स्वामी

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जनातलं, मनातलं
4 May 2019 - 1:29 pm

जगताना खरोखर महत्वाच्या गोष्टी कोणत्या? केवळ सवयीच्या, समाजाने लादलेल्या कोणत्या आणि आतून रुजून येणाऱ्या मूलभूत कोणत्या? कितीतरी गोष्टी, ज्यांना आपण जीवापाड जपतो, महत्वाच्या मानतो त्या किती फोल असतात ते नजर आत वळवून मूलभूत गोष्टींमध्ये 'ध्यान' लावल्याखेरीज उमजत नाही. हे ध्यान स्वयंप्रेरणेने करणारे बुद्ध होतात. आपल्यासारख्या सामान्य लोकांना जगण्याने तशा स्थितीत जबरदस्तीने ढकलावं लागतं. आणि अर्थातच परिस्थिती आहे म्हणून ध्यान होईलच आणि त्यातून ज्ञान होईलच अशी खात्री देता येत नाहीच. आपल्या रोजच्या जगण्यात अशी, मोजा उलटा व्हावा तशी जगणं उलट होईल अशी उलथापालथ होईल अशी शक्यता कमीच. कृती काय ते आपली क्षमता ठरवेल पण मुख्यतः ते ठरेल ते आपल्या मेंदूत काय घडतं यावरच. शेवटी ज्ञानेंद्रियात आपण अनुभव घेत नसतो तर सारे अनुभव घडतात ते मेंदूतच. जगण्याच्या मूलभूत अंगाकडे अशातर्हेनें पहायला प्रवृत्त करणे, ते अनुभव कल्पनेने जगायला लावणे हे कलावंत आणि मुख्य म्हणजे अशा प्रश्नाचा शोध घेण्यात झपाटलेला कलावंत प्रतिभावंतच करू शकतो. जीए हे अशा प्रतिभावंतांच्या यादीतील अगदी वरचं नाव. त्यांच्या ज्या कथेबद्दल सांगू इच्छितो तिचं नाव 'स्वामी'.

विषयाला भिडण्यासाठी माणसाच्या जगण्याला चिकटलेली बाह्य व्यवधानं हटवण्याची गरज आहे. आणि ती हटवणं ओढून ताणून असून चालणार नाही. वाचकाने स्वतःला त्या परिस्थितीत कल्पणे गरजेचे आहे आणि ते जर स्वाभाविक वाटले नाही तर सगळेच मुसळ केरात. इथे जीएची घटना रचायची सहजता आणि चित्रदर्शी भाषा उपयोगी पडते. वाचक नकळत त्यात गुंततो आणि स्वतःला कथानायक समजायला लागतो. व्यवहारी जगातून कथेसाठी गरजेच्या असलेल्या जगात वाचक अलगद उतरत जातो. नायका सोबत हलके हलके एकेक वरवरची गोष्ट खरवडून काढली जाते. तोवर कल्पनेच्या जगाची सत्यता वाचकाच्या मनात झिरपत असली तरी पक्की झालेली नसते. ही उतरवून ठेवलेली झूल ही गम्मत आहे. आजच्या रात्रीचाच प्रश्न, एक थोडा विचित्र पण रुचिपालट अशी भावना असताना अचानक एका क्षणी नायकाला अचानक जाणीव होते की ही व्यवधानं उतरवलेली अवस्था आता कायमस्वरूपी आहे! तोवर वाचकाचा नायकात परकायाप्रवेश पूर्ण झालेला असतो. आणि नायकाला बसणारा धक्का वाचक अनुभवतो.

जखम मोठी असेल तर सुरवातीला बधीरपणा येतो आणि वेदना जाणवत नाहीत. नंतर हळूहळू ठणकणारी नस नी नस स्वातंत्रपणे जाणवते. तसं या नव्या परिस्थितीचा आघात वाचकाला बधिर करतो. नायकाचा महतांशी झालेल्या संवादातून त्या वेदनेने अक्रंदणारी प्रत्येक नस जीए आपल्या जाणिवेत आणून देतात आणि तिथून मूलभूत जगणं म्हणजे काय या दिशेने प्रवास सुरु होतो.

या प्रवासात दुसऱ्याचे अनुभव एका मर्यादेपर्यंतच उपयोगी असतात. परिस्थिती आणि त्याला येणारी आपली प्रतिक्रिया यात परिस्थिती पॅसिव्ह आणि आपण ऍक्टिव्ह असतो. एकच परिस्थिती प्रत्येकावर वेगळा परिणाम करत असते. त्या दिशेने सूचक बोट दाखवण्यासाठी आजच्या नायकासाठी भूतकाळात गडप झालेल्या नायकांची भेट घडवून आणणे भाग आहे. झालेल्या आघाताने आत्मा थरथरतो आहे. धक्याचा, यातनेचा तळ गाठला आहे असं वाटत असताना अचानक पायाखालची जमीन फाटते आणि दरीत कोसळत असताना जुने नायक भेटतात. आणि विचारांचा भोवरा केंद्रीकरणाचा सर्वोच्च बिंदू गाठतो आणि मूलभूत जगणे म्हणजे काय हा मुद्दा जीवन्त होऊन नजरेला नजर भिडवतो. गळ्याभोवती त्या प्रश्नाची पकड स्वच्छ जाणवते! पापण्या चिमटे लावून उघड्या ठेवल्या जातात. मान फिरवून चेहरा दुसरीकडे न्यायची सोय शिल्लक नसते आणि तेंव्हा जीवनातले सर्वात मूल्यवान असे काही गवसते. जे जगण्याचा भाग नाही पण त्याला माणूस आपल्या जगण्यातून घडवत असतो. चुकलो.. घडवू शकतो. ते जीवन्त राहण्याहूनही मूल्यवान असलेले असे काही, शब्दातीत मूल्य, जीए गद्य काव्यातून आपल्यासमोर उलगडतात. आणि एका सुन्न उन्नत भावावस्थेत वाचक असताना कथा संपते.

कथा कागदावर संपते पण वाचकाचा ताबा त्याचं झपाटलेपण आता संपणारी गोष्ट उरायची शक्यता संपलेली असते. वाचकाची मनोभूमिका एका पातळीवर निश्चितपणे आणि कायमस्वरूपी बदलून जाते. चुकलो.. बदलू शकते.. तस घडू शकतं. जीए ते घडण्यासाठी सर्वोत्तम परिस्थिती घडवून आपल्याला त्यात आणून सोडतात. परिणाम प्रत्येकावर कसा होईल ते प्रत्येकाच्या हाती!

-अनुप

कथा

प्रतिक्रिया

छान लिहिलं आहे , कथा याआधी 4-5 वेळा वाचली होती , वर तुम्ही लिहिलं आहे त्यातलं थोडंसं अंधुक अंधुक लक्षात आलं होतं ... पण ते असं व्यवस्थित शब्दबद्ध रुपात वाचल्यावर नीट स्पष्ट व्हायला मदत झाली ... जीएंच्या बहुतेक कथा सुंदर भाषेसाठी वाचून सोडून दिल्या आहेत , त्यातली खोली - गहिराई लक्षात येते पण जास्त विचार करून डोक्याचा पिट्ट्या पडेल म्हणून त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जात नाही .

स्वामी प्रमाणेच सगळ्या कथांचं वरच्यासारखं सोपं विश्लेषण वाचायला नक्कीच आवडेल . एक छोटीशी सूचना - ज्यांनी कथा वाचलेली नाही त्यांच्यासाठी 6 - 7 ओळीत कथेचा सारांश सांगितलात तर त्यांनाही तुम्ही केलेलं विश्लेषण समजेल शिवाय कथा वाचण्यासाठी रुचीही उत्पन्न होईल .

जीएंच्या काही कथा या ग्रीक किंवा ऐतिहासिक संदर्भ घेऊन स्वतंत्र लिहिलेल्या असतात , ती मूळ कथा माहीत नसेल तर या कथेचा अर्थ लागणं दुरापास्त असतं , उदाहरणार्थ चांदीची तीस नाणी अशा काहीतरी नावाची कथा आहे ती जुडासची गोष्ट माहीत असल्याशिवाय समजली नसती ... इतर अशा बऱ्याच कथा आहेत , त्या कोणत्या मूळ कथा / कल्पनांवर आधारलेल्या आहेत हे माहीत असेल आणि इथे स्पष्ट केलंत तर लोकांना वाचायला आवडेल असं वाटतं . उदा . सांजशकुन मधली पत्रिका ही कथा , अस्तिस्तोत्रचाही वेगळा काही संदर्भ असल्यास माहीत असेल तर समजून घ्यायला आवडेल -

https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=160715125112&P...

अन्या बुद्धे's picture

4 May 2019 - 8:48 pm | अन्या बुद्धे

कथा थोडक्यात..

या गावात माझं बालपण गेलं. कसं असेल ते गाव आता? या अशा क्षणिक लहरीमुळे कथानायक आडबाजूच्या या गावात उतरतो. ओळखीच्या काहीच खुणा न दिसून निराश होऊन परत फिरतो तो शेवटची बस गेलेली असते. गावात कुणी ओळखीचं नाही म्हणून काय करावे अशा विचारात असताना एक महंत त्याला रहायला जेवायला मठात बोलावतो आणि मठ दाखवायच्या मिषाने तळघरातल्या, 3 मजले खाली असलेल्या खोलीत कायमचा डांंबून टाकतो. त्याचे आणि महंतांचे या वेळचे संवाद मुळातून वाचण्यासारखे समजून घेण्यासारखे आहेत. नन्तरच एक वर्ष तो त्या खोलीतच काढतो.. एकट्याने.. आणि कथेचा शेवट! तो तर अगदी खास जीए स्पर्श असलेला.. पुलं चे आभार मानून सांगायचं तर काव्यात्म पद्धतीने मांडलेला करुण तरी दिव्य, devine despair किंवा खुदाई खिन्नतेत वाचकाला सचैल बुडवून काढणारा!

छान . महंत अशा एखाद्या ज्याचा कुणी शोध घ्यायला येण्याची शक्यता नाही अशा साधारण गरीब माणसाला या ट्रॅप मध्ये अडकवून मरेपर्यंत त्याला तिथे तळघरात डांबून ठेवतात व सदर माणूस म्हणजे आपल्या मठाच्या स्वामींचा अवतार / साक्षात्कारी पुरुष परमेश्वरी इच्छेने मठात आलेले आहेत अशी मठातल्या शिष्यांची समजूत करून देतात .. त्या व्यक्तीला मनाविरुद्ध डांबलेलं आहे हे शिष्यांना समजू न देता ती व्यक्ती अवतारी पुरुष असून स्वमर्जीने त्या एकांतवासाचा साधनेसाठी स्वीकार करत आहे असा समज करून देतात ... जेणेकरून अमुक आज्ञा स्वामींकडून आली सांगितल्यावर त्या आज्ञेला अधिक वजन प्राप्त होईल . या कैदेत राहताना त्याच्या मनात आपल्या आयुष्याबद्दल , आयुष्याच्या अर्थाबद्दल विचारमंथन चालू होतं आणि बाकी तुम्ही लिहिलंच आहे ..

जालिम लोशन's picture

8 May 2019 - 10:56 am | जालिम लोशन

वाःड़गयावर आधारलेल्या जाणवतात. chasis एक असते फक्त वरची body बदलते.

मराठी_माणूस's picture

8 May 2019 - 11:05 am | मराठी_माणूस

कोणत्या कथा ईंग्रजी कथेवर आधारित आहेत त्यांची माहीती द्याल का ?

जालिम लोशन's picture

8 May 2019 - 11:51 pm | जालिम लोशन

पण बर्‍याच वेगवेगळ्या लोककथांचा संग्रह वाचतांना जाणवले. मोरक्कन, अलजेरिअन, आयरिश, ग्रीक. साऊथ अमेरिकन वगैरे. माहिती म्हणुन मांडले.

मराठी_माणूस's picture

9 May 2019 - 10:38 am | मराठी_माणूस

निश्चित सांगता येत नसेल तर वरील तुमची प्रतिक्रिया "loose comment" वाटते.

अन्या बुद्धे's picture

9 May 2019 - 12:19 pm | अन्या बुद्धे

हेच म्हणतो..
कथांना अभारतीय संदर्भ आहेत म्हणणे असेल तर मान्य. पण त्या परकीय कथावर आधारित आहेत म्हणणे अमान्य..

यात्रिक, कैरी, आणि स्वामी या तीनही कथा (पिंगळावेळ कथासंग्रह ) अप्रतिम आहेत.
यात्रिक वाचकाला वेगळाच विचार करायला भाग पाडते.
कैरी मनाला चटका लावून जाते.
स्वामी वाचताना जीव गुदमरतो.
जीएंची बातच काही और ...

अन्या बुद्धे's picture

6 May 2019 - 2:51 pm | अन्या बुद्धे

+लाख

उपयोजक's picture

5 May 2019 - 9:43 am | उपयोजक

वेलांटी ना? स्वामी मधल्या म ला? सध्या तीच जास्त प्रसिद्ध आहे. :)

उपयोजक's picture

5 May 2019 - 9:43 am | उपयोजक

वेलांटी ना? स्वामी मधल्या म ला? सध्या तीच जास्त प्रसिद्ध आहे. :)

उपयोजक's picture

5 May 2019 - 9:43 am | उपयोजक

वेलांटी ना? स्वामी मधल्या म ला? सध्या तीच जास्त प्रसिद्ध आहे. :)

अन्या बुद्धे's picture

6 May 2019 - 2:52 pm | अन्या बुद्धे

?

चौथा कोनाडा's picture

14 May 2019 - 5:56 pm | चौथा कोनाडा

स्वामि ....
हा ... हा ... हा !
हे आणि स्वामींचे इतर धागे वाचा:
स्वामि धागे घेऊन येतात

देशपांडेमामा's picture

6 May 2019 - 1:46 pm | देशपांडेमामा

कैरी आणि स्वामी वाचल्यावर परत पिंगळावेळ हातात घ्यायची इच्छा राहिली नाही. भयानक उदास/भकास वगरे जे म्हणतात तस वाटायला लागलं होत

देश