एक दिवा इवलासा
रोज रात्री पेटायचा
अंधार ठेऊन स्वतः खाली
प्रकाश मात्र वाटायचा
मला नवल वाटायचे
अन नाही कळायचे
असे काही वागुन याला
नेमके काय भेटायचे?
मी त्याच्या जवळ गेलो
आणि हा प्रश्न केला
त्याने एका ओळीतच
मला 'ब्रह्मोपदेश' दिला
दुसर्यांसाठी जळण्यातलं
सुख जेव्हा तुला कळेल
"बुध्द" तेव्हा होशील तू
अन तुला मोक्ष मिळेल....
प्रतिक्रिया
20 Dec 2007 - 7:18 pm | स्वाती राजेश
खुपच छान जमले.असाच लिखाण चालू ठेवले तर आम्हालाही अशाच सुन्दर कविता, गझल, चारोळ्या ... वाचावयास मिळतील.
वाट पाहात आहे अशाच लिखाणंची.
20 Dec 2007 - 8:10 pm | सहज
एकदम सहमत. छानच आहे रचना.
20 Dec 2007 - 10:23 pm | विसोबा खेचर
दुसर्यांसाठी जळण्यातलं
सुख जेव्हा तुला कळेल
"बुध्द" होशील तू
अन तुला मोक्ष मिळेल....
वा मन्या! छान लिहिलं आहेस...
तात्या.
20 Dec 2007 - 10:27 pm | मनिष
"बुध्द" होशील तू
अन तुला मोक्ष मिळेल....
ऐवजी
"बुध्द" होशील तू
अन मोक्ष तुला मिळेल....
जास्त गेय वाटते!!! खुपच सुरेख जमली आहे कविता!
21 Dec 2007 - 5:20 pm | मनोज
बदल केला :)
21 Dec 2007 - 1:42 am | प्राजु
दुसर्यांसाठी जळण्यातलं
सुख जेव्हा तुला कळेल
"बुध्द" होशील तू
अन तुला मोक्ष मिळेल....
शेवट एकदम आवडला...
- प्राजु.
21 Dec 2007 - 7:46 am | चित्रा
सोपे शब्द आणि रचना.
21 Dec 2007 - 8:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली.
21 Dec 2007 - 8:58 am | पुष्कर
खूप छान कल्पना आहे. कविता आवडली.
"दुसर्यांसाठी जळण्यातलं
सुख जेव्हा तुला कळेल
"बुध्द" होशील तू
अन तुला मोक्ष मिळेल...."
वा! लय भारी.
जाता जाता एक आगाऊ सल्ला.
"त्याने एका ओळीत
मला ब्रम्हपोदेश दिला"
ह्या ओळीतला तो शब्द खरंतर 'ब्रह्मोपदेश' (ब्रह्म+उपदेश) असा पाहिजे.
-(आगाऊ) पुष्कर
21 Dec 2007 - 5:17 pm | मनोज
पुष्कर धन्यवाद रे.
तू सांगीतलेला बदल केला आहे :).
आपलाच,
मन्या
7 Jan 2008 - 7:43 pm | पुष्कर
शतशः धन्यवाद. हे शब्द ऐकायला माझे कान किती दिवसांपासून आसुसले होते. (हे मी, तू मला धन्यवाद म्हटल्याबद्दल म्हणत नाहिये. 'रे' या संबोधनाबद्दल बोलतोय).
मी सुरुवातीला माझं नाव 'पुष्कराक्ष' असं वापरत होतो. पण नाव मोठं आणि लक्षण खोटं असं वाटायला लागलं. काही जणांनी तर 'पुष्कराक्ष साहेब' वगैरे म्हणायला सुरुवात केली. च्यामारी आता ही तर हाईट होती. पण त्यांचं तरी काय चुकलं म्हणा! हे असलं अडनिडं नाव वाचून मी कदाचित त्यांना कोणीतरी वयस्कर/दाढीवाला/गंभीर प्रवृत्तीचाच माणूस वाटणार! (तसा मीसुद्धा अधनं-मधनं दाढी वाढवतो; दाढी करायचा कंटाळा दुसरं काय!)
मग नंतर मी माझं पुनर्बारसं करून 'पुष्कर' नाव ठेवलं. तरी एकदा कानफाट्या नाव पडल्यामुळे ह्या राव-साहेबांचा ससेमिरा काही सुटला नाही. कधी मी 'पुष्करराव' तर कधी 'पुष्कर साहेब', चुकून कधितरी 'पुष्कर शेठ' सुद्धा झालो. पुष्कर शेठ हे शब्द जेव्हा पहिल्यांदा ऐकले, त्यादिवशी रात्री मला 'मी कुठल्यातरी सावकाराची टोपी डोक्यावर घातलीये, पोट सुटलं आहे, डोळ्यांवर जस्ती काड्यांचा चष्मा लावला आहे, समोर तिजोरीत पैशांची चळत घेतलीये आणि माझ्याकडे उधार मागयला लोक येताहेत' असलं रम्य स्वप्नसुद्धा पडलं होतं
तू पहिल्यांदा मला अरे-तुरे करून आपलासा केलास. माझे कान तृप्त झाले. त्याबद्दल तुझे आभार मानण्याइतकी फॉर्मॅलिटी पाळण्याइतका दुष्ट मी नाही. त्यापेक्षा माझ्याकडून तुला पार्टी. तू कुठे राहतोस तेवढं कळव. मी पुणे, मुंबई दोन्हीकडे आहे. (आमची शाखा कुठेही नाही. आम्हीच वैयक्तिकरित्या दोन्हीकडे येऊन-जाऊन असतो).
-तुझाच,
(अरे-तुरेतला) पुष्कर
21 Dec 2007 - 9:23 am | प्रमोद देव
कवितेतली कल्पना खूपच सुंदर आहे. मात्र शब्दांच्या मांडणीकडे जरा जास्त लक्ष द्यायला हवेय. कवितेच्या प्रांतातले इथेले दिग्गज त्या बद्दल नक्कीच मार्गदर्शन करतील .
21 Dec 2007 - 5:36 pm | मनोज
श्री धंनजय यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार बदल करुन पुन्हा संपादित केली.
सर्वांचे सुचना व प्रतिक्रिया बद्दल आभार.
आपलाच,
मन्या
21 Dec 2007 - 8:31 pm | सागर
मनोज,
अतिशय सुंदर कविता आहे. एकदम मस्त...
तसा मी काही मोठा कवी नाही... पण पहिल्या चार ओळींमुळे मलापण थोडेसे स्फुरण चढल्यामुळे या चार ओळी लिहीत आहे ...
एक घास चिमणासा
पिलाच्या पोटी जायचा
उपाशी राहून स्वतः तरी
पोटचा जीव जपायचा...
लगे रहो... असेच लिहित रहा..
(कवी मन जागे झालेला) सागर
24 Dec 2007 - 4:50 pm | मनोज
धन्यवाद सागर
----
कवी मन असेचा
जागे ठेवा
मिळुदेत रसिकांना
नवनविन मेवा
आपलाच,
मन्या
7 Jan 2008 - 7:53 pm | इनोबा म्हणे
हि कविता नुसतीच आवडली नाही,काहितरी शिकवून गेली...
खुपच छान!कसं काय सुचतं तुम्हाला,देव जाणे!
(कविता'चा बॉयफ्रेंड) -इनोबा