एक मुंगी दाराआडून बघते आहे कोर्टहॉलच्या बाहेर
किती बाहेर?
कंपाउंडच्या बाहेर, सिग्नलपार
जिथे एक हत्ती शोधतो आहे पुष्पगुच्छ मस्त....
करत असेल का तो ही तिचा विचार?
येणार असेल का तो आज कोर्टहॉलमधे
कंपाउंडच्या आत, सिग्नलच्या अलीकडे?
मुंगीही कोर्टातून बाहेर येऊ शकत नाही...
जाईल का ती ही
हत्तीचा हात धरून, कंपाउंडच्या पलीकडे?
आडोसा घेऊन असलेला चुलत खाप मुंगळा
हातातली शास्त्रे लपवत,
याची जाणीव नसलेली मुंगी
आपल्या सुखस्वप्नात हरवलेली असते....
पुष्पगुच्छात भान हरवलेला हत्ती
मॅरेज रजिस्ट्रारच्या कंपाउंडकडे येतच राहतो...
येतच राहतो .....