माझ्या वडिलांची ५० वर्षांपूर्वीची कवितांची डायरी सांभाळून ठेवली आहे. वडील पत्रकार, कवी, संपादक होते. तरुण असतानाच गेले. त्या डायरीतील कविता खाली टंकत आहे. कवितेतला मला फारसा गंध नाही. मिपाकरांकडून जर काही रसग्रहण झाले वा प्रकाश पडला तर बरे ह्या उद्देशाने मिपावर टाकत आहे.
"शर"
माझ्या संज्ञेचा पारा....
पडलाय तुटून कुठंतरी
रडतय इथे मानवाचे चिरदुःख
हतभागी गुडघ्यात दुर्दैवी मान खुपसून
शतकानुशतके ...!
पहातय न्याहाळून
आयुष्याच्या तडा गेलेल्या आरशात
स्वतःचे मनहूस प्रतिबिंब!
कवटाळू दे मला ते आभासी दुःख
हुंदक्यांच्या धुमाऱ्यात फुललेले....
कुरवाळू दे मला
प्रकाशाची कुस एकदा तरी !
घालू दे मला एक हळुवार फुंकर
निखारे दडपणाऱ्या राखेवर!
पण __
पण माझ्या संवेदनेचा
शरच कुठंतरी हरवलाय रे!
अशोक चिन्धा आहेर
- दिनांक
१२/३/७१
देवळा
प्रतिक्रिया
27 Jan 2020 - 5:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाहु काय काय अर्थ लावता येतो तो ते.
किंचित व्यस्त आहे. बाकी, जाणकार बोलतीलच.
-दिलीप बिरुटे