जिवंत पण जाणीवरहित

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
29 May 2019 - 7:21 am

बेशुद्ध पडलेला रुग्ण हा त्याच्या कुटुंबीयांसाठी धडकी भरवणारा विषय असतो. अचानक आलेली बेशुद्धी ही तर अधिक चिंताजनक असते. ही अवस्था नक्की कशामुळे येते हे सामान्यांना नीट समजले नाही तरी तिचे गांभीर्य कळते. तिच्या मुळाशी मेंदूच्या कार्यातील विशिष्ट बिघाड असतो. या बिघाडाची अनेक कारणे असतात. त्यामध्ये विविध आजार, गंभीर अपघात, व्यसनांचा अतिरेक आणि काही औषधांचे प्रमाणाबाहेर सेवन यांचा समावेश होतो. बेशुद्ध रुग्णास शुद्धीवर आणणे हे डॉक्टरसाठी एक आव्हान असते. ते पेलत असताना त्याला आपले वैद्यकीय कौशल्य अगदी पणाला लावावे लागते.

बेशुद्धावस्थेची विविध कारणे, संबंधित रुग्णतपासणी व त्याचे निष्कर्ष आणि अशा रुग्णाचे भवितव्य या सगळ्यांचा आढावा या लेखात घेत आहे. सुरवातीस आपली जागृतावस्था आणि मेंदूचे संबधित कार्य यांची माहिती देतो. त्यातून पुढे माणूस बेशुद्धावस्थेत कसा जातो हे समजेल.

pict

लेखातील विवेचन खालील मुद्द्यांच्या आधारे असेल:
१. जागृतावस्था आणि मेंदूचे कार्य
२. बेशुद्धावस्थेची कारणे
३. रुग्णतपासणी
४. उपचार, आणि
५. रुग्णाचे भवितव्य

जागृतावस्था आणि मेंदूचे कार्य:
हे समजण्यासाठी मेंदूची संबंधित रचना जाणली पाहिजे. ढोबळपणे मेंदूचे ३ भाग असतात: मोठा मेंदू, छोटा मेंदू आणि मेंदूची नाळ (stem). मोठ्या मेंदूच्या बाहेरील आवरणाला cortex असे म्हणतात. हा भाग जैविकदृष्ट्या सर्वात उत्क्रांत असतो. तिथे सर्व मज्जातंतूंच्या संदेशांचे एकीकरण होते.

pict

याउलट मेंदूची नाळ ही जैविकदृष्ट्या सर्वात प्राचीन भाग आहे. तिच्यामध्ये RAS नावाची एक ‘सक्रीय यंत्रणा’ असते. तिच्यातील मज्जातंतूंत सतत काही रासायनिक क्रिया होतात. त्यातून cortexला संदेश जातात. RAS आणि Cortex यांच्या समन्वयातून आपली जागृतावस्था टिकवली जाते. जेव्हा कुठल्याही कारणाने या यंत्रणेवर विपरीत परिणाम होतो, तेव्हा संबंधिताची शुद्ध जाऊ शकते.

बेशुद्धावस्थेची कारणे:
अनेक प्रकारचे आजार आणि डोक्याला जबरी मार बसणारे अपघात यांमध्ये व्यक्ती बेशुद्ध होते. काही प्रमुख कारणे आता समजून घेऊ.
१. मेंदूच्या रक्तपुरवठ्यातील अडथळा: याची दोन कारणे आहेत :
अ) रक्तवाहिन्या त्यांच्यात साठलेल्या मेद-थरांमुळे आकुंचित वा बंद होणे (Stroke)
आ) रक्तवाहिनी फुटणे.

या कारणामुळे येणारी बेशुद्धी ही बरेचदा अचानक येते. बऱ्याचदा अशा रुग्णांना लकवा / पक्षाघात झालेला असतो.
२. अपघात : बऱ्याच वाहन अपघातांत डोक्यास जबरी मार लागतो. तसेच डोक्यावर कठीण वस्तूचा जोराचा प्रहार हेही महत्वाचे कारण आहे.

३. औषधांची विषबाधा: मेंदूला गुंगी आणणारी औषधे (प्रामुख्याने opium गट) आणि अन्य घातक पदार्थ अतिरिक्त प्रमाणत घेणे. हे मुख्यतः व्यसनी लोकांत आढळते. तसेच आत्महत्या वा खून करण्यासाठी देखील यांचा वापर होतो. जवळपास ४०% बेशुद्ध रुग्णांत हे कारण सापडते.

४. हृदयक्रिया बंद पडणे: हृदयविकाराचा तीव्र झटका व अन्य काही आजारांत जर हृदयस्पंदन थांबले (arrest) तर मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होतो. जवळपास २५% बेशुद्ध रुग्णांत हे कारण सापडते.

५. जंतूसंसर्ग: विशिष्ट जिवाणू आणि विषाणूंमुळे मेंदूदाह किंवा मेंदूच्या आवरणांचा दाह होतो. हे आजार गंभीर असतात.

६. ग्लुकोजच्या रक्तपातळीचे बिघाड: मेंदूला ग्लुकोजचा योग्य प्रमाणात पुरवठा सतत आवश्यक असतो. रक्तातील ग्लुकोजची पातळी अति वाढणे अथवा कमी होणे या दोन्ही कारणांमुळे बेशुद्धावस्था येते. आता ही दोन्ही कारणे विस्ताराने बघू.

अ) ग्लुकोजची पातळी अति वाढणे : याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अनियंत्रित मधुमेह. जेव्हा ग्लुकोजची पातळी खूप वाढते तेव्हा शरीरातील भरपूर पाणी मूत्रावाटे निघून जाते (dehydration). त्यातून एकूण रक्तपुरवठा खूप मंदावतो(shock). तसेच अशा रुग्णास खूप उलट्याही होत असतात. त्यातून दुष्टचक्र होऊन परिस्थिती अजून बिघडते.

आ) ग्लुकोजची पातळी खूप कमी होणे: जेव्हा ही पातळी ४० mg/ dL चे खाली जाऊ लागते तेव्हा मेंदूच्या कार्यात बिघाड होऊ लागतो. जर का ती २० mg इतकी खाली गेली तर रुग्ण बेशुद्ध होतो.
ही पातळी कमी होण्याची प्रमुख कारणे अशी: मधुमेहीने घेतलेला इन्सुलिनचा अतिरिक्त डोस, स्वादुपिंडातील अति-इन्सुलिन निर्माण करणाऱ्या गाठी, यकृत आणि मूत्रपिंडाचे तीव्र आजार आणि फाजील मद्यसेवन. मद्यपी लोकांत मद्यपानाच्या जोडीला अन्य व्यसनी पदार्थांचे सेवन सुद्धा असू शकते. तसेच असे लोक जबरी वाहन अपघातालाही आमंत्रण देतात.

७. चयापचयातील अन्य बिघाड: यामध्ये रक्तातील सोडियमची पातळी खूप कमी वा जास्त होणे आणि काही हॉरमोनचे बिघाड यांचा समावेश आहे.

८. अपघाती विषबाधा: यामध्ये मुख्यतः कार्बन मोनोऑक्साइड व शिसे यांचा समावेश आहे. खाणी किंवा गटारातील कामे करणाऱ्यांना कार्बन मोनोऑक्साइडची विषबाधा होऊ शकते. हा वायू आपल्या रक्तात हिमोग्लोबिनला घट्ट चिकटतो आणि त्यामुळे असे हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे वहन करू शकत नाही.

रुग्णाची शारीरिक तपासणी:

सर्वप्रथम रुग्णाचे नातेवाईकांकडून त्याचा इतिहास जाणून घेणे महत्वाचे असते. यात व्यसनाधीनता, पूर्वीचा आजार, औषधे आणि अपघात या माहितीचा समावेश होतो.

प्रत्यक्ष तपासणी करताना डोक्याला मोठी जखम आहे का आणि हातापायाच्या त्वचेवर सुया टोचल्याच्या खुणा पाहतात. मग रुग्णास चिमटे काढून तो काही प्रतिसाद देतो का अथवा डोळे उघडतो का, हे पाहतात. तसेच मनोरुग्णांचे बाबतीत ते बेशुद्धीचे सोंग करीत नाहीत ना, हेही पहावे लागते. शरीर-तापमान पाहणे महत्वाचे. रुग्णाच्या नाडी आणि श्वसनाची गती आणि ताल हे काळजीपूर्वक पहिले जाते. दोन्ही डोळ्यातील बाहुल्यांचा आकार आणि त्यांनी टॉर्चच्या प्रकाशाला दिलेला प्रतिसाद पाहणे हेही महत्वाचे ( विशेषतः ओपियम गटातील रसायनांची विषबाधा झाली असल्यास).

निरोगी डोळ्याच्या बाहुल्या :

pict

ओपियम गटातील रसायनांची विषबाधा : डोळ्याच्या बाहुल्या :
pict

याव्यतिरिक्त रुग्णाचे विविध प्रतिक्षिप्त प्रतिसाद तपासले जातात.
पूर्ण शारीरिक तपासणीनंतर बेशुद्धीची खात्री केली जाते आणि तिची तीव्रता ठरवली जाते. आता पुढची पायरी म्हणजे बेशुद्धीचे कारण ठरवणे. त्यासाठी विविध प्रयोगशाळा आणि प्रतिमाचाचण्या कराव्या लागतात.

प्रयोगशाळा चाचण्या
१. रक्त: यावरील चाचण्या ३ गटांत मोडतात. रक्तनमुन्यात खालील रासायनिक घटक गरजेनुसार मोजले जातात.

अ) ग्लुकोज, कॅलशियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, युरिआ आणि क्रिअ‍ॅटिनिन.
आ) ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण, अमोनिआ
इ) विशिष्ट औषधांचे प्रमाण

२. पाठीच्या मणक्यातील द्रव (CSF) : जेव्हा मेंदूच्या जंतूसंसर्गाची शक्यता वाटते तेव्हा ही तपासणी केली जाते. त्यात जंतूंचा शोध घेणे आणि काही रासायनिक चाचण्या करतात.

प्रतिमा चाचण्या

यात मुख्यत्वे CT अथवा MRI स्कॅन आणि EEG (मेंदू-विद्युत आलेख) यांचा समावेश असतो. त्यातून मेंदूला झालेल्या इजेबद्दल सखोल माहिती मिळते.
वरीलपैकी योग्य त्या चाचण्या झाल्यावर बेशुद्धीचे निदान केले जाते. आता त्यानुसार उपाय केले जातात.

उपचार आणि रुग्णाचे भवितव्य

अशा रुग्णांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवले जाते. त्यांच्यावर उपचार करताना प्रथम त्यांच्या श्वसन व रक्ताभिसरण या मूलभूत क्रियांवर लक्ष केंद्रित केले जाते. गरजेनुसार रुग्णाच्या श्वासनलिकेत नळी घातली जाते. तिचा उपयोग कृत्रिम श्वसन देण्यासाठी होतो. बेशुद्धीच्या कारणानुसार शिरेतून औषधे देऊन उपचार केले जातात.

आता रुग्ण शुद्धीवर कधी येणार हा कळीचा प्रश्न असतो. त्याचे उत्तर मेंदूस किती प्रमाणात इजा झाली आहे, यावर ठरते. ती मध्यम स्वरूपाची असल्यास काही दिवसांत रुग्ण शुद्धीवर येतो. मात्र ती गंभीर स्वरूपाची असल्यास तो महिनोंमहिने बेशुद्धीत राहू शकतो. त्यानंतर पुढे ३ शक्यता असतात:
१. काही रुग्ण बरे होतात
२. काही मृत्यू पावतात, तर
३. काही vegetative अवस्थेत राहतात.

vegetative अवस्था
आता ही अवस्था आणि निव्वळ बेशुद्धावस्थेतील फरक समजून घेऊ. बेशुद्ध माणूस निद्रिस्त आणि जाणीवरहित असतो. तर vegetative अवस्थेतील माणूस हा “जागा” असला तरी पूर्णपणे ‘जाणीवविरहित’ असतो. असे रुग्ण हे वेळप्रसंगी डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल करू शकतात. तसेच ते ‘झोपी जाणे’ आणि ‘जागे होणे’ या अवस्थांतून जाऊ शकतात. पण, त्यांना कुठलेही आकलन (cognition) होत नाही. एक प्रकारे ही ‘जागृत बेशुद्धावस्था’ (coma vigil) असते ! म्हणजेच असा रुग्ण हा केवळ कागदोपत्री जिवंत पण काहीही समजण्यास वा करण्यास असमर्थ असतो. असा रुग्ण जर या अवस्थेत १ महिन्याहून जास्त काळ राहिला तर तो कायमच्या अशा अवस्थेत गेल्याची नोंद होते. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना त्या रुग्णावरील सर्व ‘जीवरक्षक उपाय यंत्रणा’ बंद करण्याची कायदेशीर परवानगी (काही देशांत) मिळते.
***
अनेक प्रकारचे अपघात, गंभीर आजार, व्यसनांचा अतिरेक अशा अनेक प्रसंगांत माणूस बेशुद्ध होतो. आपल्या कोणाच्याही कुटुंब अथवा परिचयातील व्यक्तीवर अशी वेळ येऊ शकते. अशा दुःखद प्रसंगाला सामोरे जाताना आपल्याला मनोबल वाढवावे लागते. त्या दृष्टीने बेशुद्धावस्थेची मूलभूत माहिती या लेखात दिली आहे. वाचकांना ती उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.
*************************************************************
'vegetative ' (अवस्था) साठी मराठी शब्द जरूर सुचवावा ही वि.

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

खूप दिवस याविषयी वाचतो आहे.

फक्त कुपोषण हाच प्रश्न असेल तर देशभर, जगभर कोट्यवधी मुलं तीव्र कुपोषणात राहतात. रात्रीचं जेवण न घेऊ शकणं हा काही ठराविक प्रांतातल्या मुलांबाबत घडणारा प्रसंग नव्हे. पण त्यातून जी शुगर लेव्हल कमी होते तिच्यातून मेंदूला सूज येणं आणि चालत्या खेळत्या बालकाचा रातोरात मृत्यू होणं हा सिन्ड्रोम फक्त या ठराविक भागात का व्हावा? कुपोषण तसं सर्वव्यापी आहे. आणि लहान मुलंच का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jun 2019 - 5:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

या समस्येला "केवळ कुपोषण जबाबदार आहे", असा दावा कोणीच (अगदी राजकारण्यांनीही) केलेला नाही, फक्त कोणत्या मुद्द्यावर भर दिला पाहिजे याचा विचार करताना बर्‍याचदा शास्त्र मागे पडते आणि अर्थ-राजकारण आड येते आणि मग साधासोपा उपायही दुर्लक्षिला जातो... असे मी म्हटले आहे.

कुपोषण, रात्रीचे जेवण चुकवणे, यांचा चयापचयक्रियेवर होणारा एकत्रित परिणाम, लिचीचा मोसम, लहान मुलांनी ती फळे दिवसाच्या विशिष्ट वेळी खाणे, इत्यादी अनेक पैलू व त्यांचे एकमेकावर होणारे परिणाम, या घटनेमागे आहेत. अर्थ-राजकारण बाजूला ठेऊन, त्या सर्व पैलूंचा एकत्रितपणे शास्त्रिय विचार केला तरच योग्य उपाय सापडेल... आणि कदाचित, "तो रात्रीचे पुरेसे जेवण" इतका साधासोपा असू शकतो, असे एका संशोधकाचे मत आहे.

त्या वार्षीक घटनेचे "जागेवर संशोधन केलेल्या त्या तज्ज्ञाची" घटनेसंबंधीची निरिक्षणे, त्यांचे शास्त्रिय विश्लेषण व निष्कर्ष , "हिंदू"मध्ये प्रसिद्ध झालेल्या (आणि वर एका प्रतिसादात ग्राफिक स्वरूपात दिलेल्या) लेखात आहेत. पुनरुक्ती टाळण्यासाठी, या आताच्या प्रतिसादात, त्या बातमीतील केवळ संबंधीत मुद्द्यांचाच त्रोटक उल्लेख केला आहे. तो सर्व लेख वाचल्यास, या समस्येचे अनेक पैलू आणि त्यांचा एकत्रित परिणाम समजून घेण्यासाठी मदत होईल.

मग, प्रतिसादातील वरच्या लेखात लिहिल्याप्रमाणे लिची तोडणी करणार्‍या मजुरांची मुले योग्य तेवढे रात्रीचे जेवण घेतात याची खात्री/सोय केल्यास, सकाळच्या वेळी रक्तात साखरेचे पुरेसे प्रमाण राहील व हा आजार होणार नाही. या वाक्याचा अर्थ स्पष्ट होईल.

कुमार१'s picture

22 Jun 2019 - 2:44 pm | कुमार१

डॉ. सुहास, सहमत.

आणि एकदा का अशा प्रश्नात अर्थकारण व राजकारण शिरले, की सत्य बाहेर यायला अडथळा होतो. मुलांचे मृत्यू हा चिंतेचा विषय आहे.

कुमार१'s picture

22 Jun 2019 - 1:32 pm | कुमार१

तुमचे प्रश्न चांगले आहेत. सविस्तर उत्तर जरा वेळाने.
धन्यवाद!

कुमार१'s picture

22 Jun 2019 - 1:54 pm | कुमार१

गवि, शंकानिरसन:

**** रात्रीचं जेवण न घेऊ शकणं हा काही ठराविक प्रांतातल्या मुलांबाबत घडणारा प्रसंग नव्हे. पण त्यातून जी शुगर लेव्हल कमी होते तिच्यातून मेंदूला सूज येणं व बालकाचा रातोरात मृत्यू होणं हा सिन्ड्रोम फक्त या ठराविक भागात का व्हावा? कुपोषण तसं सर्वव्यापी आहे. आणि लहान मुलंच का?**** >>>>>>

१. हा लिची तोडणी चा काळ आहे. ते काम पहाटे ४ - ७ वेळात करतात. त्यासाठी मुलांसह सगळे मजूर तेव्हा उठतात. बऱ्याचदा ही मुले रात्री च्या जेवणाविना व फक्त लिचीवर.

२. कुपोषण व त्या जेवणाचा अभाव >>> यकृतातील ग्लाय कोजेन चा साठा बराच कमी, जो मुलांत आधीच कमी असतो.

३. अशा वेळेस शरीरात नव-ग्लुकोज निर्मिती होणे आवश्यक असते. निरोगीपणात ती व्यवस्थित होते.

४. आता खूप लिची खाल्ल्यास त्यातील MCPG हे वरच्या प्रक्रियेस खीळ घालते.
५. >>> ग्लुकोज पातळी खूप कमी >>> बेशुद्धी.

सारांश : हा प्रश्न कुपोषण, MCPG, लिची उत्पादनाचे स्थान व काळ या सर्वांचा एकत्रित परिणाम.

गवि's picture

22 Jun 2019 - 2:02 pm | गवि

धन्यवाद,

म्हणजे फक्त कुपोषण इतकाच भाग कारणीभूत नाही ही शंका योग्य ठरली.

प्रचंड उष्णता,रात्री जेवण न करणे,प्रमाण पेक्षा जास्त लिची खाणे आणि अजुन बरीच कारण असतील .
माझ्या ओळखीचे जेवढे बिहारी आहेत त्यांचा बायका गावी राहतात आणि प्रत्येकाच्या बायकोला पोटाचा काही ना काही आजार आहे .
ते जे पाणी पिण्यासाठी वापरतात त्या मध्ये गंधकाचे प्रमाण जास्त आहे असे मी बऱ्याच ठिकाणी वाचलं आहे

कुमार१'s picture

27 Jun 2019 - 3:19 pm | कुमार१

लिचीतील रसायन की मेंदूदाह यावर अद्याप तज्ज्ञांचे एकमत दिसत नाही.

आता समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

मराठी_माणूस's picture

10 Jul 2019 - 4:18 pm | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/desh-videsh-news/doctors-said-her-son-was-dead-...

इथे काय झाले असेल

(अवांतरः डॉक्टरांचे म्हणणे (ब्रेनडेड) हे कुटूंबाने मान्य केले असते तर पुढे काय झाले असते?)

कुमार१'s picture

10 Jul 2019 - 4:30 pm | कुमार१

वृत्तपत्रातील आहे. त्या रुग्णाचा पूर्ण वैद्यकीय अहवाल वाचायला मिळाला तरच त्यावर काही मत देता येईल, असे माझे मत.

कुमार१'s picture

14 Jan 2020 - 2:59 pm | कुमार१

‘स्टेइंग अलाइव्ह’ हा छान हिंदी चित्रपट ‘प्राईम’वर पाहिला. अनंत महादेवन (पत्रकार) आणि सौरभ शुक्ला (दहशतवादी) प्रमुख भूमिकेत. हे दोघे हृदयविकाराचा झटका आल्याने अतिदक्षता विभागात दखल झालेले आहेत. त्यांच्या जोडीला गेली ७ वर्षे बेशुद्धावस्थेत असलेली एक स्त्री पण दाखवली आहे.

जीवनमृत्यूच्या सीमेवर असलेल्या माणसाची आणि त्याच्या कुटुंबियांची उलघाल सुरेख दाखवली आहे. चित्रपटाचा शेवटही अनपेक्षित कलाटणी दिलेला.
जरूर पाहण्यासारखा.

कुमार१'s picture

22 Jan 2020 - 5:50 pm | कुमार१

वरील चर्चेत लोळागोळा अवस्थेतील रुग्णांचा संदर्भ आला आहे. असे बरेच रुग्ण आशा सोडून दिलेल्या अवस्थेत वर्षानुवर्षे पडून असतात. त्यांच्यासाठी आता एक आशेचा किरण आहे.

बेल्जियम मधील डॉ. Steven Laureys यांनी अशा रुग्णांच्या प्रगतीसाठी कसून संशोधन चालवले आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना १० लक्ष युरो रकमेचा Generet हा पुरस्कार देण्यात आला आहे. ही रकम ‘नोबेल’ पेक्षाही अधिक आहे.
या संशोधनाचा भविष्यात गरजू रुग्णांना उपयोग होवो यासाठी या डॉ ना शुभेच्छा !

कुमार१'s picture

10 Aug 2020 - 10:43 am | कुमार१

‘मृतमेंदू’ स्थितीची व्याख्या हा महत्त्वाचा पण संदिग्ध विषय आहे. इथे वैद्यक आणि कायदा अगदी हातात हात घट्ट घालून फिरत असतात. त्यादृष्टीने विविध देशांत त्यासंबंधीचे वेगवेगळे कायदे आहेत.

या महत्त्वाच्या व्याख्येत सुसूत्रता आणण्यासाठी जागतिक मृतमेंदू प्रकल्प हाती घेतलेला आहे. नुकतेच त्यातील तज्ञ समितीने काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत.

काही रुग्णांचे बाबतीत निव्वळ शारीरिक तपासणीवरून ही व्याख्या करणे अवघड जाते. अशा वेळी तंत्रज्ञानाचे मदतीने मेंदूतील रक्तप्रवाह आणि विद्युतप्रवाह मोजणी केली जावी, असे सुचविले आहे.

कुमार१'s picture

14 May 2021 - 6:01 pm | कुमार१

एक 65 वर्षीय माणूस मानेखाली संपूर्ण लुळा पडलाय. तरीही त्याला लिहिता येऊ शकते ! कसे ? ते इथे वाचाच :

https://www.thehindu.com/sci-tech/science/mind-over-matter-brain-chip-al...

त्याच्या मेंदूत एक मेंदू-संगणक इंटर्फेस चिप बसवली आहे. आता त्याने मनात फक्त काय लिहायचे याचा विचार करायचा. पुढे कृत्रिम प्रज्ञा सर्व काही बघून घेते आणि त्यानुसार संगणकावर योग्य ती अक्षरे उमटत जातात.

संबंधित वैज्ञानिकांचे अभिनंदन !!

गॉडजिला's picture

14 May 2021 - 8:32 pm | गॉडजिला

आ मीन सी धिस इज जस ब्लोविन मा माइंड... आमीन वाट इफ थिन्ग्स वर्क हीर वाइस्वर्सा ? धिस इस अ लिप टुवर्ड्स लिमिटलेस...

कुमार१'s picture

4 May 2022 - 11:28 am | कुमार१

या विषयासाठी वेगळा धागा न सापडल्याने इथेच लिहितो.
या लेखातील अवस्था वाट्याला येऊ नये म्हणूनच त्यांनी हे केले असावे

‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया’मधील विकास-अर्थशास्त्राचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक अशोक कोतवाल यांनीही आपल्या जगण्याचे इष्टतमीकरण केले आणि आजार बळावतो आहे, शरीर साथ देईनासे होईल, हे जाणून वयाच्या ७७ व्या वर्षी कॅनडामध्ये इच्छामरणाचा मार्ग पत्करला. कॅनडात हा मार्ग कायदेशीर आहे, त्यामुळे घरच्यांच्या सान्निध्यात, आप्तसुहृदांना संदेश पाठवून त्यांनी २८ एप्रिल २०२२ रोजी इहलोक सोडला.

संदर्भ