदीकाठाला निघाली. जिथे अंत्यसंस्कार होणार होते.
नदीकडे जाणारा रस्ता माणसांनी फुलून गेला होता. आजूबाजूच्या गावातले लोकही आले होते . जणू गेली ती आपल्या गावचीच मुलगी होती, अशा भावनेने.
थंडी नव्हती. आभाळ राखाडी. कोंदटलेलं . निसर्गाचं चक्रच बिघडलेलं सालं ! झाडंही स्तब्ध होती . एक पान न हलवता .जणू त्या प्रसंगाची मूक साक्षीदार म्हणून .
एके काळचा तो सुंदर देह जो आता असुंदर होता , पूर्ण पांढऱ्या वस्त्रात लपेटलेला होता.
शांताबाई तिथे पोचली. कोणाच्या नजरेस न पडेलशी . पदर डोक्यावर ओढून. तिने लांबूनच मयतीला नमस्कार केला.
“ बाई, चूक झाली गं. माफ कर. माझ्या पोराच्या वतीने मी तुझी क्षमा मागते ! तुझ्या देहाची राख झाली अन माझ्या आयुष्याची वाट लागली ! आपल्या दोघींचा गुन्हा एकच .तू पण बाई अन मी पण एक बाईच. साली बाईची जातच अशी कमनशिबी !”
-----

आत्तापर्यंत शांताबाई पोलीस कस्टडीत असलेल्या पोराला भेटायला एकदाही गेली नव्हती. अक्ष्या मात्र जुना राग सोडून त्याला भेटून आला होता.
तो शांताबाईंकडे आला. म्हणाला , “ मावशे, बंटी तुझी लय आठवण काढतो. चूक झाली म्हणतो.”
“ आता रे काय उपयोग त्या साऱ्याचा ! मला मेला तो.”
“ तसं नाय मावशे . तो खरंच तुजी आठवण काढतो. अन म्हणाला पैश्याची सोय कर. ती केली तर तो सुटू शकतो . “
“ काय? - कसा ? “
“ कोणी प्रत्यक्ष साक्षीदार नाही. त्यात तिची वाचा गेली. शुद्धही गेली. तिची तोंडी जबानी नाही का लेखी.”
-----

कोर्टात बंटीला पेश करणार होते, त्या दिवशी शांताबाई कोर्टात गेली. सगळीकडे माणसंच माणसं. वकील , पक्षकार अन पोलीस . लोकांची ही गर्दी ! आरोपी पहायला . कदाचित त्या गर्दीत आणि काही पुढचे ,छुपे बंटी लपलेले!... पोलिसांच्या गाडीतून बंटी उतरला. त्याला समोर आई दिसली. तो ओरडला, “ आये s,आज आलीस व्हय ?”
हात बांधलेले , भोवती पोलीसांचं वर्तुळ . अशातच चालत तो आईजवळ आला , तिने त्याच्याकडे एकवार पाहिलं . तिची मुद्राच बदलली .
तिने तिच्या साध्या पिशवीतून प्लॅस्टिकची बाटली काढली. पण त्यात पाणी नव्हतं- तर घासलेट होतं. तिने कुठल्याश्या तिरमिरीत स्वतःच्या पोरावर ते रॉकेल ओतलं. शेजारच्या पोलिसाच्या लक्षात यायच्या आत. त्या पोलिसांनाही धक्काच बसला. तिने पिशवीत काडीपेटी शोधण्यासाठी हात घातला. ती तिला लवकर सापडली नाही. तेवढ्या अवधीत एका पोलिसाने तिला ढकललं. त्याने कृश शांताबाई धाडकन खाली पडली. तो पोलीस तिच्याकडे नुसताच पाहत उभा राहिला .
आणि ती तशीच पडून राहिली. तिला उठावंसंही वाटेना अन ती रडू लागली. आहे त्याच अवस्थेत . जीवाचा आकांत करत.
“तू सुटशील रे एकांद्या वेळी मुडद्या!- पण मी - मी अडकले रे. देवा , मला सोडव यातून . मी आता काय करू ?”
तिचा तो टाहो ऐकवत नव्हता . दोन पोलिसांनी बंटीला लगेच पुढे चालवलं .
तिचा तो काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश पुढे गेलेल्या बंटीच्या कानापर्यंत पोचला की नाही, कोणास ठाऊक ?
तिथून दोन बायका चालल्या होत्या. त्यांनी मातीत बसलेल्या शांताबाईकडे सहानुभूतीनं पाहीलं .
एक बाई दुसरीला म्हणाली , " आत्त्तापर्यंत किती मुलींच्या आयांनी आक्रोश केला असेल, किती गुन्हेगारांच्या आयांनी हाय खाल्ली असेल . पण त्यांचं दुःख ह्या जवानीची मस्ती चढलेल्या , गुर्मी वाढलेल्या पोरांपर्यंत पोचतच नाही . ते कधी पोचणार , कोणास ठाऊक ? “…
डोळ्यातल्या आसवांनी शांताबाईला आता समोरचं धूसर दिसत होतं .
सारंच धूसर ! ...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हे ठिकाण

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

1 May 2020 - 8:04 pm | Nitin Palkar

खूपच छान कथा. सद्यस्थितीचे विदारक वर्णन. नक्की चूक कुणाची...... हा विचार मनात आणणारी कथा.

बिपीन सुरेश सांगळे's picture

1 May 2020 - 9:27 pm | बिपीन सुरेश सांगळे

नितीनजी
खूप आभार .

बिपीन सुरेश सांगळे's picture

1 May 2020 - 9:30 pm | बिपीन सुरेश सांगळे

सदस्य कथा वाचतात . हे आकड्यांवरून कळतं .
प्रतिक्रिया देतातच असं काही नाही .
पण अजिबातच प्रतिक्रिया येत नाहीत , तेव्हा लेखन चुकीच्या ट्रॅक वर आहे कि काय , असं वाटत राहतं .
यावर जाणकार प्रकाश टाकतील काय ?
कळावे आणि आभार .

सौंदाळा's picture

1 May 2020 - 10:49 pm | सौंदाळा

लेखन छान असतं तुमचं नेहमीच
पण तुम्हीदेखील कधीच एखाद्या लेखावर प्रतिसाद दिल्याचं दिसले नाही.
मिसळीत मिसळून राहा, पटलं तर घ्या हा सल्ला नाहींतर सोडून द्या

अभ्या..'s picture

2 May 2020 - 1:22 am | अभ्या..

सर्वानाच लागू होणारा परफेक्ट सल्ला.
बरोबर बोललात सौंदाभाव

सौंदाळा's picture

1 May 2020 - 10:45 pm | सौंदाळा

विदारक सत्य

माझिया मना's picture

2 May 2020 - 12:24 am | माझिया मना
माझिया मना's picture

2 May 2020 - 12:24 am | माझिया मना
नेत्रेश's picture

2 May 2020 - 6:27 am | नेत्रेश

" कोणी प्रत्यक्ष साक्षीदार नाही. त्यात तिची वाचा गेली. शुद्धही गेली. तिची तोंडी जबानी नाही का लेखी"

मग गावात कळले कसे कुणी जाळली ते?

कथेमधुन जळजळीत वास्तव मांडले आहे .

मनाला अंतर्मुख करणारी कथा. बेजबादार लोकांचा वागण्या मुळे निरपराध मुलीला जीव गमावा लागला. अशा अनेक घटना समाजात घडत आहेत. दुर्दैव.

सुचिता१'s picture

2 May 2020 - 2:41 pm | सुचिता१

कथील म्हणून आवडली, पण कथा सत्यघटनेवर आधारित आहे अश्या समाजात आपण राहतोय ही भावना मनाला विषण्ण करतेय .

बिपीन सुरेश सांगळे's picture

2 May 2020 - 9:56 pm | बिपीन सुरेश सांगळे

सौंदाळा खुप आभार
प्रयत्न नक्की करिन

बिपीन सुरेश सांगळे's picture

2 May 2020 - 9:58 pm | बिपीन सुरेश सांगळे

सगळ्या वाचकांचे अन प्रतिसादकांचे खूप आभार