कितीक नवस
देवासी बोलती
भजती पूजती
मनोभावे
वाहणारी नदी
देव कितीकांची
पालक प्राणांची
कितीकांच्या
उगम डोंगरी
अंत सागराशी
वाहे दूर देशी
असहाय्य?
करी कुणी एक
त्यात मासेमारी
वाळू चोरी करी
कुणी एक
कुणी तीत करी
सुखे जलक्रीडा
आणि कुणा पीडा
बुडोनिया
तितूनच होई
विजेची निर्मिती
नासाडी पुरती
पुरामाजी
तिच्या पाण्यावरी
वाढतात शेते
शुष्क जग होते
तिच्या विना
सांगा मज आता
नदीचे वागणे
आमुच्या कारणे
असते का?
तिचा हा प्रवाह
निसर्गे बांधला
तसाच चालला
युगे युगे
आपुल्याच हाती
नदीचा वापर
शाप किंवा वर
ठरतसे
तैसे ची हे विश्व
देवाने निर्मिले
ज्याने वापरले
त्याच्या साठी
देव माझ्या साठी
काही न करतो
अलिप्त राहतो
भले बुरे
-अनुप