समीक्षा

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
18 Nov 2019 - 10:56 am

(सामना 17 नोव्हेंबर 2019 च्या ‘उत्सव’ पुरवणीत प्रकाशित झालेला लेख)

अवघड आशयाची सोपी अभिव्यक्ती:

- प्रा. लक्ष्मण पाटील

‘मी गोष्टीत मावत नाही’ ही एक कादंबरी आहे असं प्रकाशकाने सोयीसाठी म्हटलं असलं तरी या पुस्तकाचं वाचन करताना असं लक्षात येतं, की ही एक केवळ कादंबरी नसून अनेक साहित्य प्रकारांचा एक अनोखा संगम आहे. साहित्याच्या कोणत्या कॅटेगरीत बसवावा असा प्रश्न उपस्थित करणारा हा एक साहित्य प्रकार म्हणता येईल. या नवकादंबरीबद्दल लेखक डॉ. सुधीर देवरे यांचे अभिनंदन.
कादंबरीचा नायक स्वधर्म देवकिरण नावाचा असून तो एक साधा कर्मचारी आहे. एक दिवस तो आपल्या विचारात दंग होत स्वतःसाठी वेळ देतो आणि त्याच्यातील ‘मी’ जागृत होतो. जीवनाचं वास्तवात खरं स्वरूप काय? असा विचार सुरू होतो. तो स्वतःच्या अंतर्नादातून जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहतो, त्यावेळी त्याच्यातला ‘मी’ केवळ एखाद्याच गोष्टीत मावणारा नाही हे लक्षात येतं. कारण केवळ त्याच्यातलाच नाही तर जागतिक मी जागृत होऊ लागतो.
ह्या कांदबरीची सुरूवात माणूस आणि माणसाचे मन यावर केंद्रित होताना दिसते. माणूस जीवनात कोणत्याही कानाकोपर्याेत राहून, एखादं व्रत अंगिकारून स्वतःचं एक भव्य भावविश्व निर्माण करू शकतो, आणि त्या विश्वात रंगण्यासाठी आपली कर्मकृती सुरू करू शकतो, असं वैश्विक मन इथं आपल्याशी संवाद साधू लागतं. थोडक्यात प्रत्येक व्यक्ती एक विशेष व्यक्ती आहे.
‘मी गोष्टीत मावत नाही’ या कादंबरीचा नायक- सुधर्म देवकिरण याला मानवी जीवन म्हणजे काय, हे घटना- प्रसंगातून व वास्तव अनुभवातून कळतं. सोप्या साध्या शब्दांत तो आजचे अभिनव सुविचार- सुभाषितं पेरत राहतो. अमूल्य मानवी जीवनात प्रेमाचं शाश्वत रूप होत राहतो. कादंबरीचं कथानक ‘मी’ या पात्राभोवती फिरतं आणि हा ‘मी’ गीतेतल्या मी सारखा प्रचंड असल्याचं लक्षात येतं. वाचक कादंबरी वाचण्यात इतका गुंग होतो, की कादंबरी वाचून झाल्यावरच भानावर येतो, अशी ही अफलातून कादंबरी आहे. ‘मी’ म्हणजे तू, तो, ती, ते, त्या असं सर्व काही असल्याचं कादंबरीच्या सुरवातीलाच सांगितलं जातं. ह्या आभासी आणि तरीही वास्तव माणसाभोवती कादंबरीचं कथानक एखाद्या भुतभोवरीसारखं झपाटून फिरत राहतं. खरं तर या कादंबरीला अमूक एक कथानक आहे, असं म्हणता येणार नाही आणि तरीही ती वैश्विक जीवनमूल्य मांडत राहते. या कादंबरीची तुलना आधीच्या कोणत्याही पूर्वसूरींच्या कादंबरीशी करता येणार नसली तरी मला ही कादंबरी वाचतांना भालचंद्र नेमाडेंच्या ‘कोसला’तील पांडुरंग सांगवीकर डोळ्यासमोर आला.
कादंबरीतून वर्तमान काळातील जागतिक, देशिक व स्थानिक भूभागातील घटना आणि त्या द्वारे मानवी जीवनावर होणारा परिणाम याचं उदाहरणादाखल चित्र चलचित्रांप्रमाणे शब्दांद्वारे मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केला आहे.
‘मी गोष्टीत मावत नाही’ ह्या कादंबरीच्या मीमांसेपेक्षा तिचे लेखन वैशिष्ट्ये सांगण्यावर मी अधिक भर देणार आहे: या कादंबरीत वर्तमानकालीन मानवी मनाचा संघर्ष उदाहरणादाखल मांडला आहे. या वर्तमानाचा कालपट वीस बावीस वर्षांचा असा दीर्घ आहे. कादंबरीचं कथानक एकाच पात्राभोवती फिरत असलं तरी हे पात्र अनेकमुखी- अनेक माणसांचं प्रातिनिधीक रूप धारण करतं. म्हणजे आपण सगळेच आहोत त्या पात्रात असा भास निर्माण होत राहतो. भाषिक सौंदर्यस्थळे आपोआप आणि सहज निर्माण होतांना दिसतात. कादंबरीची भाषा साधी-सोपी असली तरी आशयातून आकलन होणारा गर्भित अर्थ कठीण आणि अवघड आहे.
भाषिक अलंकारातून वाक्य रचना जाणीवपूर्वक केली असली तरी त्यात कमालीची सहजता आली आहे. उदा. ‘रंधा मारलेली मराठी.’ असं एक वाक्य येतं.
या कादंबरीचं वेगळंपण म्हणजे वाचकाला संमोहीत करत वाचनाचा आनंद देणारं कथानक. सर्वसामान्य वाचक तर यात गुंग होणारच पण जो उत्तम साहित्याचा वाचक- रसिक आहे वा स्वत: साहित्यिक आहे त्याला या पुस्तकाचा आनंद अवचर्णनीय असा मिळतो. साहित्य संदर्भातील अभिनव आणि वेगवेगळ्या व्याख्या होत राहतात. त्या अर्थातच विडंबनात्मक- उपहासात्मक असल्याचं लक्षात येतं.
कादंबरीतलं पात्र स्वतःची निंदा करत- स्वत:ला नावं ठेवता ठेवता त्याचा रोख वाचकांकडे वळतो. जगातील लोकांची मानसिकता ओळखणारं हे पात्र आहे. प्रत्येक वाचकाला हे कथानक आपल्या जीवनविश्वाशी घट्ट जखडून ठेवतं. कादंबरीची वाक्यरचना लहान लहान वाक्यांची आहे. क्वचित एका शब्दातही वाक्य पूर्ण होतं. वाचकाला ही वाक्य रचना गुंतवून ठेवते. वाचक विचार प्रवृत्त होतो.
कादंबरीचं कथानक एखाद्या आत्मकथनासारखं प्रवाहीत आहे. पात्रात वाचकच प्रत्येक ठिकाणी स्वत:ला पाहू लागतो. म्हणजे जो जो वाचक ही कादंबरी वाचेल त्याला हे पुस्तक म्हणजे आपल्या जगण्याची गोष्ट- आत्मकथन आहे की काय याचा प्रत्यय येतो. ही कादंबरी मराठी साहित्यातील आतापर्यंतच्या कादंबरी लेखनाचा वेगळा मार्ग निवडते आणि त्यात यशस्वी होते. विस्तृत कथानकाचा पट न मांडता जीवनातील एका पात्राच्या मनचाळ्यांवर कादंबरी प्रकाश टाकते. हे मनचाळे अफलातून आणि निखळ सत्य मांडत राहतात. मळलेल्या वाटेवरचं हे लिखाण नसल्याने वाचक स्तिमित होतो. केवळ ही एक कादंबरी नसून हा एका जीवनमूल्यातून समग्र जीवन दर्शनाचा प्रवास घडविणारा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथातून नवोदित लेखकांना आपल्या साहित्य लेखनाची योग्य दिशा मिळेल अशी आशा वाटते.
कादंबरीत अनेक ठिकाणी उपहास ठासून भरला आहे. जीवनाचं विडंबन आलं आहे. धार्मिक- राजकीय- सामाजिक गोष्टीतलं ढोंग लेखक अधोरेखित करतात. जीवनाची आस्वादात्मक समीक्षा म्हणजे ही कादंबरी. ‘प्रबंध म्हणजे तुकड्यांतुकड्यांची गोधडी!’ अशा काही उपरोधिक व्याख्या कादंबरीत वाचायला मिळतात. जगात कुरूप असं काहीही नाही, सर्व जीव- वस्तू नैसर्गिक म्हणून त्या सुंदर आहेत, अशी नवी दृष्टीही हे लिखाण देतं. ही कादंबरी म्हणजे ‘वास्तव जीवनाचं सत्य’ असून आजच्या सांप्रत काळात हे लिखाण समाज दिशादर्शक ठरतं. प्रत्येकाने एकदा तरी वाचावी अशी ही कादंबरी.
सारांश, ही कादंबरी म्हणजे अवघड आशयाची सोपी अभिव्यक्ती असून मराठी कादंबरी विश्वात अशी चाकोरीबाह्य कादंबरी पहिल्यांदाच वाचायला मिळाली.

कादंबरी: मी गोष्टीत मावत नाही
लेखक: डॉ. सुधीर राजाराम देवरे
मुखपृष्ठ: सरदार जाधव
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन, पुणे
प्रथम आवृत्ती: 25 फेब्रुवारी 2019
पृष्ठ संख्या: 137 , मूल्य: 170 रुपये

भाषासमीक्षा

प्रतिक्रिया

पण एक गोष्ट आपल्याला शिकवावीशी वाटते धाग्याना नुसतेच समीक्षा हे नाव देणे बंद करा.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

19 Nov 2019 - 10:48 am | डॉ. सुधीर राजार...

शिकवल्याबद्दल धन्यवाद. आपण शिक्षक असाल.

कपिलमुनी's picture

18 Nov 2019 - 11:23 am | कपिलमुनी

Advt

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

19 Nov 2019 - 10:48 am | डॉ. सुधीर राजार...

कादंबरी वाचावी. आभार