नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना’ विषाणूच्या आजाराची जागतिक साथ आल्याचे जाहीर केले आहे. ती साथ आटोक्यात राहावी म्हणून आपण सर्वजण योग्य ते प्रयत्न करीतच आहोत. आजाराच्या एखाद्या जागतिक साथीमुळे संपूर्ण जनजीवन ढवळून निघते. तसेच त्याचे अर्थकारण आणि समाजकारणावर गंभीर परिणाम होतात.
या निमिताने जागतिक साथींच्या इतिहासात डोकावत आहे. त्याची थोडक्यात माहिती देतो. त्यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करूयात. इ.स. १३०० ते २०१२ या कालावधीतील साथींचा हा आढावा आहे.
.......
१. इ.स. १३४६ -५३
प्लेग अर्थात काळ्या मृत्यूची महासाथ
हा आजार Yersinia pestis या जीवाणूमुळे होतो. हा जीवाणू निसर्गतः उंदीर आणि तत्सम प्राण्यांत आढळतो. उंदरांना विशिष्ट पिसवा चावत असतात आणि त्याच या रोगाच्या प्रसाराला कारणीभूत ठरतात. मुळात अशी रोगट पिसू उंदीर आणि माणूस या दोघानाही चावते. या मानवी आजारात शरीरातील लिम्फग्रंथी मोठाल्या सुजतात, त्यांच्यात रक्तस्त्राव होतो आणि मग त्या मरतात. पुढे संपूर्ण शरीरात विषबाधा होते, अंगावर काळेनिळे चट्टे पडतात आणि अखेर रुग्ण दगावतो.
या साथीचा उगम आशियात झाला आणि मग ती फैलावली. त्याकाळी जागतिक दळणवळण आणि व्यापार समुद्रमार्गे असायचे. त्यामुळे विविध जहाजे आणि बंदरांवर उंदीर आणि त्यांना चावणाऱ्या पिसवा खूप पैदा होत. तसेच बंदराच्या मर्यादित जागेत मानवी समूह दाटीवाटीने वावरत. हे घटक या जागतिक साथीस कारणीभूत ठरले. या महासाथीत सुमारे १५ कोटी माणसे मृत्यू पावली.
२. इ.स. १८५२- ६०
कॉलराची महासाथ
हा आजार Vibrio cholerae या जिवाणूमुळे होतो आणि त्याचा प्रसार दूषित पाण्यातून होतो. हा आजार झालेल्या माणसाच्या विष्ठेतून हे जंतू समाजात पसरतात. घनदाट लोकसंख्या, सांडपाण्याची गलीच्छ व्यवस्था, दुष्काळी व युद्धकालीन परिस्थिती या सर्वांच्या एकत्रित परिणामातून ही महासाथ फैलावली. कॉलरा झालेल्या रुग्णास प्रचंड जुलाब होऊन त्याच्या शरीरातील पाणी संपुष्टात येते. परिणामी मृत्यू होऊ शकतो. आतापर्यंत जगात या आजाराच्या ६ मोठ्या साथी येऊन गेलेल्या आहेत. त्यापैकी ही तिसरी साथ होती. तिचा उगम भारतात गंगा नदीच्या पट्ट्यात झाला. या साथीत सुमारे १० लाख लोक मरण पावले.
३. इ.स. १८८९-९०
फ्लूची महासाथ
या आजाराचे पूर्ण नाव ‘इन्फ्लूएन्झा’ असे आहे. तो एका विषाणूमुळे होतो आणि त्या विषाणूचे बरेच प्रकार असतात. ही साथ ‘‘इन्फ्लूएन्झा’-ए (H3N8) या प्रकारामुळे आली होती. या आजारात सुरवातीस ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे दिसतात. पण आजार बळावला की श्वसन, हृदयक्रिया, मेंदूकार्य आणि स्नायू या सर्वांवर गंभीर परिणाम होतात.
या साथीचा उगम आशियात झाला असा समज होता. परंतु, संशोधनानंतर वेगळी माहिती मिळाली. या आजाराची सुरवात जगात एकदम ३ ठिकाणी झाली – तुर्कस्तान, क्यानडा आणि ग्रीनलंड. या सुमारास जगभरात शहरे लोकसंख्येने फुगू लागली होती. त्यामुळे या आजाराचा फैलाव वेगाने झाला. या साथीत सुमारे १० लाख लोक मरण पावले.
४. इ.स. १९१०-११
कॉलराची महासाथ
हिचा उगम भारतात झाला आणि पुढे ती फैलावली. एव्हाना आरोग्यसुविधांमध्ये बरीच सुधारणा झालेली होती. त्यामुळे ही साथ तशी लवकर आटोक्यात आली. यावेळी सुमारे १ लाख लोक दगावले.
५. इ.स. १९१८
फ्लूची महासाथ
पुन्हा एकदा ‘इन्फ्लूएन्झा’ विषाणूने जगभर धुमाकूळ घातला. याखेपेस जगातील सुमारे १/३ लोक याने बाधित झाले होते. त्यापैकी सुमारे १५% मृत्युमुखी पडले. या साथीचे एक वैशिष्ट्य दखलपात्र आहे. यापूर्वी अशा साथींत बहुतांश लहान मुले, वृद्ध आणि दुबळे लोक आजारास बळी पडत. पण यावेळेस पूर्ण उलटे चित्र दिसून आले. बहुसंख्य रुग्ण हे तरुण आणि धडधाकट असे होते.
६. इ.स. १९५६-५८
आशियाई फ्लूची महासाथ
ही साथ ‘इन्फ्लूएन्झा’-ए (H2N2) मुळे आली. तिचा उगम चीनमध्ये झाला. मृत्यूसंख्या सुमारे २० लाख.
७. १९५८
हाँगकाँग फ्लूची साथ
ही साथ ‘इन्फ्लूएन्झा’-ए (H3N2) मुळे आली. तशी ती लवकर आटोक्यात आली. तरीसुद्धा त्यात १० लाख लोक मरण पावले. त्यापैकी निम्मे लोक हे हाँगकाँगचे रहिवासी होते.
आतापर्यंतच्या फ्लूच्या ४ साथी पाहता एक लक्षात येईल. ‘इन्फ्लूएन्झा’ या विषाणूचे विविध उपप्रकार हे आजार घडवत असतात. साधारणपणे एखाद्या साथीदरम्यान नवीन औषधे आणि लसींचा शोध लागतो. त्यातून विषाणूच्या एका प्रकाराचा मुकाबला करता येतो. आता माणसाला वाटते की आपण त्या जन्तूवर विजय मिळवला. पण तसे नसते. जंतूपण हुशार असतात ! ते उत्क्रांत होतात आणि त्यांची नवी प्रजाती आपल्या पूर्वीच्या औषधांना पुरून उरते.
८. २००५- २०१२
एड्सची महासाथ
हा आजार HIV या विषाणूने होतो. त्याचा प्रथम शोध १९७६मध्ये आफ्रिकेतील कोंगोमध्ये लागला. १९८१ पासून त्याचा वेगाने जागतिक फैलाव झाला. वरील काळात ही साथ उच्चतम बिंदूवर होती. आजपर्यंत या आजाराने ३.६ कोटी लोक मृत्यू पावले आहेत.
आजच्या घडीला या आजारावरील अत्यंत प्रभावी औषधे उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्या जोडीला अशा रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळींवर अनेक समाजसेवी संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे हा आजार आटोक्यात येत आहे. १९८०- ९० च्या दरम्यान एखाद्याला एड्स झाला म्हणजे “आता सगळे संपले, तो खात्रीने मरणार” अशी काहीशी परिस्थिती होती. आज त्याचे उपचार व प्रतिबंध यावर भरपूर लक्ष दिल्याने परिस्थिती नक्कीच सुधारली आहे. योग्य उपचार घेतल्यास अशा रुग्णांचा जगण्याचा कालावधी बराच वाढलेला आहे. थोडक्यात, ‘नियंत्रणात ठेवता येणारा आजार’ असे एड्सचे आजचे स्वरूप आहे.
वरील जागतिक साथींच्यानंतर काही काळ ‘एबोला’ या विषाणूने धुमाकूळ घातला होता. पण आज तरी तो आजार पश्चिम आफ्रिकेपुरता मर्यादित झाला आहे.
...........
आणि लोकहो,
सध्या चालू असलेली ‘करोना’ची जागतिक साथ आपण अनुभवत आहोत. प्रगत वैद्यकीय संशोधन आणि सुविधांमुळे आपण आता ही साथ लवकर आटोक्यात आणू शकू असे वाटते. या साथीसंबंधी विपुल लेखन या संस्थळासह अनेक माध्यमांतून झालेले आहे. म्हणून पुनरुक्ती टाळतो.
या साथीत ....
जे मरण पावले आहेत, त्यांना आदरांजली,
जे आजारी आहेत, त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा,
आणि
ही जागतिक साथ लवकरात लवकर संपुष्टात येईल या आशेसह समारोप करतो.
**********************************************
प्रतिक्रिया
16 Mar 2020 - 12:24 pm | Nitin Palkar
चांगली माहिती....
19 Mar 2020 - 3:27 pm | हस्तर
पुलेशु
ऐडस १९९८ पासुन माहित आहे ,२००५ नाही
19 Mar 2020 - 3:46 pm | कुमार१
लेखातील हे नीट पाहा :
१९८१ पासून त्याचा वेगाने जागतिक फैलाव झाला. २००५- २०१२ या काळात ही साथ उच्चतम बिंदूवर होती.
आपण "मोठी साथ" बघतोय लेखात, निव्वळ आजाराचा शोध नाही.
21 Mar 2020 - 3:40 pm | नमकिन
सन १३४६ सुमारास एकूण जगात लोकसंख्या किती असावी जर मृत १५कोटी?
आजचा दिवस हा प्रत्येक देशाच्या हलगर्जीपणामुळे पहावा लागतो आहे असे आढळले. इथे रोग हवेमार्फत पसरता आजचे निर्बंध योग्य ठरते पण परदेशी पर्यटक वापर प्रवासी यांना अटकाव केला नाही, घरी जाऊन झोपा एकटेच असे नुसत्या सूचनेवर विसंबून स्मार्ट सरकारने झोपा केला.
स्मार्ट सुशिक्षीत, ऊच्च आर्थिकदृष्ट्या सक्षम जनतेला सरकार आवरू शकले नाही. आज त्या उद्दाम, मुद्दाम वागण्याचे गंभीर परिणाम सर्व जनता भोगतेय.
आज बाहेरच्या विमान वाहतूक प्रतिबंध केला तोच महीनाभर आधी केला असता तर साधारण १०लाख परदेशी वापर देशी लोकांना थोडी गैरसोय झाली असती पण संपूर्ण भारत देशात १२५कोटी लोकसंख्या सुरक्षित रहाती.
गेला बाजार फक्त देशी नागरिक जे बाहेरच्या देशातून आलेले होते त्यांना सक्तीने विलगीकरण कक्षात सरकारने सोय करून ठेवले असते तरी चालले असते. पण श्रीमंतांच्या यादीत मोडणारा मोकाट रोग घेऊन फिरताना दिसतात पण गरीबांना कामधंदा सोडून घरी बसवतात हे सरकारी अधिकारी व नेते.
निव्वळ निष्कलंक राहिले सर्व रोगी व राजकीय सत्ताधारी निर्धास्त.
काय वाट्टेल ते चालले आहे भाऊ इतकं टरकून ठेवले आहे आमची धडगत नाही कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी बळजबरीने डांबण्यात आले आहे. एखाद्या राजकीय पक्षाने बंद पुकारला तर देशाचं किती लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले, दंगलखोर पकडून भरपाई वसूल करण्यात येते.
कोरोना पसरविणारे व पसरवू देणारे सरकार विरोधात भरपाई वसूल केली पाहिजे.
21 Mar 2020 - 5:11 pm | कुमार१
सन १३४६ सुमारास एकूण जगात लोकसंख्या किती असावी जर मृत १५कोटी?
>>>>>
लोकसंख्या सुमारे ४७.५ कोटी होती . ती साथीपश्चात ३५ कोटी झाली .
(https://en.wikipedia.org/wiki/Black_Death)
धन्यवाद !
21 Mar 2020 - 5:13 pm | कुमार१
वरील वजाबाकी अचूक नसणार.
कारण सगळेच आकडे हे "सुमारे/ अंदाजे" असे असतात.
21 Mar 2020 - 8:07 pm | नमकिन
शंका नव्हती पण निरागस प्रश्न पडला होता की तेव्हा किती असतील माणसं.
धन्यवाद.
22 Mar 2020 - 12:21 pm | सुधीर कांदळकर
विविध साथींचे उल्लेख आढळतात. प्लेगच्या रुग्णांना शोधून काढून ब्रिटिशांनी क्वारंटाईन केले होते. तसेच इतर उपाययोजना केल्या होत्या. त्याचा आपल्या स्वातंत्र्यलढ्यात खुबीने वापर केला गेला.
जिम कॉर्बेटच्या फारशा न शिकलेल्या भगिनीने कॉलर्याच्या साथीत खूप रुग्णसेवा बजावली होती असे जिम कॉर्बेटच्या 'माय इंडिया'च्या कही भागात उल्लेख आहेत.
फारसे तांत्रिक ज्ञान हाती नसतांना, दळणवळणाच्या सोयी आणि वेग यांना प्रचंड मर्यादा असतांना आपण इतक्या साथींमधून मार्ग काढला आहे. आता कॉरोनामधूनही असाच मार्ग निघेल असा विश्वास वाटतो. छान लेखाबद्दल धन्यवाद.
22 Mar 2020 - 3:47 pm | कुमार१
सुधीर, धन्यवाद व सहमती.
.....................................
इतिहासात फ्लूच्या बऱ्याच महासाथी येऊन गेल्या. अशा साथी नियंत्रणात आणण्यासाठी लोकांच्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर निर्बंध घालावेत का, हा एक औत्सुक्याचा मुद्दा असतो. या संदर्भात WHOचे काही अभ्यास झालेले आहेत. त्यांचे साधारण निष्कर्ष असे आहेत:
१. एखाद्या देशाने असे कडक निर्बंध जरी घातले तरी त्यामुळे साथीचा देशातील शिरकाव पूर्णपणे रोखता येत नाही.
२. मात्र तो शिरकाव २ महिन्यांपर्यंत पुढे ढकलता येतो.
३. त्यामुळे त्या साथीचा तिथला व्यापक प्रसार ३-४ महिने पुढे जातो.
४. वरील दोन मुद्द्यांचा एक मोठा फायदा होतो. तो म्हणजे संबंधित विषाणूविरोधी औषधे आणि लसीचे उत्पादन व वितरण करण्यास बहुमूल्य वेळ मिळतो.
..........
अन्य काही अभ्यासात देशांतर्गत रस्त्याने होणाऱ्या प्रवासावर निर्बंध घालून पाहण्यात आले आहेत. त्यापैकी काहींत या निर्बंधांचा उपयोग (विमानापेक्षा) अधिक झाल्याचे दिसून आले आहे.
प्रौढांपेक्षाही लहान मुलांच्या प्रवासावारील निर्बंध अधिक उपयुक्त ठरतात, असाही एक रोचक निष्कर्ष आहे.
...............
सध्याही आपण या अवस्थांतून जात आहोत. त्याचे उपयुक्त परिणाम किती होतात हे काळाच्या ओघात समजेल.
22 Mar 2020 - 4:32 pm | अनन्त्_यात्री
अँटिबायोटिक प्रमाणे wide spectrum अँटिव्हायरल औषधे बनविण्याचे प्रयत्न केले जातात का?
22 Mar 2020 - 5:49 pm | कुमार१
अनंत,
चांगला प्रश्न.
होय, Broad spectrum विषाणू विरोधी औषधे जरूर निघालेली आहेत. सुमारे ४८ अशी औषधे सध्या रुग्णप्रयोगांच्या चाचण्यांत वापरत आहेत.
Pleconaril, valacyclovir ही काही उदा.
अजून एक रोचक भाग. काही जीवाणूविरोधी औषधांनाही Broad spectrum विषाणू विरोधी गुणधर्म असतो.
22 Mar 2020 - 6:31 pm | स्मिताके
नेहमीप्रमाणे उत्तम माहितीपूर्ण लेख.
साध्या सर्दीवर लागू पडणाऱ्या उपायांचा इथे काही उपयोग होईल का? वाफ घेणे, मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करणे वगैरे.
22 Mar 2020 - 6:54 pm | कुमार१
स्मिता,
धन्यवाद.
त्या उपायांचे महत्व पूरक उपचार म्हणून श्वसनविकारांत आहेच.
22 Mar 2020 - 7:58 pm | कुमार१
Dr Enric Sala यांची एक अभ्यासपूर्ण मुलाखत :
“‘भविष्यात आपल्याला अजून महासाथींना तोंड द्यावे लागेल”
(https://www.independent.co.uk/environment/coronavirus-uk-pandemics-envir...)
त्यातले ठळक मुद्दे :
१. बेसुमार जंगलतोड, प्राण्यांचा पाळण्यापासून खाण्यापर्यंत उपयोग घातक
२. १९५०च्या दशकात ३० नवे संसर्गरोग निर्माण झाले.
३. १९८० पर्यंत त्यात तिपटीने वाढ झाली.
४. HIV, Ebola, SARS & MERS – CoV आणि Zika हे विषाणू प्राण्यांकडून आपल्यात आले.
22 Mar 2020 - 8:13 pm | बाप्पू
डॉक्टर सर,
हे पटकी आणि नारू हि काय भानगड होती? ते देखील साथीचे च रोग होते का?? त्यामुळे किती माणसे मृत्युमुखी पडली किंवा काय परिणाम झाले समाजजीवनावर. ?
22 Mar 2020 - 8:30 pm | कुमार१
१. पटकी = कॉलरा.
याच्या महासाथींच्याबद्दल लेखात लिहिलेच आहे.
२. नारू हाही दूषित पाणी पिल्याने होतो. त्याचे कारण १ parasite आहे.
१९८०मध्ये हा २० देशांत अस्तित्वात होता. २०१९मध्ये जगात फक्त ५४ रुग्ण आढळले. आता तो समूळ उच्चाटनाच्या मार्गावर आहे.
22 Mar 2020 - 10:06 pm | राघव
https://youtu.be/KXQxh5wfvJY
यात गिरीश कुबेर यांनी काही साथी आणि त्यांची कारणे याविषयी माहिती दिली आहे. मिनिटे 20:53 पासून पुढे.
Horrible हा शब्द कमी पडतो कधी कधी. :-(
23 Mar 2020 - 9:34 am | कुमार१
पाहिली ती चित्रफीत.
खरेच धक्कादायक आहे.
सहमत.
23 Mar 2020 - 9:34 am | कुमार१
पाहिली ती चित्रफीत.
खरेच धक्कादायक आहे.
सहमत.
25 Mar 2020 - 10:23 am | कुमार१
१९१८च्या फ्लूच्या महासाथीत अमेरिकेत विलगीकरण केलेल्या व्यक्तीच्या घरावर असे पांढरे कापड गुंडाळीत. बाहेरून ते पाहिले की त्या घरात कुणी जात नसे.
(सौजन्य : STAT न्यूज )
11 Nov 2020 - 12:06 pm | कुमार१
विषाणूजन्य आजारांच्या विरोधात लशी तयार करताना संबंधित विषाणूंचा वापर केला जातो. त्यातून काही वेळेस सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होतात. यावर एक तोडगा म्हणून लस तयार करताना वनस्पतींचा वापर करता येतो.
सध्या या प्रकारचे नवे संशोधन इन्फ्लुएंझा विरोधी लस तयार करण्यासाठी वापरले जात आहे. यामध्ये एखाद्या वनस्पतीला जनुकीय सूचना दिल्या जातात. त्यामुळे तिच्यात संबंधित विषाणूची प्रथिने तयार होतात. मग ती वेगळी काढून त्यापासून लस तयार केली जाते.
मानवी सुरक्षितता आणि मोठ्या प्रमाणावर सुलभ उत्पादन हे या प्रकाराचे फायदे आहेत.
भविष्यात या संशोधनाची प्रगती पाहणे रोचक ठरेल.
21 May 2022 - 7:46 pm | कुमार१
गेल्या तीन आठवड्यांपासून जगभरात अचानक मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत. आजमितीस जगभरात मिळून असे 38 रुग्ण सापडले आहेत. ते मुख्यतः युरोप आणि उत्तर अमेरिकेत आढळले आहेत.
उंदीर, ससा, खार आणि माकड या प्राण्यांमधून हा आजार माणसात संक्रमित होतो. ज्या लोकांचा हे प्राणी पकडणे, त्यांची कत्तल करणे व त्यांचे मांस हाताळणे यांच्याशी संपर्क होतो त्यातून हा विषाणू माणसात येतो.
या आजाराचा मूळ उगम आफ्रिका खंडातून झालेला आहे
या आजारात त्वचेवर जी इजा होते ती इथे पहा :
https://www.google.com/amp/s/www.insider.com/monkeypox-rash-pictures-whe...
जागतिक आरोग्य संघटनेने या आजारासंदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
21 May 2022 - 10:01 pm | sunil kachure
साथीच्या रोगाचे माहेर घर झाले आहे.
Covid नी पण तिथेच जास्त धिंगाणा घातला होता.
आणि दुसरे चीन आणि उत्तर कोरिया .
काय काय प्रयोग करत असतात.आणि त्यांचेच प्रयोग त्यांच्यावर उलटतात.
मग देशाला कडी कुलूप लावून आत मध्ये काय काय उपाय योजना करत अस्तात.
जगाला काही कळून देत नाहीत.
उत्तर कोरिया मध्ये पण कोणती तरी साथ आली आहे.
29 May 2022 - 10:55 am | कुमार१
एका वृत्तपत्रातील खालील बातमी पहा :
यामध्ये rt- PCR ही चुकीची माहिती आहे. मंकीपॉक्स हा मुळात डीएनए प्रकारचा विषाणू असल्याने त्याच्या निदानासाठी PCR ही चाचणी वापरतात.
( कोविडचा विषाणू RNA प्रकारचा असल्यामुळे त्याच्या चाचणीला rt-pcr म्हणतात.
R = Reverse. त्या चाचणीत प्रयोगशाळेत RNA चे DNA मध्ये रुपांतर करतात).
10 Sep 2022 - 4:15 pm | कुमार१
न्यूयॉर्कमध्ये पोलिओ संदर्भात आरोग्य आणीबाणी जाहीर.
लसीकरण वेगाने करण्याची गरज.
3 Apr 2023 - 4:29 pm | कुमार१
Marburg विषाणूचा 21 मार्च 2023 रोजी टांझानियात उद्रेक झालेला आहे.
ठळक घटना:
सुरुवातीलाच ८ बाधित झाले व त्यातील ५ मृत्युमुखी.
Ebola च्या जातीचा विषाणू
वटवाघळांच्या गुहांमधून आजाराचा उगम
मानवी प्रसार (रुग्ण आणि मृताच्या शरीरातून) रक्त आणि इतर द्रवांच्या द्वारा
रुग्णाला मोठा ताप, जुलाब आणि विविध ठिकाणाहून प्रचंड रक्तस्त्राव
विषाणू-विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत
डब्ल्यूएचओचे सर्वेक्षण चालू.
19 Feb 2024 - 4:27 pm | कुमार१
अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात प्लेगचा एक रुग्ण आढळल्याची बातमी काही वृत्तपत्रांनी ठळकपणे दिलेली आहे. त्या रुग्णावर व्यवस्थित उपचार झालेले आहेत आणि काळजीचे कारण नाही.
गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेत वर्षाकाठी पाच ते दहा प्लेगचे रुग्ण आढळतात परंतु त्याची साथ होत नाही.
वृत्तपत्रांनी उगाचच असा भडकपणा करायची गरज नाही :
“महाभयंकर ‘ब्यूबॉनिक प्लेग’ परततोय? हा रोग नेमका आहे तरी काय?”