शूर वैमानिक श्रीमान अभिनंदन वर्धमान

Sumant Juvekar's picture
Sumant Juvekar in जे न देखे रवी...
17 May 2019 - 3:03 pm

आपला शूर वैमानिक श्रीमान अभिनंदन वर्धमान याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरू दादासाहेब दापोलीकर यांनी लिहिलेले ११४ ओळींचे खंडकाव्य!

(हे लिहिण्यास दादासाहेबांना अडिच महिने लागले. तस्मात् वाचकांनी १५ मिनिटे तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व 9967840005 वर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!)

खंडकाव्य: अभिनंदन, अभिनंदन!

एक मार्च २०१९ रोजी आपला शूर वैमानिक अभिनंदन वर्धमान, शत्रु देशातून स्वदेशी परतला. त्या संपूर्ण घटनेने आमच्या मनात दु:ख, अभिमान, चिंता, क्रोध, आनंद, राष्ट्रप्रेम यांचे आवर्त आलटून पालटून उमटत राहिले.

भारतमातेच्या या वीरपुत्राने शत्रूचे अत्याधुनिक आणि सर्वश्रेष्ठ असे विमान, आपल्या अत्यंत निम्नतर आणि कालबाह्य विमानात बसून, केवळ असामान्य शौर्य, पराकोटीचे युद्ध कौशल्य, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अफाट धैर्य यांच्या जोरावर, जिवाची पर्वा न करता पाडले. ]

स्वतःचे विमान आपद्ग्रस्त झाल्यानंतर, शत्रूदेशी उडी घेऊन, परिणामांची पर्वा न करता, राष्ट्राच्या गोपनीय गोष्टी शत्रूच्या हाती लागू दिल्या नाहीत. पकडला गेल्यानंतर, शत्रूने रक्त येईपर्यंत मारूनसुद्धा हा स्थितप्रज्ञ वीर, मेरुपर्वतासारखा अविचल राहिला.

आपल्या देशनेतृत्वानेसुद्धा, असामान्य मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन करीत, हिंदुस्थानच्या या महान योद्ध्याला केवळ दोन दिवसातच शत्रूच्या तावडीतून सोडवून आणले.

या सा-या घटना, प्रचंड आणि अविश्वसनीय वेगाने
, एखाद्या चित्रपटासारख्या उलगडत गेल्या. या दोन दिवसांच्या कालावधीत, सारे आर्यावर्त, भावनांच्या कल्लोळात न्हाऊन निघाले. या शौर्यगाथेचा शेवट, सुदैवाने आनंदमय आणि समाधानकारक झाला. परंतु या घटनेने असंख्य प्रश्न आमच्या मनात उभे राहिले!

आपण असे किती वीर, किती वर्षे डावावर लावणार आहोत? इतिहासातून आपण काही शिकणार आहोत का?
१४०० वर्षे आपण परकिय आक्रमकांशी लढलो, असे आपण अभिमानाने सांगतो. पण खरेच, प्रत्येक जण लढला? की काही मूठभर देशाभिमानीच फक्त लढले ? आणि बरेचसे एकतर घरात बसून राहिले किंवा फितुर होऊन स्वतःच्या क्षुल्लक स्वार्थासाठी त्यांनी शत्रूला मदत केली?

या सा-या अनैक्य, फितुरी, उदासीनता अशा दुर्गुणांचे पर्यावसन भारतमातेची शकले होण्यात झाले. फाळणीच्या यातना नवीन पिढ्यांना माहितही नसतील. एक तृतीयांश भूभाग भारतमातेपासून कापला गेला. कायमचा!!

किती भारतीय आयुष्यातून उठवले गेले? किती अबलांना पाशवी अत्याचारांची शिकार व्हावे लागले? कितींचे धर्मपरिवर्तन केले गेले, मारले गेले वा हाकलून दिले गेले- त्याची आहे काही मोजदाद? आहे आपल्याला त्याचे काही दु:ख?

हे, आणि असे अनंत प्रश्न मनात थैमान घालू लागले. आणि मग, त्या विचार मंथनातून जन्म झाला या सा-या घटनाक्रमावर एक प्रदीर्घ खंडकाव्य लिहिण्याच्या संकल्पाचा!!

खंडकाव्य ही संकल्पना आज फार मागे पडली आहे. मराठीमध्ये शेवटचे खंडकाव्य कुणी लिहिले असे कुणी विचारले तर त्याचे उत्तर आम्ही देऊ शकणार नाही.
खंडकाव्यामधे, प्रसंगाला साजेशी विविध वृत्ते वापरली जातात.

आम्ही काही मोठे वृत्तांचे जाणकार नाही. तरीही केवळ आवडीमुळे आणि स्वानंदासाठी, विविध वृत्तांत हे काव्य लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. वृत्तांचे गण, यति, मात्रा आणि इतर नियम पाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. तरीही काही जागांवर एखादा लघु गुरु किंवा गणमात्रा यांचा विपर्यास झाला आहे.

जे नियम पाळले गेलेत त्याचे श्रेय दापोली ए जी हायस्कूलच्या, आदरणीय देशमुख मॅडम आणि आदरणीय करमरकर मॅडम यांचे आहे.दोन्ही मॅडमनी आम्हाला अमर्याद मदत केली.

आणि जेथे गणमात्रांचा विपर्यास आहे त्याचे खापर मात्र आमच्या डोक्यावर फोडले गेले पाहिजे. जाणकारांना त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सहकार्य करण्याची आम्ही विनंती करतो.

खंडकाव्य: अभिनंदन, अभिनंदन!

छंद: अनुष्टुभ

( चाल: यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:।
तत्र श्रीर्विजयो भूतिध्रुवा नीतिर्मतिर्मम॥)

देश तोडावया गिद्ध, घालिती घिरट्या तिथे
रक्त घाटी मधे वाहे, लोक हो निजता इथे?

रिपु आला भयाकारी, राष्ट्र शीर्ष गिळावया
थोपवाया तया दुष्टा, वीर आले लढावया. ४

वृत्त: पृथ्वी
(चाल: प्रसाद पट झाकती परि परा गुरूंचे थिटे
म्हणूनि म्हणती भले, न ऋण जन्मदेचें फिटे)

शरीर रिपु मारण्या धवलपेशिका या जशा
चहूकडुनि धावती त्वरित रोग स्थाना तशा
मराठ गुजरात काश्मिर बिहार पंजाबचे
सुपुत्र जमती तसे, भरतभूतुनी आमुचे. ८

प्रभात समयी निघे भरतभूविरांचा जथा
उरात भरुनी, अहा, प्रखर राष्ट्र एकात्मता
दबा धरुनि बैसला परि कृतांत मार्गावरी
समर्पित स्वआहुती त्वरित राष्ट्र यज्ञांतरी. १२

वृत्त: वसंततिलका
(चालः मातीत ते पसरले अति रम्य पंख)

भीती उरात समरा, करण्या समोर
मागून भ्याड करती, म्हणुनीच वार
द्रोही असाच भितरा, गुपचूप आला
विध्वंस मांडुन पुरा, नरकात गेला. १६

काही क्षणात घडला, बहु रक्त पात
विच्छिन्न देह उडले, पडले पथात
चाळीस वीर शमले, हकनाक तेथ
संसार चाळिस धुळी, निमिषात जात. २०

वृत्त: शार्दूलविक्रीडित. माझे आवडते वृत्त! वीररसासाठी सर्वोत्तम!

(चालः आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके।)

वार्ता ही पसरे क्षणात सगळ्या, पुण्यप्रदेशावरी
आर्यावर्त पुरे उफाळुन उठे, प्रक्षोभ देशांतरी
ते चाळीस जवान- छे- अमुची ती, चाळीस रत्ने खरी
ते चाळीस जवान- देव अमुच्या, या भारती मंदिरी. २४

द्यावे जीवनदान त्यास- शरणी, जो ये भये कांपुनी
व्याख्या ही अहिंसेचि अम्ही शिकलो साक्षात गीतेतुनी
भ्याडांनो परि सोडणार न तुम्हा,येऊन मारू घरी
नाही बोथट खड्ग धार अमुची, ना सुप्त हा केसरी. २८

शस्त्रावीण न काय राष्ट्र जगते? स्वातंत्र्यवीरा पुसा
क्रांतीचा पथ हा नळीतुन असे, तो बंदुकीच्या तसा
गेल्या आवळल्या मुठी समसमा, सेना तिन्ही कोपल्या
जैसा शंकर तांडवास निघतो, तैशा उभ्या ठाकल्या. ३२

होत्या किंचितशा सशंक परि त्या, नेतृत्व संघावरी
आज्ञा येइल?- आक्रमा, रिपुवरी, जा धावुनी सत्वरी ?
किंवा स्वस्थ बसा, गिळोनि मुग हो, हे काम ना आपुले!
ऐकायास असे अता नच मिळो, आधी बहू ऐकले! ३६

आज्ञा आलि तयां, खरोखर तशी- जा क्षात्रधर्मा स्मरा
मारा, ठेचुन या, रिपूस- तुमच्या, हा देश मागे पुरा
हर्षोन्माद उठे, चढे स्फुरण त्या, योद्ध्यांस धुंदी चढे
जै जै कार निनादलाअणि निघे, ती वायुसेना पुढे. ४०

होते स्थंडिल तप्त त्यात पडली, आहूतिची चेतना
आले वीर विमानि राति, दिधली, उत्तेजना इंजिना
लंकेच्या दहना मरुत्सुत जसा, झेपावला अंबरी
तैसे वीर नभातुनी बरसले, बेभान- शत्रू वरी. ४४

दैत्यांना वधुनी, प्रभात समयी, सेना फिरे मागुती
आले हो अमुचे धुरंधर पहा, आतंक निर्दाळुनी
शत्रू तो डिवचे तरी पण- जसा, कुक्कूर, तो कुंजरा
धाडोनी दिथली 'फ-षोडश'- किती, खोड्या कराव्या ब-या! ४८

अत्याधूनिक, वायुयान समुहा, रोखावयाला त्वरे
हिंदुस्थान जवान वीर गगनी, झेपावले सत्वरे
तानाजी लढला जसा सिंहगडी, खिंडीत बाजी जसे
व्योमी संगर छेडुनी पळविले, शत्रूस मागे तसे. ५२

झाले अद्भुत युद्ध, आम्हि कसला, केला चमत्कार हा
'पन्नाशी' तिल वायुयानि बसुनी, आव्हान कोणा पहा
सर्वोत्कृष्ट, नवे फ- षोडश जुन्या, मिग्गेक्विसे पाडिले
ऐशा पार्थ पराक्रमास जगती, सर्वांनी वाखाणिले. ५६

( फ-षोडश= F16, मिग्गेक्विस= MIG 21)

वृत्त: मालिनी
(चाल: करुणाष्टकांची! अनुदिन अनुतापे तापलो रामराया)

अरिवर बरसोनी, पाडिले त्या विमानी
परि विपरित झाले, तेधवा युद्धभूमी
निघति लढुन योद्धे, मागुती यावयाला
तव खल रिपु अस्त्रे, डाव हा साधियेला. ६०

स्वजन मरुतयाना, शत्रुने पाडियेले
नरविर रिपुदेशे, कोंडिला- आर्त झाले
मुघलकटकि जैसा, शंभुराजा धरीला
गनिमकरि अमूचा, वीर योद्धा मिळाला. ६४

वृत्त: दिंडी
(चाल: तया कासारी राजहंस पाहे
राजहंसांचा कळप पोहताहे)

वीर उतरे रिपुभुमी भारताचा,
दुष्ट येती घोटण्या गळा त्याचा
कठिण काळी पण प्रसंगावधाने,
गुप्त पत्रे नष्टवीली तयाने. ६८

वीरपुत्रा वेढिले निर्दयांनी,
शूर अभिमन्यू जसा कौरवांनी
रक्तसिंचित जाहले सुमुख त्याचे,
धैर्य परि त्या खचले न केसरीचे. ७२

श्रेष्ठ स्वर्गाहुन असे जन्मभूमी
असे प्राणाहुन प्यारि मायभूमी
रक्षण्या तिजला असू बद्ध आम्ही
म्हणुनि रिपु देशी घेतली उडी ही. ७६

वृत्त: पंचचामर

(चाल: सुकोमली सुहागिनी प्रिया पुकारती रही।
अनामिका विहारिणी हिया विचारती रही।।)

अनेक वार साहुनी रिपूस नाहि भ्यायला
अनंत यातना उरी परी न धीर सोडला
जसा प्रतापि मारुती दशाननासमोर तो
गनीम छावणीमधे तसा सुधीर वीर तो. ८०

वृत्त: दिंडी
(चाल: तया कासारी राजहंस पाहे
राजहंसांचा कळप पोहताहे)

आणि इकडे भारती काय झाले?
राष्ट्र सारे चिंतेमधे बुडाले
कधी अभिनंदन परतणे घराला
काहि धोका तर नाहि ना जिवाला? ८४

त्याजसाठी उपवास कोणि केले
देव कोणी जलमग्न काय केले
कोणि निजले नाहि पुढील रात्री
अश्रु संतत वाहिले किती नेत्री. ८८

वृत्त: मंदाक्रांता
(चाल: पोटासाठी भटकत जरी, दूर देशी फिरेन)

देशामाजी चलबिचल ती, मानसी घोर चिंता
की तो योद्धा सुखरुप घरा, काय येईल आता?
नेतृत्वाची अजि कुशलता, कूटनीती पणाला
काही कैसे करुनि घरि हो, घेउनी या मुलाला. ९२

वृत्त: पादाकुलक
(चाल: सतारीचे बोल : काळोखाची रजनी होती, ह्रदयी भरल्या होत्या खंती , किंवा फुलराणी: हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे)

आणि अचानक संकट सरले , चिंतेचे घन सावट विरले
गडद निराशा वितळुन गेली, श्रावण वर्षा उन्हात न्हाली
शक्ति युक्तिची शर्थ जाहली, नेतृत्वाने कमाल केली,
कंसाच्या कारागृहातुनी, जसा श्रीहरी आला सुटुनी
गजेंद्र आला जसा निसटुनी, कराल मगराच्या मुखातुनी
क्रूर मोगली विळख्यामधुनी, अफझलखॉंच्या हातामधुनी
पन्हाळगडच्या वेढ्यामधुनी, शिवबा आले जसेच सुटुनी
तसाच अमुचा वीर परतुनी, आला अरिच्या देशामधुनी
अभिनंदनची सुटका झाली, भारतमाता मनी तोषली
आर्यावर्ती वार्ता गेली, अभिनंदनची सुटका झाली!
पवनपुत्र नरव्याघ्र आजला, पार्थ पराक्रम करून आला
दस-याचे जणु सीमोल्लंघन, विजयाच्या गुढिचे आरोहण
हिंदुस्थानी मने हर्षली, माघामध्ये दिवाळि आली! १०५

वृत्त: सिंहनाद
(चाल: हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे)

गेली सहस्त्र वर्षे, आहे लढा सुरू हा
परकीय राक्षसांचा, लोंढा न थांबतो हा
ते सिंध, वंग गेले, पंजाबचेही तेच
शिकणार ऐक्य केव्हा, अथवा पुनश्च तेच?
सीमेवरी विरांच्या, किति आहुती पडाव्या?
अजुनीहि वेळ आहे, हे राष्ट्र वाचवाया!
ही थोर संस्कृती अन्, हा वारसा जपाया
हे राष्ट्र राखणे हे, नच कार्य एकट्याचे
'अभिनंदनीय' काम, संपूर्ण भारताचे!! ११४

- दादासाहेब दापोलीकर आणि सुमंत जुवेकर
9967840005
12 May 2019
Mumbai
(Copyright: Sumant Juvekar)

वृत्तबद्ध कविताकविता

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

17 May 2019 - 3:07 pm | अभ्या..

अल्टीमेट मटरेल विडंबनाला.
बहुत दिनोबाद अईसा माल आया हय.

Sumant Juvekar's picture

17 May 2019 - 3:15 pm | Sumant Juvekar

म्हनजे काय पावने? :)

अभ्या..'s picture

17 May 2019 - 3:39 pm | अभ्या..

म्हनजे तुमच्या दादासाह्यबांना मिपाचा आयडी काढून द्या, त्यांच्चा ११४ गुलाबफुलाचा बुके दीवून सत्कार करायचा आहे.

Sumant Juvekar's picture

17 May 2019 - 3:49 pm | Sumant Juvekar

हा हा हा . ते दादासाहेब म्हण्जे दस्तुर खुद्द आम्हीच!! धन्यवाद!!

नरेंद्र गोळे's picture

17 May 2019 - 6:41 pm | नरेंद्र गोळे

सुमंत,

खूप कालावधीनंतर असे सुंदर वृत्तबद्ध, प्रेरणादायक काव्य पाहण्यात आलेले आहे.
आपली वृत्तबंधन शैली आणि सामर्थ्य वाखाणण्यायोग्य आहे.

आपल्या गुरुजनांना सादर प्रणाम!

शस्त्रावीण न काय राष्ट्र जगते? स्वातंत्र्यवीरा पुसा >>> शस्त्रावीण खरेच राष्ट्र तगते? स्वातंत्र्यवीरा पुसा

अशासारखे काही बदल जरूर आवश्यक आहेत, कारण अर्थच बदलत आहे.

मात्र काव्यप्रतिभा अलौकिक आहे. ती जपा. हार्दिक अभिनंदन!

प्रसंग काव्य स्फुरावा असाच आहे. हे काव्य त्या प्रसंगाचा आणि वीराचा यथोचित गौरव करणारे तर आहेच शिवाय आपल्या वृत्तवारशातील वैविध्य आणि सामर्थ्य उजागर करणारेही आहे. आवडले. मी ह्याचा यथाशक्ती प्रसार करेन!

गोळे साहेब, मनापासून धन्यवाद. आपल्या कौतुकाने मी भारावून गेलो आहे. आपल्याशी चर्चा करायला आवडेल. आपण सुचवलेली सुधारणा आवडली.
प्रणाम!!

महासंग्राम's picture

18 May 2019 - 10:09 am | महासंग्राम

ते शेवटच्या काव्याला हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे ची चाल बसत नाई कि ओ ! तेवढं चालीचं बगा

आपलाच
प्राचीला गच्ची लावणारा कृष्णराव हरिहर

मंदार राव, लागते हो की चाल. जरा एकदा बघा परत.. धन्यवाद,

वृत्ते वापरून लिहिलेत, ह्याचे कौतुक.

Sumant Juvekar's picture

18 May 2019 - 4:35 pm | Sumant Juvekar

धन्यवाद, आणि नमस्कार....

भृशुंडी's picture

21 May 2019 - 11:09 pm | भृशुंडी

मी शरण आहे.
फ-षोडश= F16, मिग्गेक्विस= MIG 21
फ-षोडश हे वाचून आज मिपा वाचत असल्याचं सार्थक झालं.
रत्न आहे हा लेख, रत्न.

धन्यवाद साहेब. फार बरे वाटले.

जालिम लोशन's picture

22 May 2019 - 7:46 am | जालिम लोशन

गेय

गड्डा झब्बू's picture

22 May 2019 - 4:30 pm | गड्डा झब्बू

खत्री लिहिलय. तुमच्या चिकाटीला दंडवत.