शब्द वेध

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
24 Dec 2019 - 5:49 pm

श्री मृगेंद्र कुंतल यांचा पसारा वरील आणि श्री कुमार यांचा शब्दकोशांवरील हे सुंदर धागे वाचुन मला शब्दवेध या नावाने एक धागा काढण्याची कल्पना सुचली.
अर्थात मी भाषा विषयाचा अभ्यासक नाही व वरील लेखकांप्रमाणे माझा सखोल व्यासंग नाही. माझे फक्त शब्दांवर प्रेम आहे आणि त्यांचा धांडोळा घ्यायला मला आवडते. कदाचित मला माहीत असलेले काही शब्दांचे अर्थ बरृयाच जणांना नविन नसावेत पण माझ्यापुरते मला जे रोचक शब्द वाटले अर्थपुर्ण वाटले ते मला इथे तुमच्या बरोबर शेअर करावेसे वाटतात इतकेच. माझ्याप्रमाणे जे इतरही शब्दप्रेमी इथे असतील त्यांना या धाग्याची ही एक हक्काची खुंटी मिळाल्यास आवडलेला रोचक शब्द टांगायला सोपे होइल असे मला वाटते. शब्द बरेचदा नविन भेटतात तेव्हा डोक्यात फिरत राहतात कधी अर्थ शोधले जातात कधी स्मृतीतुन निघुन जातात कधी एकदम वीज चमकल्यासारखा त्यांचा अर्थ दिसु लागतो कधी कोणी नेहमीच्या अतीपरीचीत शब्दांचा अनोखा वापर करतांना दिसतो. या सर्वांची मजा असते. एक एक शब्द आनंद देउन जातो समृद्ध करुन जातो, शब्दांना लगडलेले संदर्भ काळ त्यांचा उगम इतिहास नेहमी खुणावत राहतो कधी धागा सापडतो कधी काहीच गवसत नाही पण मागोवा घेण्यात त्यांच्च्याशी खेळण्यात भरपुर आनंद मिळतो इतके नक्की आणि इतकेच पुरेसे आहे.
असा धागा काढतांना शब्दवेध हा आवडलेला शब्द पहील्यांदा आठवला तो चंद्रकांत काळे यांच्या संचाच नाव शब्दवेध होत त्यामुळे. याच नावाच एक पुस्तक विद्युल्लेखा अकलुजकर यांनी लिहीलेलं आहे अस कुणीतरी सांगितल म्हणुन हे पुस्तक बुकगंगावर शोधतांना ( मी अजुन वाचलेले नाही ) याच्या पानावर फार सुंद र ओळ रेडीमेड सापडली जी माझ्या भावना अचुक व्यक्त करते. ती अशी.
शब्द-वेध म्हणजे शब्दांचा मागोवा. भाषेच्या घनदाट जंगलात घुसून केलेला नादाचा/शब्दांचा/अर्थांचा पाठपुरावा.

तर सुरुवात करतो व नंतर जमेल तसे प्रतिसादातुन एकेक शब्द घेत पुढे सरकतो

खस्ता

एक दिवस विदर्भातील कुठल्याशा गावातुन एस टी महामंडळाच्या बसने जात होतो. शेजारचा माणुस गप्प बसलेला. मला गप्पा मारायची सवय गप्प बसता येत नाही. मी हळु हळु काडी टाकत टाकत संवाद वाढवु लागलो. गडी खवय्या होता गप्पा खाण्यावर आल्या म्हणाला "अरे शेगाव कचोरी भुल जाएंगे आप ये ये यहॉ की कचोरी खाओ " मी सहज विचारलं कैसी है वो कचोरी ? तो म्हणाला " अरे बहोत बढीया एकदम खस्ता " खस्ता ??? कचोरी खस्ता ? माझ्या डोक्यात हा शब्द दोन ठिकाणी आदळलेला होता.
एक गालिब चा प्रसिद्ध शेर माहीत होता
'ग़ालिब"-ए-ख़स्ता के बग़ैर कौन से काम बन्द हैं
रोइये ज़ार-ज़ार क्या कीजिये हाय-हाय क्यूँ
यातला खस्ता हाल ट्रॅजीक गालिब माहीत होता. दुसरा " संसारासाठी मी इतक्या खस्ता (?) खाल्या आणि शेवटी हे नशिबी आलं " हे डायलॉग खुप वेळा ऐकलेले. पण खस्ता कचोरी पहील्यांदाच ऐकली ( खाल्ली नाही ) मग अर्थ शोधला खस्ता चा तिथे रीतसर पहीला अर्थ होता. दुर्दशाग्रस्त जो आपला वरील शेर मधला गालिब. पण हा खस्ता म्हणजे कुरकुरीत क्रिस्पी खस्ताच्या विरोधी अर्थाने कडक कचोरी कोणाला आवडेल. तोंडात सहज तुडवली जाईल अशी खस्ता कचोरी किंवा असा कोणताही खाद्यपदार्थ जो ही क्वालिटी बाळगतो तो.
वि० [फा०खस्तः] १. बहुत थोड़ी दाब में टूट जानेवाला। भुरभुरा। २. जो कान में मुलायम तथा कुरकुरा हो। जैसे– खस्ता कचौड़ी, खस्ता पापड़। ३. टूटा-फूटा। भग्न। ४. दुर्दशा-ग्रस्त

कल्लोलिनी

श्री माधव ज्युलियन यांचे छंदोरचना हे सुंदर पुस्तक आहे. यात पहिल्यांदा हा शब्द माझ्या वाचनात आला. यात एके ठिकाणी ते म्हणतात " गद्यातही रमणीय आंदोलन असते. एखाद्या गद्यगंगाधराच्या ( हा पण रोचक शब्द आहे मराठीतले गद्यगंगाधर गाडगीळांचे नाव गंगाधर आहे हा योगायोग म्हणावा का ? ) भाषेत जेव्हा लेखन एकप्रकारच्या जेव्हा समाधीतच झाले असावे असे वाटते आणि भाषा ही कल्लोलिनीप्र्माणे भरपुर ओढाळ आणि नादवती होते तेव्हा तीत एक प्रकारचे श्रेष्ठ गुढ आंदोलन प्रत्ययास येते."
कल्लोलिनी म्हणजे अशी नदी ज्यात भरपुर लाटा तरंग उठतात किंवा अशा लाटा तरंगाचा कल्लोळ करत वाहणारी कल्लोलिनी नदी. नदी किंवा सरीता या नेहमीच्या गरीब शब्दांना किती सुंदर नादमय पर्यायी शब्द आहे हा. आणि हा असा प्रचाराबाहेर का गेला असावा ? माहीत नाही. मग हा शब्द जेव्हा अजुन शोधला तेव्हा श्री रुद्राष्टकम मध्ये सापडला तो असा

तुषाराद्रि संकाश गौरं गम्भीरं। मनोभूत कोटि प्रभा श्री शरीरं।
स्फुरन्मौलि कल्लोलिनी चारु गंगा। लसद्भालबालेन्दु कण्ठे भुजंगा॥3॥
याचा दिलेला अर्थ खालील प्रमाणे होता
व्याख्या - जो हिमाचल समान गौरवर्ण व गम्भीर हैं, जिनके शरीर में करोड़ों कामदेवों की ज्योति एवं शोभा है, जिनके सर पर सुंदर नदी गंगा जी विराजमान हैं, जिनके ललाट पर द्वितीय का चंद्रमा और गले में सर्प सुशोभित है ॥3॥

इथे कल्लोलिनी शब्दावरुन हलकल्लोळ शब्द आठवुन माझ्या मनात विचारांचा कल्लोळ माजला. मला अजुन ऑनलाइन मराठी डिक्शनरी अजुन नीट शोधता येण्याची प्रॅक्टीस नाही. नबाच्या प्रतिसादावरुन आता दाते त शब्द थोडा थोडा शोधता येतो पण अजुन ते व्यवस्थित जमत नाही. म्हणजे मराठी टायपुन मग शोधावा की कसे म्हणुन सध्या गुगलुनच शोधतो तर इथे हिंदी अर्थात कल्लोलिनी चा अर्थ अधिक स्पष्ट करणारे विवरण असे आढळले
जल का वह प्राकृतिक प्रवाह जो किसी पर्वत से निकलकर निश्चित मार्ग से होता हुआ समुद्र या किसी दूसरे बड़े जल प्रवाह में गिरता है
तर मोठा सुंदर नादमय शब्द आहे मला खुप आवडला.

Mamihlapinatapai

एक गाणं आहे मनीषा कोइरालावर चित्रीत झालेलं जावेद अख्तर च गाणं आहे त्याच्या ओळी अशा आहे
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
क्या कहना है, क्या सुनना है
मुझको पता है, तुमको पता है
समय का ये पल थम सा गया है
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
आता यात दोन्ही प्रेमी जीवांना एकमेकांच्या ह्रद्यी फुललेला वसंत कळलेला आहे. एकमेकांच्या भावना क़ळलेल्या आहे. आणि त्या शब्दांनी व्यक्त करुन त्यातला आनंद त्यांना घालवण्यात अजिबातच रस नाही. तर मराठी ताणून आपण म्हणु शकतो की दोन प्रेमी मौनरागमग्न आहेत. ठिकाय बस्स पण Mamihlapinatapai हा एक शब्द आहे Yaghan भाषेतला. हा भाषांतर करण्यासाठी फार कठिण शब्द मानला जातो. ही भाषा मला माहीत नाही अजिबात पण शब्द त्याच्या अर्थामुळे भारी वाटला. याचा जो एक अर्थ दिलेला आहे तो खालीलप्रमाणे

"It is that look across the table when two people are sharing an unspoken but private moment. When each knows the other understands and is in agreement with what is being expressed. An expressive and meaningful silence."

दुसरा अर्थ असा
"A look that without words is shared by two people who want to initiate something, but neither start" or "looking at each other hoping that either will offer to do something which both parties desire but are unwilling to do
हा अर्थातच थोडासा चावट अनुभवाकडे निर्देश करतो
प्रत्येकाने कधीना कधी याचा अनुभव घेतलेला असावा
आता मराठीत याचा अनुवाद कसा करता येइल?
आणि त्यांची नजरानजर झाली मग पुढे काय झाल ? जुन्या अगदी जुन्या गरीब चित्रपटांत गरीब दिग्दर्शक दोन फुल दाखवायचे मग ती एकमेकांवर आदळायची बस झाल.
मराठी नेत्रपल्लवी या शब्दाच्या अर्थाच्या जवळ जातो पण वरील पहीला अर्थ हा कंटीन्युइटी दर्शवतो व नेत्रपल्लवी क्षणिक असते हा एक मुलभुत फरक आहे.
किसलय

महान कवि सुमित्रानंदन पंत यांच्या " पतझर" कवितेत हा शब्द येतो. या सुंदर कवितेच्या या ओळी बघा अगोदर्
झरो झरो झरो
जंगम जग प्रांगण मे, जीवन संघर्षण मे
नवयुग परीवर्तन मे , मन के पीले पत्तो
झरो झरो झरो
या ओळीत पण बघा " जंगम " शब्द जनरली आपण मराठीत् हा सरकारी शब्द "स्थावर व जंगम मालमत्ता " इतका रुक्ष वापरतो त्याचा असा काव्यात्मक वापर
क्वचितच आढळतो.
नंतर बघा
तुम पतझर तुम मधु....जय !
पीले दल , नव किसलय
तुम्ही सृजन, वर्धन, लय
आवागमनी पत्तो
सरो सरो सरो
किसलय चा अर्थ असा आढळतो [सं-पु.] - 1. पौधों में निकलने वाले नए पत्ते; कोंपल; नवपल्लव; कल्ला 2. अँखुआ; अंकुर।
इथे नव किसलय हा नव्या पालवी कडे निर्देश आहे.

याच्या अर्थात दिलेला अँखुआ हा ही बघा मस्त शब्द आहे जणु नवी पाने म्हणजे झाडाचे डोळे याचा ही अर्थ अंकुर च . पण नवी कोवळी पाने अशोक च्या झाडाची कोवळी मऊ मुलायम पाने आठवातात ? अजुन एक यात जो पतझड साठी मधु जय शब्द वापरला आहे तो बघा
हिन्दीत मधुमास म्हणजे वसंत ऋतु चैत्रमास इथे पतझड साठी वापरलेला आहे पण .इथे मी थोडा कन्फ्युज होतोय कारण मधु जय कसा ते काय कळत नाही.
रजनीश यांच्या एका पुस्तकाचे नाव आहे " कोंपलें फिर फूट आँई"

फ़रहत शहज़ाद च्या या सुंदर ओळी बघा

कोंपलें फिर फूट आँई शाख पर कहना उसे

वो न समझा है न समझेगा मगर कहना उसे

वक़्त का तूफ़ान हर इक शय बहा के ले गया

कितनी तनहा हो गयी है रहगुज़र कहना उसे

भाषाआस्वाद

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

24 Dec 2019 - 6:49 pm | कुमार१

शब्दविहार आवडला.
आपण जर शब्दांशी समरस झालो, तर ते सुद्धा आपल्याशी बोलतात !

गणेशा's picture

25 Dec 2019 - 12:18 am | गणेशा

अप्रतिम...
पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे.. उद्या निवांत पुन्हा वाचणार लेख..
एकूण तुमचा शब्दवेध आणि त्यासाठीचे शब्द संचित जबरदस्त आहे..

जाता जाता : कुमार यांच्या धाग्यातील 'माळवद' हा शब्द वाचला आणि मन माझ्या आजोळी गेले, तेथील सर्व घरे माळवदाची होती.. ते बालपण...
शब्दांवरून असे आठवनिंच्या राज्यात पण मस्त जाता येते..

कधी काळी थोडे लिखाण करायचो, तेंव्हा 'शब्दमेघ' नावाने लिहायचो... त्यावरून तर खूप आठवणी...

धन्यवाद...

मारवा's picture

25 Dec 2019 - 7:31 am | मारवा

लेखक राजकारणी शशी थरुर हे कठिण विलक्षण असामान्य इंग्रजी शब्दांचा वापर त्यांच्या लेखनात बोलण्यात करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विधांनावरुन बरेचदा वाद होत असतात. फार पुर्वी एकदा त्यांच्या cattle class च्या विधानावर मोठी राळ उडाली होती. तर मागे एकदा त्यांनी एक ट्वीट करुन त्यांच्या अशा लांब कठीण इंग्रजी शब्दवापरासाठी वाचकांची माफी मागितलेलेली होती त्यातही त्यांनी एक विलक्षण शब्द वापरुन उपहासात्मक टोमणा मारला ते ट्वीट असे होते.
I'm sorry if one of my tweets y'day gave rise to an epidemic of hippopotomonstrosesquipedaliophobia!
[Don't bother looking it up: it's just a word describing a fear of long words].
But #TheParadoxicalPrimeMinister contains no words longer than Paradoxical!
या शब्दाचा अर्थ ही त्यांनी दिलेला अजुन खणायचे तर या सस्थळावर बघु शकता इथे विविध प्रकारच्या फोबियांची विस्तृत माहीती आहे. या भीतीचे परीणाम या भितीच्या एका सर्वेक्षणाचा अहवाल वगैरे ही आहे.

https://www.fearof.net/fear-of-long-words-phobia-hippopotomonstrosesquip...

People suffering from Hippopotomonstrosesquippedaliophobia tend to experience a great deal of anxiety when faced with long words. It is indeed ironical that the scientific name given to this phobia is such a long one

इथपर्यंत ठिक होते पण हे कमी होते की काय त्यांच्या या वरील ट्वीट ला जयेश गोपीनाथन नावाच्या व्यक्तीने उत्तर दिले ते म्हणजे कहर च होते ते असे

Being a sesquipedalian, Mr. Tharoor is quite ebullient in gasconading about his habit of circumlocution. Little does he show any perspicaciousness or excogitate before assuming rest of the people are saxicolous. This is idiosyncratic with his personality of being anomalistic!

माझी लांब शब्दांची भिती वाढुन मला सध्या घाम फुटलेला आहे मला पॅनिक अटॅक आलेला आहे. सायटीत दाखवलेली खालील लक्षणे मी अनुभवतोय काय म्हणावे या स्थितीला ? पळुन जा गडे पळुंजा !!!
People suffering from Hippopotomonstrosesquippedaliophobia tend to experience a great deal of anxiety when faced with long words. It is indeed ironical that the scientific name given to this phobia is such a long one

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Dec 2019 - 9:31 am | ज्ञानोबाचे पैजार

विशेषतः वरची जुगलबंदी फारच मस्त.
अजून नव्या शब्दांच्या मेजवानीची अपेक्षा आहे.
पैजारबुवा,

mrcoolguynice's picture

25 Dec 2019 - 9:31 am | mrcoolguynice

"फ़क़त"

माझा मित्र(इंग्लिश मिडीयमवाला ), हा शब्द जेव्हा , ऐकायचा (गाणं हिंदी असलं तरीही ) तेव्हा लय हसायचा..
म्हटलं , का रे बाबा, यात हसण्यासारखं काय ?..

उस हसीन ने कहा, सुनो जान-ए-वफ़ा
ये फ़लक़ ये ज़मीं, तेरे बिन कुछ नहीं
तुझपे मरती हूँ मैं, प्यार करती हूँ मैं
बात कुछ और थी, वो नज़र चोर थी
उसके दिल में छुपी, चाहत और गर्ज़ी थी
प्यार का, तो फ़क़त, इक बहाना था
इक हसीना थी, इक दीवाना था ...

विजुभाऊ's picture

25 Dec 2019 - 1:15 pm | विजुभाऊ

वा सुंदर लेख आहे हा

रमेश आठवले's picture

25 Dec 2019 - 10:50 pm | रमेश आठवले

शासन आणि चेष्टा
हे दोन मुळात संस्कृत मधून मराठीत आलेले शब्द. पण त्यांचा अर्थ मराठी मध्ये बदलतो. संस्कृत मध्ये किंवा हिंदी मध्ये त्यांचा अर्थ शिक्षा आणि प्रयास असा आहे. पण मराठीत तेच शब्द ऍडमिनिस्ट्रेशन आणि मस्करी या अर्थाने वापरतात.

मारवा's picture

26 Dec 2019 - 10:45 pm | मारवा

Queen चा प्रचलित अर्थ एखाद्या स्वतंत्र राज्याची स्त्री शासक किंवा राजाची पत्नी असा आहे. जो सर्वात जास्त प्रचलित आहे.
दुसरा एक अर्थ एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील एक यशस्वी श्रेष्ठ स्त्री उदा. ब्युटी क्विन टेनिस क्विन इ. असा ही एक प्रचलित वापर आढळतो तर या व्यतिरीक्त
याचा जो समलैंगिक संदर्भातील अर्थ आहे व शब्द आहेत ते बघु या. शब्दकोशात दिलेला अर्थ असा
a homosexual man, especially one regarded as ostentatiously effeminate.

How the Homosexuals Saved Civilization: Cathy Crimmins
या पुस्तकात लेखिका या शब्दाचा मागोवा घेते.त्यात खालील शब्दांचा उल्लेख येतो.

१- Drag Queen
a man who ostentatiously dresses up in women's clothes.
या प्रकारचा समलैंगिक पुरुष स्त्रीयांची वस्त्रे पोषाख घालुन वावरतो.
२-Size Queen
A man who prefers large penises
3-Curry Queen
a white Caucasian man who exclusively prefers to date South Asian (Indian, Pakistani etc.) men.

यात लेखिकेचे एक् असे रोचक मत आहे की Queen हा शब्द कालांतराने हेट्रोंच्या विश्वात संक्रमित झालेला आहे त्या म्हणतात की या शब्दाचा आता जो अर्थ स्थिर झालेला आहे तो असा की
" To be a queen means you are particularly intense about something इथे उदा. ज्याला सिनेमाचं वेड आहे त्याला मुव्ही क्विन म्हणू शकतो.
त्यांच्या मते हेट्रोंच्या हद्दीत हा शब्द ( या शब्दाचा वापर ) हा गेल्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे Drama Queen हा शब्द आहे.
याच्या प्रत्यक्ष वापराचे एखादे उदाहरण आढळल्यास शोधुन टाकतो

मारवा's picture

26 Dec 2019 - 10:46 pm | मारवा


श्री अनिरुद्ध कुलकर्णी त्यांच्या ब्लॉगमध्ये Toska या रशियन शब्दा संदर्भात झपुर्झा चा उल्लेख करतात हे रोचक आहे अवश्य पहावे. त्यांच्या मते Toska एक
it is a sensation of great spiritual anguish आहे. आणि झपुर्झा हा मराठी शब्द याच प्रकारची अर्थछटा दाखवतो.

http://searchingforlaugh.blogspot.com/2012/09/is-toska-zapurza.html


उगमा बद्दल बोलायच तर माझ्या मते हा शब्द केशवसुतांनी नव्यानेच निर्माण केलेला आहे. यामागे कारण असे असावे की सहसा आध्यात्मिक अनुभुती च्या प्रांतात किंवा त्या श्रेणीतला अनुभव कवीला आलेला असेल तर तिथे एक समस्या असते. म्हणजे असा जो " पल्याड चा अनुभव " असतो तो भाषेतील उपलब्ध शब्दांच्या व त्यांना चिकटलेल्या रुढ अर्थांमधुन व्यक्त च होऊ शकत नाही असे कवीला वाटत असावे. म्हणुन त्यांना उपलब्ध जुन्या शब्दापैकी एक वापरण्यात अडचण असावी कारण तो चुकीचा अर्थ पोहोचवेल. मग आपली अनुभुती पोहोचवण्यासाठी कवीला नवाच शब्द निर्माण करण्याची गरज निर्माण होत असावी. या उर्मीतुन अशा विलक्षण शब्दाची निर्मीती झाली असावी होत असावी.
नेती नेती या मार्गानेही जसा ते हे नाही ते ते हे ही नाही असे करत करत ते काय असावे याकडे निर्देश करत तिथपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न असतो. इथेही कवी त्याचा अनुभव पोहोचवण्याचा डेस्परेटली प्रयत्न करत आहे. मात्र इथे तो नविन शब्दनिर्मीती ही करुन मदत करतोय.
हर्षखेद ते मावळते,
हास्य निवालें
अश्रु पळाले;
कण्टकशल्यें बोंथटलीं,
मखमालीची लव वठली;
कांही न दिसे दृष्टीला,
प्रकाश गेला,
तिमिर हरपला;
काय म्हणावें या स्थितिला ?-
झपूर्झा ! गडे झपूर्झा ! १

आता झपुर्झा हा शब्द कुठुन सुचला असेल ते फारसे महत्वाचे यासाठी वाटत नाही की त्यांना एक युनिक लेबलींग त्यांच्या युनिक अनुभुतीसाठी हवे होते हे महत्वाचे आहे तरी गुगलल्यावर हे सापडले.
उद्गा . ( काव्य ) जा , पोरी , जा , हें वाक्य झपाटयानें उच्चारलें असतांना होणारा ध्वनि , शब्द . हा शब्द केशवसुत कवीनें प्रत्यानंदाच्या सीमेचा वाचक याअर्थी रूढ केला . झपूर्झा ! गडे झपुर्झा ! - केक १०६ .

अजुन एक पर्याय असतो
That whereof we cannot speak, thereof we must remain silent’,
पण असे कवीच्या बाबतीत अवघड असावे कदाचित. एक "गुंगे का गुड" संकल्पना आहे ती अशीच एखाद्या मुक्या माणसाने गुड खाल्ला तर आता त्याने त्याचा गोडवा कसा वर्णावा ?

या कवितेत ज्या विरोधाभासाच्या जोड्या केशवसुतांनी दाखवलेल्या आहेत त्यातील
हर्ष खेद आसु हसु या कॉमन आहेत पण सर्वात विलक्षण जी जोडी आहे ती
कण्टकशल्ये आणि मखमालीची लव
त्यातही अजुन स्पेसीफिक निर्देश करण्यासारखा म्हणजे
कण्टकशल्ये चे बोथटणे पण कॉमन वाटते
पण मखमालीची लव " वठणे" चा जो कॉन्ट्रास्ट वरील कण्टकशल्ये ला दिलेला आहे
तो निव्वळ अप्रतिम काव्याचा नमुना आहे

शिवकालीन महसुल व्यवस्थेवरील एका पुस्तकात खालील माहीती आढळली.शिवरायांच्या राज्यकारभारात त्याचे अष्टप्रधान मंडळ होते. या अष्टप्रधान मंडळाच्या हाताखाली खालील १८ कारखाने होते त्यांची नावे अशी

१-खजिना २- जवाहिरखाना ३-अंबरखाना ४-शरबतखाना ५- तोफखाना ६-दफ्तरखाना ७- जामदारखाना ८-जिरातखाना ९- मुतबखखाना १०-उष्टरखाना
११-नगारखाना १२- तालीमखाना १३-पीलखाना १४-फरासखाना १५-दारुखाना १६-शरतखाना

या व्यतिरीक्त या व्यवस्थेत १२ महाल होते ते असे

१- पोते २- सौदागिर ३- पालखी ४-कोठी ५- इमारत ६ -बहिली
७-पागा ८-शेरी ९- दरुनी १०-थट्टी ११-टांकसाळ १२-छबिना

यातील वेगळा वाटला व आजही रीलेट करता येइल असे दोन अगोदर घेउ.

पीलखाना -फिलखाना
हैद्राबादेत जुन्या हैद्राबादेत एक भाग आहे बहुधा बेगम बजार च्या जवळ त्याचे नाव पीलखाना असे आजही आहे. तेथे प्लास्टीक जनरल ट्रेडींग चे मोठे सेंटर आहे अनेक ठोक किरकोळ दुकाने असलेला हा व्यापारी भाग आजही आहे.
तर याचा अर्थ हत्ती ठेवण्याची जागा असा होतो. म्हणजे इथे सैन्यासाठी वा इतर राज्याचे जे हत्त्ती आहे ते इथे ठेवले जात असावेत. याचा अचुक उच्चार फिलखाना असा आहे फिल हा अरेबिक फारशी उगम असलेला शब्द आहे फिल चा अर्थ हत्ती असा दिलेला आहे. यावरुन हा शब्द फिलखाना असा आहे.
आता वरती अजुन एक अंबरखाना हा शब्द आहे.याठिकाणी हत्तीवरील सामान अंबारी संबंधित शस्त्रे इत्यादी बाळगणे साठी हा आहे ( उत्पादनही होत असावे कदाचित माहीत नाही )

फरासखाना

पुणे नगरीत एका पोलिस चौकीचे नाव " फरासखाना पोलिस चौकी " असे आहे. फरासखाना चा अर्थ जो मला सापडलाय एका शब्दकोशात तो वस्तुभांडार या अर्थाने आहे.म्हणजे मंडप सामाना या अर्थाने मला वाटते कदाचित सैन्या साठी चे तंबु व ते उभारण्यासाठीचे कापड दोरखंड बांबु हा सेट फरासखान्यात ठेवला बनविला जात असावा.

उष्टरखाना म्हणजे उंट व त्याच्या संबंधित सामानाच्या कारखान्याचे नाव.

शरबतखाना
हा शब्द रोचक वाटला. शरबत ही आपली मर्यादीत ओळख सध्याची आहे. एक प्रकारचे फळाचा अर्क असलेले गोड पेय जसे रुह अफजा इत्यादी. पण शरबत चा म्हणजे या द्रावणाचा या शरबत ला एक औषधी अर्थाची छटाही आहे. खर म्हणजे शरबत ची व्याख्या फार व्यापक आहे. शब्दकोशात शरबत चा अर्थ डिस्पेन्सरी असाही दिलेला आहे. हा इथे डिटेल अर्थ बघावा पुर्ण अर्थ अनेक बाबी दाखवतो न्ह्वाव्या कडील एक परंपराही त्यात येते.

P شربت sharbat (for A. شربة, n. of un. fr. sharb, inf. n. of شرب 'to drink'), s.m. A draught (of water, &c.), drink, beverage, cup; sherbet, sugar and water (the most com. signification); a dose of medicine, draught, potion:—sharbat pilānā (-ko), To give (a barber) sherbet to drink (and so seal the betrothal which he has arranged):—sharbat-pilāʼī, s.f. The present made by a bride and bridegroom to the barber who arranged the marriage:—sharbat-ḵẖāna, s.m. A dispensary:—sharbat-dār, s.m. A servant who has charge of the water, wine, &c.; a butler:—sharbat-ke-se ghūṅṭ pīnā, To gulp down as sherbet; (fig.) to suffer meekly.

यातील एक किती छान आहे बघा शरबत के से घुट पीना चा अर्थ तो म्हणतो to suffer meekly. ( हे सिद्ध करते की शरबत हा कडु औषधी काढा सारखेही असेल की जे सहन करणे अवघड असावे त्यावरुन हा वाकप्रचार आलेला असावा. सध्याच्या शरबत च्या रुह अफजा इमेज चे हे शरबत नाही )
तर वरील शरबत चा व्यापक अर्थ बघितल्यावर शरबत खाना हा १८ पैकी एक कारखाना असण्याइतका महत्वाचा विषय का होता याची कल्पना येते.

महालापैकी
बहिली चा अर्थ रथ असा दिलेला आहे याचा अर्थ रथाशी संबंधित काही कारखाना असावा इतकेच आकलन होते.
तसेच थट्टी चा अर्थ गोठा इतकाच दिलेला आहे यावरुन फारसा बोध होत नाही
दरुनी महाल
मात्र लक्ष वेधुन घेतले ते दरुनी ने अर्थ दिलेला आहे अन्त:पुर या शब्दाचा शोध घेतला तर मजेदार माहीती कळते. एक दरुनी म्हणजे आंतील असा एक लिटरल अर्थ उर्दु शब्दकोश दाखवतो आता बघा अंदरुनी हा प्रचलित शब्द पण हाच अर्थ दाखवतो म्हणजे लिंक बरी लागते. दुसरा अर्थ उर्दु शब्दकोशात सरळ सरळ जनाना जनानखाना असाच दिलेला आहे. गंमत म्हणजे अंत;पुर हा ही शब्द सरळ सरळ सारखाच अर्थ दाखवतो. ते काही त्याला जनानखानाच आहे असे म्हणत नसावेत त्यांच्या दृष्टीने आंतील कार्ये करण्याची जागा स्थान इतकेच्
महालातील पोते चा निर्देश खजिना असा केलेला आहे. हे सांभाळणारा व्यक्ति "पोतदार" हा म्हणजे धातुपरीक्षक अधिकारी होता अशी जुजबी माहीती मिळते.
सध्या पण पोतदार हे आडनाव आढळते.
पण रोचक बाब म्हणजे दरुनी महाल शिवाजी महाराजांच्या ऑफिशीयल कारभाराचे एक अभिन्न अंग होते.