सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना
सर्वांना राम राम! नुकताच किन्नौर- स्पीति सायकल प्रवास केला. त्याविषयी आता सविस्तर लिहिण्यास सुरुवात करतो आहे. प्रत्येक सायकल प्रवास खूप काही शिकवून जातो, समृद्ध करून जातो. ह्या सायकल मोहीमेमध्येही खूप काही शिकायला मिळालं. एका प्रकारे स्पीतिमध्ये सायकल चालवण्याचं स्वप्नही पूर्ण झालं. हा सायकल प्रवास फक्त सायकलिंग नसून त्याला एक सामाजिक उद्दिष्ट होतं. आरोग्य, फिटनेस, पर्यावरण ह्याविषयी जागरूकतेसंदर्भात संदेश आणि वेगवेगळ्या लोकांसोबत व गटांसोबत बोलणं हासुद्धा त्याचा एक भाग होता. पुण्यातील मंथन फाउंडेशन, रिलीफ फाउंडेशन, इतर संस्था व अनेक जणांचं सहकार्य ह्या सायकल मोहीमेला मिळालं. हा एक नवीन प्रयोग होता. समाजातील सहकार्य व सामाजिक उद्दिष्ट ठेवून हा प्रवास झाला. ह्यासंदर्भात वेगवेगळी मतं असू शकतात. कोणाला असंही वाटू शकतं की, सायकल मोहीम करायची ती स्वत:च्या बळावर का करू नये व संस्था किंवा इतर व्यक्तींचं सहकार्य का घ्यावं. हेसुद्धा एक मत असू शकतं. माझ्या दृष्टीने ह्या वेळी थोडं नवीन करण्याचा प्रयत्न केला. एक विचार अणि थीम घेऊन अनेक लोकांकडे गेलो. पुण्यातील मंथन फाउंडेशन आणि रिलीफ फाउंडेशन ह्या दोन संस्थांनी हा उपक्रम व त्यातील सामाजिक संदेशामध्ये रस घेतला. त्यांनी केलेल्या आवाहनानंतर अनेक संस्था आणि व्यक्तींनीही त्यामध्ये रस घेतला. इथे आणखी एक गोष्ट वेगळी आहे. जेव्हा मी एकटा सायकल चालवतो तेव्हा ते फक्त माझ्या किंवा माझ्या सोशल मीडियापुरतं मर्यादित रहतं. पण जेव्हा मी एखाद्या संस्थेबरोबर व व्यापक समाजापुढे येऊन सायकल चालवतो, तेव्हा ते सायकलिंग जास्त लोकांपर्यंत पोहचतं. प्रिंट मीडीयामुळे आणखी जास्त प्रमाणात तो विचार लोकांपर्यंत जाऊ शकतो. आणि प्रवासाच्या खर्चाबद्दलच्या सहभागासंदर्भात सांगायचं तर अशी मदत खूप मर्यादित असते. ह्या मोहीमेतील प्रत्यक्ष प्रवासात होणा-या अनुमानित खर्चासाठी संस्था व व्यक्तींची मदत मिळाली. पण मोठा खर्च अप्रत्यक्ष असतो- म्हणजे मी मोहीमेच्या तयारीसाठी अनेक महिने केलेल्या राईडस, सरावासाठी केलेल्या गोष्टी हा खर्च वेगळा. शिवाय इतके दिवस सुट्ट्या घेण्यामुळे एक प्रकारे जे आर्थिक नुकसान होतं ते होतंच. असो.
ह्या प्रवासाची मूळ योजना स्पीति- लदाख़ अशी होती आणि स्वरूप असं होतं. पुण्यातील मंथन फाउंडेशन आरोग्य व पर्यावरणावर काम करते. हे सोलो सायकलिंग स्पीति व लदाख़ ह्या अगदी दुर्गम भागामध्ये होणार होतं. त्याची उद्दिष्टे अशी होती.
१. सायकल आरोग्य व फिटनेसचा संदेश देणारं माध्यम आहे.
२. सायकल चालवणं पर्यावरण- अनुकूल जीवनशैलीकडे जाणारं एक पाऊल आहे. पर्यावरणाबद्दल आदर व पर्यावरणाच्या संवर्धनाचा संदेश त्यामध्ये समाविष्ट आहे.
३. स्पीति आणि लदाख़ भारतातले दुर्गम भाग आहेत व तिथलं लोकजीवन वैविध्यपूर्ण आहे. इथे सायकल चालवताना स्थानिक लोकांसोबत संवाद करता येऊ शकतो.
४. इथे सायकल चालवणं एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेत एकतासुद्धा दर्शवतं.
5. हे भाग सीमेला लागून असल्यामुळे इथे सायकल चालवताना आर्मीच्या जवानांसोबतही भेट होते; त्यांच्याशी अनौपचारिक संवाद करता येऊ शकतो. ते किती विपरित परिस्थितीमध्ये काम करतात, हे बघता येतं. त्यांना तिथे भेटणं, हासुद्धा त्यांना एक प्रकारे केलेला सॅल्यूट असतो.
पुण्यातील रिलीफ फाउंडेशन, महा- एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र, माहिती सेवा समिती, हरित सेना, महाराष्ट्र ह्या संस्थांचंही सहकार्य ह्या उपक्रमाला मिळालं. एक सायकलिस्ट म्हणून ही खूप मोठी गोष्ट होती. एका सायकल मोहीमेसाठी इतक्या लोकांचं सहकार्य व त्यांचा विश्वास मिळणं, ही खूप मोठी गोष्ट होती.
ह्या मोहीमेसाठी अनेक महिने तयारी केली. मॅरेथॉन पळाल्यानंतर फिटनेस वाढला होताच. तो पुढे टिकवून ठेवला. प्रवासाला निघण्याच्या काही महिने आधी पुण्याच्या जवळपासच्या काही घाट रस्त्यांचा सराव केला. स्पीति- लदाख़च्या रूटसचा थोड़ा अभ्यास केला. मागे २०१५ मध्ये जो प्रवास केला होता तो बेसलाईन मानून पुढची तयारी केली. सायकल नेण्यासाठी ह्यावेळी एक मोठी पिशवी बनवून घेतली. अर्थात् सायकल कॅरी केस. बाजारात अशी बरीच महाग मिळते. पण माझे परभणीतले एक दिग्गज सायकलिस्ट मित्र- सायकल रेसर खुदुस भाई हे स्वत: तशी केस बनवतात. अनेक ठिकाणी रेससाठी जाताना ते ह्या केसमधूनच सायकल नेतात. अशी सायकल केस ट्रेनमध्ये बर्थच्या खाली आरामात बसू शकते. मार्केटमधल्या केसपेक्षा खूप कमी रेटमध्ये त्यांनी मला तशी पिशवी बनवून दिली. सायकल कशी फोल्ड करायची, परत कशी लावायची हेसुद्धा शिकवलं. तिची एकदा ट्रेनमध्ये ट्रायलही घेतली. पिशवीत ठेवलेली सायकल खांद्यावर नेण्याचाही सराव केला. हा एक वेगळाच व्यायाम बनला. फोल्ड केलेली सायकल, कॅरी केस आणि सायकल टूल किटसचं एकूण वजन १५ किलोहून जास्त होतं. ते उचलून नेताना सुरुवातीला बराच त्रास झाला. पण वजन घेऊन चालण्याचा व्यायाम मस्त झाला. असे एक- दोन किलोमीटरचे अनेक वॉकही व्यायाम म्हणून केले. ह्याच सुमारास माझ्या साडेचार वर्षांच्या मुलीला कडेवर घेऊन ५-६ किलोमीटर चालत राहिलो. त्यामुळेही एक प्रकारे वेट ट्रेनिंगसारखा व्यायाम झाला.
२५ जुलैला निघण्याच्या आधी काही छोटे कार्यक्रम झाले. पुण्यातील मंथन संस्थेच्या कार्यालयामध्ये एक प्रकारचा सेंड ऑफ झाला. नंतर परभणीतील सायकलिस्टस व मंथन संस्थेचा एक कार्यक्रम झाला. त्यामध्ये हा पूर्ण उपक्रम, उद्दिष्टे, स्वरूप, स्पीतिमध्ये सोलो सायकलिंगमधील आव्हाने ह्यावर चर्चा झाली. परभणीतील अनेक सायकलिस्टस, रनर्स ह्यांनी आपलेही अनुभव शेअर केले. ह्या पूर्ण मोहीमेत परभणीतील सायकलिस्टसचं अनेक प्रकारे सहकार्य मिळत राहिलं. त्या अर्थाने तर कोणतीही सोलो सायकल मोहीम सोलो नसते. अनेक जण अनेक प्रकारे त्यात सहभागी असतातच. विशेष म्हणजे परभणीत झालेल्या कार्यक्रमाच्या आधी लोकांना आग्रहाची विनंती केली होती की कार्यक्रमाला येताना सायकलीवर किंवा चालत आलात तर उत्तम. कारण अनेकदा आपण दुस-यांच्या अचिव्हमेंटसचे मॅसेजेस फॉरवर्ड करतो आणि स्वत: एक पाऊलही उचलण्यापासून लांब राहतो. असो.
परभणीतून २५ जुलैला निघालो. निघताना मनात अनेक विचार आहेत. योजना तर मोठी महिन्याभराची बनवली आहे. सुट्ट्यांचाही जुगाड केला आहे. पण काय ह्या योजनेप्रमाणे सायकल चालवू शकेन? अनिश्चितता खूपच आहेत. एक तर सुरुवातीचे काही दिवस व मधले काही दिवस मोठ्या पावसाची शक्यता आहे. लँड स्लाईडस, ढगफुटी, रस्ते बंद होणं अशा गोष्टी तिथे नेहमीच होतात. निसर्गाचीही मदत पाहिजे, रस्त्यांच्या बाबतीत नशीब चांगलं पाहिजे, सायकलीचीही साथ पाहिजे! शिवाय तब्येतही ठीक राहिली पाहिजे. ह्या गोष्टी लक्षात घेऊन वाटत आहे की, जर मी ६०% जरी प्लॅनप्रमाणे करू शकलो, तरी समाधनकारक असेल. त्याबरोबर हेसुद्धा वाटतं आहे की, वास्तविक एक्स्पीडिशन ही परीक्षेच्या निकालासारखी असते. खरी परीक्षा तर वर्षभराची तयारीच असते. असो! बघूया कसं आणि किती जमेल. ट्रेनमध्ये प्रवास करताना थोडी भिती नक्कीच वाटते आहे, पण त्याहून जास्त उत्सुकता आहे की, हे स्वप्न किती प्रमाणात प्रत्यक्षात येईल, किती सायकल चालवू शकेन...
पुढील भाग: सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
16 Aug 2019 - 9:37 am | महासंग्राम
https://twitter.com/misalpav/status/1162214220403843072
16 Aug 2019 - 11:56 am | ज्ञानोबाचे पैजार
पुभाप्र
पैजारबुवा,
17 Aug 2019 - 12:33 pm | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
17 Aug 2019 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर उपक्रम. तसे तुमचे सगळेच उपक्रम वेगळे आणि रोचक असतात. फोटो मस्तं.
पुभाप्र.