खरी कविता कधी येते माहितीये का?
जेव्हा ती आतून हाक मारते ना! तेंव्हा!!!
तीच तिची खरी-यायची वेळ..
तिला मग यमकांची, छंदांची, वृत्तांची, कसलीच गरज उरत नाही..
खरोखर अनावृत्त होऊन छंदमुक्तीचा
खरा ध्यास घेऊनच धावत येते ती! .
वेदना जागायची, स्वतःहुन चालत बोलत घडत धडपडत बाहेर यायची खरी वेळ..
काहीही सुचायची, सांगायची, बोध शिकवायची, ओझी डोक्यावर न घेता ती सताड उमटते बाहेर! जशी आत आहे तशीच!!!
हीच तिची खरी सुरवात मानायची का हो!???
असेल, असेल कदाचित..आणि असू दे ..असली तरीही!
अंतरीच्या बोल वाटे तू आता जवळी रहा
मीच माझे शब्द सांडू का मला सांगू पहा.
हीच आता वाट नवखी चालतो तुझिया सवे
वेदनेचे अर्थ कथिशी ,बोलतो ..असू दे नवे!
काय गाठू शब्द आणखी आशयाला तोकडे
सोडूनि देतो तुला मी जा कशी तुझिया सवे...
मुक्तछंदी मुक्तबंधी जा आता जगती जरा
लागला तर अर्थ थोडा दे मला सत्यी खरा.....
आत्मबन्ध..
प्रतिक्रिया
18 Jan 2019 - 10:57 am | ज्ञानोबाचे पैजार
अरे? एकाच दिवशी दोन कवितेवरच्या कविता?
ही पण आवडली,
जीओ गुर्जी
पैजारबुवा,
18 Jan 2019 - 2:16 pm | यशोधरा
आवडले!
18 Jan 2019 - 2:57 pm | पद्मावति
सुंदर.
18 Jan 2019 - 8:13 pm | अनन्त्_यात्री
आवडली.
18 Jan 2019 - 9:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
त्याच हाकेची वाट पाहतोय :(
तुमची कविता पोहचली.
19 Jan 2019 - 6:24 am | प्रचेतस
क्या बात है अत्रुप्तजी आत्मा.
सहज सुंदर लिहिलंत. कवीच्या मनातली आंदोलनं उत्कटपणे टिपलीत आपण.
19 Jan 2019 - 11:52 am | कंजूस
(आतून आलेली हाक?)
19 Jan 2019 - 12:59 pm | नाखु
कविता आवडली.
बुवांची कविता दुपट्यातून बाहेर पडली आणि दूडुदूडु धावू लागली आहे.आताच्या कविता कसोशीने होत नसून असोशीने असतात हे नमूद करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
अखिल मिपा चारोळी ते आरोळी कवीसंघाच्या "कवीची काकवी" अनियतकालिकातून साभार.
संकलक आणि आस्वादक वाचकांची पत्रेवाला नाखु
20 Jan 2019 - 1:48 pm | अत्रुप्त आत्मा
@ज्ञानोबाचे पैजार, यशोधरा, पद्मावति, अनन्त्_यात्री,
मिसळलेला काव्यप्रेमी, कंजूस :---- मन:पूर्वक धन्यवाद.
-------------------------------------------------
@ प्रचेतस ~~~
क्या बात है प्रचेतसजी आगोबा.
सहज सुंदर साधा प्रतिसाद दिलात. आमच्या मनातली (आपणास आधीच माहीत असलेली) आं-दोलनं निवडकपणे टपाटप टिपलीत आपण! आपल्या निर् मळ, विद्वत्ताप्रचुर, आशयघन प्रती पादनास वीणम्र अभिवादण!
---------------
नाखून अंकल - लउल्लूल्लूल्लू !
21 Jan 2019 - 1:27 pm | खिलजि
अगदी मनकवडा आहेस बघ तू
मलाबी ह्येच म्हणायचं व्हतं
कशाला हवंय व्याकरण , काना नि मात्रे
नको कुठली छंद यमक नि वृत्ते
भावना येताच जशीच्या तशी प्रसवावी
मग थेट काळजाला जाऊन भिडते