लॉकडाऊन: पाचवा दिवस

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in काथ्याकूट
29 Mar 2020 - 6:12 am
गाभा: 

लाॅकडाऊनमध्ये लोकांना आपली राहती जागा सोडून गावी का जायचा अट्टाहास का असतो हे कळत नाही. मेडिकल सुविधा आणि ट्रान्सपोर्टेशनचा विचार करता आत्ताच्या स्थितीला गावांपेक्षा, मेट्रो शहरं ही सर्वात जास्त सुरक्षित आहेत हे लक्षात घेण्याची गरज आहे.

गावच्या भूमीत करोनाची लागण होणारच नाही अशी सुरक्षिततेची(?) भावना किंवा मुंबई-पुण्यातल्या लहानश्या घरात बसून कंटाळवाणे दिवस काढण्यापेक्षा शेतीत कामे करून वेळ सत्कारणी लावावा ही कारणे त्यामागे कदाचित असू शकतील. कारण काहीही असो, सद्य स्थितीमुळे गर्भगळीत झालेली ही लोक अगदी कुठल्याही मार्गाने का होईना गावी जायचेच या हट्टातून मिळेल त्या गाडीने, हवे तेवढे पैसे खर्चून, किंवा अगदी चालतही गावच्या दिशेने निघाली आहेत.

अशा कठीण प्रसंगी, गावाच्या आसऱ्याला आलेल्या लोकांची मदत करण्याचे सोडून, गावी पोचलेल्या या लोकांना, त्यांचे स्वतःचे गावबांधव गावात उभे करत नाहीयेत, संसर्ग होईल या भितीने सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी भरू दिले जात नाहीये, त्यांच्यासोबतचे सगळे व्यवहार बंद करून अस्पृश्यासारखे वाळीत टाकले जातेय आणि हे सर्वात जास्त धक्कादायक, त्याचबरोबर माणूसकीला काळीमा फासणारे सुद्धा आहे.

लोकांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे खरं तर! सद्य परिस्थिती खूप गंभीर तशीच नाजूकही आहे. आपण सगळे मिळून या परिस्थितीचा सामना नक्कीच करू शकतो. त्यासाठी खालील गोष्टी करण्याची नितांत गरज आहे.

१. या लाॅकडाऊनमध्ये आपले राहते घर ही सर्वात सुरक्षित जागा आहे हे ध्यानात ठेवून आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी घेणे.

२. गावी स्थलांतर केलेल्या लोकांनी आपल्या स्थलांतराची माहिती स्थानिक प्रशासनाला आवर्जून द्यावी.

३. खोकला, किंचितसा ताप ही लक्षणे जाणवू लागल्यास त्वरीत जवळच्या रूग्णालयात तपासून घ्यावे.

४. स्वतःची योग्य ती काळजी घेत, मास्कचा वापर करून आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावे.

५. समाजमाध्यमांवर अफवांचा प्रसार करणे प्रकर्षाने टाळावे, त्यामुळे प्रसंग आणखी बिकट होण्याची शक्यता होऊ शकते.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

29 Mar 2020 - 7:43 am | प्रचेतस

वर्तमानपत्र सध्या येत नसल्याने ईपेपर वाचणे चालू आहे. आता चकवाचांदण वाचतोय.

बाहेरून आलेल्या लोकांना गावात उभे करत नाहीत हे वाचून काही लोकांचे डोळे उघडतील असे वाटते.
पुण्य मुंबई राहून जॉब करायचा, पैसे कमवायचे आणि शहरांच्या आणि तिथला मूळ नागरिकांच्या नावाने खडे फोडायचे आणि सतत गावचे तुणतुणं वाजवत राहायचे त्यांना या निमित्ताने कळेल.

फुटूवाला's picture

29 Mar 2020 - 9:01 am | फुटूवाला

कायप्पा फॉरवर्ड वेगळेच आहेत... आम्हाला गावी येऊ देत नाही आता. मग ते विसरले का जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा आम्हीच मदतीला धावून आलो होतो... वगैरे.....

यूपी बीहार वाले पलायन करायला लागलेत.
बरेचसे अगोदरच पळून गेलेत. राहिलेले क्वारंटाईन असतानाही घोळक्याने तिकडे चाललेत.. या लोकाना परिस्थितीचे गांभीर्य केंव्हा समजणार कोण काणे.
जे तिकडे गेलेत त्यांनी तिथेच रहावे परत येवू नये. असले अडाणी वागणारे लोक पूर्ण देशाला धोक्यात घालताहेत.

संजय क्षीरसागर's picture

29 Mar 2020 - 10:03 am | संजय क्षीरसागर

आता प्रत्येक दिवस रविवार झाला आहे, ज्याची प्रत्येकजण अपेक्षा करत होता ती कल्पना आता प्रत्यक्ष झाली आहे.

थोडक्यात, जीवनात स्वर्ग अवतरला आहे. वर्तमानाशिवाय कुणाच्या हातात काहीही नाही. ही अनमोल संधी समजून पूर्णपणे उपभोगायची का भविष्याची नाहक चिंता करत स्वतःची घुसमट करून घ्यायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2020 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन देवा, काही बासरीवर सूर लावून, हे संकट पळवून लावा. बाय द वे, सध्या सर्वत्र भयंकर दोन गोष्टी दिसल्या एक दिल्लीच्या आनंदविहार स्थानकावर जनतेची झालेली गर्दी आणि पायी आपल्या गावाकडे निघालेले लोक. अनेक मजुर, रोजंदारीवर काम करणारे नागरिक तर रात्री बायका मुलांसह पायी निघाले आहेत कसंही करुन गाव गाठायंच आहे. एकतर शासनाने जिथे असाल तिथे राहा, दोन वेळेची जेवणाची व्यवस्था होईल असे सांगितले पण त्याच्यावर अंमलबजावणी करायला सरकार कमी पडलं. आपत्ती व्यवस्थापनाचे आपल्याकडे धडेद दिलेले नसतात म्हणून अशा प्रसंगी सर्वच भांबावून जातात. स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार महत्वाचा आहे, गल्ली मोहल्ल्यात एकमेकांना आवश्यक काळजी घेऊन मदत करीत राहणे. अफवा नावाची गोष्ट तर सर्वात भयंकर आहे, ती पसरवू नका. आणि आलेल्या फॉर्वर्डसना डिलिट करा. भिती मोठी भयंकर असते. घाबरु नका.

मानसिक स्वास्थ्य सर्वांनीच जपणे गरज आहे. घरात राहिले तर सर्व प्रश्न सुटतील. काही किराणा वस्तू कमी असतील म्हणून गोंधळून जायची गरज नाही. संयमही तितकाच म्हत्वाचा आहे. घरात राहून विनाकारण चीडचीड करु नका. कुटुंबाची काळजी घ्या.

बाकी, रुटीन दिवस. घरच्यांसाठी रामायण सुरु आहे. सर्व दैनिकांची पीडीएफ डालो केली. कविवर्य मोरोपंताची श्लोककेकावली चाळली शब्दार्थासहित असल्यामुळे उगाच वेळ जावा म्हणून वाचतो. बाकी, प्रचेतसशी बुद्धीबळाचा एक डाव होईलच.

घर गुलजार, सुने शहर
बस्ती बस्ती मै, कैद हर हस्ती हो गई
आज फिर जिंदगी महेंगी
और दौलत सस्ती हो गई.

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

29 Mar 2020 - 11:41 am | किसन शिंदे

हातावर पोट असलेला बराचसा कष्टकरी समाज भारतातल्या मेट्रो शहरांमध्ये राहतोय, त्यांचाही विचार करुन हे लाॅकडाऊन लागू करायला पाहीजे होते असे वाटते. लाॅकडाऊनची गरज होती यात वादच नाही, पण या सगळ्या लोकांची आधी व्यवस्थित सोय लावायला हवी होती, त्यांची सखोल माहिती घेऊन. सध्या 'अन्नासाठी दाही दिशा' अशी दशा झालेले हे लोक, काहीच न सुचल्याने आपल्या गावाकडे हजारो किमी पायी निघाले आहेत.

त्याना टाइम लाईन देवून काहिही साध्य झाले नसते.
हातावर पोट असलेल्यांचे लॉजीक काही वेगळेच असते. त्याना कितीही धाकदपटशा दाखवा. ते जोवर त्यांचे काम मालक बंद करत नाही तोवर ते तिथे चिकटून रहातात

किसन शिंदे's picture

29 Mar 2020 - 11:52 am | किसन शिंदे

टाईमलाईनपेक्षा, अशा लोकांची माहिती घेवून त्यांच्या कंत्राटदारांना त्यांची व्यवस्थित सोय लावण्याचे आदेश द्यायला हवे होते. न जाणो हजारो किमी दूर गावाकडे पायी निघालेल्या लोकांमधूनही एखादा भूकबळीचा आकडा येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2020 - 11:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्ताच मन की बाते मधे साहेब नेमकं याच विषयावर बोलले. ''मला माफ करा मला असा ऐनवेळी निर्णय घ्यावा लागला. अनेक गरिबांची दैना होत आहे. वगैरे वगैरे.''
लॉकडाऊनची घोषणा आवश्यकच होती पण तत्पूर्वी काही नियोजन व्हायला पाहिजेच होतं. ''मेरे प्यारे देशवासियो आज रात बारा बजेसे कर्फ्यू रहेगा, कोई बाहेर नही निकलेला'' अहो सेठ, आमच्या राशन पाण्याचं काय ? औषधांचं काय ? पुन्हा दहा मिनिटांनी ट्वीट की राशन पाणी खुला रहेगा, मिलेगा. ज्यांचं पोटच मुळी हातावर आहे, बहुसंखेने तेच आहेत त्यांचा विचार या सर्व लॉकडाऊनच्या भाषणात कुठेच नव्हता. महाराष्ट्र सरकार आपापल्या पद्दतीने शांतपणे मुकाबला करीत होतं. असे वाटते.

वाईट वाटतंय ते सर्व चित्र पाहून आणि काळजीही.

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Mar 2020 - 3:54 pm | ज्ञानोबाचे पैजार

लोक काय दोन्ही बाजूंनी ढोलकी बडवत असतात.

जर लॉकडाउनला थोडा उशीर झाला असता आणि कोरोना त्या काळात पसरला असता तर "मोदीने आधीच भारत बंद केला असता तर कमी हानी झाली असती" असे दुसर्‍या बाजूने बडवले असते.

खांग्रेसचे आदरणिय नेते आणि थिंक टँक राहुलजी गांधीजी यांनी सुध्दा मोदींचे या निर्णयाकरता कौतुक केले.

महाराष्ट्र सरकारच्या बंदच्या आवहानाला कोणी जुमानत नव्हते, सगळे कसे सुरळीत चालू होते.

जेव्हा मोदींनी जनता कर्फ्युचे आव्हान केले तेव्हा या विषयाचा गंभिर पणा लोकांच्या लक्षात आला.

पैजारबुवा,

चौकस२१२'s picture

30 Mar 2020 - 5:09 am | चौकस२१२

अगदी बरोबर पैजारबुवा
आता ऊत येईल " मोदींनी यावं आणि त्याव करायला पाहिजे होता ..."
हे बरेच जन विसरतात कि वेळ नव्हे हि असली विधान करायची ...जरा विचार करा एवढया मोठयाया जनतेला कसा काय नियंत्रण करणार ! त्यात सुद्धा लोकशाही मध्ये
आज जरी काँग्रेस सत्तेत असती केंद्रात तरी त्या सरकारला पण आपण मदतच करण्याचे धोरण ठेवले पाहिजे ...पण आता मस्त संधी "हान टपली मोदींना" हेच धोरण ठेवणाऱ्यांचं मनोवृत्ती ची कीव येते ...आणि वर मखलाशी अशी होते कि .. माझे मत मांडणे हा माझा अधिकार आहे...
टीका जरूर करावी पण केवळ टीकेसाठी नको

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2020 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

की लोक दोन्ही बाजूने बोलत असतात. मागच्या एका प्रतिसादात म्हटलं तसं एक फेब्रुवारीला पहिला रुग्ण डिक्लेयर होऊनही घोषणा करायला २० मार्च उजाडला. केंद्र सरकार उपाययोजनांच्या याबाबतीत किती गंभीर होतं ते दिसून येतं. सरकार कोणत्याही पक्षाचं असतं तरी त्या उपाययोजना जेव्हाच्या तेव्हा करायला पाहिजे तर त्यास जागरूक सरकार म्हटलं पाहिजे.

आज हातावरील काम करणा-यांचे लोंढे रस्त्यावर आले आहेत त्याबाबतितही योग्य नियोजन व्हायला हवे होते दुर्दैवाने ते दिसत नाही.

परदेशातून येणा-या मंडळीना थांबवायची काही तरी उपाययोजना करायला पाहिजे होती किंवा आलेल्या सर्वांना कोणत्या तरी दवाखान्यात देखरेखीखाली ठेवले असते तर देशभर होणारा प्रादुर्भाव थांबवता आला असता. पण दुर्दैवाने सरकार याबाबतीत काही करू शकले नाही हे तितकंच खरं आहे. यात केवळ सरकारला विरोध करायचा म्हणून विरोध नाही आणि तसे वाटत असेल तर विलाजही नाही. पण सत्य ते सत्यच असतं. इतकंच

जाने दो देर आये दुरुस्त आये.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

29 Mar 2020 - 10:28 am | सुबोध खरे

बहुतेक वेळेस गावाला असलेली आई किंवा वडील मुंबई पुण्यात गेलेल्या मुलाला घरी बोलावतात. जसं असेल तसं मीठ भाकरी खाऊन जगू. शेतीतून आलेल्या धान्या वर दिवस काढू पण उपाशी राहू नकोस, परत ये. असे सांगतात.
परंतु याच चाकर मान्यांचे भाऊ बहीण मात्र अगोदरच आमचं जेमतेम चाललंय आणि हे उगाच येऊन एक खाणारं तोंड कशाला वाढवत आहेत याची चिंता करतात.

इतके दिवस नोकरदारांनी पोटाला चिमटा काढून पाठवलेले पैसे खाण्या पिण्यात, उत्सवात, घराची डागडुजी करण्यात संपलेले असतात. त्यामुळे आता हा न आला तर बरे अशी मनोवृत्ती दिसते.

संकटकाळी माणसाची मूळ वृत्ती दिसून येते ही वस्तुस्थिती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2020 - 11:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता अशा प्रसंगात पूर्वीचे सर्व कढ बाजूला ठेवले पाहिजेत . शेतजमीन विकून बायका पोरांसह गाव सोडून गेलेले आता पुन्हा गावाकडे येताहेत. कधी आईवडीलांची आठवण आली नाही. आणि अशा संकटावेळी गावाकडे जावावे वाटते, तिकडे शेतमजूरी करु, कसंही करु, एका भाकरीत चतकोर चतकोर खाऊ म्हणून गावाकडची मंडळी बोलावते. इकडेही आता काम नाही, उपाशी मरण्यापेक्षा गावाकडे काहीतरी सोय होईल अशा अपेक्षेने गर्दी वाढतेय.

प्रचंडं द्वंद्व या विषाणुने निर्मान केलं. साहित्यिक महायुद्धाच्या कथा, कविता लिहायचे. आता कोरोनाच्या कथा, कविता, कादंबरी आणि सामाजिक जीवनावर होणारा परिणाम:एक चिकित्सक अभ्यास. अशा सामाजिक अंगाने विविध पैलूंवर लिहायला खुप कच्चं साहित्य मिळालं आहे. माणसाच्या स्वभावाचे विविध पैलू आताच बघायला मिळताहेत.

-दिलीप बिरुटे

माणसाच्या स्वभावाचे विविध पैलू आताच बघायला मिळताहेत.

या धाग्यावर पण पैलूंचा लख्ख प्रकाश पडला आहे. ;)

ऋतुराज चित्रे's picture

29 Mar 2020 - 11:06 am | ऋतुराज चित्रे

बऱ्याचदा निवृत्त झाल्यावर शहरातील जीवनाला कंटाळून अथवा गावच्या ओढीने गावाला स्थाईक होणाऱ्या चाकरमान्यांची नेहमीच घोर निराशा होते. कोरोनाच्या निमित्ताने हा अनुभव लवकर आला.

किसनदेवा, गंभीर पण आवश्यक वळण घेतलंत. शहरात WFH सवलत असणाऱ्या गटापेक्षा एक मोठा वेगळ्याच जगातला गट आहे. त्यांच्या समस्या वेगळ्याच.

बोलघेवडा's picture

29 Mar 2020 - 1:44 pm | बोलघेवडा

या निमित्ताने असे वाटते की इथून पुढे सर्वच देशांना फार organised पद्धतीने फेर मांडणी करावी लागणार आहे. लोकसंख्येला आवर घालावाच लागेल. ज्यांचे पोट हातावर आहे अश्या वर्गासाठी आपत्कालीन काळात योजना तयार करणे. ह्या वर्गाने सुद्धा सतत प्रत्येक गोष्टींसाठी सरकार वर अवलंबून न राहता स्वतःचा मार्ग शोधून स्वयम् सिद्ध केला पाहिजे.

अर्थात हे सर्व स्वप्न रंजन आहे हे माहीत आहे पण अंतिम सत्य हेच आहे.

माहितगार's picture

29 Mar 2020 - 2:37 pm | माहितगार

भारतातील गावांची एकुण संख्या साडे सहा लाखांच्या घरात जाते. (शहरी गल्ल्यांची संख्याही तेवढी होण्यास हरकत नसावी) आर्थिक विकास भरधाव असता तरी वीषाणू चाचण्यांच्या अती अती अती अल्प सुविधा ते १२ लाख वीषाणू चाचणी केंद्रे असा आकडा साध्य करण्यासाठी प्रगत देशांनाही दहा वर्षे लागणे सहाजिक असावे. दहा लाखात दहा चाचण्या आणि अगदी दहा हजार चाचण्या झाल्या तरी असा आकडा एका अर्थाने फसवाच ठरतो कारण उरलेल्या चाचणी न झालेल्या ९० टक्क्यात वीषाणू बाधीत शिल्लक राहू शकतोच. तेव्हा केवळ चाचणी सुविधांवर विसंबणे तर्कपूर्ण ठरत नाही. दुसरी कडे १००% जनता कर्फ्यू पण शक्य नसतो अगदी आदर्श स्थितीतही किमान अत्यावश्य्क सेवांचे कर्मचारी बाहेर रहातातच आणि त्यांच्याकडूनही संसर्ग पसरू शकतो त्यामुळे चाचणी सुविधांची जोड सुद्धा अत्यावश्य्क ठरते.

चाचणी सुविधांचा अभाव असताना जनता कर्फ्यूवर विसंबण्याचा निर्णय सुद्धा सयुक्तीक आहे. इमर्जंसीत काटोकोर प्लानिंग हे अपवाद असतात. चीन प्रमाणे आधीपासूनच एकाधिकारशाही असेल तर वेगळी बाब अन्यथा जगातल्या कोणत्याही शासनाला सहसा पूर्ण मायक्रो मॅनेजमेंट सहज शक्य नसते. त्यामुळे जनतेच्या गैरशिस्तीचा दोष सर्वथा शासनाच्या डोक्यावर फोडणे सयुक्तीक ठरत नाही. मोदींनी दुसर्‍या भाषणात जनता कर्फ्यू एवजी सामान्य जनतेस अद्याप फारसा ठाऊक नसलेले लॉक डाऊन आणि सोशल डिस्टंसीग सारखे शब्द वापरले. सोशल डिस्टंसींग म्हणजे किमान सहा फूट अंतर ठेवणे आणि अंतर ठवूनही गर्दी टाळण्याचे महत्व नीटसे सांगितले गेलेच नाही.

ऑफीसच्या रेगुलर वेळांच्या काळात पब्लिक आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट बंद ठेऊन तो इतर वेळी गर्दी न होणार्‍या वेळेत अहोरात्र आणि चढ्या किमतीत देणे शक्य झाले असते, जिवनावश्य्क गोष्टीच्या उपलब्धतेच्या वेळा कमी करण्या एवजी वाढवून तीन एके महिन्यांची खरेदी एकाच वेळी आर्थिक उचली सहीत दिली असती तर दुकानांमधली परत परत होणारी गर्दी टळली असती. भाजीच्या फिरत्या हातगाड्यांना पोलीस नेमके पिटाळत होते उलट गर्दी कमी होण्यासाठी त्यांना मास्क हातमोजे देऊन त्यांच्यावर विसंबणे चांगले झाले असते. पब्लिक ट्रान्सपोर्टच्या तिकीट किमती आणि प्रायव्हेट पॅसेंजर ट्रान्सपोर्ट करता पेट्रोलचे डिझेलचे भाव सॉलीड वाढवले असते तर लोकांनी सूट्टीसाठी गावी पळण्याचा प्रकार केले नसते. स्थलांतरीतांची गावी जाण्याची इतर बहुतेक कारणे अस्विकार्य ठरतात, जर गावी कुणी नसतेच तर आहे तिथेच मार्ग काढला असता ना ? शहर पातळीवर मिनीमम वेजेस -ज्यात काम न किळाल्यास ९० दिवसाचे सेव्हींग - ठेवण्याचे कायदे करण्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार असते तर स्थलांतराचे प्रमाण मर्यादीत राहीले असते, तसे परतण्याचे प्रमाणही कमी राहीले असते.

२१ दिवसांचा जनता कर्फ्यू पूर्ण करण्या शिवाय पर्याय नाही पण मास स्थलांतरांमुळे तांत्रिक दृष्ट्या आजार पसरण्यावरील नियंत्रण हरवले आहे. शहरांप्रमाणे ग्रामीण भागात जनता कर्फ्यू पुर्णत: यशस्वी करणे अशिक्षीत आणि सहकार्य न करणार्‍या जनतेच्या बळावर शक्य नाही आणि २१ दिवसांनतर भारतात आजार पसरण्यावर नियंत्रणही आता शक्य नाही. २१ दिवसानंतर भारतभर जनता कर्फ्यू चालू ठेवणे अथवा दोनेक वर्षांच्या आत पुन्हा लावणेही अवघडच असावे. उरलेला मार्ग पब्लिक ट्रान्सपोर्टचे रेट भरपूर वाढवून वाचवलेल्या पैशात चाचणी सुविधां आणि वैद्यकीय सेवा मास्कचा वापर यावरील गुंतवणूक वाढवणे हाच वाटतो.

साहेब..'s picture

29 Mar 2020 - 4:31 pm | साहेब..

चेस कोणी खेळणार असेल तर मी आहे खेळायला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2020 - 6:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिंक द्या..आलोच.

-दिलीप बिरुटे

साहेब..'s picture

29 Mar 2020 - 6:22 pm | साहेब..

लिंक पाठवली आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2020 - 8:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण तुम्ही खेळला नाहीत. मी वाट पाहिली.
जाने दो, उद्या तुम्हाला वेळ असेल तेव्हा खेळु.

तुमचा स्कोर पाहता. आमची काही मिनिटांत छुट्टी कराल.
असे दिसते. तरीही खेळू.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

29 Mar 2020 - 5:44 pm | चौथा कोनाडा

काही लोकांसाठी लॉकआऊटचा काळ दुर्दवी ठरतो आहे. विशेषतः जे लोक रोजंदारीवर काम करताहेत. यांना रोजचा पगार कोण देणार, पक्षी खायला कोण देणार ?

टीव्हीवर मजुरांचे लोंढे गावी परतण्यासाठी बसस्थानकावर गर्दी करताहेत ही दृष्यं पाहून वाईट वाटल. शासन आणि संबन्धितांनी अजूनही त्यांच्या गावी जाण्याची सोय केली (सामाजिक अंतर वै राखून) तर योग्य काम होईल, किंबहुना यंत्रणेने अश्या विविध लोकांना मदत केलीच पाहिजे जेणे करून लॉकडाऊन आणि सामाजिक अंतर यशस्वी होईल.

चौथा कोनाडा's picture

29 Mar 2020 - 5:53 pm | चौथा कोनाडा

वरिल प्रतिसादात पहिल्य परिच्छेदातील वाक्य असे वाचावे.

यांना रोजचा पगार कोण देणार: पक्षी खायला कोण देणार ?

जुइ's picture

29 Mar 2020 - 7:46 pm | जुइ

आमचा अमेरिकेतील अधिकृत लॉक डाऊनचा पहिला दिवस पार पडला. तसे पाहिले तर सरकारी आवाहनानुसार लॉक डाऊन गेले दोन आठवडे चालू आहे. शाळा बंद झाल्या, जे लोक घरून काम करू शकतात ते घरून काम करू लागले. अगदी गरजेपुरतेच बाहेर पडा इत्यादी. रस्त्यांवर अगदी तुरळक गर्दी जाणवू लागली. पेट्रोलचे भाव उतरले तर दुकानांमधून टॉयलेट पेपर, जंतुनाशक वाईप्स , सनिटायझर्स गायबले. तांदूळ, डाळ इत्यादी सारखे धान्य लोकांनी वर्षभरासाठी भरून ठेवले. याला प्रगत देशातील पॅनिक बायिंग अ‍ॅटॅक म्हणावा का?

लहान मुले आपल्या सवंगड्यांना लांबून हात दाखवून अभिवादन करण्यात समाधान पावू लागली. बाहेर सायकल चालवणे थोड्या वेळेसाठी या गोष्टी होवू लागल्या. अंगणात मुले खडूने मोठे बदाम आणि इंद्रधनुष्य अशी मनाला प्रफुल्लित करणारी चित्रे काढू लागली. मात्र ही पोस्ट लिहिताना अमेरिकेतल्या मृतांची संख्या दोन हजारावर गेली आहे.

तसे म्हणायला यंदा आमच्या राज्यातील नेहमीच्या प्रदीर्घ हिवाळ्याने लवकरच आपले बस्तान आवरले. नुकताच वसंत ऋतू सुरू झाला आणि बर्फाचे ओढे वाहू लागले. निरनिराळे उन्हाळी पक्षी परत आले. त्यांचे मधुर कुजन ऐकू येऊ लागले. हे सगळे अनुभवायला बाहेर निवांत खेळायला मुलांची वसंत ऋतूची सुट्टी उद्या पासून चालू होते आहे.
पण... तो पर्यंत करोना व्हायरसने आपले जाळे अगदी सर्वदूर पोहोचवले.

ऑफिशियल लॉक डाऊनची सुरवात अखंड पावसाने झाली. आम्ही वाण सामान तसेच गरजेच्या वस्तूंचे नीट नियोजन करून ठेवले. जेणेकरून सतत दुकानांमध्ये जायची गरज भासू नये. विकांत असल्यामुळे घरातील सामानाची आवरा आवर करण्यात बराच वेळ गेला. मुलीने तिचा बराच वेळ चित्र रंगवण्यात घालवला. बालवाडीतील तिच्या शिक्षिकांनी त्यांचे व्हिडियो तयार करून पाठवले, तसेच वर्गातील गाण्यांचे तुनळीचे व्हिडियो पाठवले. ते पाहण्यात तिचा बराच वेळ गेला. एकंदरीत पहिला दिवस बरा गेला. तरी गेल्या दोन आठवड्यांपासून लेक आणि नवरा चोवीस तास घरात असल्याचे मानसिक दडपणामुळे डोक्यावर बर्फाची लादी ठेवली आहे!

येथील शैक्षणिक वर्ष अजून संपले नाहीये. त्यामुळे मोठ्या मुलांना ऑनलाईन अभ्यासक्रम देऊन ते पूर्ण करून करतील. मात्र बालवाडीतील मुलांसाठी घरी मन रमवण्यासाठी अनेक उद्योग इंटरनेट उपलब्ध आहेत. रोज नवीन काहीतरी करत राहावे लागते. लेकीचा बराच वेळ बर्ड फिडरवर आलेले पक्षी पाहण्यात जातो.

आता अमेरिकेतल्या बर्‍याच दुकानांनी कर्ब साइड पिकअप सोय (ज्यांनी पूर्वी केली नव्हती) सुरू केली आहे. ऑनलाईन ऑर्डर केल्यास आपले सामान थेट दुकानाच्या पार्किंग लॉटमध्ये आणून दिले जाते.

भारतातील हातावर पोट असणार्‍यांच्या बातम्या ऐकून मन द्रवते. तसेच आई वडिलांची फोनवरून चौकशी करणे यापलीकडे काही मदत करता येत नाही याचा मनाला रोष जाणवत राहतो. पण म्हणतात ना की ये भी दिन जायेंगे! हा आशावाद कायम ठेवून हात धूत राहणे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2020 - 8:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामान ऑर्डर केल्यावर थेट पार्किंग लॉट मधे ही चांगली सोय. आपल्याकडे फेरीवाले येतात पण रिस्क नको असे वाटते. बाकी सर्वच काळजी घ्या.

बाकी, यहभी दीन बदल जायेंगे हा आशावाद आहेच.

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

29 Mar 2020 - 8:02 pm | चौकटराजा

इथे बर्याच लोकाना व्हायरस हे किती हुशार असतात , किती पटकन बदल हे स्वत: त करून घेतात याची जाणीव नसावी. आपण फक्त आपले सोशल इकोनिमिक जीवनाचा विचार करतो . आपल्या बयोलोजिकल जीवनाचा विचार कुणी करायचा ? माणूस स्वत: त जैविक बदल करण्यात फार मागासलेला आहे म्हणून कोणतीही तयारी नसताना असा टोकाचा निर्णय सरकारला घ्यावा लागत आहे. 1918 च्या साथीत मुम्बईत आठवड्याला 8000 माणसे मरत असत. प्रेत जाळायला लाकडे नव्हती म्हणून नद्यामधे ती फेकून द्यावी लागत. कारण त्यावेळी आजच्या इतकी शास्त्रीय समज न लोकांची होती ना सरकारची. आताचा लॉक डाउन हा देखील 100 टक्के यशाची खात्री देऊ शकत नाही. निसर्गाच्या प्रचण्ड ताकदी पुढे हा प्रयत्न तसा तोकडा पण अपरिहार्य आहे. कारण टेस्ट किट हे अभियांत्र्तिकी तंत्र आहे लस हे नाही. लस म्हणजे संजीव कपूर ची रेसिपी नव्हे. असो.

आज बॉन्ड, मिशन इम्पोसिबल यांचे बिहांईंड द सीन चे व्हिडिओ पहात आहे. सकाळी वॉक ( माझ्या मजल्यावर 70 फूट लाम्बीचा कॉरेडोर आहे ) वसंत प्रभू -लता कम्बो ऐकत केला. दुपारी कुमार1 यांचा फोन आला होता त्याना एक्ज़ाम हा चित्रपट पहाण्यासाठी शिफरस केलीय ! येस मुव्हीज वर फुकट आहे ! हॅपनिग हा चित्रपट ही चांगला आहे.

> "खोकला, किंचितसा ताप ही लक्षणे जाणवू लागल्यास त्वरीत जवळच्या रूग्णालयात तपासून घ्यावे."

अशी बारीकसारीक लक्षणे दीसु लागली तर घरीच सेल्फ क्वारंटीन करावे. तसेही करोना झाला की नाही हे तपासण्याची कीटस खुप मर्यादीत आहेत व त्यावर काही प्रभावी औषध नाही. त्यामुळे जरी झाला असेत तरी रूग्णालयात जाउन आणखी ५ - १० लोकांना देण्यापेक्षा, घरीच आयसोलेट होणे चांगले. आणी करोना झाला नसेल तर तर रूग्णालयात जाउन होण्याची शक्यता जास्त आहे.

नीदान अमेरीकेत तरी हेच लॉजीक आहे. अशा साधारण लक्षणांची लोक दवाखान्यात जाउन ४ - ५ तास बसुन न तपासताच घरी पाठवत आहेत. करोनाच्या त्पासणीसाठी अपॉईंटमेंट घेउन जावे लागते, आणी अपॉईंटमेंट फक्त जास्त सीरीयस लक्षणे असणार्‍यानांच मिळत आहे.

विजुभाऊ's picture

30 Mar 2020 - 10:08 am | विजुभाऊ

गेले दोन दिवस कायप्पा बंद ठेवलय.
सुखात आहे त्यामुळे.
अख्खा दिवस मोबाईलच्या चौकटीत मुंडके खुपसून बसणे थांबले.
विरोधी मत असलेल्या प्रत्येक मेसेज वर आपण व्यक्त झालो नाही तर जगबुडी येईल हे मत निवळलेय.
आपल्या मेसेजवर कोणी काही कोमेंट्स टाकली तर ती स्वतःला लावून घ्यायची सवय मोडायला आलीय.

लाॅकडाऊनमध्ये लोकांना आपली राहती जागा सोडून गावी का जायचा अट्टाहास का असतो हे कळत नाही. मेडिकल सुविधा आणि ट्रान्सपोर्टेशनचा विचार करता आत्ताच्या स्थितीला गावांपेक्षा, मेट्रो शहरं ही सर्वात जास्त सुरक्षित आहेत हे लक्षात घेण्याची गरज आहे.

मागे वळून पाहताना, हा पॅरेग्राफ बदलावा लागेल हे नक्की..