मोठा मासा आणि छोटा मासा .

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
7 Oct 2019 - 4:00 pm

मोठा मासा आणि छोटा मासा ..

बारक्याने आपले घारे डोळे थोडेसे आणखीन बारीक केले. हातातील सिगरेटचा एक मोठा झुरका घेऊन तोंडाचा चंबू करून परत एक धुराचे वर्तुळ बाहेर सोडले. मग आपल्या केसावरून एकदा हात फिरवला. मग उगीचच शेजारी बसलेल्या ढापण्याला पाठीत एक गुद्दा ठेऊन दिला. ढापण्या पीत असलेल्या चहाच्या ग्लास मधून थोडा चहा हिंदकळून खाली पडला. नशीब त्याच्या अंगावर सांडला नाही.
बारक्या एकदम हसायला लागला. त्याचा गोरा चेहरा एकदम लालबुंद झाला. मग त्याला एकदम ठसकाच लागला. सिगरेटचा धूर आपण बाहेर सोडायचा होता का आत घ्यायचा ?हेच त्याला समजेना आणि त्याचा ठसका परत वाढला. तेवढ्यात ढापण्याने त्याला जोरात खाली ढकलला . रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाजवळ असलेल्या एका कट्ट्यावर हे दोघे बसलेले होते. बारक्या एकदम खाली पडला. त्याच्या हातातील सिगरेट खाली पडली. तो कसाबसा उठला आणि ढापण्या कडे झेपावला.त्यांच्या समोर उभा राहून झिपऱ्या सिगारेट ओढत होता.
“ बास ..पुरे आता ..just stop it…” झिपऱ्या जोरात ओरडला. बारक्या आणि ढापण्या एकदम शांत झाले. झिपऱ्याने असा आवाज लावला कि आपण काही बोलायचे नाही हे त्या दोघांना आता चांगलेच ठाऊक झाले होते.
“ आपण जाम बोअर झालो आहोत ...काय आपल्या जिंदगीत काही होतच नाही …” झिपऱ्या म्हणाला. पूर्वी त्याने केस खूप वाढवले होते म्हणून तो झिपऱ्या पण आता मात्र सध्याच्या स्टाईल ने त्याने डोक्याच्या वरच्या बाजूला केस वाढवून बाकी डोक्याच्या दोन्ही बाजूचे केस एकदम मिलिटरी स्टाईल बारीक केले होते. पण त्याच्या मित्रांना तो अजून झिपऱ्याच होता. हातात महागडा स्मार्टफोन ,डोळ्यावर रेबनचा नव्या स्टाईल चा काळा चष्मा . त्याला नेहमी फेडेड जीन्स घालायला आवडे. आणि वरती ब्रान्डेड टी शर्ट. त्याची सगळी बटणे न लावता तशीच ठेवायची त्याला आवड होती. एकदम कसे बिनधास्त वाटले पाहिजे. या तिघांच्या टीमचा तो कॅप्टन होता.
“ हो ना ! आज कॉलेज मध्ये चंपा सुद्धा आली नाही ...कॅन्टीन चा आजचा बनमस्का काही बरा नव्हता आणि आज त्या accounts च्या मास्तराने फारच पीळ मारला.” बारक्या म्हणाला.बारक्या खरे तर आता बारक्या नव्हता. दररोज जिम मध्ये जाऊन त्याने आपले शरीर कमावले होते. या तिघानाही दररोज जिम मध्ये जायला आवडे. गोरापान आणि कमावलेल्या शरीरामुळे बारक्या मोठा रुबाबदार दिसे. त्याची उंची जरा कमी होती. ढापण्या हा त्याच्या काळ्या रंगामुळे आणि कुरळ्या केसामुळे नायजेरियन असावा असा भास प्रथमदर्शनी होई. जाड भिंगाचा चष्मा असल्यामुळे त्याचे ढापण्या हे नाव त्याला अजूनही शोभून दिसे. हे तिघे कॉलेज च्या दुसऱ्या वर्षाला होते. फार आभ्यास नको म्हणून त्यानी commerce घेतले होते. त्यांना अभ्यासात अजिबात रस नव्हता.
तिघांचे ही आई बाप गडगंज मिळवत होते.
बराच वेळ तिघेही आपल्या मोबाईल मध्ये डोके खुपसून बसले होते. दुपारचे जेवण झाले कि आपल्या गाड्या काढून पुण्यातील कर्वे नगर मधील आतल्या बाजूला असलेल्या या रस्त्यावर झाडाखाली बसून टवाळक्या करत बसणे हा या तिघांचा दिनक्रम होता.
उगीचच एखाद्या पोरीची झेड काढणे ,कुणाची तरी टिंगल करणे आणि सिगारेट ओढत शेजारच्या टपरीवरचा चहा पिणे हा त्यांचा नित्य क्रम होता. मोबाईल बराच वेळ पाहून कंटाळा आल्यावर आता काय करावे याचा ते तिघे विचार करायला लागले.
“ काही तरी सॉलिड करायला पाहिजे यार ..” बारक्या म्हणाला.काही दिवसापूर्वी पलीकडच्या गल्लीतील दोन तीन बाईकवर पेट्रोल फेकून त्याने आग लावली होती ,तसे काही तरी आज परत करावे काय याचा तो विचार करत होता. पण झिपऱ्या ने त्याला बजावले होते कि आता काही दिवस ते बंद करू या.
“ हो ना यार ..बिअर प्यायला जाऊया का ?” ढापण्या म्हणाला ...याला दुसरे काही सुचतच नसे. त्या दोघांनी मोठ्या आशेने झिपऱ्याकडे पाहिले. त्याच्याकडे जाम पैसे असतात. पण आज झिपऱ्या मूड मध्ये नसावा. किवा त्याच्याकडचे पैसे संपले असावेत. त्याने नुसतीच मान हलवली.
“ कुठल्या तरी कुत्र्याला धरून बडवून काढूया का ? “ बारक्या म्हणाला. त्याला हे जाम आवडायचे. त्यानी दोन तीन दिवसापूर्वीच एका भटक्या कुत्र्याला बिस्कीट देण्याचे लालूच दाखवून जवळ बोलावले होते आणि त्याला समोरच्या झाडाला बांधून ठेवले होते. मग काय जाम मजा केली होती. बारक्या ने कुठून तरी एक काठी आणली होती आणि त्याने त्या कुत्र्याला जाम बडवून काढले होते. मधून मधून ढापण्या आणि झिपऱ्या त्याला हातभार लावत होते. झिपऱ्या ने एक दोन दगड अगदी नेम धरून हाणले होते. काय मस्त ओरडत होते ते कुत्रे. बारक्याला ते आठवूनच एकदम अंगावर रोमांच उभारल्या सारखे झाले. त्याला अजून थोडा वेळ त्या कुत्र्याला हाणायचे होते पण त्याच वेळी रस्त्यातून जाणाऱ्या दोघा तिघांनी त्यांना हटकले आणि त्या सर्वाना तो खेळ थांबवावा लागला.
“ दररोज तेच काय करायचे ? आज माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया आली आहे.” झिपऱ्या म्हणाला. बाकीच्या दोघांना एकदम हुरूप आला. आज एकदम धमाल येणार . झिपऱ्या नेहमी काही तरी मस्त डोके लढवतो. झिपऱ्या ने घड्याळात बघितले आणि तो एकदम आपल्या बाईक वर जाऊन बसला.
“ चला बसा दोघेही ..”
“ अरे काय करायचे ते तरी सांग ..का नुसतीच राईड मारून यायची …” झिपऱ्या च्या बाईक वरून तिघांनी सुसाट जाणे हा पण त्यांचा आवडता उद्योग होता.
पी प्या पाई ..पी प्या पाई….असा जोरात हॉर्न वाजवत गेले म्हणजे कसे आपण काही तरी बहादुरी केली असे त्यांना वाटे. पण रात्री अकरा बारा वाजता असे जायला त्यांना आवडे.लोकांची झोप उडवायला पाहिजे. पण आता तर दुपारचे जेमतेम तीन वाजत होते. पण तरी ते झिपऱ्या च्या मागे जाऊन बसले. बारक्या सगळ्यात मागे ..त्याला पाय ठेवायला जागाच नसायची म्हणून त्याला होडीतून जाताना जसे वल्ही मारतात तसे आपले दोन्ही पाय मागे पुढे हलवायला खूप आवडे.
“ तीन वाजायच्या थोडे आधी ..पलीकडच्या सोसायटी मधून ती ठेंगणी आणि जाडी मुलगी तिच्या आक्टिवा वरून येते. आपल्याकडे बघत पण नाही ..xxx..” झिपऱ्या ने एक शिवी हासडली. टीवी वरच्या जाहिरातीत दाखवतात तसे सेंट उडवल्यावर प्रत्येक मुलगी आपल्याला मिठी मारायला यायला हवी अशी त्याची रास्त अपेक्षा होती. झिपऱ्या त्या विशिष्ट कंपनी चा सेंट सुद्धा वापरायचा. तरी सुद्धा ही जाडी आपल्याकडे पहात सुद्धा नाही याचा त्याला खूप राग होता.
“ जाडी असली तरी माल आहे ..” बारक्या म्हणाला.
“ होय तीच ती ..फार माज आलाय तिला ..आज एकदम उतरवून टाकू” झिपऱ्या म्हणाला . मग थोडा वेळ त्यानी आपला प्लान नीट समजावून सांगितला. बारक्या आणि ढापण्या एकदम खूष झाले. आज खूप मजा येणार.
थोड्या वेळात ती मुलगी रस्त्यावरून आपल्या आक्टिवा वरून आली. आज तिने निळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची जीन घातली होती. डोळ्यावर चष्मा होता. खांद्यापर्यंत बॉब केलेले केस मस्त इकडे तिकडे उडत होते. बारक्या तिच्या उभार छातीकडे टक लावून बघत राहिला. तेवढ्यात झिपऱ्या ने आपली बाईक सुरु केली आणि ते तिघे तिच्या आक्टिवा शेजारून जाऊ लागले .
“ बियर प्यायला येते का ? “ झिपऱ्या ओरडला..त्या मुलीने तिकडे दुर्लक्ष केले आणि तिने आपला वेग वाढवला . झिपऱ्या ने सुद्धा वेग वाढवला आणि त्याने आपली बाईक तिच्या अगदी जवळ आणली आणि त्याने आपला एक हात वर घेतला आणि आपल्या केसा वरून फिरवला ..बारक्याला ही खुण होती .बारक्याने आपल्या पायाने त्या मुलीच्या आक्टिवा ला एक जोरदार लाथ मारली .झिपऱ्या ने आपली बाईक मग जोरात पुढे काढली आणि ते तिघे तिथून पसार झाले.
झिपऱ्या चा असा अंदाज होता कि त्या मुलीची आक्टिवा थोडी वाकडी तिकडी होईल आणि ती मुलगी ब्रेक लावून थांबवेल ..पण त्याचा अंदाज जरा चुकला ...बारक्या ने जरा जोरात लाथ मारली असावी ..पण त्याने आरशात बघितले तर ती आक्टिवा एकदम खाली पडली त्या मुली सकट आणि वेगामुळे त्या आक्टिवा बरोबर ती मुलगी बरेच अंतर फरफटत गेली … धाड .धाड .असा काही तरी आवाज झाला .
तेव्हा तिथे फारशी रहदारी नव्हती ..पण आजू बाजूच्या घरामधून काही लोक आवाज ऐकून बाहेर आले. आरडाओरडा झाला ...झिपऱ्या ने लगेच आपली बाईक एका शेजारच्या बोळात घातली आणि सुसाट पळवली . तासभर इकडे तिकडे फिरवून ते तिघे एका हॉटेलात बियर रिचवायला गेले.
पहिली पाच दहा मिनिटे कोणीच काही बोलले नाही .पण बियर चे दोन तीन घोट पोटात गेल्यावर त्यांनी एकमेकांना हात वर करून जोरात टाळी दिली. …
“ आयला ...लई भारी धमाल ….” ढापण्या म्हणाला.
“ Great Job… बारक्या..” झिपऱ्या म्हणाला.
“ आपल्या गाडीचा नंबर कुणी टिपला नसेल ना ?’ बारक्या ने तेवढ्यात शंका काढली . याचे डोके जाम शंकेखोर. पण त्या प्रश्नावर त्या तिघांनी बराच वेळ चर्चा केली . त्या वेळी रहदारी फारशी नव्हती आणि झिपऱ्या ने लगेच गाडी बोळात घातली होती ..त्यामुळे कुणी नंबर टिपून घेतला नसावा असे त्या सर्वानी बहुमतांनी ठरवले.
“ ती पोरगी आपल्याला ओळखण्याची शक्यता आहे ...तेव्हा आपला अड्डा आता एखाद्या लांबच्या रस्त्यावर हलवायला पाहिजे. “ झिपऱ्या म्हणाला. नाही तरी नेहमी काही तरी उद्योग करत असल्याने त्यांना आपला अड्डा असा मधून मधून हलवायला लागायचा.
“ पण काही म्हण झिपऱ्या आज फार म्हणजे फारच धमाल आली. ..आपण तो सीन शूट करून ठेवायला पाहिजे होता...काय फरफटत गेलीय ती पोरगी..! सगळा माज उतरला असेल ...भारी धमाल ..झिपऱ्या मानला बाकी तुला …” बारक्या म्हणाला ..ढापण्या ने त्याची री ओढत आपल्या ग्लास मध्ये आणखी थोडी बियर घातली…
झिपऱ्या ने खूष होत आणखी एक बाटली मागवली.
“ झिपऱ्या पण त्या मुलीला फार लागले नसेल ना ? ती जरा जास्तच जोरात पडली ..” बारक्याने त्याला बराच वेळ छळत असलेला प्रश्न शेवटी विचारलाच .
“ जाऊ दे रे ..गेली उडत ..आपल्याला मजा आली ना ? मग बाकीचा विचार करायचा नाही ..आपल्याला चिकन आवडते ना ? मग मस्त मिटक्या मारत खायचे ..ती कोंबडी बिचारी मेली आपल्यासाठी... असला विचार करायचा नाही !” झिपऱ्या म्हणाला . बाकीच्या दोघांनी आपली मान हलवली. अगदी लगेच पटले त्यांना. कोंबडीचे नाव निघताच त्या सर्वांच्या तोंडाला पाणी सुद्धा सुटले . मग कोंबडी खात बराच वेळ ती मुलगी कशी फरफटत गेली हे दृश्य ते तिघे आपल्या मनात घोळवत बसले.
“ आपण याचे शुटींग करायला पाहिजे होते ...चुकलेच आपले.” बारक्या परत म्हणाला .बाकीच्या दोघांनी पण आपले चुकलेच याची कबुली दिली.
मग पुढचे दोन तीन दिवस आपल्या अड्ड्या साठी नवी जागा शोधण्यात त्यांचा वेळ गेला. बारक्या दोन तीन दिवस वर्तमानपत्रे चाळत होता. त्या मुलीची काही बातमी आली आहे का हे त्याला पहायचे होते. पण नाही ..काही बातमी नव्हती ..असल्या छोट्या अपघाताकडे कुणाचे लक्ष जाणार ? त्याने जरा सुटकेचा निश्वास सोडला.
दोन तीन दिवसात त्यांनी एक नवीन जागा शोधली. MIT कॉलेज रस्त्याजवळ एका बोळात त्यांना हवी तशी जागा सापडली. जवळच चहा आणि सिगारेट ची सोय होती आणि थोड्याच अंतरावर बियर ची पण सोय होती. एका झाडाखाली बरीच सावली पण होती. दुपारच्या वेळी तिथे बरीच शांतता असे .त्या झाडाखाली आपल्या गाड्या लावून त्यांचा अड्डा परत जमायला लागला.
**********

बारक्या नेहमी म्हणे ..म्हणजे मनातल्या मनात. आपला ग्रुप फक्त एखाद्या पोरीमुळेच मोडेल. त्यांच्या वर्गातील चंपा वर त्याचा केव्हाचा डोळा होता. ठेंगणी ठुसकी ,सावळी आणि बिनधास्त ..बऱ्याच वेळा अगदी तोटकी जीन ची हाफ pant घालून हातातील सिगरेटचा मोठ्या झोकात झुरका मारणारी आणि बिनधास्त पणे आपली बेंबी दाखवणारी चंपा त्यांच्या ग्रुप मध्ये यायला लागली तेव्हाच त्याला चाहूल लागली. आपला ग्रुप आता मोडणार.
“ हे पहा झिपऱ्या आणि ढापण्या चंपा माझी आहे ..तेव्हा ती तुमची वाहिनी आहे ..जरा सांभाळून वागा तिच्याशी”
बारक्याने एकदा त्या दोघांना सांगितले. यावर झिपऱ्या आणि ढापण्या जोरजोरात हसायला लागले.
“ तुझी ? तिने काय तुला तसे सांगितले आहे का ? “ ढापण्या .
“ म्हणजे अजून नाही ..पण तिच्या नजरेत मला तसे दिसते ना ? “ बारक्या म्हणाला.
“ खयाली पुलाव बंद कर. अरे ती माझ्या मागे गाडीवर मला इतकी घट्ट मिठी मारून बसते ..त्यावरून तर ती माझ्यावरच मरते यात मला शंका नाही …” झिपऱ्या म्हणाला.
ढापण्या काही बोलला नाही ..पण चंपा ज्या प्रकारे त्याच्या मांडीला आपली उघडी मांडी लावून बसते त्या मुळे ती आपल्यावरच मरते याची त्याला खात्री होती. त्याने बऱ्याच वेळा तिच्या उघड्या मांडीवर आपला हात फिरवला होता आणि चंपाने पण त्याला प्रोत्साहन दिले होते.
“ हे बघा हे लग्न ..वाहिनी वगैरे आत्ता पासून चर्चा नको ..आपण तिघेही तिच्याबरोबर जेवढी मजा करून घेता येईल तेव्हढी करून घेऊ या ..आपल्याला धमाल आली पाहिजे … मजा आली पाहिजे ...बाकीचे पुढच्या पुढे ..” झिपऱ्या ने सगळा वाद संपवला.
आज अड्ड्यावर चंपा ची वाट बघताना बारक्याला ही सगळी चर्चा आठवत होती. झिपऱ्या च्या गाडीवरून राईड मारताना चंपा नेहमी दोघांच्या मधे बसे. परवा एकदा तर भारी मजा आली होती . तिने झिपऱ्या ला घट्ट मिठी मारली होती आणि ती त्याच्या कानाला मधून मधून चावत होती. झिपऱ्या मग चेवात येऊन अजून जोरात गाडी मारत होता. बारक्याने पण चंपा च्या कंबरेला मागून घट्ट मिठी मारली होती आणि तो मधून मधून तिच्या पाठीवर आपले डोके घासत होता. चंपाला त्यात काही गैर वाटले नाही . त्या दिवशी ढापण्या आला नव्हता ..पण नंतर त्याने बाकीच्या दोघांना खूप शिव्या घातल्या होत्या. बारक्याला आज परत एकदा तशी राईड मारायची होती. पण आज ढापण्याची मागे बसायची पाळी होती. तो पण बऱ्याच वेळा पासून चंपा ची वाट पहात होता. शेवटी एकदाची चंपा आली. आज ती फार म्हणजे फारच माल दिसत होती. काळ्या रंगाची गुढघ्या पर्यत येणारी घट्ट लेगिंग आणि वरती त्याच रंगाचा झुळझुळीत ब्लाउज . आजच्या फ्याशन प्रमाणे खांद्यावर ब्लाउज च्या हातावर एक मोठा कट मारला होता. आणि त्यातून तिचे खांदे आणि हाताचा काही भाग एकदम भारी दिसत होता. डाव्या हातात सिगरेट नाचवत आणि आपले खांद्यापर्यंत येणारे केस उजव्या हाताने सावरत ती त्यांच्या समोर उभी राहिली तेव्हा त्या तिघानाही काय बोलावे हे क्षणभर कळलेच नाही. आपल्या खांद्या वरच्या पर्स मधून मोबाईल काढत ती झिपऱ्या च्या गाडीवर त्याच्या शेजारी बसली. मग आपल्या ब्लाउजचे वरचे एक बटन काढत ती सुस्कारत म्हणाली ,
“ काय गरम होते आहे नाही ?..I hate this heat..”
“ I totally agree baby..totally..” झिपऱ्या म्हणाला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला आपल्या कडे ओढले. चंपा ने मग आपल्या सिगरेटचा एक झुरका मारून सिगरेट झिपऱ्या कडे पास केली .
“ आज काही तरी तुफानी करूया ...जाम बोअर होतंय …” चंपा म्हणाली.
शेवटी बरीच चर्चा होऊन पिरंगुट रोड वर त्यांच्या आवडीच्या तुफान हॉटेलात बियर पिऊन धुडघूस घालायचे ठरले. तिथे स्विमिंग पूल पण होता ..जमले तर पोहायला जाऊ असेही ठरले. मागच्या वेळी बारक्या झिपऱ्या च्या गाडीवर होता तेव्हा आता झिपऱ्या ,चंपा आणि ढापण्या एका गाडीवर आणि बारक्या आपल्या गाडीवर त्यांच्या मागे मागे येणार असे ठरले. बारक्या ला काही मनातून हे आवडले नव्हते ..पण येताना बारक्याने ,झिपऱ्या आणि चंपा च्या मागे बसायचे आणि ढापण्या बारक्या ची गाडी घेऊन येणार असे ठरले.
मग चांदणी चौक जाताच झिपऱ्या ने सुसाट गाडी सोडली . आपले वाऱ्याने उडणारे केस मधूनच सावरत चंपा ने झिपऱ्याला घट्ट मिठी मारून आपली मान त्याच्या खांद्यावर ठेवली होती ..मागून ढापण्या ने चंपा च्या कंबरेला मिठी मारून तिला घट्ट कवटाळून ठेवले होते. बारक्या हे सगळे पहात आणि मनात त्या तिघांना शिव्या घालत शक्य तेवढा त्यांच्या बरोबर राहायचा प्रयत्न करत होता. दुपार असल्याने फारशी रहदारी नव्हती ..त्या मुळे झिपऱ्या मोठ्या झोकात मधूनच नागमोडी गाडी चालवत होता. मोकळी हवा ..वेगवान गाडी आणि चंपा ची मिठी ...काय धमाल ...आपल्या संथ जीवनाला एकदम भन्नाट वेग आल्यासारखे त्या सर्वाना वाटले. समोर येणाऱ्या सर्वांनी एकदम बाजूला होऊन आपल्याला कशी मोकळी वाट करून दिली पाहिजे . झिपऱ्या त्यासाठी सारखा जोर जोरात हॉर्न वाजवत होता...
हा प्रवास कधी संपूच नये असे त्याला वाटत होते. पिरंगुट गाव संपले आणि मग थोडा वळणावळणाचा रस्ता सुरु झाला. झिपऱ्या ने सहज मागे आरश्यात बघितले तर एक उघडी जीप जोरात त्याच्या मागे येत होती. एक डोळ्यावर काळा चष्मा घातलेला तरूण मुलगा आणि त्याच्या शेजारी एक सुंदर मुलगी त्याला दिसली. झिपऱ्या चेकाळला आणि त्याने आपला वेग वाढवला ..ती जीप पण आपला वेग वाढवून जोरात पुढे आली. झिपऱ्या ने परत आपला वेग वाढवला आणि आपली मोटारसायकल रस्त्याच्या मध्ये घेतली.माझ्या पुढे जातो म्हणजे काय ?
झिपऱ्या ने खूप वेळ खेळवत त्याला आपल्या मागे ठेवले . पण एका वळणावर तो जीप वाला अगदी रस्त्याच्या कडेने झिपऱ्या च्या पुढे वेगात निघून गेला .. जाताना त्याने झिपऱ्याला आपला अंगठा दाखवला .
झिपऱ्या एकदम खवळला. त्याने त्या जीप चा पाठलाग करून एका वळणावर परत त्याला मागे टाकले ..
झिपऱ्या ,चंपा आणि ढापण्या एकदम ओरडले आणि त्यानी त्या जीप वाल्याला आपले हात उंच करून दाखवले. मग झिपऱ्या वेगात पुढे निघून गेला . बारक्या या सगळ्या भानगडीत कुठे तरी खूप मागे राहिला होता.

जीप मधून जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एका मंत्र्याचे लाडके पुत्र ...केदार ने आपल्या आजच्या मैत्रिणी कडे कांचन कडे रागात पहिले ..ती एकदम जोर जोरात हसायला लागली होती . ..ती एक उगवती मॉडेल होती आणि केदार च्या ओळखीने आपल्याला एखाद्या सिनेमात काम मिळवायच्या प्रयत्नात ती होती. ते दोघे आज केदारच्या फार्म हाउस वर मुक्कामाला चालले होते. तिथे लवकर पोचून केव्हा एकदा कांचन ला मिठीत घेतो असे केदारला झाले होते.आणि त्यात हा मोटार सायकल वाला सारखा मधे मधे येत होता.
“ हार गये ना .. केदार राजे ...आणि ते सुद्धा एका मोटार सायकल कडून ?” आपला हात केदारच्या पाठीवर ठेवत कांचन म्हणाली
“ आगे आगे देखो ..होता है क्या …” केदार ने एक फिल्मी वाक्य टाकून दिले. त्याने मग गेअर बदलून वेग वाढवला ..त्याच्या डोक्यात एकदम रक्त उसळले….त्याचे डोळे एकदम बारीक झाले ..हात थरथर कापायला लागले...घरातून निघताना त्याने एक दोन पेग मारले होते …बहुतेक त्याचाच परिणाम.
“ माझ्या पुढे जातो हा मच्छर ..? केदार राजांच्या ..आता दाखवतोच त्याला ….” केदार कांचन ला म्हणाला
“ ये हुई ना बात ...जियो मेरे शेर ..” असे म्हणून कांचनने त्याच्या गालाचे चुंबन घेतले ,आणि त्याच्या केसावरून हात फिरवला. केदार एकदम उत्तेजित झाला.
आपल्या जीपचा वेग वाढवत केदार त्या मोटारसायकल जवळ आला ..झिपऱ्या ने आपल्या केसावरून हात फिरवला आणि आपला वेग अजून थोडा वाढवला. केदारने सुद्धा आपलं वेग वाढवत आपली जीप झिपऱ्या च्या उजव्या बाजूला घेतली ..मग तो त्याच्या अगदी जवळ आला आणि काय होते आहे हे कळायच्या आत आपल्या जीप चे स्टियरिंग एकदम डावीकडे वळवून त्या मोटारसायकलला एक जोराचा धक्का दिला . बऱ्याच इंग्रजी चित्रपटात केदार ने असे करताना पहिले होते आणि ..किती तरी दिवसापासून त्याला हे करायचे होते. ती मोटार सायकल एकदम जोरात डावीकडे ढकलली गेली आणि रस्त्याकडेच्या भरावावरून खाली फरफटत गेली .
त्या मोटारसायकल वरचे तिघेही एकदम जोरात ओरडले आणि त्या मोटारसायकल सह एकदम दिसेनासे झाले...केदार ने आपली जीप न थांबवता तशीच वेगाने पुढे नेली . काही क्षणा पूर्वी कानात घुमणाऱ्या त्या किंकाळ्या आता ऐकू येईनाश्या झाल्या. ..उडालेला धुरळा मागे पडला. केदार ने बघितले कि कांचन आपले काळेभोर मोठे डोळे विस्फारून त्याच्याकडे पहात होती ...काही क्षण तसेच शांतातेत गेले ..मग केदार ने आपली जीप एका वळणावरून पुढे नेऊन कडेला थांबवली . रस्त्यावर आत्ता चिटपाखरू नव्हते.मग तो बसल्या जागेवरून उठला ..आपण जणू James Bond झालो आहोत असे त्याला वाटायला लागले. आपले दोन्ही हात उंच करून त्याने एक जोरात आरोळी ठोकली ..
“ हो.. हो… हूर्रे …” असे काही तरी तो जोरात ओरडला आणि कडेला झुकून त्याने कांचनला आपल्या मिठीत घेतले. त्याच्या मिठीत झोकून देत कांचन ओरडली ,
“ वा रे मेरे शेर ..!”
एक दोन क्षण तसेच गेले ..मग केदारने आपली जीप सुरु केली आणि कांचनला अजून थोडे जवळ घेऊन तो ओरडला ,
“ काय भारी धमाल .. काय भारी धमाल ..” कांचन केदार ला अजून थोडी बिलगून बसली .
थोड्या वेळाने कांचनने जरा भीत भीतच विचारले “ राजे ..पण ते तिघे मेले तर नसतील ना ?”
केदार बेदरकारपणे म्हणाला ,
“ जाऊ दे ग ..असले मच्छर जगले काय आणि मेले काय दोन्ही सारखेच ..तू नको फार विचार करूस .”
मग जणू काही घडलेच नाही अश्या प्रकारे केदार ने आपली जीप धुरळा उडवत वेगाने पुढे नेली.
मोठा मासा छोट्या मास्याला गिळंकृत केल्यावर शांतपणे पुढे निघून जातो .. आपण मासा खाल्ला याची तो जाहिरात करत नाही ...

***************************************************************************

कथा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

8 Oct 2019 - 5:43 pm | पद्मावति

परिणामकारक. आवडली कथा.

Jayant Naik's picture

10 Oct 2019 - 11:57 am | Jayant Naik

आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

अभ्या..'s picture

8 Oct 2019 - 6:07 pm | अभ्या..

मुळशी पॅटर्न

Jayant Naik's picture

10 Oct 2019 - 11:58 am | Jayant Naik

आपला आभारी आहे.

यशोधरा's picture

8 Oct 2019 - 7:46 pm | यशोधरा

मस्त कथा!

Jayant Naik's picture

10 Oct 2019 - 12:10 pm | Jayant Naik

मी स्वतः काही कॉलेज च्या जवळ राहतो. बहुतेक तरुणांमध्ये मला आज हि " मला मजा येते आहे ना ? मग झाले तर ..मला बाकी लोकांशी काय करायचे आहे?" बेदरकार वृत्ती दिसत आहे. हे अतिशय क्लेषकारक आहे. माझ्या डोळ्यादेखत गाडीवरून तिघे जाणाऱ्या मुलांनी एका लहान मुलाला आणि एका मध्यम वयाच्या महिलेला धडक दिली. पण त्यांची साधी विचारपूस सुद्धा न करता ते तिघेही हसत हसत पसार झाले. आणि ते सिग्नल तोडून आले होते याची काहीही लाज त्यांना नव्हती . उलट अभिमान वाटत होता. अश्या अनेक घटना दररोज दिसतात. म्हणून मला ही कथा सुचली.

यशोधरा's picture

10 Oct 2019 - 12:23 pm | यशोधरा

हो, खरे आहे. सद्ध्या मला एक तत्सम निष्काळजीपणाचा अनुभव नुकत्याच डॉ झालेल्या तरुण व्यक्तीकडून आला. भविष्यात असे डॉ असतील का ह्या विचाराने भीती वाटली जरा.

तुषार काळभोर's picture

8 Oct 2019 - 8:02 pm | तुषार काळभोर

1

Jayant Naik's picture

10 Oct 2019 - 12:12 pm | Jayant Naik

अशी आपण अपेक्षा तरी करू या. कारण आज कालं हे असे मुजोर लोक बिनधास्त फिरत आहेत . त्यांना काहीही होताना दिसत नाही .

जॉनविक्क's picture

8 Oct 2019 - 10:39 pm | जॉनविक्क

Jayant Naik's picture

10 Oct 2019 - 12:14 pm | Jayant Naik

पूर्वीचे पुणे आता फक्त आठवणीत .

जॉनविक्क's picture

10 Oct 2019 - 1:41 pm | जॉनविक्क

पुणे आणी गोथम मधील सीमारेषा कमालीची धूसर होत आहे असेच वाटते आहे :(

गोथम झालेलेच आहे.