दुर्वास

निराकार गाढव's picture
निराकार गाढव in जे न देखे रवी...
3 Dec 2019 - 5:33 am

एक ओजस्वी संन्यासी
ज्यास विमुक्तीचा ध्यास ।
करि ध्यान रात्रंदिन
करि शास्त्रांचा अभ्यास ।।

रुक्ष ज्याची दिनचर्या
करि कडक उपास ।
ओढी अतोनात कष्ट
किती सेवेचे सायास ।।

ऐसे दिन कित्ती गेले
हिमालयाच्या कुशीत ।
तैसा राहून एकला
जाले महीने, वरिस ।।

पण एके दिनी येता
मातापित्यांचा आठव ।
परतला मूलग्रामी,
गृही, शोधुनिया ठाव ।।

जैसा परतला गृही,
दिसे गर्दी, कोलाहल ।
दिले झोकून संसारी
झाला कल्लोळ अपार ।।

साही अपेक्षांची ओझी
स्वार्थी, पोटार्थींची ढोंगं ।
होई वेळोवेळी क्रोधी,
खूप व्याकूळ, व्याकूळ ।।

मग एके सायंकाळी
झाला वदीता मातेस ।
मनातली तगमग,
सारा मनातला त्रास ।।

"हिमालयी बैसोनिया
केले होते किती तप ।
नाही आला कधी क्रोध
नाही स्फुरला विकार" ।।

"कसा, किती होई इथे
माझा संताप, संताप ।
कैसे मूढ जन सारे,
काही सुचेना जिवास" ।।

"उबगलो माणसांस
किती क्षूद्र मने त्यांची ।
वारंवार करि क्षुब्ध
त्यांची वेडी वाचाबाची" ।।

स्मितहास्य करूनिया,
चुंबुनिया वृद्धा त्यासि
म्हणे, "माझ्या राजा,
किती कष्टसि जिवासि !"

"दमुनिया गेला बाळ
क्रूर जगीच्या व्यापात,
घेई श्वास क्षणभर,
ऐक प्रेमाचा विचार ।"

"शांति तिथे डोंगरांत
सांग, कोणाचि वदावि?
तुझ्या मनाचा निग्रह
की हीमाद्रिची ठेव?"

ऐकोनिया बोल ऐसे
मन त्याचे झाले स्तब्ध ।
आलंगुनि मातेसि तो,
म्हणे, "अहं झाला विद्ध!"

कविता

प्रतिक्रिया

राघव's picture

3 Dec 2019 - 7:02 am | राघव

किती सुंदर! सहज, साधं आणि सरळ.
खूप आवडली रचना.

कित्ती कित्ती दिवसांनी परत!!
आता हा दु:खी सन्यासी कोण?

प्राची अश्विनी's picture

3 Dec 2019 - 8:11 am | प्राची अश्विनी

वाह!

जॉनविक्क's picture

3 Dec 2019 - 8:28 am | जॉनविक्क

श्वेता२४'s picture

3 Dec 2019 - 10:45 am | श्वेता२४

तुझ्या मनाचा निग्रह
की हीमाद्रिची ठेव?

आलंगुनि मातेसि तो,
म्हणे, "अहं झाला विद्ध!

खूपच भावले मनाला :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Dec 2019 - 9:04 am | ज्ञानोबाचे पैजार

कधी कधी हिमालयात न जाता देखिल अशी आवस्था होते...
आवडली हेवेसांन
पैजारबुवा,

जॉनविक्क's picture

4 Dec 2019 - 4:38 pm | जॉनविक्क

जर हिमालयात न जाता देखिल अशी आवस्था होते...
तर झैरात कशी करता यावी ...?

ह