माझी ही एक कविता . त्यानंतर काही मास्तर घरी येऊन मला फुकट गणित शिकवू लागले आणि ती संधी साधून या कवितेचा सूड म्हणून त्यांनी मला सडकून चोपले!!!
'पाखरा येशिल कधी परतून?' या कवितेचे कर्ते ना वा टिळक आणि 'परिटा, येशिल कधी परतून?' या, वरील कवितेवर बेतलेल्या विडंबन काव्याचे कर्ते केशवकुमार उपाख्य आचार्य अत्रे यांची दोन्ही हात जोडून क्षमा मागून, तसेच माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या गुरुजनांना , माझा त्यांच्या प्रती असलेला आदर हा अजूनही तसाच आहे याची ग्वाही देऊन तसेच खालील कविता, पुण्यातील माझ्या एका शिकवणीच्या मास्तरांवरून स्फुरलेली आहे असे प्रांजळपणे व्यक्त करून आणि याउपर, तरीही, कोणाच्या भावनांना धक्का लागला तर त्याबद्दल सपशेल आणि विनाशर्त माफी मागून...
मास्तरा- जाशिल कधि परतून?
(आपल्या परम पूज्य गणिताच्या मास्तरांच्या बद्दल आमच्यासारख्या टवाळ कार्ट्यांच्या मनात खालीलपेक्षा आणखी दुसरे कोणते विचार असणार)
मास्तरा- जाशिल कधि परतून? ऐकून तुजला किटले कान
पोरेही कंटाळुन गेली, चाळून चाळून पान न् पान!
बाडबिस्तरा उचलून येथून, जाशिल कधि परतून?
मास्तरा, जाशिल कधि परतून? १
अगम्य ऐसे तुझे बोलणे! अम्हा पामरा कैसे कळणे?
तुझे तुला तरी कळते का रे? काय बरळतो वेडे विद्रे?
पोथ्या काखोटीला मारून, जाशिल कधि परतून?
मास्तरा, जाशिल कधि परतून? २
तुझा लांबडा भेसूर चेहरा, सर्वांवरती कडक पहारा
कोठे चष्मा, कोठे पट्टा! तोंडाचा परि अखंड पट्टा-
जरा तरी थांबवून मास्तरा, जाशिल कधि परतून?
मास्तरा, जाशिल कधि परतून? ३
न्यूटन तिकडे काही म्हणू दे, आईन्स्टाईन काही भकू दे भांडवलावरती त्यांच्या रे, तोडसी का अकलेचे तारे?
उधार अक्कल झाली देऊन, (आतातरी) जाशिल का परतून?
मास्तरा, जाशिल कधि परतून? ४
शिंंकू लागला कोणी तिकडे ! खोकु लागला कोणी इकडे !!तिकडे कोणी म्याऊ करतो, कुणी गुंड रॉकेट फेकतो
स्वतःस आता तरी आवरून, जाशिल का परतून?
मास्तरा, जाशिल कधि परतून? ५
किती दांडगी तुझी चिकाटी ! सदा आमच्या पाठी पाठी!!
मथ्थड डोक्यांंमध्ये अक्कल- भरण्यालाही लागे अक्कल !!कळत नाही तुज हेही मास्तरा- जा आता परतून!
मास्तरा, जाशिल कधि परतून? ६
जसा न्हावी फिरवितो वस्तरा, गि-हाईकांच्या मानेवरूनी पिसाळलेला खाटीक फिरवी, सुरी जशी बोकडांंवरूनी
तशी तुझी ती जीभ आवरून, जाशिल का परतून ?
मास्तरा, जाशिल कधि परतून? ७
फुलायचे हे दिवस आमुचे, करपून गेले तुझ्या धगीने
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी, तुझीच भीषण मूर्ती नयनी!!
एक दिवसतरी सोडून आम्हा, जाशिल दूर निघून?
मास्तरा, जाशिल कधि परतून? ८
गुरगुरणे हे ध्येय आपुले, म्हणुनि कुणि तुला गुरु मानिले? गुरासारखा आम्हा झोडशी, दया क्षमा माहीत न तुजसी!
एक दिवसतरी सोट्या फेकुन, जाशिल दूर निघून ?
मास्तरा, जाशिल कधि परतून? ९
उभा सदा तू इथे गाडुनी, हातामध्ये सोट्या घेऊनी!
घरदार आहे का नाही? किंवा घरि तुज कोणी नाही?
एक दिवस तरी सुट्टी घेऊन, जाशिल का परतून?
मास्तरा, जाशिल कधि परतून? १०
सदा आमच्या मान्गुटीवरी, उतरशील का क्षणभरी तरी?
शंका येते कधी मनाशी, न्यूटनचे तू भूत न असशी?
उरले त्याचे कार्य कराया, आला का अमुच्या राशीशी?
क्रूर असा तू होऊ नको रे, लांब कुठेतरी निघुनी जा रे!
लांब, लांब अति दूरवरी रे, जिथून पुन्हा कधी न ये रे!!
ऐशा जागेवरती बाबा, जाशील कधी परतून? ११
मास्तरा जाशिल कधि परतून, मास्तरा जाशिल कधि परतून?
( हे एक गणिताचे प्राध्यापक सोडले तर मी माझ्या बाकीच्या साऱ्या गुरुजनांचा आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन)
दादासाहेब दापोलीकर
९९९६७८ ४०००५
प्रतिक्रिया
22 Jan 2020 - 10:38 am | एस
हाहाहाहाहा! रोफल!!!!
22 Jan 2020 - 10:54 am | श्वेता२४
हे एक गणिताचे प्राध्यापक सोडले तर मी माझ्या बाकीच्या साऱ्या गुरुजनांचा आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन
हे लै आवडलं :))
22 Jan 2020 - 12:47 pm | ज्ञानोबाचे पैजार
क्रुपया मास्तरांना वाचायला देणे, लैच खुश होइल मोग्यांबो
पैजारबुवा,