समीक्षा

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
11 Nov 2019 - 7:26 pm

(‘भाषा आणि जीवन’ उन्हाळा 2018 च्या पण आता प्रकाशित झालेल्या नियतकालिकात डॉ. सयाजी पगार लिखित लेख.)

अहिराणीच्या निमित्ताने समग्र भाषांची संहिता

- डॉ. सयाजी पगार

एखाद्या बोलीच्या निमित्ताने सर्वच भाषांना लागू होणारी संहिता कशी तयार होते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘अहिराणीच्या निमित्ताने: भाषा’ हे पुस्तक. लोकसाहित्याभ्यासाची असली तरी त्यातही स्वत:ची अशी वेगळी वाट निवडणारे व त्यासाठी रात्रंदिवस चिंतन-मननासह अभ्यास करणारे, अहिराणी भाषेचे निष्ठावंत पाईक डॉ. सुधीर रा. देवरे हे भाषा, कला, लोकवाड्‍.मय व लोकजीवनाचे संशोधक आहेत. सदर पुस्तक उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ असून ह्या पुस्तकाला 2016 साली महाराष्ट्र शासनाचा ‘नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
पुस्तकाच्या ‍शीर्षकामुळे पुस्तक अहिराणी बोलीत असेल की काय असा कोणाचा समज होऊ शकतो. पण या पुस्तकातील सर्व लेख मराठी भाषेत आहेत. लेखकाने अठरा पुष्पांचा चिंतनशील सुंदर असा गोफ विणला आहे. ज्यातून महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील सर्वच बोलीभाषांवर प्रकाशझोत पडतो. लोकसाहित्याच्या स्वरूपाची, विविध भाषांच्या समान संदर्भांची, लोकसंस्कृतीतील सांस्कृतिक परंपरांच्या पटाची लोकतत्वीय अध्ययन दृष्टीतून मांडणी करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. प्रस्तुत ग्रंथात भाषांच्या उपयोजनासाठी लोकजीवन, लोकश्रध्दा, लोकपरंपरा, लोकधाटी व लोकसंस्कृतीचेही यथार्थ दर्शन घडतं. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथ भारतातील सर्वच बोलीभाषा, प्रमाणभाषा, लोकसाहित्य, आदिवासी साहित्य, लोकसंस्कृती, लोकजीवन आदी क्षेत्रातील भाषाभ्यासकांना व संशोधकांना नवनवीन वाटा शोधण्याचं उत्तम साधन- संदर्भ आहे.
पुस्तकातील पहिल्याच प्रकरणात अहिराणी व मराठी शब्दांच्या काही करामतींचा उलगडा केला जातो. भारतात असंख्य बोली बोलल्या जातात, पैकी आज बर्याडच भाषा मृत झाल्यात. सध्या अठराशे बोलींचा नामोल्लेख सापडत असला तरी पंधराशेच्या आसपास भाषा भारतात शिल्लक राहिल्यात. भाषा जीवंत व प्रवाही राहण्यासाठी, त्या भाषांचं संवर्धन होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असल्याचं लेखक सांगतात.
भाषा समजण्याची अडचण असली तर शालेय जीवनात विद्यार्थ्यांना भाषिक विनोदही कळत नाही याचं मजेशीर अनुभवातून चिंतन ‘चाळ आणि मुळाक्षरे’ या प्रकरणात आलेलं आहे. पु. ल. देशपांडे यांचा ‘बटाट्याची चाळ’ हा धडा शालेय वर्गात शिकत असतानाचा लेखकाचा अनुभव इथं उपयोजित केला आहे. ग्रामीण व शहरी भागातील भिन्न संकल्पना, वस्तू, वास्तू, पदार्थ, फळं, घरं इत्यांदींचा मुळाक्षरं शिकवत असताना परस्पर संबंधांचं प्रास्ताविक शिक्षकाने न केल्याने मुळाक्षरांचं गैरसमजांचं महाभारत निर्माण होतं ते ग्रामीण विद्यार्थ्याला पुढे आयुष्यभर भाषिकदृट्या नडत राहतं. म्हणून त्या त्या भाषेतल्या रोजच्या परिचित वस्तूंची माहिती शिक्षकाने विद्यार्थ्यांना करून देणं योग्य ठरतं. सार्वत्रिक समजतील अशा वस्तूंची नावं शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणंही आवश्यक आहे, असं लेखक सुचवतात.
मातृभाषा लपवणं चुकीचं आहे, भाषेत शुध्द- अशुध्द असं काही नसतं, बोलीतल्या अश्लील शब्दांकडे अश्लील दृष्टीकोनातून न पाहता सामान्य ग्रामीण संज्ञा म्हणून पहावं आदी बाबी पुस्तकात अधोरेखित होत राहतात. (हीच गोष्ट लेखकाच्या ‘आदिम तालनं संगीत’ या कवितासंग्रहाबाबत घडताना दिसते. भाषिक अडचणीमुळे, वाचकांकडून बोली भाषेतल्या कवितेतून फक्त लोकगीतांच्या चालींची मागणी वा अपेक्षा केली जाते हे ही इथं मुद्दाम नमुद करतो.) श्री. विश्वनाथ खैरे यांचा भाषेकडे पाहण्याचा दृष्टीकोन डॉ. देवरे यांना भावतो म्हणून खैरे यांच्या काही पुस्तकांवर विस्तृत भाष्य येतं. खैरे यांच्या समग्र ग्रंथांसह त्यांच्या त्रोटक वाटणार्याा पुस्तिकाही संशोधनात्मक ग्रांथिक बळ कसं देतात हे एका लेखात सोदाहरण दाखवून दिलं आहे.
‘पारख आणि पारखं: एका अनुस्वाराचा फरक’ या लेखात विश्लेषणात्मक – स्पष्टीकरणात्मक निरिक्षणातून लेखकाने जे मांडलं ते म्हणजे दोन भाषांच्या लेखनातही शब्दसाम्य पण अर्थविरोध दिसून येतो. पारख आणि पारखं या संज्ञांच्या अर्थांचं गुपीत या लेखात स्पष्ट केलं आहे. एका अनुस्वारामुळे शब्दाचा अनर्थ कसा होतो हे या लेखातून मुळातून वाचायला हवं.
प्रांतवाद वा भाषावादाच्या भानगडीत न पडता मराठी माणसाने विशाल दृष्टीकोन स्वीकारत मराठी भाषा अस्मितेनंतर भारतीय अस्मिता आणि शेवटी वैश्विक भाषा मानवतेला प्राधान्य द्यायला हवं असं लेखक म्हणतात, ते महत्वाचं आहे. भाषा आणि राजकारण यांच्यातल्या संबंधावर साधकबाधक चर्चा एका प्रकरणात आली आहे. मराठी भाषेची मानसिकता कशी टिकवायची हा प्रश्नही या निमित्ताने ऐरणीवर आणला गेला.
‘अहिराणी भाषा: उत्पत्ती आणि इतिहास’ या दीर्घ आणि पुस्तकातील सर्वात महत्वाच्या लेखात अहिराणी भाषेचे कुळ आणि मूळ शोधले आहे. एखाद्या अभ्यासकाला अहिराणी भाषा वस्तुनिष्ठपणे अभ्यासायची असेल तर त्याने फक्तअ हा लेख वाचला तरी अहिराणीबद्दल त्याला सर्व काही ज्ञात होईल, असा हा सेहचाळीस (४६) पानांचा लेख आहे. प्रस्तुत लेख विस्तृत व सूक्ष्म नोंदींसह मांडून खानदेशच्या सर्व अंगोपांगांवर अभ्यासपूर्ण प्रकाशझोत टाकला आहे. उदा. अभिर- अहिर, खानदेश शब्दाची‍ निर्मिती, खानदेशची उत्पत्ती, विस्तार, क्षेत्रफळ, खानदेशातील बागलाण प्रांत, बागूल राजांची राजवट, अहिराणीची उत्पत्ती, अहिराणी व्याकरण, साहित्य, अहिराणीतील मौ‍खिक लोकसाहित्य, शिलालेख, अहिराणीचे संशोधन करणारे अभ्यासक, अहिराणीचे व्याकरण, लिखित वाड्‍.मय, आधुनिक साहित्य, अहिराणीतील शब्दसौष्ठव इत्यादी. भारतात आज जवळजवळ पंधराशे बोली अस्तित्वात आहेत. या बोलींपैकीच अहिराणी एक आहे. ती सोयीसाठी मराठीची बोली म्हणून ओळखली जाते. या लेखाच्या समारोपातील संश्लेषण अतिशय महत्वपूर्ण योगदान ठरावे. धुळे येथील का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेतर्फे प्रकाशित व डॉ. मु. ब. शहा संपादीत ‘खानदेशचा सांस्कृतिक इतिहास’ खंड तीन यात 2003 पासून मागविण्यात आलेला हा महत्वपूर्ण लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.
भाषा ही कोणतीही असो ती संवादासाठी अस्तित्वात आलेली असते. भाषा ही संबंध जोडण्यासाठी आहे, तोडण्यासाठी नाही. म्हणून स्वभाषेचा आग्रह धरणं जसे नैसर्गिक आहे, तसं पर भाषेचा दुस्वास करणं असंमजपणाचं लक्षण आहे. भाषा दुर्बोध करण्यापेक्षा ती प्रवाही असावी, संवादी असाव, व्यवहारी, कालिक, कलासंपन्न, ज्ञानसंपन्न, स्थळीय, गतिमान आणि सौष्ठवयुक्तकही असावी. तरीही भाषा नैसर्गिकपणे चिरंजीव ठरवायची असेल तर कोणत्याही दुराग्रही अट्टाहासापासून मुक्तष असायला हवी. परभाषेच्या आदरावरच स्वभाषेची वाढ होऊ शकते, असं आग्रही प्रतिपादन डॉ. सुधीर देवरे करतात.
‘अहिराणी बोलीचे शब्दविशेष’ या दीर्घ लेखात अहिराणीचा भूगोल आणि इतिहासावर प्रकाशझोत टाकला आहे. त्यासाठी पूर्वसूरींच्या - विव्दानांच्या- अभ्यासकांच्या मत - मतांतरांचा ऊहापोह होतो. कोणत्याही भाषेचा सखोल अभ्यास करताना त्या भाषेतील शब्दसामर्थ्य समजून घेणं महत्वाचं ठरतं. मूळ, आदिम आणि वेगळ्या शाब्दीक सामर्थ्यावर एखाद्या विशिष्ट स्वतंत्र भाषेचं अस्तित्व टिकून असतं, अशा भाषेतील शब्दांची यादी संकलन वा जमल्यास उत्पतीकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो, या सूत्रानुसार अहिराणी भाषेचा साधकबाधक तपशील उलगडण्याचा महत्वपूर्ण आणि यशस्वी प्रयत्न लेखकाने या लेखात केला आहे. त्यासाठी त्यांनी अनेक शब्दांच्या उगमाचा मागोवा घेतला आहे. शब्द, त्याचा अर्थ, उपयोगाचे उदाहरण, म्हणी वा वाक्यात उपयोग करून त्यातून शब्दाचा अर्थ शोधला आहे. नाते, शरीर व्यापार, क्रियापद, खाणं पिणं स्वयंपाक, वेळा, दिवस, दिशा, शेती व वनस्पती, सामाजिक व्यवहार, गुणदोष, क्रियाविशेषण व विशेषण, प्राणी, जीवसृष्टी, कपडे, विभक्तीप इत्यादी विविध सुमारे तीनशे शब्दांचा मागोवा घेतला आहे. या अभ्यासातून असं निदर्शनास आलं- ‘बोली बोलणारे स्थानिक लोकच आपले शब्द गरजेनुसार बनवतात. बोलीचे सृजकत्व आणि सवतेपण भाषेच्या मुळाचा अभ्यास करण्यास महत्वाचे ठरतात.’ एकूणच बोली भाषेतील शब्दांवर यथार्थपणे प्रकाशझोत टाकण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.
जगात सात हजार भाषा बोलल्या जातात. पैकी भारतातल्या ओंगे आणि जारवा लोकांची संख्या शंभरापेक्षा कमी आहे. 1961 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 65 बोलीभाषा आढळून आल्या. पण एकूण भाषा 75 च्या आसपास असाव्यात.
शिवी सदृश्य शब्द बोलीभाषेत आला तर नागरी लोकांचा कसा गैरसमज होतो वा भाषेकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा वाईट होतो याचे यथार्थ विश्लेषण ‘भड्या आणि भाड्या’ या लेखात आले आहे. भाड्या, रांडना, यानीमायले, तुनीमायले, आत्तेनीमायले इत्यादी शब्द ऐकल्यावर शहरी माणसाचा गैरसमज होतो. पण अहिराणीत वा इतर बोलीत नकळत सामान्य नामाप्रमाणे हे शब्द वापरले जातात. अशा शब्दात अश्लीलता नसते. ग्रामीण मनातही अश्लीलता नसते. तो केवळ लोकपरंपरेचा आविष्कार समजला पाहिजे. ग्रामीणांना शब्दांच्या अर्थाशी विशेष देणंघेणं नसतं. बोलण्याची ती लकब झालेली असते.
भारतातील सर्वच बोली आणि प्रमाणभाषेवर पुस्तकात भाष्य आलं आहे. म्हणून ग्रंथाच्या शीर्षकात अहिराणीचा उल्लेख आला असला तरी तो केवळ अहि‍राणीच्या निमित्ताने केलेल्या चिंतनापुरता आहे. बाकी सर्व विवेचन जगातील समग्र भाषेबद्दल आहे. जगातील अनेक बोली या आदिम भाषा आहेत, हे नक्की. म्हणून आपापल्या बोलीसोबतच परभाषांचाही आदर करा असं आवाहन डॉ. देवरे करतात.
‘भाष्यकाराते वाट पुसतु’ या न्यायाने पुस्तकातील भाषांचा बंध अनुबंध जोडताना ग्रिअर्सन, वि. का. राजवाडे, लक्ष्मणशास्त्री जोशी, महादेवशास्त्री जोशी, पां. मा. चांदोरकर, श्री. व्यं. केतकर, ना. गो. कालेलकर, भा. रं. कुलकर्णी, द. ग. गोडसे, डॉ. अशोक रा. केळकर, दा. गो. बोरसे, विश्वनाथ खैरे, डॉ. गणेश देवी यांच्या विचारांचाही परामर्श पुस्तकात येत राहतो.
‘अहिराणीच्या‍ निमित्ताने: भाषा’ हे पुस्तक भाषिक दृष्ट्या इतकं महत्वाचं आहे, की महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठात कुठल्यातरी वर्षाला ते अभ्यासलं जायला हवं. पण दुर्दैवाने या पुस्तकाकडे अजून तरी कोणाचं विशेष लक्ष गेलेलं दिसत नाही.

पुस्तकाचे नाव : अहिराणीच्या निमित्ताने : भाषा
लेखकाचे नाव : डॉ. सुधीर रा. देवरे
प्रकाशकाचे नाव: पद्मगंधा प्रकाशन, पुणे
प्रकाशन दिनांक : ८ एप्रिल २०१४
पृष्ठ संख्या : १५१
पुस्तक मूल्य : रू. 160

भाषासमीक्षा