हात, जंतू, पाणी आणि साबण

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
18 Mar 2020 - 8:27 am

‘करोना’च्या जागतिक साथीमुळे वैयक्तिक स्वच्छतेबाबत बरीच चर्चा सर्वत्र होत आहे. रोगप्रसार कमी होण्याचे दृष्टीने त्याचे महत्व नक्कीच आहे. क्षणभर आपण ही साथ बाजूला ठेवू. कुठलाही संसर्गजन्य रोगप्रसार टाळण्याचे दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता ही कायम खूप महत्वाची आहे. त्यातील एकाच महत्वाच्या पैलूकडे या लेखाद्वारे लक्ष वेधत आहे आणि तो म्हणजे आपल्या हातांची स्वच्छता.

आपले हात शास्त्रीयदृष्ट्या स्वच्छ कसे करावेत यावर काही मूलभूत माहिती देत आहे. वरवर पाहता हा विषय सामान्यज्ञान किंवा शालेय पातळीवरचा वाटेल. पण वास्तव तसे नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य लोक ही क्रिया उरकून टाकल्यासारखी करतात. हात धुण्याची महत्वाची कृती ही कायम व्यवस्थित व्हावी या उद्देशाने काही सूचना करतो. आपणही आपापले अनुभव लिहा. ही चर्चा सर्वांसाठी आरोग्यदायी व्हावी ही इच्छा.
.........

१. हात धुण्यासाठीचे पाणी स्वच्छ आणि वाहते असावे. ते गार किंवा गरम याने फरक पडत नाही. फक्त हात जर तेलकट असतील तर गरम असल्याचा फायदा होतो.
२. धुण्याची क्रिया किमान २० सेकंद झाली पाहिजे. जरा आजूबाजूस निरीक्षण केल्यास असे दिसेल, की बरेच लोक हे काम ३-४ सेकंदात उरकतात, अगदी पाटी टाकल्यासारखे.

३. हात धुताना ते खरखरून घासले पाहिजेत.
४. बहुतेक लोक फक्त हाताचा तळवा वरवर धुतात. हात नीट धुताना तळहाताची खालची बाजू आणि हातांची मागची बाजू ही देखील नीट धुतली पाहिजे.

५. साबणाचा वापर : हा या प्रक्रियेतील कळीचा मुद्दा आहे. आता साबणाच्या वापराने काय फायदे होतात ते पाहू.

इथे एक मुद्दा स्पष्ट करतो. साबणाचा एक गुणधर्म म्हणजे तो surfactant असतो. आपण हातांनी विविध कामे करताना त्यांच्यावर कमी अधिक प्रमाणात मेदाचा थर जमा होतो. नुसत्या पाण्याने हात धुताना हा थर सहज निघून जात नाही. याचे कारण म्हणजे पाणी आणि मेद ही दोन एकमेकात न मिसळणारी माध्यमे आहेत. त्या दोघांच्या संपर्कात साबण सोडला की मग मात्र ‘इमल्शन’ तयार होते आणि परिणामी त्वचेवरील मेदाचा थर पाण्याबरोबर छान निघून जातो. आता हाताला लागून आलेले जीवजंतू आणि साबण यांचा संबंध पाहू. करोना आणि अन्य काही जंतू यांच्या पेशीभोवती मेदाचे आवरण असते. जेव्हा आपण साबणाने हात धुतो त्यावेळेस हे आवरण तोडले जाते. साबणाचा वापर करीत हात खसाखसा चोळले की हातावरचे काही जंतू फुटून जातात. त्वचेला साबण लावल्याने ती निसरडी होते आणि त्यामुळे तिथले जंतू पाण्याबरोबर वाहून जातात. साबणवापराचे असे हे फायदे आहेत.

६. आता कुठल्या प्रकारचा साबण वापरावा, हा पुढचा मुद्दा. साबणाचे साधारणपणे उपलब्ध असलेले दोन प्रकार म्हणजे वडी आणि द्रवसाबण. हे दोन्ही प्रकार वापरून काही संशोधन अभ्यास झालेले आहेत. त्याबद्दल आता पाहू.

आपल्याकडे वडीचा वापर खूप होतो. अनेक जण लागोपाठ एकच वडी वापरतात तेव्हा ती सतत ओली राहते. त्यामुळे तिच्यावर धुणाऱ्याच्या हातातून आलेले जंतू राहू शकतात. मात्र हे जंतू पुढील हात धुणाऱ्याला ‘हस्तांतरित’ होत नाहीत असे आढळले आहे. त्यामुळे वडीबद्दल अकारण गैरसमज नको. फक्त एक काळजी सर्वांनी घ्यावी. एखाद्याने हात धुतल्यावर ती वडी पुरेशी कोरडी व्हावी. मग दुसऱ्याने तिचा वापर करावा. आपण वडीला हात लावण्यापूर्वी जर ती बुळबुळीत दिसली तर ती आधी पाण्याखाली धुवावी आणि मगच वापरावी.
द्रवसाबणाच्या वापराने अर्थातच वडीच्या तोट्यापासून सुटका होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर प्राधान्याने व्हावा.

७. हात धुवायला साबण की सॅनिटायझर , हा सध्याचा बहुचर्चित मुद्दा आहे. सॅनिटायझरमध्ये दोन प्रकार असतात – अल्कोहोलयुक्त आणि विरहित. अल्कोहोलयुक्त प्रकाराला जंतुनाशक गुणधर्म आहे. त्यासाठी त्यातील अल्कोहोलचे प्रमाण ६२% असणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण जनतेसाठी साबणाने नीट हात धुणे हे पुरेसे आणि योग्य आहे. संसर्गजन्य रुग्णाशी जे लोक थेट संबंधित आहेत त्यांच्यासाठी सॅनिटायझरची शिफारस केली आहे. तसेच ज्या परिस्थितीत वाहते पाणी, साबण आणि हात धुण्याची जागा उपलब्ध नसतात, त्या वेळीही ते वापरावे.

८. हात धुऊन झाल्यावर ते कशाने पुसावेत? हाही एक महत्वाचा मुद्दा.
धुतलेले हात कोरडे करण्यासाठी दोन पर्याय आहेत – कापड व कागदी रुमाल. घरगुती वापरासाठी कापड योग्य वाटते. असे हात पुसायचे कापड रोज स्व‍च्छ धुवून उन्हात वाळवलेले असावे. ही काळजी बऱ्याच घरांत घेतली जात नाही.

कागदी रुमालाने हात कोरडे करण्यात अजून एक फायदा आहे. कागद त्वचेवर अगदी घासून फिरवता येतो आणि त्यामुळे पूर्ण कोरडा होतो. घासण्याच्या क्रियेने हातावरील उरलेसुरले जंतू निघून जातात. हे पाहता सार्वजनिक ठिकाणी कागदी रुमालाचा वापर योग्य वाटतो.
सारांश: हात कशानेही पुसले तरी ते अगदी कोरडे करणे महत्वाचे.

९. कोणत्या परिस्थितीत हात नीट धुणे अत्यावश्यक आहे? शौचालयातून बाहेर आल्यावर, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी हात धुणे या मूलभूत गोष्टी आपण जाणतो आणि पाळतो. या व्यतिरिक्त काही मुद्द्यांचा उल्लेख आवश्यक वाटतो.

a. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास भेटण्याआधी आणि नंतर.
b. बाळांचे लंगोट बदलल्यानंतर
c. आपल्या तोंडापुढे हात धरून शिंकल्या वा खोकल्यानंतर
d. पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर
e. कचरा हाताळल्यानंतर.

जेवणापूर्वी हात धुण्याची सवय बहुतेक घरांत बहुतांश वेळा पाळली जाते. परंतु सार्वजनिक ठिकाणी मात्र बरेच लोक याचा आळस करताना दिसतात. जरा मंगल कार्यालये, उपाहारगृहे आणि प्रवासातील निरीक्षण करून पाहा. हे चित्र बिलकूल समाधानकारक नाही. बफेसाठी रांग लावण्यापूर्वी हात धुवून येणारे लोक अत्यल्प आहेत. काहींना या कृतीचा जाम आळस आहे तर काहींना त्यात कमीपणाही वाटतो ! “इथे काय चमच्यानेच तर खायचे आहे”, असा युक्तिवाद करणारेही आढळतात. पण जेवताना रोटी तोडणे आणि लिंबू पिळणे ही कामे तरी आपण हातानेच करतो, याचा त्यांना विसर पडतो. अशा प्रसंगी जे काही मोजके लोक हात धुवून जेवायला येतात त्यांच्याकडे उपेक्षेने पाहिले जाते.

प्रवासातील खाण्यादरम्यान तर हातांची स्वच्छंता हा विषयच अनेकांनी धाब्यावर बसवलेला दिसतो. यामध्ये जाणीवपूर्वक सुधारणा व्हायला हवी.

१०. सध्याच्या युगात आपण दिवसभर अनेकवेळा मोबाईल आणि कम्प्युटर हाताळतो. त्यामुळे मोबाईलचा पडदा आणि कम्प्युटरचा कीबोर्ड यांच्यावरही अगणित जंतू जमा होतात. या उपकरणांची योग्य ती स्व‍च्छता नियमित करावी. त्यात हलगर्जीपणा करू नये.

“हातांची नियमित स्व‍च्छता राखल्यास संसर्गजन्य रोग पसरणारच नाहीत का?” असा युक्तिवाद कधीकधी केला जातो. कुठल्याही रोगाचा १००% प्रतिबंध शक्य नाही हे बरोबर. परंतु काही मूलभूत स्वच्छता पाळल्यास रोगप्रसार रोखला जातो हे निःसंशय. म्हणूनच सामाजिक आरोग्याचे दृष्टीकोणातून हातांची स्व‍च्छता हा विषय अत्यंत महत्वाचा आहे.

…….
समाजात काही भीषण रोगांची साथ आल्यानंतर वैयक्तिक स्व‍च्छतेचे मुद्दे खूप चर्चिले जातात. कालांतराने आपल्याला या सगळ्याचा विसर पडतो. व्यवस्थित हात धुण्याची सवय ही खरे तर कायमस्वरूपीच हवी. ही साधी गोष्ट वारंवार सांगायची आणि चर्चेला घ्यायची वेळ यायला नको. दरवर्षी १५ ऑक्टोबर हा ‘जागतिक हातस्वच्छता दिवस’ म्हणून पाळला जातो. वास्तविक असा ‘दिन’ ठेवण्याची वेळ यावी हे खेदजनक आहे. सध्याच्या जागतिक साथीच्या निमित्ताने जगातील सर्वच नागरिक ही आरोग्यविषयक मूलभूत गोष्ट कायम आचरणात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
*********************************************

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

18 Mar 2020 - 8:32 am | कुमार१

सॅनिटायझर मधले अल्कोहोलचे प्रमाण कमीत कमी ६२% असावे.

उत्तम विस्तारपूर्वक माहिती.याची सर्वांनाच आज आणि यापुढेही कायम जाणीव हवी. साथ संपल्यावर सगळे गाडे पूर्वपदावर न येता रोगप्रसाराला अटकाव करणारा हा सोपा उपाय सर्वांनीच लक्षात ठेवायवा हवा आहे.

बोलघेवडा's picture

18 Mar 2020 - 11:25 am | बोलघेवडा

शौचासाठी संडास वापरा आणि हात धुवा हे सांगण्याची वेळ यावी ही मोठी शोकांतिका आहे.

याचबरोबर रस्त्यावर थुंकणे, नाकात बोटं घालणं, नख खाणं यावर ही काहीतरी करायला हवं

कुमार१'s picture

18 Mar 2020 - 11:37 am | कुमार१

* याचबरोबर रस्त्यावर थुंकणे यावर ही काहीतरी करायला हवं

माझा एक प्रयत्न (अन्यत्र लिहिलेला प्रतिसाद पुन्हा डकवतो) :

माझे एक ठरलेले रिक्षाचालक होते. ते त्यांच्या गाडीला पोटच्या मुलीप्रमाणे जपतात. ती नेहमी स्वच्छ, नियमित देखभाल केलेली असते. त्यांना फोन केला असता रात्री अपरात्री देखील येण्यास तयार असतात. या चालकांची एकच वाईट सवय म्हणजे गाडीतून तंबाखूच्या पिंका रस्त्यावर टाकत राहणे. अक्षरशः दर पाव किमीला एक पिंक टाकतात.
वर्षभर त्यांच्याबरोबर प्रवास झाल्यावर जवळीक झाली होती. आता मी तो थुंकायचा विषय काढायचे ठरवले.

दरम्यान आमच्या भागात एक सुखद घटना घडली. सुमारे ३०० रिक्षाचालकांनी रस्त्यावर न थुंकण्याची जाहीर शपथ घेतली आणि या घटनेला वृत्तपत्रात ठळक प्रसिद्धी मिळाली.
आता मला आमच्या चालकांबरोबर प्रवासाचा योग आला. मग हळूच सुरवात केली, "तुमची गाडी एक नंबर आहे, तुम्ही कधीही व कुठेही येता, मीटर प्रमाणेच चालता… हे खूप आवडते. आता फक्त एक सुचवतो. तेवढे थुंकणे आणि एकूण तंबाखूच सोडता येईल का ? तंबाखू तुमच्या तब्बेतीसाठी आणि थुंकणे आपल्या स्वच्छ भारतासाठी !"
पुढे मी त्या ३०० चालकांच्या शपथेचा उल्लेख केला. मला वाटले की त्यावरून ते हा मुद्दा गांभीर्याने घेतील.

पण…..
झाले उलटेच ! माझ्या बोलण्यावर ते फाडकन म्हणाले, " मी तंबाखूवाला आहे. मी कशाला त्या शपथविधीत सहभागी होऊ ? लै लहानपणी हे व्यसन लागलेय, नाय सुटणार".
यावर मी फक्त बघा प्रयत्न करून, एवढेच म्हणालो.
….
प्रबोधन ही गोष्ट महाकठीण असते एवढे मात्र यातून शिकलो.

नमकिन's picture

21 Mar 2020 - 4:16 pm | नमकिन

प्रबोधन करण्यासाठी एकदा सांगितले तर बघूया ऐकतायत का, असं होत नाही.
तिन्ही त्रिकाळ कानी कपाळी घोकून घोटवून अंमलबजावणी बदल घडवून आणण्यासाठी चिकाटी हवी.
समोरच्या व्यक्तीला, आपल्या स्वत:ला लाख कोटी वाईट वाटले तरी पाठपुरावा करावा, निर्भीड होऊन कर्म करीत राहणे म्हणजे प्रबोधन.
असे सोडू नका त्यांना पिचकारी मारणं हा त्यांचा जन्म सिद्ध अधिकार नाही दाखवाच. आता १०००रूपये दंड ठोठावला आहे, एकदा भरायला लावा, साक्ष द्या पण खपवून घेणार नाही असे दरडावून सांगायचे तर प्रबोधन.
मी माझ्या ३ री शिकणाऱ्या मुली सोबत रिक्षा चालक रस्त्यावर तंबाखू गुटखा थुंकला तर मला माझ्या मुलीने निदर्शनास आणून दिले. २-३किमी अंतर होते. एकदा थुंकला तो. उतरताना मी त्याला म्हणालो की माझ्या मुलीला काही सांगायचं आहे. मुलीने सांगितले की रस्त्यावर थूंकू नका, रोग पसरतो.
मग मी त्याला समजावले की आपण जागरूक नागरिक म्हणून आपली पूढील पिढीला जास्त जाणीव आहे, शाळेंत शिकवतात. आदर्श आपण तयार नाही केले तर ते काय बघणार की पुस्तकात आहे ते वास्तवात नसते. वरमला रिक्षा चालक, आगे खयाल रखेंगे, अब आदत हो गई तंबाखू गुटखा की.
स्वच्छ भारत!

कुमार१'s picture

21 Mar 2020 - 6:03 pm | कुमार१

चिकाटी हवी हे अगदी बरोबर.

वरच्या प्रसंगात मी त्यांना एकदा सांगितल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात खूप वेळा सांगून पाहिलेले आहे. शेवटी मी त्यांना सोडून दुसरे निर्व्यसनी चालक पकडले.
सध्या रस्त्यावरील बेशिस्तीत अनेक प्रकार असतात. त्यापैकी “सिग्नल तोडू नका, उलट्या दिशेने वाहनावर येऊ नका”, असे प्रबोधन मी सतत करतो. अर्थात उपयोग होत नाही. आजपर्यंत फक्त एक व्यक्ती मला ‘सॉरी’ म्हणाली. बाकी दुर्लक्ष, तिरस्कारयुक्त कटाक्ष किंवा खालील वाक्ये भरपूर ऐकली:

१. लाल दिवा असताना : “ ओ काका, तुम्ही सरका बाजूस, मला जाउद्या”,
२. “ओ, तुम्ही पोलीस हाये का, मग गपा न”.

...असो, सहनशीलतेलाही एक मर्यादा असते. उद्धट, उर्मट उत्तरे ऐकली की आपला दिवस खराब जातो.

नमकिन's picture

21 Mar 2020 - 7:52 pm | नमकिन

नुसत्या विनंती वजा उपदेश केला तर प्रबोधन ठरत नाही.
फार फार तर एक सल्ला झाला.
आचरणात आणणे तसेच इतर थोड्यांना भाग पाडणे एवढंच समाधान मानावे पण संपूर्ण प्रबोधन हे निश्चित धोरण व ध्येयाने प्रेरित होऊन दीर्घ काळ कार्य, वसा घेऊन कुठल्याही प्रकारची मदत, अपेक्षा, अभिलाषा, अढी, मनात न बाळगता निरपेक्ष वृत्तीने निरंतर चालणारी भक्तीच जणू.
जसा तो हात धूवा सांगत जीव अर्पण केलेला इग्नेशिएस, जसे आपले कर्वे पिता पुत्र, फूले, आंबेडकर इ इ. प्रबोधनकार.

माहितगार's picture

21 Mar 2020 - 8:44 pm | माहितगार

ह्या वरुन आठवलं, महात्मा गांधींनी सुद्धा स्वच्छता कार्यक्रम राबवले त्यांच्या बद्दल लहानपणा पासून पुस्तकात शिकवले जाते. अहमदाबादच्या पाल्डी भागातील (पाल्डीच ना ? चुभूदेघे) गांधीजींच्या पहील्या आश्रमाच्या बाजूच्या कमर्शिअल बिल्डींग मध्ये माझे ऑफीस होते अत्यंत पचापच थुंकणे आणि मुतारीचा वास -तेव्हा मोदी मुख्यमंत्री होते. मी माझ्या पैशातून पुरेसा खर्च करण्यास तयार असूनही सफाई कामगार मिळणे कठीण लोकांचे को-ऑपरेशनचा अभाव . हे गुजराथेचे झाले. अशोक चव्हाणांनी गाडगे बाबा अभियान राबवलेले. मनमोह सिंगांच्या काळात चव्हाणांनी गाव काय ग्रेट केले म्हणून ऐकुन होतो. नंतर मोदींच्या स्वच्छता अभियानाची चर्चा होती पण मी पाहिलेल्या चव्हाणांच्या गावाची स्वच्छतेत वाट लागलेली होती.

आता लोक कसे वागतात याचा नेत्यांनाही दोष देता येत नाही.

नमकिन's picture

23 Mar 2020 - 4:12 pm | नमकिन

गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात कै माजी गृहमंत्री, ग्रामविकासमंत्री आर आर पाटील, लाडके वामनमूर्ती, गुटखा व डान्स बार बंद करणारे धडाकेबाज कामगिरी बजावली.

खिलजि's picture

18 Mar 2020 - 6:55 pm | खिलजि

""" सध्याच्या युगात आपण दिवसभर अनेकवेळा मोबाईल आणि कम्प्युटर हाताळतो. त्यामुळे मोबाईलचा पडदा आणि कम्प्युटरचा कीबोर्ड यांच्यावरही अगणित जंतू जमा होतात. या उपकरणांची योग्य ती स्व‍च्छता नियमित करावी. त्यात हलगर्जीपणा करू नये."""

येक नंबर परीक्षण/मुद्दा सर .. याचा विचार मला वाटतं ९९ टक्के लोक करत नसतील .. स्वतः मीही कधी केला नव्हता .. काही का असेना कोरोनाने बऱ्याच गोष्टींवर लक्ष घालण्यास मदत केलीय असे म्हणावे लागेल .. मोबाईल आणि त्याची स्वच्छता आणि त्याचा घराघरात पोचलेला वावर , यावर जर आपण वेगळा धागा काढलात तर तो आमच्यासारख्या वाचकांसाठी दिशादर्शक ठरू शकतो ...

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Mar 2020 - 7:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

धुण्याची क्रिया किमान २० सेकंद झाली पाहिजे

म्हणजे साबण लावणे पाण्याने हात स्वच्छ करणे हे सगळे २० सेकंदात झाले पाहिजे की साबण आपल्या हतावर किमान २० सेकंद चोळत राहिला पाहिजे आणि मग त्या नंतर हात पाण्याखाली स्वच्छ केले पाहिजेत.

पैजारबुवा,

कुमार१'s picture

18 Mar 2020 - 7:41 pm | कुमार१

खिलजी ,

मोबाईल व आरोग्य यावर या आधी मी काही लिहीले आहे :
https://www.misalpav.com/node/41353

ज्ञा पै
साबण लावणे हे एक ५ सेकंद पकडू.
पुढचे चोळून हात धुणे हे पक्के २० सेकंद !

खिलजि's picture

18 Mar 2020 - 8:25 pm | खिलजि

___/\___ सर

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

18 Mar 2020 - 7:15 pm | सौ मृदुला धनंजय...

अप्रतिम लेख खरंच खूप सुंदर माहिती मिळाली

माहितगार's picture

18 Mar 2020 - 7:24 pm | माहितगार

उपयूक्त आणि रोचक लेख

पाणीपूरी खाण्यापुर्वी
साथींचे व्हायरल आजार प्रस्थ येण्यापुर्वीच माझ्याकडे हँड सॅनिटायझरचा प्रसार करण्याची जबाबदारी असतानाचा एक महत्वाचे निरीक्षण असे कि पाणीपूरी आणि चाट विक्रेत्याकडून खाणार्‍या मंडळींपैकी ९९.९९ टक्के लोकांचे हात धुतलेले नसतात. पाणीपूरी खाल्यानंतर तब्येत बिघडली तर पाणीपूरी वाल्याच्या पदार्थात जेव्हढा दोष असू शकतो तेवढाच तुमचे स्वतःचे हात अशा वेळी धुतलेले नसणे कारण असू शकावे (माझा कयास)

माश्या
कायद्यानुसार खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या सर्वच आस्थापनांना (दुकानांना) पाण्याची जागा आणि खाद्यपदार्थ बनवणे आणि वितरण यात किमान १०० मीटर अंतर असावे असा नियम असतो. नियम माहित नसला तरी शिक्षण माश्या बसलेल्या ठिकाणावरुन खरेदी करु नये हा सामान्य नियम अगदी ९९.९९ टक्के सुशिक्षीताही धाब्यावर बसवत असतात. खाद्य पदार्थ गरम केल्या नंतर जंतू नाश होतो पण सर्वच पदार्थ गरम करून खाल्ले जातात असे होत नाही हे लक्षात घेतले जाताना दिसत नाही.

नाणी आणि नोटा
एका लाईव्ह टिव्ही शो मध्ये फोन करणार्‍याने नाणी आणि नोटांबद्दल प्रश्न विचारला. आणि पॅनेल मधल्या डॉक्टरांनी त्याचीच थट्टा केली याची गंमत वाटली. नोटा आणि नाण्यांच्या देवाण घेवाणी नंतरही हात धुणे प्रशस्त नसावे का ?

हे कसलं अंधश्रद्धा निर्मुलन ?

माझ्या एका मित्राचे मागील वर्षी एखाद दोन अंधश्रद्धा निर्मुलकांच्या घरच्या अंत्य संस्कारांना उपस्थित रहाणे झाले. बाकीच्या पुजा अर्चांना फाटा दिला होता ते ठिक पण सोबतच परतताना पाय आणि हात धुण्याच्या परंपरेचा विसर पडलेला होता असे एक निरीक्षण ऐकण्यात आले. हात पाय न धुण्यात हे कसले अंधश्रद्धा निर्मुलन ?

थुंकणे
डॉ. महोदयांनी पान तंबाखु खाऊन थुंकण्याबाबत प्रबोधन कठीण जात असल्याची माहिती दिली. माझाही असाच अनुभव आहे. तंबाखु उत्पादन आणि आयातीवरच बंधन घालणे हा अधिक चांगला उपाय असावा.

गरम द्रव पदार्थांची बर्‍याच सार्वजनिक ठिकाणी अनुपलब्धता
काही वेळा सर्दी खोकला थ्रोट इन्फेक्शन असताना घरा बाहेर आवश्य्क कामा निमीत्त बाहेर पडावेच लागते. अचानक सतत शिंका खोकला घसा दाटून इत्यादी आल्यास गरम पदार्थांचे सेवन लाभदायक ठरते पण उपलब्धता बर्‍याचदा नसते. इतर वेळी रुमाल वगैरे लावता येतो पण गाडीचालवताना अचानक शिंका खोकला आल्यास ड्रायव्हर असाहय्यच नसतात का ?

तेजस आठवले's picture

21 Mar 2020 - 5:38 pm | तेजस आठवले

मी चारच दिवसांपूर्वी पुण्याहून परत आलो. प्लॅटफॉर्मवर इतकी माणसे पचा पचा थुंकत होती की विचारु नका. जीव मुठीत घेऊन लहान बाळाला घेऊन परत घरी आलो.

कुमार१'s picture

21 Mar 2020 - 6:14 pm | कुमार१

तेजस,

अगदी बरोबर. नैराश्य येते हे पाहून.

एका माणसामागे एक पोलीस की स्वयंशिस्त, हाच मुद्दा फिरून मनात येतो.

माझ्या माहितीतील एका रिक्षाचालकाने तंबाकू (व थुंकणे) सोडले.
का माहितीये?

त्यांना तोंडाचा जबरी कर्करोग ऐन चाळीशीत झाला. आता मोठी शस्त्रक्रिया होऊन चेहरा विद्रूप झालाय. कायम मास्क लावून हिंडताहेत. पण त्यांचेच काही सहकारी अजून पिचकाऱ्या टाकत आहेत.

प्रकाश घाटपांडे's picture

31 Mar 2020 - 9:06 am | प्रकाश घाटपांडे

बाकीच्या पुजा अर्चांना फाटा दिला होता ते ठिक पण सोबतच परतताना पाय आणि हात धुण्याच्या परंपरेचा विसर पडलेला होता असे एक निरीक्षण ऐकण्यात आले. हात पाय न धुण्यात हे कसले अंधश्रद्धा निर्मुलन ?>>>>
कालबाह्य झालेल्या वा तर्कविसंगत झालेल्या प्रथा परंपरा न पाळण्याचा तो प्रकार आहे. अंधश्रद्धेच्या व्यापक संकल्पनेत तो येतो.

कुमार१'s picture

18 Mar 2020 - 7:46 pm | कुमार१

मृदुला,
मिपा परिवारात स्वागत.

माहितगार,
सुंदर मुद्देसूद प्रतिसाद. पूर्ण सहमत.

सार्वजनिक भोजनाचे ठिकाणी पांढरपेशा कुटुंबातील एक जण जेवणापूर्वी हात धुण्याबाद्द्ल आग्रही असेल आणि बाकीचे नसतील, तर त्या एकाची पण टिंगल होते.
आधी हे प्रबोधन जमले तरी खूप; थुंकणारे हा विषय तर लांबचा आहे !

आनन्दा's picture

19 Mar 2020 - 2:56 pm | आनन्दा

एक बेसिक प्रश्न -
जर विषाणू ओलसर जागेत जिवंत राहतात, तर मग ते वाहत्या पाण्यात जिवंत राहतात का?
जर राहत असतील तर आपण हे विषाणू वाले हात धुवून एक प्रकारे रोगप्रसारच करत नाही का?

माहितगार's picture

19 Mar 2020 - 5:16 pm | माहितगार

चांगला प्रश्न. याचे उत्तर जाणकार तज्ञ देऊ शकतील पण माझ्या प्राथमिक अंदाजाने गरम पाणी आणि / अथवा साबण न वापरता केलेल्या धुण्यातून पाण्यासोबत विषाणू स्थानांतर करु शकावेत? पण जिवाणूंप्रमाणे इतर सजीवांच्या पेशींशिवाय त्यांची संख्येने वाढ होऊ नाही हा एक भाग. दुसरे जगातल्या कोणत्याही इंचभर परिसर अथवा पाण्यातही अती प्रचंड संख्येने वीषाणू तसेही वास करुन असतात (चुभूदेघे) त्यामुळे हात धुताना नुसत्याच पाण्याने हात धुतला तर आदर्श नसले तरी तुम्ही आधीच प्रचंड असलेल्या वीषाणू संख्येत प्रचंड भर घालता असे नसावे पण त्याच वेळी ज्या वीषाणू जन्य आजारांचे समुळ उच्चाटण झाले असे वीषाणू अनवधानाने वातावरणात पुन्हा सोडले जाऊ नयेत हे महत्वाचे असावे.

ह्यावरुन एक बारकावा लक्षात आला. वाचनास सुखद असणार नाही पण हात धुताना सहसा साबण वापरला जातोच पण नाक शिंकरले जाताना प्रत्येक वेळी गरम पाणी आवर्जून वापरण्याची प्रथा नाही. त्यावेळी पाण्यातून वीषाणू जिवाणू संक्रमण चालू रहाणे संभवत असावे. आपल्याशी हि चर्चा केल्यानंतर नाक शिंकरताना सर्वांनीच शक्यतो ३५ डिग्री पेक्षा अधिक उष्ण पाण्याचा वापर करणे योग्य असावे असे वाटते.

कुमार१'s picture

19 Mar 2020 - 3:42 pm | कुमार१

करोनाचे उदा. घेऊन पहा. आपण साबणाने हात धुतले की त्या इमल्शन प्रक्रियेत त्या विषाणूचे बाह्यवेष्टण उचकटले जाते. पुढे त्याचे छोटे तुकडे होतात, जे पाण्यात वाहून जातात.

तुकड्यांपासून पुढे काय होणार ?

माहितगार's picture

19 Mar 2020 - 5:44 pm | माहितगार

साऊथ कोरीया पेक्षा इटलीत COVID19 मृतांची टक्केवारी अधिक का? या बद्दल सिएनएन वरील हा उत्तम विश्लेषण लेख जिज्ञासू आणि जाणकारांनी आवार्जून वाचावा.

इटली लोकसंख्येत वृद्धांची संख्या अधिक असणे कारण असू शकेल हे बरोबर मानले तर वृद्धांची टक्केवारी अधिक असलेल्या चीनच्या बाजूस असलेल्या जपानचे नाव मृत्यू टक्केवारीत पुढे का नाही किंवा मला माहित नाही हा प्रश्न मला लेख वाचताना पडला. इटलीती वृद्धांचा प्रवास संपर्क शेक हँड या गोष्टी अधिक आहेत का ? पण इटली विकसीत देश असेल तरी वृद्धांचा प्रवास आणि संपर्क सहसा कमी झालेला असतो मग इटलीती वृद्धांमधून अधिक प्रसार कशामुळे ह्याचे कोडे मला नीटसे उमगले नाही.

याच लेखात वीषाणू टेस्टींग सुविधांची साउथ कोरीयापेक्षा आमेरीकेतही कशी कमतरता आहे याची माहिती आहे. या वरुन आठवले की अशात एन डि टिव्हीवर प्रायव्हेट हॉस्पिटल आणि टेस्टींग चेन असलेल्यां प्रमुखंडळींना तुमच्याकडे (खासगी क्षेत्रात) या टेस्टींग सुविधा का नाहीत ह्या प्रश्नाला त्यांना नीटसे उत्तर देता आले नाही असे दिसले. पेशंट कडून प्रचंड पैसा उकळूनही स्वतःच्या स्वतंत्र टेस्टींग सुविधा खासगी क्षेत्राकडे का नसाव्यात म्हणजे सार्वानिक सेवेवरील ताण तेवढाच कमी राहून सामान्यांच्या टेस्टची संख्या वाढेल? असा एक सहाजिक प्रश्न मनात आला.

त्या सोबत त्याच लेखातील केवळ टेस्टींग नव्हे तर आजारी आणि वृद्ध व्यवस्थापन पद्धती अधिक प्रभावी असण्याची गरज या विश्लेषणाने दाखवून दिली संदर्भ आमेरीकेचा असला तरी मुद्दा भारतीयांनाही तेवढाच लागू पडावा किंवा कसे?

कुमार१'s picture

19 Mar 2020 - 6:02 pm | कुमार१

धन्यवाद.
चांगला दुवा. वाचतो .

अनिंद्य's picture

20 Mar 2020 - 10:35 am | अनिंद्य

समयोचित जागृती करणारा लेख, अभिनंदन !

फक्त वर आल्याप्रमाणे करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता हा विषय मागे पडू नये म्हणजे झाले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Mar 2020 - 11:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनापासून आभार.

-दिलीप बिरुटे

'बाहेरच्या जगात तुमच्या माझ्यावाचून कोणाचे काहीही अडलेले नाही, नीट घरी राहा. करोना विषाणु पासून दूर राहा'
कुमार१'s picture

20 Mar 2020 - 11:51 am | कुमार१

अनिंद्य आणि प्रा दिलीप,

धन्यवाद आणि सहमती.
चौकटीतील फलक छान !

माहितगार's picture

20 Mar 2020 - 2:01 pm | माहितगार

इटली बद्दलचेच मास टेस्टींगचा एका गावाला फायदा झाल्याचे वृत्त आहे. व्यक्ती गंभीर स्थितीत आयसीयूत पोहोचत नाहीत -बर्‍याचदा आयसीयूतही गेल्यानंतरही कोणता व्हायरस बॅक्टेरीया होता हे सांगितलेच जात नाही- तो पर्यंत टेस्टींग नाही हि कितपत आदर्श व्यवस्था आहे? मुख्य म्हणजे वीषाणू टेस्टींग सुविधांची कृत्रिम टंचाई का आणि या प्रश्नांचे पारदर्शक उत्तरांचा अभाव का हा मला नेहमी छळणारा प्रश्न आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि आठवडी बाजार बर्‍याच ठिकाणी बंद करण्याची वेळ आली. या जागांवर गर्दी करण्याची लोकांना सवय आहे पण बाजार बंद करणे हा उपाय चांगला की बाजार जास्त तास चालवला तरी गर्दी विभागली जाणार नाही का असा एक प्रश्न मला पडला. कारण दीर्घकाळ अन्नधान्य सप्लाय बंदकरणे शेतकरी आणि शहरी नागरीक दोघांची ओढाताण होणार. काल मोदी अन्नधान्य तुटवडा होणार नाही म्हणाले किराणामालाची दुकाने चालूही राहीली तरी कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि आठवडी बाजार बंद झाले की आश्वासनांना काही अर्थ उरणार नाही काही चांगाले उपाय हवेत .

या विषयाच्या अनुषंगाने थोडी ऐतिहासिक माहिती:

१९व्या शतकात जंतुसंसर्गातून झालेल्या तापाने बरेच लोक मरत. पण त्याचे कारण समजत नसे. १८४६मध्ये Ignaz S या हंगेरियन डॉ ने याचे बारीक निरीक्षण करून एक महत्वाचा निष्कर्ष काढला. तो म्हणजे, रुग्णालयातील डॉक्टरांच्या हातांच्या अस्वच्छतेमुळे रुग्णांना गंभीर ताप येतो. त्यावेळेस जीवाणूंबद्दल फारशी माहितीच नव्हती.

मग या डॉ ने सर्व डॉ नी हात स्वच्छ धुवावेत तसेच शल्य-उपकरणे क्लोरीनने धुवावीत असा आदेश काढला.
पण प्रकरण सोपे नव्हते.

अन्य डॉ नी त्याचे ऐकण्याऐवजी त्याला जोरदार विरोध केला. त्याला अगदी वेड्यात काढले. “डॉ चे हात अस्वच्छ असतात” हे विधान त्यांना अपमानास्पद वाटले. मग त्यांनी संगनमत करून Ignaz S यांची हकालपट्टी केली. या धक्क्याने शेवटी ते मनोरुग्ण झाले. त्यांना इस्पितळात ठेवले गेले. तिथे बेदम मारहाण झाली. अखेर ते जंतूसंसर्गाने वारले.
अशी या संशोधकाची शोकांतिका.

पुढे यातून प्रेरणा घेऊन संशोधकांनी सूक्ष्मजंतूंचा शोध लावला.
......
आज आपण हात स्वच्छतेचे महत्व जाणतोच. जालावर आजचे गुगल -डूडल (मुखपृष्ठ) जरूर पाहा. त्यावर Ignaz S यांचे स्मरणचित्र आहे.

नमकिन's picture

21 Mar 2020 - 4:39 pm | नमकिन

मोठा लेख आला होता ५-७ दिवसात.
ऑस्ट्रिया देशातील स्त्री बाळंतपण सूईण बाई कडे करीत पण सरकारी इस्पितळात दाखल होत नसल्याचे आढळले या डॉ. महोदयांना. कारण अर्भक मृत्यू पावत, माता पण.
दीर्घ कालीन अभ्यास, अनेक कुशल सूईण बाई कडे बाळंतपण करून, निरीक्षण नोंदवले व हात अस्वच्छ असलेल्या कारणाने जंतुसंसर्ग होऊन बाळ बाळंतीण दगावतात हा निष्कर्ष काढला. आपल्या इस्पितळात लगोलग निर्देश दिले तसेच शहरातील डॉ संघटना व संघ इ ना हात धूवा एवढाच आग्रहाची मागणी केली तर हा शोधनिबंध प्रकाशित नाही व तुमच्या अनुभवाला आम्ही मानत नाही असे दरडावून सांगायचे तर प्रबोधन करण्यासाठी या डॉ ला निरंतर आग्रहाची शिक्षा म्हणून सर्रास वेडा ठरवले व पागलखान्यात रक्षक छळात मारहाणीत कृश देहाला देवाज्ञा झाली.
खरा प्रबोधनकार.

तेजस आठवले's picture

21 Mar 2020 - 5:33 pm | तेजस आठवले

मी डॉ लिमयांच्या क्लोरोफॉर्म नामक गाजलेल्या पुस्तकात हे बहुतेक वाचलेले आहे.

माहितगार's picture

21 Mar 2020 - 9:32 am | माहितगार

इटलीत COVID 19 चा इतक्या वेगाने प्रसार का झाला ह्याची अजून एक रोचक माहिती समोर येताना दिसते आहे. पाश्चात्य रेसिझम जसे वास्तव आहे तसेच रेसिझमच्या विरोधात त्यांचेही लिबरल विचीत्र ओव्हर रिअ‍ॅक्ट करतात. इटलीतल्या एका शहाण्या मेयरने (महापौर) COVID 19 च्या निमीत्ताने इटलीत चिनी लोकांबद्दल रेसिझमची भावना वाढू नये म्हणून अगदी अनोळखी चिनी व्यक्ती रस्त्यावर दिसली तरी आणि चिनी व्यक्तीने मास्क लावला असला तरी मास्क काढूनही हग करण्याचे (मिठ्या मारण्याचे) आवाहन केले आणि स्वतः मेयर आणि त्याच्या असंख्य चाहत्यांनी तसे केले. वीषाणूने इटलीकरांना दणका दिला नसेल तरच नवल.

सुबोध खरे's picture

21 Mar 2020 - 11:08 am | सुबोध खरे

हात धुतल्यावर जे पाणी आपल्या सांडपाण्याच्या पाईप मधून जाते ते आपल्या मैला वाहिनीत जाते. शहरात त्या मैला मिश्रित पाण्यावर एरोबिक प्रक्रिया करून ते जिवाणू रहित झाले कि ते पाणी नदीत पुढे पाठवले जाते.

इतर ठिकाणी सेप्टिक टॅन्कचे संडास असतात त्या टॅंक मध्ये अँनएरोबीक जीवनाच्या प्रक्रियेमुळे तापमान ५५-६५ "C पर्यंत जाते. ज्याने त्यातील बहुसंख्य मरतात. अशा तर्हेने दोन्ही प्रक्रियांमध्ये बहुसंख्य रोग निर्मण करणारे जंतू (जिवाणू आणि विषाणू) मरतात.

केवळ उघड्यावर शौच केल्यामुळे पावसाळ्यात हा मैल पावसाच्या पाण्याबरोबर आपल्या पाणी पुरवठ्याच्या स्रोतात मिसळून बरेच पोटाचे आजार होतात.
बाकी एकदा करोनाचे विषाणू पाण्यातून धुतले गेल्यावर त्यांचा संबंध आपल्या चेहऱ्याशी/ नाकाशी येण्याची शक्यता फारच कमी आहे.

सुधीर कांदळकर's picture

22 Mar 2020 - 11:17 am | सुधीर कांदळकर

लेख आणि प्रतिसादातून होत असलेली प्रबोधनात्मक चर्चा. आवडले.

मला बालपण आठवले. बालपणी खाण्यापूर्वी आणि खाण्यानंतर तसेच खेळून अथवा बाहेरून घरात आल्याबरोबर त्वरित हातपाय तोड स्वच्छ धुवावे लागे. त्याकडे वडीलधार्‍यांचे बारीक लक्ष असे. हयगय झाल्यास फटके मिळत. साहाजिकच तेव्हापासूनच हात धुवायला २० सेकंदापेक्षा जास्त वेळ लागून स्वच्छ धुतले जातात. औषध कारखान्यात नोकरीला सुरुवात केल्यानंतर नवे कामगार, पॅकिंगमधल्या नवीन मुली यांना या प्राथमिक स्वच्छतेची माहिती नसलेली पाहून धक्का बसला होता. सर्वांना खास प्रशिक्षण द्यावे लागे. याचाच अर्थ बहुतेक घरात आणि शाळातून बालपणी स्वच्छतेचे धडे दिले जात नाहीत. देवपूजा प्रार्थनेइतकीच प्राथमिक स्वच्छता देखील महत्त्वाची आहे हे शालेय वयातच बिंबवले गेले पाहिजे.

समयोचित सुरेख लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

कुमार१'s picture

22 Mar 2020 - 11:32 am | कुमार१

प्रार्थनेइतकीच प्राथमिक स्वच्छता देखील महत्त्वाची आहे

>>>>> अत्यंत महत्वाचे वाक्य.

रोगप्रतिबंध हाच रोगावरील सर्वोत्तम उपाय असतो.

Nitin Palkar's picture

24 Mar 2020 - 11:58 am | Nitin Palkar

उपयुक्त माहिती बरोबरच, दरवर्षी १५ ऑक्टोबर हा ‘जागतिक हातस्वच्छता दिवस’ म्हणून पाळला जातो'. ही नवीन माहिती मिळाली. ....'वास्तविक असा ‘दिन’ ठेवण्याची वेळ यावी हे खेदजनक आहे' ... हे खरेच आहे पण स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी, 'शौचालयाचा वापर करा हे देखील सांगण्याची वेळ यावी हे दुर्दैवाचे नाही का?

टर्मीनेटर's picture

24 Mar 2020 - 12:40 pm | टर्मीनेटर

समयोचित सुंदर लेख!

कुमार१'s picture

25 Mar 2020 - 1:00 pm | कुमार१

नितीन, टर्मि.
धन्यवाद.

एक दखलपात्र जाहिरात

‘लाइफबॉय’ साबणाची अभिनेत्री काजोल ही मुद्रादूत आहे. पण सध्याच्या त्यांच्या जाहिरातीत तिने आवाहन केले आहे की की कोणत्याही साबणाने हात धुवा.

https://www.afaqs.com/news/advertising/when-lifebuoys-handwashing-ambass...

हे विशेष वाटले.

(नेहमीसारखाच) कुमारसाहेबान्चा माहितीपूर्ण आणि उपयुक्त लेख.
बर्‍याच वेळा भारतातल्या सार्वजनिक वातावरणात हात धुण्याची जेव्हा जरूर लागते तेव्हा जरी "काहीतरी" व्यवस्था असते उदा. हात धुण्याचे तस्त - wash basin) पण ती अगदीच विचार न करता बसवलेली असते जसे तोटी अशी बसवलेली, की ती वापरताना - घाण असलेल्या - तस्ताला हात लागतोच, किन्वा हात व्यवस्थित धुतल्यावर बाहेर पडताना पुन्हा दरवाजा उघडण्याकरता हात कुठे तरी लावाच लागल्याने हात केलेली धुण्याची खटपट वाया जाते.
बर्‍याच आन्तरराष्ट्रिय विमानतळावर जी स्वच्छ्तागृहे असतात तेथून बाहेर पडताना, एकदा हात धुतले की पुन्हा कुठेही हात लावावे न लागता बाहेर पडता येते.

कुमार१'s picture

27 Mar 2020 - 9:24 am | कुमार१

शेखर,

तुम्ही एक चांगला आणि महत्वाचा मुद्दा मांडला आहे. धन्यवाद.
आपल्याकडे मोजक्या पंचतारांकित ठिकाणी तसा विचार केलेला दिसतो.
प्रवासस्थानकांवरची स्थिती मात्र असमाधानकारक आहे.

आता काही रेल्वे स्थानके अत्याधुनिक करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यात अशा सुविधा मिळाव्यात अशी आशा.

कुमार१'s picture

4 Apr 2020 - 9:31 pm | कुमार१

‘ओसीडी’ हा विकार असलेल्या रुग्णांना एरवीही हात वारंवार धुवायची खोड असते. सध्याच्या वातावरणात त्यांची अजूनच गोची होत आहे. त्यांचे मानसिक द्वंद्व वाढत आहे.

“आता इतर सर्वजणही स्वच्छतेबाबाबत आपल्यासारखेच वागत आहेत”, अशी त्यांना भावना होत आहे !

एक चांगला लेख इथे :
https://www.nytimes.com/2020/04/03/style/ocd-coronavirus-challenges.html