माझ्या चेहर्यावर नाक फक्त चेहरा बरा दिसावा म्हणून देवाने घाईघाईत चिकटवलं असणार असा माझा समज आहे. वस्तू नाकाजवळ घेतल्याखेरीज मला फारसा वास जाणवत नाही. 'तुला नाक नाही श्वास घ्यायला भोकं दिलीत देवाने' बहीण म्हणायची मला. तरी मला ही इष्टापत्ती वाटते. कारण चांगल्या गोष्टी नाकाजवळ नेऊन मी वास घेतो पण वाईट वास मला त्रास देत नाहीत हे सुखाचं नव्हे का? एकदा कॉलेजमधून दुपारी घरात पाऊल टाकल्याक्षणी 'आजपण बटाट्याच्या काचऱ्या?' म्हणाली बहीण तेंव्हा 'तुला नाक नाही सोंड दिली आहे देवाने' असं तिला म्हणालो होतो मी. असो..
सो असा विचित्रपणा असल्याने माझं गंधाळलेलं विश्व तस लहानसं आहे. पण आता लिहिताना विचार केला तर लक्षात येतं की म्हणूनच खूप अप्रूप असलेलं आहे.
सर्वात जुनी वासाची आनंदाची आठवण म्हणजे डास मारायला धुरवाले यायचे त्या धुरात नाचतानाची. आजकाल हा अनुभव खूपच दुर्मिळ झालाय पण ती आठवण तितकीच ताजी आहे. तो आला की घराजवळचा 2 एक km व्यासाचा परिसर त्या धुराच्या वासामागे सहज पालथा घातला जायचा.
मला दहावी नन्तर ट्रेकिंगचा नाद लागला. आता वासाच्या अनुशंगाने माझ्या भटकंतीकडे बघीतलं तर मला वाटतं मला जंगलाचा वास खूपच आवडतो. डोंगरात भटकायच्या आकर्षणामध्ये त्याला मानाचं स्थान आहे. विशेषतः ऑक्टोबर नंतरच्या रानात हा वास प्रकर्षाने भेटतो. वाळकं गवत, तापलेली वस्त्रगाळ माती, रानजाई, गुरांचं शेण, मोहाचा उग्रट घमघमाट (मार्च एप्रिल नंतर), यांचा संमिश्र वास. डोंगरातल्या पाण्याला देखील खास डोंगराचा वास असतो. दुपारी 3 वगैरे वाजले असावेत, घसा कोरडा पडत असावा अशावेळी कातळात साठलेलं पाणी आडवं पडून सरळ तोंड लावून प्यायलं की तो वास डोक्यात भिनतो. तापल्या कातळाचा आणि थंड शीतल पाण्याचा, ट्रेकिंगचा शीण घालवून नशा चढवणारा वास! कधी उभ्या कपारीवरून पाझरणारं पाणी सरळ तोंड लावून प्यायलं की त्या पाझरपाण्याच्या जीवावर त्या कातळावर तग धरून राहिलेल्या हिरवाईचा नी शेवाळ्याचा पाण्यात मिसळलेला कंच हिरवा गंध! अहाहा!
राजमाचीत अनेकदा जाणं झालं. तिकडे तळ्याकाठी असलेलं प्राचीन महादेव मंदिर विशेष आवडतं. अर्थात तिथल्या शीतल शांततेसाठी पण एका खास सुगंधासाठी. सकाळी तलावात पोहून झाल्यावर मंदिरासमोरच्या देवचाफ्यायाची 8-10 फुलं काढून पिंडीवर व्हायची. संध्याकाळ नंतर परत तिकडे जायचं. दिवसभर उन्हात तापलेल्या गाभाऱ्यात चाफ्याचा सुगंध कोंदलेला असायचा. खलास! काही असोसिएशन्स एकदम पक्की असतात. देऊळ शंकराचं असेल तर वाटतं, तिकडे गाभाऱ्यात एकवेळ पिंड नसली तरी चालेल पण ती शांतता, घुमणारा ओंकार आणि देवचाफ्याच्या फुलांचा कोंदलेला सुवास हवाच!
फुलांमधे मोगरा, सोनचाफा, बकुळ विशेष प्रिय. मोगर्याच्या थोड्या उमललेल्या कळ्या माठाच्या पाण्यात टाकाव्या, चाफा कानात अडकवावा, आणि बकुळीची फुलं शर्टच्या खिशात ठेऊन अधून मधून मान झुकवून नम्र पणे नाक खिशाकडे न्यावे.
नव्याकोऱ्या पुस्तकाचा, चामड्याच्या कोऱ्या वस्तूचा, वीटभट्टीचा, रात्री काही दिसत नसताना गंभीर गाजे सोबत वाऱ्यावर येणारा समुद्राचा खारा वास, दुधावर आलेल्या भातशेतीचा वास, मृदगंध तर आहेच पण सुरवातीला 10-12 km वर डोंगरात पाऊस झाला तर नुसता हवेला देखील पहिल्या पावसाचा जो खास वास असतो तो, हे आणखी काही मर्मबंधातले वास.
अरे! नाही नाही म्हणता मलाही बरेच वास आठवले की मनात दडलेले.
-अनुप
प्रतिक्रिया
22 Apr 2019 - 1:00 am | आनन्दा
छान आहे
22 Apr 2019 - 6:22 am | उगा काहितरीच
छान छान !
22 Apr 2019 - 9:10 am | यशोधरा
आवडलं.
22 Apr 2019 - 9:26 am | सुबोध खरे
गंध या संवेदनेवर काही शास्त्रीय विवेचन
http://www.misalpav.com/node/25432
http://www.misalpav.com/node/25466
22 Apr 2019 - 12:56 pm | महासंग्राम
राजमाचीच्या आठवणीने दिल गार्डन गार्डन कर दिया. असाच मोहाचा गंध अलंग चढतांना आला होता.
आंब्याचा मोहोराचा, नवीन पेंट चा, फक्कड जमलेली बिर्याणीच्या वाढतांना येणारा तांदुळाचा, गावाकडच्या पाणीपुरीच्या गाडीवर लावलेल्या धूपबत्तीचा,
सारवलेल्या अंगणाचा हे गंध पण भारी वाटतात.
22 Apr 2019 - 1:43 pm | पद्मावति
सुंदर लेखन. आवडलं.
22 Apr 2019 - 4:17 pm | सोत्रि
झक्कास लेखन!
- (सुवासिक) सोकाजी
22 Apr 2019 - 9:26 pm | महासंग्राम
बाब्बो गुरुजींचं कित्येक दिवसानंतर दर्शन
23 Apr 2019 - 6:54 am | प्रचेतस
मस्त लिहिताय.
23 Apr 2019 - 7:52 am | तुषार काळभोर
नव्याकोऱ्या पेपरचा आणि पुस्तकाचा वास
ताज्या धारेच्या दुधाचा वास
गावाकडं चुलीवर बनणाऱ्या गावरान मटणाच्या रश्श्याचा वास
(लहानपणी पेट्रोलचा वास आवडायचा, पण आता मळमळतं)
जिलेबी आणि गुलाबजाम तळताना येणारा वास.
गुलाबाच्या बागेतला वास
स्क्रीन पेंटिंग आणि फ्लेक्स बनवतात तिथला वास
मोती साबण
बेकरीच्या शेजारून जाताना येणारा वास
ना आवडणारे -
चेन्नईत असताना मरिना बीचवर जाण्यासाठी लोकल ने जावं लागायचं. गिण्डी ते पार्क अन पार्क ते चेपॉक. चेपॉक जवळ आलं की समुद्राचा मासेदार वास नाकात शिरायचा. तो अजिबात आवडत नसे. बेसंतनगर ला एलियट बीचवर असा वास नसायचा.
कढणाऱ्या साजूक तुपाचा. आता मला कुणी कितीही वेड्यात काढलं तरी मला साजूक तूप आणि त्याचा वास अजिबात आवडत नाही. आमच्या घरी आठवडाभर साय साठवून ती कढवतात. मी दोन तास तरी बाहेर फिरतो, घरात पाऊल टाकत नाही.
23 Apr 2019 - 10:57 am | अन्या बुद्धे
वास आणि आठवणी यांचं असोसिएशन हा एक भारी प्रकार आहे मात्र..
25 Apr 2019 - 2:35 pm | कंजूस
एकदम आवडलं.
25 Apr 2019 - 3:09 pm | पद्मावति
सकाळी एखाद्या कॅफे मधून येणारा फ्रेश कॉफी चा सुगंध.
उन्हाळ्यात गवत कापल्यानंतरचा येणारा सुवास
आलं , गवती चहा टाकलेल्या चहाचा दरवळ
पूरण शिजतांनाचा , भरताची वांगी भाजतांनाचा खमंग वास
धुतलेले कपडे वाळत टाकतांना येणारा डिटर्जंट चा सुवास
कपाटातील परफ्यूम्सचा खण उघडतांना येणारा परफ्यूम्स चा संमिश्र दरवळ.
25 Apr 2019 - 3:28 pm | मेघमल्हार
वाह फार छान. आवडलं.
25 Apr 2019 - 6:18 pm | विजुभाऊ
मद्रास मधे मैलापुर नावाचा एक जुना एरीया आहे.
जुन्या मद्रासी पिक्चर मधे दाखवतात तशी इथली घरे आहेत.
इथे फिरताना भाजलेल्या कॉफी चा गंध वातावरणात भरून असतो.
मजा येते
25 Apr 2019 - 6:27 pm | यशोधरा
तुम्ही तिथे परप्रांतीय असून सुद्धा तुम्हाला कॉफी मिळाली? हाकलून नाई दिलं त्यांनी?
26 Apr 2019 - 2:14 am | वीणा३
मस्त लिहिलंय. माझ्यासाठी पण वास हे त्या त्या अनुभवाला अजून एक मिती वाढवत. कितीतरी आठवणीमध्ये वास हा फार महत्वाचा घटक आहे. सारवलेलं अंगण, पहिला पाऊस, वेग-वेगळ्या पदार्थाचा वास, अनेकानेक वास :)
27 Apr 2019 - 12:23 am | भिंगरी
नाते गंधाशी.
या माझ्या लेखात गंधाचे बरेच प्रकार मिपाकरांनी सांगीतले आहेत