डोह

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
23 Jun 2019 - 2:15 pm

पल्याड-
एखादा कभिन्नकाळा राक्षस निवांत पहुडलेला असावा
आणि केवळ त्याच्या अस्तित्वाच्या भीतीने कुणीही त्याच्या आसपास फिरकू नये
असा तो गूढगर्भ डोह निवांत पसरला होता.
वाटसरू ... वाटसरूच तो अनंत अंतर पायदळी तुडवून श्रांत झालेला
पुढे तोडायच्या अंतराची कितिक गणती असेल या विचाराने विद्धसा, हळू-हळू डोहाच्या काठी आला.
वाटसरू पाणी घ्यायला झुकणार इतक्यात गहन गंभीर आवाज निनादला ...
ये, राजा... ये.
सगळी राज्यश्री सोडून गेली, सगे सोयरेही सोडून गेले आता तुला माझी आठवण झाली ना ?
ये ... बस इथे शांतसा ..
वाटसरू हताशपणे डोहाच्या काठी बसला.
दमला असला तरी दोन घोट पाणी पिण्याचं त्राणदेखील त्याच्यात उरलं नव्हतं.
थोडा वेळ असाच अस्वस्थ शांततेत गेला आणि मग राजाने डोळे किलकिले करून डोहाच्या पल्याड पहायचा प्रयत्न केला.
निळ्यासावळ्या दाट धुक्यात एखादा हिरवागार डोंगर लपेटला जावा तसं काहीसं अंधुक चित्र राजाला दिसलं.
कुणीतरी पुढे होऊन तिथे काय आहे हे सांगावं म्हणून राजाच्या ओठी शब्द आले .. “कोण आहे रे तिकडे”... आणि तो थबकला आपण राजा उरलो नाही नव्हे नव्हे जगाच्या दृष्टीने आपण कुणीच उरलो नाही याची खिन्न जाणीव त्याच्या तनामनावर पसरली.
डोह हसला ... त्याला राजानं न बोललेले शब्द ऐकू आले होते...
मित्रा ... अरे कुणाला बोलावतोस .. त्या तिथे काय आहे हे पाहायला ?
राजानं खिन्नसा उसासा सोडला....
अरे माझ्या मध्ये काय दडलं आहे आणि त्या तीरावर काय आहे
हे पहायला सहाय्यकाला बोलावू पाहतोस....
वेडा रे वेडा ..
मित्रा काही गोष्टी अश्या असतात ना कि त्या तुझ्या तुलाच पाहाव्या लागतील ..
आणि काही वाटा अश्या कि तुझ्या तुलाच तुडवाव्या लागतील.. प्रत्येकालाच लागतात..
तुझी वेळ आज आली आहे इतकच.
ही वाट तुझा जीव मागेल; तुझं कलेवर कदाचित इथेच टाकाव लागेल तुला...
राजा मनोमन शहारला
डोह पुन्हा हसला...
मित्रा तुला वाटतंय ना त्या तिथे,पल्याड काय आहे पहायला जावं ?
इथं तरी तुझं आता काय राहील आहे म्हणा ...
डोहाच्या बोलण्यात कुचेष्टेचा सूर राजाला क्षणैक जाणवला
पण मित्रा, असं आहे, तू वाटचाल सुरु कर.. तुला आज ना उद्या ..
डोह पुन्हा हसला ...
अर्थात तुझ्यासाठी आता आज आणि उद्या हेही संदर्भहीन झालेत म्हणा ..
तुला पुढे जावं तर लागेलच ..
मग किती काळ इथे घोटाळत राहायचं हा तुझा प्रश्न ..
आणि जे दिसत आहे ते पहायला निघालास तरी ... तरी ..
तू तिथे जाई पर्यंत तुझा तू तरी कुठे उरणार आहेस ..?
ते पहायला तुझी नजर सुद्धा उरेल किंवा न उरेल...
तेव्हा मित्रा एक काम कर तुझ्या अस्तित्वाच ओझं आहे ना ते मला देऊन टाक ..
काय उपयोग आहे तुला त्याचा ..?
दे ना मला दे तुझ्या अस्तित्वाच ओझं ह्या डोहात मिसळून टाक...
मग मी वाट पाहत बसेन नव्या वाटसरुची ...
© सागरलहरी-

कविता

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

23 Jun 2019 - 9:06 pm | जॉनविक्क

महासंग्राम's picture

24 Jun 2019 - 12:32 pm | महासंग्राम

हि कविता आहे ?