परग्रहवासी की ..... ?

Primary tabs

अमेयसा's picture
अमेयसा in जनातलं, मनातलं
9 Feb 2019 - 1:31 pm

"आपली गती कमी झाली म्हणजे आपण पोचलो का बाबा?" समोर दिसणाऱ्या निळ्या प्रकाशमान गोलाकडे बघत त्याने आपल्या वडिलांना विचारले.
काही प्रकाशवर्षे दुरून आलेले ते यान आता एका बिंदू वर स्थिरावत होतं आणि आतिल प्रवासी आपापली उपकरणे घेऊन खालील महाद्विपाकडे जाण्यास सज्ज होत होते.

"२ वर्षांपूर्वी तुम्ही इथेच आला होतात का? आणि माझे मित्र म्हणत होते की गेली कित्येक दशकं आपले लोक इथे येत आहेत. खरं आहे हे?" त्याचाच अजून १ प्रश्न.
त्याचे वडील या वेळेस खाली जाणार नव्हते आणि फक्त यानाच्या व्यवस्थापन आणि देखरेखी साठी आले होते. त्यामुळेच या मोहिमेसाठी ते आपल्या मुलाला घेऊन आले होते.

कामाचा व्याप आता थोडा कमी झाल्यामुळे कुतूहलाने निळ्या शार पाण्याने वेढलेल्या त्या जम्बुद्वीपकडे बघणाऱ्या आपल्या मुलाच्या प्रवासभर भंडावून सोडलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायची आता वेळ आली होती.

"कित्येक दशके नाही कित्येक शतके/सहस्त्रे म्हण . आपला या ग्रहाशी आणि या द्विपाशी फार जुना संबंध आहे. कित्येक दशलक्ष आकाशगंगांचा शोध घेऊन जीवन सापडलेला हा एकमेव ग्रह आहे."

"पण आपण इथे का आलो आहोत आणि इथे राहणाऱ्यांना अजून आपले अस्तित्व का नाही सांगितले?"

"आपल्या खेरीज एकमेव जीवनवस्ती असल्यामुळेच आपण त्यांना आपले अस्तित्व अजून दाखवले नाहीये. आपले अस्तित्व ते कसे स्वीकारतील शिवाय आपल्याला ते मित्र समजतील का शत्रू याचा अंदाज घेण्यासाठी आपण यांचा गेले लाखो वर्षे अभ्यास करतोय. शिवाय बौद्धिक दृष्ट्या आणि त्यांची सध्याची वैज्ञानिक स्थिती बघता अजून काही वर्षे तरी त्यांना आपले अस्तित्व समजणार नाहीये. पण याचा अर्थ असा नाही कि आपण त्यांच्या मध्ये हस्तक्षेप अजिबात केला नाहीये.
या जंबुद्वीपावर जेंव्हा कधी आपल्या लक्षात आले कि यांचा कालखंड वा प्रगती पुढे नेण्यासाठी काही विशिष्ठ बदलाची गरज आहे तेंव्हा तत्कालीन राज्ये, राज्यकर्ते, समूह यांचा अभ्यास करून आपण आपल्यातलेच काही बीजे त्यांच्यामध्ये वाढण्यास प्रवृत्त केली. त्याचा अर्थात आपल्यास अनुकूल असा परिणाम दिसून आला."
"पण बाबा आपण असे किती जण पाठवले, त्यांनी काय काय केले आणि या ग्रहवासीयांना या वेगळेपणाची कधी शंका नाही आली? आणि आपण आत्ता इथे का आलो आहोत?" वडिलांना मध्येच तोंडात मुलाने परत विचारले.

"जंबुद्वीपावर अनेक वेळेस जेंव्हा जेंव्हा काही संकटे आली तेंव्हा काही शक्तिमान राज्यकर्ते वा सामान्य प्राणी/मनुष्य प्राण्यांनी त्यांचा योग्य सामना केला पण त्यांना आवश्यक असे किंवा त्यांना मदत लागेल म्हणून आपण आपल्या स्वयंसेवकांना काही भूमिकांमध्ये प्रवेश दिला जसे कि प्रशिक्षण देणारे गुरु, ज्ञानी राजे, सर्वोत्तम योद्धे इत्यादी. त्यांनी वेळोवेळीस योग्य ते प्रशिक्षण, सल्ले , युद्ध अशी मदत करून ती संकटे निभावून नेली.
हे सर्व जण विशिष्ट उपकरणांद्वारे आपल्या संपर्कात होते आणि आपण त्यांना त्यानंतर पुढेही त्यांचे अस्तित्व आणि त्यांची गरज आहे का किंवा असेल तर कशापद्धती ने पुढच्या युगांमध्ये प्रकट होउन कार्यभाग साधावा याचे मार्गदर्शन करत होतो.
आपले वेगळे पण त्यांच्या हळू हळू लक्षात आले कारण अशी विशीष्ट भूमिका पार पाडणारे शतकानु शतके तेथेच जीवन व्यतीत करत होते. याचे कारण आपली अमर्याद आयुष्य मर्यादा.

आपल्याला इथे कायम यावे लागते याचा १ मुख्य कारण म्हणजे आपल्यातलाच १ गेले कित्येक शतके संकटात आहे आणि त्याचा शोध घेणे अजूनही आपल्याला जमलेले नाहीये. त्याचा आपल्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग नष्ट झाला आणि त्याचमुळे हवे तेंव्हा लोकांसमोर प्रकट होणे आणि इतर वेळेस अदृश्य राहणे त्याला कायम जमेनासे झाले आहे. ज्यावेळेस तो आपल्या पर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेस तो त्याच्या आजूबाजूस असणाऱ्या लोकांनाही दृष्टीस पडतो तेही त्याच्या अत्यंत हिडीस स्वरूपात - त्याच्या शिरावरचे आपले फुटलेले शिरस्त्राण, त्यामुळे पृथ्वी वरील कायम सहन ना होणारे वातावरण आणि त्यामुळे शरीभर झालेले आजार आणि त्यातील दुर्गंधी. "

या वेळेस चे आपले शोधकार्य हे नर्मदा नदीच्या परिसरात आहे आणि अश्वत्थामा आणि आपले बाकीचे स्वयंसेवक ज्यांना जंबुद्वीप वासी चिरंजीव मानतात ते आपली जबाबदारी आहेत."

कथा

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

9 Feb 2019 - 3:39 pm | विनिता००२

सुरेख :)

वेगळाच अँगल अनुभवला.

पैलवान's picture

9 Feb 2019 - 3:48 pm | पैलवान

कभी कभी मेरे (भी) दिल मे खयाल आता है, अपुनहीच भगवान हय!

पद्मावति's picture

9 Feb 2019 - 3:56 pm | पद्मावति

वाह, मस्तच.

उगा काहितरीच's picture

9 Feb 2019 - 6:12 pm | उगा काहितरीच

छान !

श्वेता२४'s picture

10 Feb 2019 - 7:30 pm | श्वेता२४

असेही असू शकते. मस्त लिखाण

उपेक्षित's picture

11 Feb 2019 - 1:15 pm | उपेक्षित

सही, आवडले

ज्योति अळवणी's picture

11 Feb 2019 - 5:29 pm | ज्योति अळवणी

खूप आवडले. असं देखील असू शकतच

सर्व प्रतिसादांसाठी मनःपुर्वक धन्यवाद

आदिजोशी's picture

13 Feb 2019 - 6:48 pm | आदिजोशी

पण सायन्स फिक्शन लिहिण्यासाठी सायन्सचा दणकून अभ्यास लागतो अन्यथा कथेचा बेस उथळ राहतो.