व्याकरणशुध्द भाषा वापरणार्यांना आपण न्यायासनावर नाही, याची जाणीव असणे महत्वाचे. तसे संस्कार पुढच्या पिढीवर होणे हेही तितकेच आवश्यक आहे.
अन्यथा मराठी भाषेचा ऱ्हासच होईल.
मुख्य लेख -
मराठी भाषेची भेट
लेखक शेषाद्री नाईक
मराठी भाषा दिना निम्मित आपल्या मातृ भाषेविषयी ---
एखाद्या बेळगावी माणसाने दळणाला 'दळप' म्हटले किंवा मुंबईच्या माणसानें मंडईच्या मागे ऐवजी 'पाठी ' म्हटले तर आपण भाषेचे वैविध्य म्हणून ते सोडून देतो. पण तेच एखाद्याने 'पाणी’ ऐवजी 'पानी ' म्हटले, तर अशुद्ध म्हणून टीका करतो . त्याही पेक्षा वाईट म्हणजे त्या माणसाला आपण 'शिवराळ' किंवा तत्सम उपाधी देऊन हिणवतो. असे कां ? त्यात त्या माणसाचा कितपत दोष असतो ?
आपण या प्रश्नाच्या उत्तरासाठी जे आता ५० च्या वरच्या वयाच्या लोंकांपुरता आणि ज्यांचे मराठी माध्यमातून शिक्षण झाले त्यांच्यापुरताच मर्यादित ठेवू . त्या माणसाने ६ वर्षांचा असतांना मराठी शाळेत प्रवेश केला, असे धरू. तोपर्यंत त्याची मराठी, निदान व्यावहारिक मराठी तरी घरात आणि समाजात शिकून पूर्ण होत आली होती! त्याच्या लेखी शब्द 'पानी ' असाच असतो ! मग तो शाळेत लिहायला शिकल्यावर 'पानी ' असाच लिहितो, मास्तर चूक देतात, फटका खातो आणि मग 'पाणी ' असा लिहितो. व्याकरण , शुद्ध लेखन या शब्दांची व्याप्ती ही मार्क , परीक्षेत पास होणे, एकंदरीत पुढे जाणे यापुरतीच मर्यादित असते. त्यामुळे 'पानी ' हे चुकीचे आहे यापेक्षा, तसे लिहिले तर मार्क कमी पडतात , असा त्याचा गृह असतो.
त्यामुळे बोली भाषा बदलण्याची तसदी तो घेत नाही! बरं , त्याच्या सभोवतीचे मित्र, परिवार काही वेळा शिक्षक सुद्धा तशीच भाषा वापरत असतात . त्यामुळे परीक्षेचे विश्व वेगळे आणि 'आपले ' विश्व वेगळे, असे नैसर्गिक पणे पृथ: करण तो मनोमन करतो. यात त्याला कितपत दोष देता येईल? मग हे आपण भाषा वैविध्य न समजता , ही भाषा उच्च आणि ती नीच , असे कां मानतो? किंबहुना त्यापुढे जाऊन समोरचा माणूस ‘माझी मराठी’ खराब करतो , अशी धारणा करतो ! अशा 'अशुद्ध ' बोलणाऱ्यां पैकी अनेक लोक इंग्रजी शिकताना त्या भाषेवर प्रभुत्व मिळवतात. त्यांच्या इंग्रजी ची आपण कदर करतो, पण मराठीच म्हणजे जरा ... अशी पुस्ती ही जोडतो !
बहीणाबाई चौधरी , मकरंद अनासपुरे अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यांच्या तथा कथित ग्राम्य भाषेचा आदर होतो . मग या जनतेला कां वेगळे करतो ?
ब्रिटिशांनी आपली इंग्लिश , त्याचे व्याकरण , silent असणे , शैली यांचा शतकानू शतके उदो उदो केला !आज काय झाले त्याचे? अमेरिकन लोकांनी colour चे स्पेलिंग color करून सर्व नियम खुंटीवर बसवले !! आपण यातून काही शिकणार आहोत कां ? (इंग्रज आणि इंग्रजी यांची सध्या इतकी वाईट अवस्था आहे, की जर कोणी असे सांगितले की चीन मध्ये colour चे स्पेलिंग kolo करतात , तरी आश्चर्य वाटणार नाही)
भाषे ला नियम असावेत , पण जीवना प्रमाणे तेही प्रवाही हवेत. 'पानी ' ऐवजी 'पाणी ' असाच उच्चार खरोखरचं हवा असेल , तर संस्कार या पिढीवर नाही तर पुढल्या पिढीवर व्हायला हवेत . तो चूक करतोय त्यानेच सुधारणा करावी !! या दृष्टिकोनाने ऱ्हासच होईल. ही जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे . प्रत्येक आई वडिलांना शिक्षकांना ते समजून, पटवून दिले पाहिजे . विद्यार्थ्याने चूक केली तर त्याला केवळ मार्कांचा बडगा न दाखवता , त्याची चूक कोठे झाली , कां झाली , कशी सुधारता येईल , या साठी समाजातल्या प्रत्येक घटकाने वेळ दिला पाहिजे. आहे तशी तयारी ? अन्यथा त्याला चूक ना उमगता तो बंडखोर तरी बनेल किंवा दुर्लक्ष्य तरी करेल.
अंततः भाषा हे संवादाचे माध्यम आहे . जर आपण बोलणाऱ्याच्या त्रुटीच जर काढत बसलो , तर एकमेकांना समजून घेणे दुरापास्तच !! आपण दूरध्वनी ला 'फोन ' च म्हणणे बरे हे, जसे स्वीकारतो, तसे पाण्याला 'पानी ' असेही म्हणतात , असे कां नाही स्वीकारत ? असे करण्याने आपल्या भाषेचे वैविध्य , गोडी वाढेल आणि आपली भाषा समृद्ध असल्याचा अभिमान आपल्याला 'भेटेल '!!!
शेषाद्री
प्रतिक्रिया
2 Mar 2020 - 4:26 pm | Jayant Naik
लेख सुरेख आहे. भाषेत विविधता असावी पण त्याला बोली भाषा आणि लिखित भाषा असे विभाजन ही असावे. गरजे पुरते बोली भाषेने लिखित भाषेत जरुर प्रवेश करावा पण तेच बरोबर असा अट्टाहास नसावा.
3 Mar 2020 - 12:57 am | हुप्प्या
लेखी भाषा ही बोलीभाषेपेक्षा जास्त काटेकोर असते. ऑस्ट्रेलियात today चा उच्चार todie होतो. पण म्हणून ते स्पेलिंग बदलत नाहीत. अमेरिकन लोकांनीही मोजक्याच शब्दांचे स्पेलिंग बदलले आहे. you चे स्पेलिंग I सारखे U असे का नाही? अगदी अमेरिकन लोकांनीही ते केलेले नाही.
कुणीही उठावे आणि नवे शुद्धलेखनाचे नियम बनवावेत असा प्रकार भाषेकरता घातक आहे. अशाने लोक ती भाषा अर्थव्यवहार, राजकीय व्यवहार जिथे काटेकोरपणा आवश्यक आहे तिथे वापरेनाशी होतील.
इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. त्या भाषेतील स्थित्यंतरे आणि मराठीतील ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यांची तुलना होऊ शकत नाही.
नवे शब्द, नवे शुद्धलेखन हे एका संघर्षातून निर्माण होतात. जुने, प्रस्थापित लोक आधी होते तसे ठेवण्याचा प्रयत्न करतात. नवे लोक ते बदलायचा. ह्या संघर्षातून जे निष्पन्न होते ते म्हणजे भाषेतील बदल.
काटेकोर भाषेचा अजून एक उपयोग म्हणजे माध्यमे. टीव्ही, रेडियो ह्या माध्यमात बातम्या, मुलाखती, चर्चा वगैरे होतात तेव्हाही लेखीच्या जवळ जाणारी व्याकरणशुद्ध भाषाच वापरली जाते. बातम्या देणारी निवेदिका "आप्ले पंतपरधान काल काय म्हनले की आमी पाकला येक थेंब बी पानी देनार न्ह्याय." असे काही वाचू लागली तर ते अनेकांना खटकेल. आज लेखी मराठी ही ह्या स्थितीत आहे. काही वर्षाने जनमताचा रेटा निर्माण झाला तर पानी आणि लोनी हे शुद्ध होतीलही. पण ते केवळ काही दिवसांत होणे शक्य नाही. निव्वळ काही मूठभर लोकांना ते हवे आहे म्हणून ते शक्य नाही. निव्वळ काही भागातील मराठी लोक तसे बोलतात म्हणून शक्य नाही.
3 Mar 2020 - 9:08 am | माहितगार
जागतिकीकरणाच्या रेट्यात मराठीचे उद्याचे रुप काय असेल हे सांगणे आज कठीण आहे. कसेल त्याची जमिन या नात्याने बोलेल त्याची भाषा अशा खाक्याचा विचार न करण्यात महाराष्ट्रातील बहुजन नेतृत्व चुकले. बहुजनीय मराठीचे बहुजनीय व्याकरण लिहिले गेले असते तर जागतिकीकरणाच्या रेट्यातही बहुजनांना स्वभाषेबद्दल अधिक आपुलकी राहुन ती अधिक चांगली टिकवली गेली असती. पण तो योग बहुजनीय मराठीच्या भाळी नव्हता. महाराष्ट्रात एवढ्या सगळ्या बहुजन चळवळी झाल्या, पण बहुजनीय मराठीचे बहुजनीय व्याकरण लेखनाचा वेळीच आग्रह करण्याच्या गरजेकडे सर्वच बहुजनीय नेतृत्वाने दुर्लक्ष केले आणि बहुजनीय मराठी भाषेचे मोठे नुक्सान केले.