टूर दी फ्रान्स - भाग १ (ओळख)

Primary tabs

Ashuchamp's picture
Ashuchamp in जनातलं, मनातलं
5 Jul 2019 - 2:21 pm

1
TDF
टूर दी फ्रान्स ही एक अतिशय जुनी आणि प्रसिद्ध अशी सायकल शर्यत आहे. यंदाचे तिचे १०६ वे वर्ष आहे. केवळ पहिले आणि दुसरे महायुद्ध सुरु असतानाच ही शर्यत झाली नव्हती (अर्थातच म्हणजे). दर वर्षी होणाऱ्या या शर्यतीत पूर्वी फक्त फ्रान्सचे सायकलपटू भाग घेत पण जशी जशी लोकप्रियता वाढली तसे जगभरातून यात स्पर्धक येऊ लागले आणि आता ही सायकलींग मधली सर्वात प्रतिष्ठेची शर्यत मानली जाते. साधारण ३४०० किमीची ही शर्यत २१ स्टेजेसमध्ये पूर्ण केली जाते.

यंदाची टूर ही ६ जुलै ते २८ जुलै दरम्यान होणार आहे त्या निमित्त हा लेखप्रपंच.

लोकांना टूर म्हणजे फक्त सायकल शर्यत इतकेच लक्षात राहते आणि मग रॅम, बिराएम करणाऱ्यांना आता पुढे काय टूर दी फ्रान्स का असे भाबडेपणे विचारले जाते. पण या दोन्ही गोष्टी प्रचंड वेगळ्या आहेत. हे म्हणजे धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया खाडी पोहून आल्यावर आता काय भारताकडून ऑलिंपिक ला १००मी ला पोहणार का असे विचारण्यासारखे आहे.

एन्ड्युरन्स सायकलिंग आणि टूर दी फ्रान्सचे सायकलींग या दोन्ही गोष्टी अतिशयच वेगळ्या आहे. उगाच कोणालाही वाटले म्हणून टूरमध्ये जाता येत नाही. टूरमध्ये आता व्यक्तिगतरित्या सहभागी होताच येत नाही. दर वर्षी २२ संघ सहभागी होतात आणि प्रचंड तगडे स्पॉन्सर असतील तरच हे संघ टूरचा विचार करू शकतात. त्यातही केवळ पैसा आहे म्हणून उतरतो असे होत नाही तर त्यासाठी बरीच मोठी प्रोसेस असते. टूर धरून आंतरराष्ट्रीय सायकल संघटनेने मान्यता दिलेल्या एकूण ३८ रेसेस असतात. जानेवारीत ऑस्ट्रेलियात होणारी टूर डाऊन अंडर पासून सायकल रेस कॅलेंडर सुरु होते ते चीनमध्ये होणारी टूर गँगझू या ऑक्टोबरच्या रेसला संपते. यात सहभागी होणार्या संघाना वर्ल्ड टीम्स म्हणतात.

असे १८ जागतिक संघ आणि ४ दुय्यम आमंत्रित संघ मिळून २२ संघाचा आकडा केला जातो. यापेक्षा जास्त संघ आल्यास नियोजन कोसळेल यामुळे हाच आकडा दर वर्षी असतो. एखादेवेळी असला तर कमी असतो पण २२ पेक्षा जास्त नाही.

निमंत्रित संघासाठी प्रत्येक खंडातून एकेक टीम निवडली जाते. टूर ऑफ अफ्रिका, अशिया, अमेरिका, युरोप आणि ओशनिया मधून फक्त चारच घेतल्या जातात, पाच नाही.

हे संघ एखाद्या फुटबॉल क्लबसारखे तगडे असतात आणि ते उत्तमोत्तम सायकलपटूंना निवडून करारबद्ध करतात. सायकलपटूंचे आपल्या बॅडमिंटन, टेनिस सारखे आंतरराष्ट्रीय रँकिंग असते आणि अव्वल खेळाडू हवे असतील तर तेवढी थैली मोकळी सोडावी लागते. ख्रिस फ्रुमला गेल्या वर्षी टिम स्कायकडून ९५ हजार युरो म्हणजे जवळपास ७३ लाखांची रक्कम मोजली गेली होती. हे सायकलपटू चक्क पगारावर असतात आणि त्यांना वर्षभर आपल्या संघाकडून कामगिरी करावी लागते.

यामुळे या प्रकारात अद्याप भारतीय खेळाडू दिसून येत नाहीत. जसे इंग्लिश प्रिमिअर लीगमध्ये होते तसेच. भारतीय खेळाडूंना तिथे पोचायला अजून बरीच मजल मारावी लागणार आहे. आत्ताशी कुठे आपले खेळाडू आशियाई स्पर्धांमध्ये दिसू लागले आहेत. पण तिथेही प्रचंड तीव्र स्पर्धा आहे. टूरमध्ये जास्तीत जास्त २०० सायकलपटू घेतले जातात आणि त्यासाठी जगभरातून प्रचंड चुरस असते. त्यामुळे टूरमध्ये भारतीय सायकलपटू आगामी काही वर्षात दिसेल याची मुळीच शाश्वती नाही. रेस जिंकण्याची वगैरे तर अगदीच स्वप्नवत गोष्टी. राखीव खेळाडू म्हणून जरी संधी मिळाली तरी ती सध्याची परिस्थिती बघता मोठी कामगिरी असेल.

टूरचे स्वरुप

टूर ही रॅम किंवा बिआरएम सारखी एक पॉईंट पासून दुसरीकडे एकसलग जात नाही. हे २१ स्टेजेस किंवा टप्पे फ्रान्समध्ये विविध ठिकाणी असतात. कधी जर्मनी, स्वित्झर्लंड, बेल्जियम देशातही टूरचा एखादा टप्पा होता.

हे टप्पे कधी जोडून असतात तर कधी एकदम लांब. छोट्यात छोटा साधारण १२५-१३० किमीचा तर मोठ्यात मोठा २५०किमीचा. यापेक्षा कमी किंवा जास्त शक्यतो नसतात. टाईम ट्रायलचे टप्पे मात्र २५ ते ३० किमी लांबीचे असतात.

टप्पे फ्लॅट, टाईम ट्रायल आणि माऊंटन अशा ३ स्वरुपाचे असतात. आणि त्यानुसार जागा बदलत जातात. भारतात जर टूर झाली तर तिचा एक टप्पा उटीच्या चढावर होईल तर दुसरा टप्पा केरळातील जंगलातून होईल, फ्लॅट रोड चा टप्पा कदाचित दिल्ली आग्रा रस्त्यावर होईल, अशाप्रकारे. प्रत्येक टप्प्याचा विजेता वेगळा असू शकतो पण रेसच्या शेवटी त्याचे एकत्रितपणे टायमिंग घेऊन अंतिम विजेता ठरवला जातो.

हे २२ संघ आणि त्यांचे २०० सायकलपटू प्रत्येक स्टेजला सर्वोत्तम कामगिरी देण्याच्या प्रयत्नात असतात आणि हे आजकाल प्रचंड प्रोफेशनल आणि कमर्शियल पद्धतीने केले जाते.

प्रत्येक सायकलपटूचे बारीक सारिक तपशील, त्यांचा दमसास, ताकद, वैशिठ्ये आणि मानसिकता तर संघ मॅनेजरला माहीती असतेच खेरीज रेस सुरु असतानाही आठही सायकलपटूंचा हार्ट रेट किती आहे, केडन्स किती पडतोय, कॅलरी इंटेक किती आहे याची सेकंदा सेकंदाच्या फरकाने माहिती मिळत असते. कोण थकल्यासारखे वाटतोय कोण स्ट्रॉंग आहे हे सतत तपासले जाते. आपल्याच नव्हे तर अन्य संघाची परिस्थिती काय आहे याकडेही बारकाईने लक्ष ठेवले जाते.

जसे फुटबॉलमध्ये मेसी किंवा रोनाल्डोवर प्रतिस्पर्धी बचावफळीचे लक्ष असते आणि ते सतत त्याला घेरून असतात तसेच प्रत्येक संघ दुसऱ्या संघाच्या स्ट्रॉंग सायकलपटूवर लक्ष ठेऊन त्याला घेरुन असतात. त्याला काही केले जात नाही पण त्याने वेग घेतला की त्याला आघाडी मिळूच न देणे, मोमेंटम घालवणे असे उद्योग केले जातात. तसे होऊ नये म्हणून त्या संघाचे अन्य सायकलपटू सज्ज असतात. असा हा प्रचंड गुंतागुंतीचा बुद्धीचा आणि बळाचा सामना सुरु असतो.

प्रत्येक संघाचा एक स्टार खेळाडू असतो ज्याकडे टूर जिंकण्याची क्षमता असते. त्याला केंद्रस्थानी ठेऊन सगळे डावपेच आखले जातात. या सायकलपटूला टाईम ट्रायलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करावी लागते, फ्लॅट स्टेजेसमध्ये आपली शक्ती शेवटच्या किमीपर्यंत राखून ठेवावी लागते आणि २०० किमी नंतर प्रचंड ताकदीने स्प्रींट मारावी लागते. माऊंटन स्टेजेसला जिथे भल्या भल्या सायकलपटूंचा कस लागतो तिथेही या लीडर्सना समाधानकारक कामगिरी करावी लागते.

त्याच्या मदतीसाठी संघातले अन्य सदस्य असतात. ते त्याला खायला, प्यायला आणून देतात, दमला असेल तर त्याच्या पुढे पुढे चालवत राहत ड्राफ्ट देतात, अन्य संघातील सायकलपटूंना त्याचा मोमेटम तोडू देत नाहीत. या सहाय्यक खेळाडूंना डोमेस्टीक्स म्हणजे सेवक असा शब्द आहे. यामुळे जिंकलेला खेळाडू जरी पोडीयमवर एकटा असला तरी त्यामागे मोठे टीमवर्क असते. इतकेच काय तर वैयक्तिक टाईम ट्रायलमध्येही हे सहकारी आधी जातात, मग कुठे किती आणि काय गियर वापरला, बिग रिंग का हाय केडन्स, हार्ट रेट, पॉवर ग्राफ याची तातडीने माहीती टीम मॅनेजरकडे येते. त्याचा अभ्यास होतो आणि त्यानुसार स्पेसिफिक सूचना स्टार खेळाडूला दिल्या जातात आणि त्यानुसार तो त्याची योजना आखतो.

रेग्युलर रेसपेक्षा टाईम ट्रायल जास्त आव्हानात्मक असते कारण त्यात थेट कळत नाही कोण पुढे कोण मागे आहे ते. आणि त्या २७ किमी च्या पॅचवर कुठे आणि किती काय करायचे, स्पीड कुठे घ्यायचा, कुठे काळजीपूर्वक जायचे हे सर्वस्वी त्या रायडरवर अवलंबून असते. एक बारकी चूक आणि तुम्ही बघता बघता कुठेतरी मागे फेकले जाता. एरवी हे रायडर अन्य सहकाऱ्यांच्या मागे राहून एनर्जी सेव्ह करत असतात पण इथे तो चान्स नाही आणि पहिल्या क्षणापासून २७ किमी ची स्प्रींट मारावी लागते आणि एकेक सेकंदाच्या फरकाने स्थान ठरत असल्याने ज्यांना टूर जिंकायची आहे त्यांना अतिशय काळजीपूर्वक ही स्टेज पार करावी लागते.
आजवरच्या टूरमध्ये २०१५ साली रोहॅन डेनिसने ५५.४४किमी च्या अॅव्हरेजने टाईम ट्रायल पूर्ण केली, हा विक्रम अद्याप अबाधित आहे.
टिम ट्रायलमध्ये ओरिका ग्रीन एज टीमने २०१३ मध्ये २५ किमी ची स्टेज ५७.७ किमी च्या वेगाने पूर्ण केली. गेल्या पाच सहा वर्षात सायकलिंग टेक्नॉलॉजीमध्ये कमालीचा बदल घडून आल्यावरही विक्रम टिकून राहीला आहे हे महत्वाचे

यलो जर्सी

टूरचा विजेता आणि टूर सुरु असताना जो आघाडीवर आहे तो या जर्सीचा मानकरी असतो. शर्यत सुरु झाली १०० वर्षांपूर्वी तेव्हा त्याला केवळ वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळत असे आणि त्याकाळी पिवळ्या रंगाचा कागद जास्त प्रचलित असे आणि त्या प्रसिद्धीचा एक भाग म्हणून ही पिवळी जर्सी देण्यात आली आणि ती प्रथा आता एक शतक झाले तरी सुरुच आहे. या मानाच्या यलो जर्सीसाठी संभाव्य विजेत्यांची जोरदार चुरस सुरु असते ती केवळ टायमिंगवर. त्यामुळे ते अन्य सायकलपटूंनी जरी सुरुवातीलाच मुसंडी मारली तरी फारसे लक्ष देत नाहीत. त्यांना फक्त दुसऱ्या संघातील संभाव्य विजेता कुठे आहे याकडे लक्ष ठेवावे लागते.

म्हणजे, आता ख्रिस फ्रुम आघाडीवर आहे. त्याच्या मागे पीटर सगान आहे, आणि त्याचे ओव्हरऑल टायमिंग तब्बल पाच मिनिटांनी जास्त आहे आणि मार्क केव्हंडीशचे टायमिंग सात मिनिटांनी जास्त आहे. तर फ्रुम आणि त्याचा संघ फक्त सगळा फोकस केवळ सगान आणि केव्हेंडीशवर ठेवतात.

मग तो पहिला दुसरा सोडाच तर १० - १२ वा आला तरी बिघडत नाही. जोवर तो या दोघांच्या पुढे आहे तोवर यलो जर्सी त्याच्याचकडे राहणार. अन्य कोणी स्टेज जिंकली तरी क्रमवारीवर फरक पडत नाही तोपर्यंत कुणी गांभिर्याने घेत नाही.
yellow

२०१७ मध्ये फ्रुमकडे पहिले तीन दिवस यलो जर्सी नव्हती. तो क्रमवारीत पार ३० वा होता. पण माऊंटन स्टेजमध्ये त्याने कव्हर केले. आणि मग त्यानंतर त्याने सोडली नाही. पण काहीवेळा अगदी चुरस असते त्यावेळी स्टेजगणिकसुद्धा यलो जर्सीचे मानकरी बदलतात.

ग्रीन जर्सी - या एकूण रेसमध्ये २१ स्टेजेस असतात आणि प्रत्येक स्टेजला तुम्ही कितव्या क्रमांकावर फिनिश करता यावर पॉइंट्स मिळतात. म्हणजे पहिल्या येणाऱ्या खेळाडूला १० पॉइंट, दुसऱ्याला ९ या प्रमाणे. जर पेलेटॉन म्हणजे एकगठ्ठा सायकली एकदम फिनिशला पोचल्या तर त्यातल्या सगळ्यांना समान पॉइंट दिला जातो. झालेल्या स्टेजेसचे मिळून ज्याचे सर्वाधिक गुण असतील त्याला ग्रीन जर्सीचा मान मिळतो. पण यलो आणि ग्रीन एकालाच मिळत नाही. अशा वेळी दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला ग्रीन जर्सी दिली जाते.

पोलका डॉट - याच प्रमाणे माऊटन स्टेजला खरा कस लागत असल्याने टूरमध्ये त्यालाही अनन्यसाधारण महत्व आहे. माऊंटन स्टेज जिंकणाऱ्याला खास पॉइंट असतात आणि फक्त स्टेज नाही तर एखादा सेगमेंट असेल तर तो फास्टेट पार करणाऱ्यालाही पॉइंट्स असतात. आपल्याकडे कसा मुंबई पुणे ला घाटाचा राजा, कामशेत प्राईम वगेरे दिले जाते तसे. या सर्व पॉइंट्स ज्याच्याकडे जास्त त्याला पोलका डॉट जर्सी मिळते. म्हणजे पांढऱ्या जर्सीवर लाल गोळे.

याखेरीज २५ वर्षाखालील सायकली्स्टमध्ये सर्वाधिक पॉइंट्स असतील त्या रायडरला पांढरी जर्सी मिळते.
jersey

या विविध जर्सी आणि वेगळ्या पॉइंट सिस्टिममध्ये फक्त एकच विजेता बाकी सगळे खाली मान घालून असा प्रकार होत नाही. प्रत्येक टिम आपापल्या क्षमतेनुसार त्यांचे रियलीस्टीक टार्गेट ठरवतात. म्हणजे काही अस्टाना, मुवीस्टार सारख्या स्ट्रॉंग टिम टूर जिंकण्यासाठी प्रयत्नशील असतात तर काहींना त्यांच्या स्ट्रॉंग रायडरला पोलका डॉट, ग्रीन किंवा व्हाईट जर्सी मिळाली तरी सक्सेस असतो. अगदी तळातल्या टिम्स तर एखाद दुसरी स्टेज विन सुद्धा सेलिब्रेट करतात.

हे म्हणजे, वर्ल्डकप मध्ये जसे काही कप जिंकायला बघतात, काही क्व्वार्टर, सेमीला गेलो तरी भारी असे म्हणतात तर काहींना त्यांच्या खेळाडूला प्लेअर ऑफ द कप मिळाला तरी बेस्ट वाटते तशातला प्रकार.

त्यामुळे मग प्रत्येक टीम आपल्या सायकलीस्टवर वेडेवाकडे प्रेशर लादत नाही.

टूर दी फ्रान्स - भाग २

क्रीडासमीक्षा

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

5 Jul 2019 - 3:17 pm | महासंग्राम

टूर दी फ्रान्स म्हंटलं कि फक्त आणि फक्त लान्स आर्मस्ट्राँग आठवतो. त्यातलं फारसं काही कळत नसलं तरी आर्मस्ट्रॉंग या नावात असलेल्या वलयामुळे तो फेव्हरिट सायकलपटू होता.

बाकी मस्त लिहिलय, यातल्या वेगवेगळया टप्प्यांची तपशीलवार ओळख करून द्यावी हि विवि.

कंजूस's picture

5 Jul 2019 - 3:52 pm | कंजूस

माहिती आवडली. धन्यवाद.
सायकलींग करत नाही म्हणून वाचू नये असं नाही.
---
पण कमर्शल वाटतेय.

मोदक's picture

5 Jul 2019 - 5:12 pm | मोदक

झकास रे आशू...

या भागाला टूर दी फ्रान्स - भाग १ (ओळख) असे नांव द्या.

अभ्या..'s picture

5 Jul 2019 - 5:50 pm | अभ्या..

वेल्कम आशू,
मिपावर भरपूर समानशील आहेत तुझे.
येऊदे जोरात.

स्थितप्रज्ञ's picture

5 Jul 2019 - 6:26 pm | स्थितप्रज्ञ

आतापर्यंत TDF म्हणजे एकापेक्षा एक भारी सायकली चालवणारे सायकलिस्ट एवढंच दिसायचं.
आज बरीच ओळख झाली.

पु.भा.प्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2019 - 7:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक लेख. आतापर्यंत "टूर दी फ्रान्स" ही सायकलिंगचा कस लावणारी एक जगप्रसिद्ध स्पर्धा आहे इतके माहीत होते. या लेखामुळे बरीच माहिती मिळाली.

पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

23 Jul 2019 - 12:21 am | मुक्त विहारि

+1

Ashuchamp's picture

5 Jul 2019 - 8:04 pm | Ashuchamp

धन्यवाद सर्वांना

उगा काहितरीच's picture

5 Jul 2019 - 9:59 pm | उगा काहितरीच

हे इतकं अवघड असतं हे माहीत नव्हतं.

दुर्गविहारी's picture

6 Jul 2019 - 7:28 am | दुर्गविहारी

याविषयी फार माहिती नव्हते. खुपच छान ओळख करुन दिली आहे. धन्यवाद. पु. भा.प्र.

पैलवान's picture

6 Jul 2019 - 8:08 am | पैलवान

स्वागत!!

टूर द फ्रान्स म्हणजे केवळ सायकल शर्यत, मुंबई-पुणे सारखी, पण बरीच मोठी असं नेहमी वाटत आलं होतं.
पण हे बरंच भव्य, दिव्य अन अवाढव्य प्रकरण आहे.

मित्रहो's picture

6 Jul 2019 - 9:56 am | मित्रहो

आवडलं. बऱ्याच गोष्टी माहीत असल्या तरी वाचताना मजा आली

जेम्स वांड's picture

6 Jul 2019 - 11:31 am | जेम्स वांड

दोन चाके हँडल चेन ब्रेक अन गियर्स इतकीच सायकल ओळख असणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना हे लेखन म्हणजे अलिबाबाची गुहा उघडल्यासारखे आहे एकदम. उत्तम शास्त्रशुद्ध लिखाण आणि आमच्यासारख्या "ले-मॅन" लोकांना समजेल अशी शैली. तुमचे मिसळपाववर स्वागत, पुढे तुमच्या सायकल मुशाफिरीबद्दल अजून वाचण्याची आता आत्यंतिक आस लागलेली आहे.

Flowers

जॉनविक्क's picture

6 Jul 2019 - 3:05 pm | जॉनविक्क

टीव्हीवर मस्त मस्त देखणी लोकेशन्स टॉप व्हिऊ मधून दिसताना त्यांना सतत कापत जाणारी सायकल स्वारांची रांग इतकिच काय ती टूर दि फ्रान्स शी ओळख. तुमच्यामुळे आजून जवळीक साधली जातेय... पुलेशु.

कपिलमुनी's picture

6 Jul 2019 - 3:36 pm | कपिलमुनी

माहितीपूर्ण लेख आहे.
पुलेंशु.

झेन's picture

6 Jul 2019 - 6:09 pm | झेन

यात एवढ टीमवर्क, गुंतागुंत असते माहिती नव्हत. छान ओळख करून दिलीत धन्स.

प्रशांत's picture

8 Jul 2019 - 12:29 pm | प्रशांत

१ लंबर चॅम्प. फारच छान लेख झाला

आता रेस चे अपडेट द्या.

पुलेंशु

Nitin Palkar's picture

8 Jul 2019 - 6:29 pm | Nitin Palkar

टूअर द फ्रान्स बद्दल 'एक प्रतिष्ठेची सायकल शर्यत' एवढीच माहिती होती, तिचे अर्थकारण प्रचंड मोठे असते हेही वाचून होतो पण इतकी विस्तृत माहिती पहिल्यांदीच वाचायला मिळाली. अतिशय सुंदर लेख. पुलेशु.

सुधीर कांदळकर's picture

9 Jul 2019 - 12:12 pm | सुधीर कांदळकर

मिपावर आला. समयोचित वगैरे म्हणतात तसे.

उपग्रह चित्रवाहिन्या आल्या तेव्हा या स्पर्धेचे विहंगम चित्रण आवडले होते. नंतर काही वर्षांपूर्वी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात अचानक लान्स आर्मस्ट्रॉन्गच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद हाती आला.तोही सुंदर आहे. त्यात न आलेले अनेक तांत्रिक तपशील आपण दिलेले आहेत. अनेक अनेक धन्यवाद.

ग्रीन जर्सी, पोलका डॉट, व्हाईट जर्सी ठाऊक नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद.

ही एक लेखमाला असून हा पहिला भाग आहे हे पाहून बरे वाटले. पुढील भागात तीव्र स्पर्धेची चुरस, क्षणिक हडेलहप्पीचा थरार, एखाद्या चमूला पहिले येण्याची संधी देण्यातला मोठेपणा आणि देवघेव याचा आनंद मिळेल तर.

फान्समधल्या तुरीची छान ओळख - तपशीलवार, तरीही मनोरंजक.

पुभाप्र

एका सुरेख लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

वरुण मोहिते's picture

10 Jul 2019 - 5:14 am | वरुण मोहिते

लिहीत राहा

अजित पाटील's picture

23 Jul 2019 - 5:11 pm | अजित पाटील

सुंदर अशी माहिती

फक्त खालील भाग थोडा पटला नाही अवघड आहे पण जिद्द आणि इच्छा असेल तर अश्यक असे काही नाही

यामुळे या प्रकारात अद्याप भारतीय खेळाडू दिसून येत नाहीत. जसे इंग्लिश प्रिमिअर लीगमध्ये होते तसेच. भारतीय खेळाडूंना तिथे पोचायला अजून बरीच मजल मारावी लागणार आहे. आत्ताशी कुठे आपले खेळाडू आशियाई स्पर्धांमध्ये दिसू लागले आहेत. पण तिथेही प्रचंड तीव्र स्पर्धा आहे. टूरमध्ये जास्तीत जास्त २०० सायकलपटू घेतले जातात आणि त्यासाठी जगभरातून प्रचंड चुरस असते. त्यामुळे टूरमध्ये भारतीय सायकलपटू आगामी काही वर्षात दिसेल याची मुळीच शाश्वती नाही. रेस जिंकण्याची वगैरे तर अगदीच स्वप्नवत गोष्टी. राखीव खेळाडू म्हणून जरी संधी मिळाली तरी ती सध्याची परिस्थिती बघता मोठी कामगिरी असेल.