प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ?
भाग २/३
डॉ. जगन्नाथ दीक्षित ( एम० डी०), डीरिडर, लुईझियाना आणि राजीव उपाध्ये, पुणे.
मागील भागाचा दुवा -http://aisiakshare.com/node/7041
(10) प्राणायामात मेंदूत नक्की काय होते ?
सर्वसाधारण श्वसन हे अनैच्छिक असते आणि त्याचे नियंत्रण आयुष्यभर मेंदूतील एका छोट्या पेशीसमूहाकडून केले जाते. या पेशीसमूहाचा आकार काही मिलीमिटर इतका लहान असतो. त्यांचे कार्य काही वेळा औषधामुळे बदलू शकते. या पेशींना काही कारणाने धक्का बसला तर श्वसनक्रिया बंद पडते आणि मृत्यु येऊ शकतो. या पेशी उष्णीषकाच्या म्हणजे वेणी ( Pons . From Latin meaning bridge, Sanskrit meaning bridge as वेणी…..मेरू नाडीजाल आणि मेंदू मधील भाग. Part between brain and spinal cord ) पुढच्या आणि मागच्या बाजूस असतात. त्यातला एक समूह अंतर्श्वसन, (inspiration) तत्संबंधी स्नायु, छातीचा पडदा तर दूसरा बहिर्श्वसन (expiration), चरनाडी (vagus nerve) आणि ग्लॉसोफरिंजीयल नाडीमार्गे नियंत्रित करतो.
सुषुम्ना शीर्षकाच्यावर म्हणजे मेरुदण्डसेतू (from Latin Medulla oblongata meaning connecting brain to spinal chord, from sanskrit मेरुदण्डसेतू ) दोन केंद्रे अतिश्वसन आणि विकृत (Pneumotaxic and apneustic) श्वसनाचे नियंत्रण करतात. म्हणजे धाप, उसासे इत्यादी मध्ये ब्रेक लावण्याचे काम करतात. याच ठिकाणी रक्तदाब, हृदयाच्या ठोक्यांच्या गतीवर नियंत्रण ठेवणारी केंद्रे पण असतात. हे पेशीसमूह शरीरातल्या प्राणवायुच्या आणि कर्बवायुच्या, तसेच रक्ताच्या आम्लतेच्या पातळीबाबतीत संवेदनशील असतात. शरीरातील अनेक रसायनांच्या पातळयांचे संदेश वेगवेगळ्या नाड्यामधुन या केंद्राकडे पोचवले जातात.
शरीराकडुन आलेल्या या संदेशाना प्रतिसाद देण्याचे काम श्वसनकेंद्राकडून केले जाते. हे संदेश मज्जारज्जुतून छातीचा पडदा, आणि श्वसनाशी संबंधित स्नायुंपर्यंत पोहोचवले जातात. ही श्वसन केंद्रे मेंदूतील काही इतर भागांशी म्हणजे बॉट्झिंगर क्षेत्र (Botziner complex), लक्षित किंवा संशयस्थ केंद्र (nucleaus ambiguous) वगैरेंशी पण जोडली गेलेली असतात. बॉट्झिंगर क्षेत्र श्वसनाची लय निश्चित करते, तसेच उसासे, धाप लागणे या क्रियांमध्ये पण सहभागी असते. लक्षितकेंद्र (nucleaus ambiguous) घसा आणि श्वासनलिकेशी जोडलेले असते. हे चरनाडीचे (vagus nerve) एक उगमस्थान आहे. (आकृती ५ क्रमांक १५ ). याशिवाय आणखी एक पेशीसमूह पेसमेकर म्हणुन काम करतो आणि श्वसन काही कारणामुळे थांबले तर ते या पेशीसमूहाकडून परत चालु केले जाते. नॉरेपिनेफ्राईन, सिरोटोनिन, ऍसिटिलकोलाईन, सिरोटोनिन, डोपामाईन, एटीपी, सोमॅटोस्टॅटिन, सब्स्टन्स पी, टिआरएच, एण्डॉर्फिन, ऍडिनोसिन, एटीपी आणि प्राणवायु (norepinephrine, serotonin, acetylcholine, substance P, ATP, TRH, somatostatin,dopamine, endorphins, adenosine, and oxygen.) अशी बरीच चेतारसायने पेशींच्या कार्यात सहभागी असतात. प्राणायाम करताना उपाग्रपिंडातून या श्वसनकेंद्रांकडे संदेश पाठवून श्वासाची गती आणि खोली निश्चित केली जाते आणि मग पर्यायाने हृदयगती आणि रक्तदाब पण नियंत्रित होतो. ( आकृती ५ मध्ये आडव्या रेघेच्यावर A जागेवरील क्षेत्र )
जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा श्वसन जोरात केले जाते, आणि जेव्हा श्वसन संथपणे करतो तेव्हा तणाव कमी व्हायला सुरुवात होते. हृदय फक्त हळू किंवा जलद चालते - त्याचा ताल (rhythm) जर बदलला तर हा एक रोगाचा प्रकार आहे, परंतु श्वसनाचे तसे नाही. वेगवेगळ्या क्रिया आणि भावनांमध्ये श्वसनाचा दर्जा वेगवेगळा असतो. उदा. उन्माद, उसासे, जांभई, धाप, झोप, हसणे, हूंदका, खोकला, शिंकणे, गिळणे आणि ओकणे या सर्व क्रियांचे मूळ भावनिक उद्दीपन असते. श्वसनकेंद्राच्या पुढच्या बाजुला असलेल्या बॉट्झिंगर क्षेत्रामध्ये सुमारे साठ प्रकारच्या चेतापेशी असतात. यातील प्रत्येक पेशी वेगवेगळया जनुकांकडून नियंत्रित होते, जेणेकरून त्या विशिष्ट पेशीकडून विशिष्ट प्रतिसाद दिला जातो. हे छोटे क्षेत्र बदामकेतु (amygdala) आणि अधश्चेतकाच्या (hypothalamus) माध्यमातून सावधान, उन्माद, चिंता, विश्रांती इ. अवस्थांशी जोडलेले असते.
अग्रपिंडातील “प्राणायाम केंद्र” (आकृती ५ क्रमांक २ ) जेव्हा संतुलित आणि विवेकी विचारांनी जेव्हा कार्यरत होते तेव्हा स्वायत्त श्वसनकेंद्राचे नियंत्रण आणि ताबा बंद होऊन भावनिक क्षोभ सुद्धा हळुहळु कमी व्हायला सुरुवात होते. २०१७ साली एक संशोधनात कॅलिफोर्निया विद्यापीठात काही संशोधकांना उंदरांमध्ये श्वसन केंद्राजवळ काही मज्जापेशी सापडल्या आहेत. काही वेगळ्या जनुकांमुळे २ प्रकारच्या वेगळ्या प्रथिनांच्या निर्मितीमुळे जेव्हा उंदरांचे श्वसन मंद होते, तेव्हा त्यांचा तणाव ह्या पेशींमुळे कमी होतो, असे त्यांनी शोधल्यामुळे त्या पेशींना त्यांनी "प्राणायाम मज्जापेशी " असे म्हटले आहे, परंतु मानवजातीत कार्यक्षम MRI (functional MRI ) या यंत्राद्वारे असे स्पष्ट दिसते, की मानवाचे "प्राणायाम केंद्र " हे मेंदूत फक्त एका बाजूस म्हणजे उजव्या बाजूच्या उपाग्रपिंडाच्या पार्श्व बाह्यभागात सापडले आहे. ही रचना मानवामध्ये उंदरासारखी नसते.
स्वायत्त नाडी, हृदयगतीची लवचिकता आणि प्राणायाम:
स्वायत्त नाडीसंस्थेच्या शाखांनी संपूर्ण शरीर व्यापलेले असते. केवळ हृदयगतीच नाही तर भावनिक अवस्था (mood), रक्तशर्करा, मेदपेशी (adipose tissue), थायरॉईड, सारख्या अंत:स्रावी ग्रंथी, स्वादुपिण्डे, शरीराची प्रतिकारशक्ती, मूत्रपिंडे या सर्वांचे मेंदूकडुन स्वायत्त नाडीमार्फत नियंत्रण होते. शरीराला उर्जेची जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा स्वायत्त नाडीची अनुकंपी शाखा उद्दीपनाचे कार्य करते. श्वास घेताना किंवा वेगाने श्वास घेताना हृदयगती वाढत नसेल तर ते अनुकंपी नाडीचे कार्य बिघडल्याचे लक्षण मानले जाते. याउलट शरीराला स्वास्थाची गरज असते, तेव्हा उर्जेची गरज कमी होते. त्यावेळी शरीरांतर्गत अनेक उद्दीपित अवयवांचे शमन किंवा कार्य स्थिर होणे आवश्यक असते. श्वास सोडताना हृदयाची गती जर कमी होत नसेल तर ते परानुकंपी नाडीचे कार्य बिघडल्याचे लक्षण आहे.
परानुकम्पी नाडीसंस्था जेव्हा उत्तेजित होते, तेव्हा अनुकम्पी नाडीसंस्थेची पकड सुटायला सुरुवात होते. मग हृदयाची गती मंदावते, लाळ सुटु लागते. सीमा व्यवस्थेमध्ये ( limbic system (from Latin -limbus- edge) डोपामाईन स्रावांची निर्मिती होते आणि जांभया येऊन पेंग यायला सुरुवात होते. स्वादुपिंड आणि पित्ताशयाचे काम उत्तेजित होते आणि अन्नरसाचे शोषण चरनाडीच्या अधिपत्याखाली व्यवस्थित चालू होते.
आपण श्वास घेतो तेव्हा श्वासनलिकांचा विस्तार होतो आणि हवा फुफ्फुसांमध्ये प्रवेश करते. प्राणवायुचा हिमोग्लोबिन बरोबर संयोग होतो. रोहिण्या (arteries ) आकुंचन पावतात आणि रोहिण्यांमधील रक्तदाब वाढतो. नीलांमधील रक्त हृदयात जाते आणि हृदयगती वाढते. ही सर्व अनुकंपी नाडी प्रबळ असल्याची लक्षणे आहेत.
उच्छ्वास टाकताना श्वासनलिका आकुंचन पावतात आणि रक्तामधुन कर्बवायु कोशिकांमध्ये शिरतो. रोहिण्या प्रसरण पावतात, रक्तदाब कमी होतो आणि हृदयगती कमी होते. ही सर्व परानुकंपी नाडी प्रबळ झाल्याची लक्षणे आहेत.
दैनंदिन तणावामुळे अनुकंपी नाड्या प्रबळ होतात आणि श्वासगती वाढते. ही गती ठराविक मर्यादेच्या पलिकडे गेल्यावर हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. पण हृदयगतीची लवचिकता कमी होते. याउलट अतिसंथ श्वसनामध्ये घडताना दिसते. यासाठी योग्य संतुलन राखायचे असेल तर प्राणायामाची श्वासगती ७-८ श्वास प्रति मिनिट (किंवा हृदयगतीची लवचिकता ५-१० चा मध्य ) हा इष्टतम (optimum) श्वास दर आहे. या लयीत केलेला प्राणायाम शरीराच्या पुनर्निर्माणाचे जास्तीत जास्त फायदे मिळवुन देतो. यासाठी आयफोन साधनांचा वापर कसा करायचा याबद्दल पुढे लिहीले आहे. प्राणायामात श्वसनाची गती संथ करताना, ती मिनिटाला ५ श्वासांपेक्षा कमी न होऊ देणे हितावह असते. नाही तर त्यामुळे हृदयगती धोकादायक पातळीवर येऊन मृत्यु संभवतो. बर्याच जणांची अशी समजूत असते की आपण स्वस्थ असताना हृदयाचे ठोके नियमित पडतात आणि म्हणुन नियमित ठोके हे स्वस्थपणाचे लक्षण आहे. पण वस्तूस्थिती थोडीशी वेगळी आहे. एखाद्या निरोगी व्यक्तीचा हृदयाचा आलेख (इसीजी) काढला तर असे लक्षात येते की सूक्ष्म पातळीवर (milli seconds) हृदयाच्या ठोक्यांची गती कमीजास्त होत असते. हे संशोधन अगदी नवीन आहे. हे ठोक्यांचे कमी जास्त होणे म्हणजेच ज्याला हृदयगतीची लवचिकता (Heart rate variability) म्हणतात, त्याला इंग्रजीत HRV असे म्हटले जाते (मराठीत थोडक्यात "हृगल " असे म्हणता येईल). ती अत्यंत श्रेयस्कर असुन ती आरोग्याची महत्त्वाची निदर्शक आहे. पुरुष आणि स्त्रियांचे वय जसे वाढत जाते तसे हृदयाचा लवचिक पणा कमी होतो. अनेक गंभीर आजारांमध्ये (हृदय आणि यकृताची निष्क्रियता, मधुमेहाची न्युरोपथी इ.) ही लवचिकता कमी किंवा नाहीशी होते. प्राणायामाचा सराव ही लवचिकता टिकवून ठेवायला मदत करू करतो. आधुनिक धकाधकीचे आयुष्य जगणार्या आणि दीर्घकाल मानसिक तणावाखाली वावरणार्या व्यक्तींमध्ये स्वायत्त नाडीसंस्थेचे संतुलन बिघडते आणि अनुकंपी नाड्या जास्त सक्रिय झालेल्या असतात. याचा परिणाम होऊन सर्व अंतर्गत अवयव अतिक्रियाशील बनतात. मग लेप्टीन ह्या संप्रेरकाची पातळी कमी होऊन खा-खा वाढते, थायरॉईडचे कार्य वाढते, इन्सुलिनचे स्रवण वाढून अतिरिक्त साखर मेदात रुपांतरीत होते. रक्तमेदाची पातळी वाढते. कॉर्टिसॉलची पातळी आणि शरीरांतर्गत दाह वाढतो
प्राणायामाने योग्य संतुलन राखल्यावर शरीराला आणि मनाला शांत आणि विश्रांती अवस्था प्राप्त होते, विचार स्वच्छ आणि स्पष्ट होतात, जाणीवा समृद्ध होतात, भावनिक स्थैर्य (emotional stability) लाभते आणि हृदयगतीची लवचिकता योग्य पातळीवर राहते.
परानुकंपी नाडी जालाच्या जागृतीचे परिणाम :
आपल्याला जेव्हा जांभई येते तेव्हा डोळ्यात पाणी येते. हे पाणी म्हणजे दू:खामुळे किंवा कांदा चिरताना आलेले अश्रू नव्हेत. स्प्लेनोपलाटाईन प्रगंडाचे (ganglion) परानुकम्पी नाडीमुळे उत्तेजन झाल्याने तोंडात लाळ सुटणे, हाताचे तळवे सोडून उर्वरित अंगाला घाम येणे वगैरे लक्षणे दिसू शकतात. (तळ हाताला घाम फुटणे हे काळजी आणि विमनस्कता हे अनुकंपी नाडी उत्तेजित असल्याचे निर्देशक असते). काही योग्यांमध्ये डोळ्याच्या बाहुल्यांचा संकोच पण कवटीच्या तिसर्या नाडीच्या (third cranial nerve परानुकम्पी) नाडीजलाच्या उत्तेजनाने दिसून येतो. तोंडाला कोरड पडणे (sialoadenitis), डोळे कोरडे पडणे (dry eyes) किंवा शोग्रेन सिंड्रोम (Sjogren syndrome) सारख्या आजारात प्राणायामाचा अभ्यास परिणाम ठरू शकेल का हे तपासणे आवश्यक आहे.
पुरूष जननेंद्रियांचे उद्दीपन परानुकम्पी नाडीच्या उत्तेजनामुळे होऊ शकते, पण लैंगिक भूक कमी होणे प्राणायामाने घडून येऊ शकते. कामतृप्ती (orgasm) अनुकंपी नाडीच्या उत्तेजनामुळे होते. गमतीचा भाग असा, की काही हजार वर्षांपूर्वीच्या कोरीवशिल्पामध्ये काही पद्मासनातील योग्यांचे जननेंद्रिय उत्थापित दाखवले आहे.
प्राणायामाने ग्लानी किंवा झोप येऊ शकते. झोपेत शरीराच्या बर्याचशा यंत्रणा म्हणजे शरीराचे मूलभूत घड्याळ किंवा अहर्निश जैविक ताल (circadian clock), प्रतिकारशक्ती, चेता, मज्जा आणि स्नायु या सर्व संस्था पुनर्निर्माणात आणि दूरुस्तीमध्ये (anabolic state) व्यस्त असतात. म्हणूनच प्राणायामाने दिवसाची सुरुवात करणे योग्य होणार नाही. झोप येणे ही प्राणायाम योग्य रितीने होत असल्याची खूण आहे. मेंदूतील पेशीमलाचा निचरा, शरीराची झीज भरून येणे. स्मृतीसंवर्धन आणि रक्षण यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. (चांगली झोप येण्यासाठी केवळ प्राणायाम पुरेसा नाही तर आहारात पुरेसे मॅग्नेशियम हे मूलद्रव्य आणि ट्रिप्टोफॅन हे अमायनो आम्ल पण असायला हवे. ट्रिप्टोफॅन, सिरोटोनिन, व्हिटॅमिन डी-३, आणि मेलॉटोनिन (tryptophane, sirotonin, Vit D3, melatonin) या संप्रेरकांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते). प्राणायामा नंतर चॉकोलेट खाल्ले तर आनंदामाईड सारख्या मन:शांती देणाऱ्या एंडोर्फिन्सची निर्मिती वाढते.
महत्त्वाचा भाग असा, की श्वसन क्रियेवर आणि फुफुसांवर ताबा असणाऱ्या कॉर्टीकोबल्बर मार्गाचा (cortico bulbar tracts), गतीबाह्यक, उपाग्रपिण्ड आणि कवटीतून सुरु होणार्या नाड्यांशी (cranial nerves) संबंध असतो आणि हे सर्व भाग परानुकम्पी नाडीसंस्थेशी जोडलेले असतात. दूसर्या शब्दात सांगायचे झाले तर "लढा किंवा पळा" हा अनुकंपी नाडीसंस्थेच्या सक्रियतेचा परिणाम मज्जारज्जुतील जनुकांनी नियंत्रित होतो. चांगली गोष्ट म्हणजे देवाने किंवा निसर्गाने ज्याने कुणी मानवी शरीराची निर्मिती केली, त्याने जनुकाशिवाय अनुकम्पी नाडीला जास्त चालना द्यायची कोणतीही यंत्रणा निर्माण केलेली नाही. असा कोणताही प्रतिप्राणायाम अस्तित्वात नाही की ज्याने हृदयगती वाढेल किंवा चिंता वाढेल. याला अपवाद फक्त काही औषधे आणि अतिश्वसन (hyperventilation). अनुकंपी नाडीजाल हा मुख्यत्वे करून पाठीच्या मणक्यात असतो, परानुकम्पी नाडीजालाप्रमाणे मेंदू जवळ नसतो. अगदी थोडेच लोक ध्यान करून त्यावर ताबा मिळवतात. काही अनुभवी योगी आणि बौद्ध भिक्षु अनुकम्पी नाडी संस्थेचे नियंत्रण (Kundalini ?) करू शकतात. पण अग्रपिंडाशी अनुकंपी नाडीचा संबंध येत नसल्याने जाणीवपूर्वक श्वसनाने हृदयगती किंवा रक्तदाब वाढवता येत नाही.
एका प्रयोगात भावातीत ध्यानाच्या शास्त्रीय अभ्यासात प्राणायामा अगोदर, मध्ये आणि नंतर कॉर्टिसॉल या तणावाशी संबंधित स्रावाची पातळी ध्यान करणार्या आणि न करणार्या व्यक्तींमध्ये मोजण्यात आली. ध्यान करणार्या व्यक्तींमध्ये कॉर्टिसॉलची पातळी बरीच कमी असते असे लक्षात आले आहे. रक्तातील प्लाझ्मा ऍड्रीनॅलिन (plasma adrenaline) मध्ये काही महिन्यानंतर लक्षणीय फरक पडल्याचे दिसून आले आहे. शरीरातील कॉर्टिसॉल ची पातळी कशी मोजावी ह्या बद्दल माहिती पुढे नंतर दिली आहे.
दीर्घकालीन ताण, शरीर आणि मनाचे अपरिमित नुकसान करतो. मानसिक ताणाने नैराश्याचा, कर्करोगाचा, हृदयविकाराचा आणि संसर्गजन्य आजारांचा धोका कमालीचा वाढतो. अमेरिकन मेडीकल असोसिएशनच्या (AMA) मतानुसार ६०% आजारांचे मूळ कारण ताणात असते. मानसिक ताण जेंव्हा वाढतो अधश्चेतक (hypothalamus) हा मेंदूचा भाग कॉरटिकोट्रोपीन सोडणारा संप्रेरक ( corticotropin-releasing hormone (CRH). स्त्राव वाढवतो. हा स्त्राव रेचनग्रंथी (pituitory gland) वर परिणाम करून अड्रिनो कॉरटिकोट्रोपीन संप्रेरक (adreno cortico tropin hormone) स्त्राव वाढतो. हा स्त्राव अड्रेनल ग्रंथीवर पोहचतो आणि कॉर्टिसॉल ची निर्मिती होते. अधश्चेतकाचे मुख्य कार्य शरीराचे वेगवेगळ्या पातळ्यांवर संतुलन राखणे हे आहे. रक्तदाब, शरीराचे तापमान, पचन, भूक, वजन, शरीरातले द्रवपदार्थ, क्षार आदींचे नियंत्रण ही सर्व कार्ये अधश्चेतकाकडून अत्यंत अचूकतेने केली जातात. चयापचयात सहभागी होणारे अंत:स्राव पण अधश्चेतकाकडून नियंत्रित होत असतात. ताणामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर चेतापेशीमध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे ते एकप्रकारे विषारी ठरते आणि स्मृतीभ्रंश, वार्धक्य, चिंता इत्यादीना निमंत्रण मिळते.
कॉर्टिसॉलचे दुष्परिणाम प्राणायामाने कमी होतात. प्राणायामाने लाळेतील कॉर्टीसॉलचे प्रमाण, एपिनेफ्रिन आणि चयापचय (metabolism), कमी होत असल्याचे आणि मेलॅटोनिन , DHEA-S आणि त्वचेचा रोध (skin reistance) वाढत असल्याचे आढळून आले आहे.
भटकणारे मन लपते कोठे ? (q) प्राणायाम यशस्वी होण्यातला प्रमुख अडथळा म्हणजे भटकणारे मन किंवा विचार. कार्यक्षम MRI (functional MRI ) या यंत्राद्वारे कोणत्याही वेळी तुमचे विचार, भावना किंवा मन मेंदूत कुठे लपलेले असते हे आता शक्य झाले आहे. मुख्य विचार सोडून तुमचे मन भानावर येई पर्यन्त कुठे भटकत असते ती जागा (default mode ) ह्या fMRI यंत्राने सापडली आहे . ही जागा म्हणजे पार्श्व अधिसेतु कर्णिका (posterior cingulate gyrus, आकृती ५, क्रमांक २९ ) आणि शंखापिंडाचा पार्श्व आणि बाह्य भाग ( posterior and lateral temporal lobe) … मग मेंदूतील संकेत जेंव्हा द्वीप केतूच्या ( anterior portion of insula, insula from Latin shaped like an island) पुढच्या भागात येतो - तेंव्हा आपले मन भटकत आहे याची तुम्हाला जाणीव होते. द्वीपकेतू हा भाग भिंतिपिंड आणि शंखपिंड ह्यांच्या मध्ये असतो . मग मन पुन्हा भानावर येऊन संदेश अधिसेतु कर्णिका (cingulate gyrus) च्या पुढच्या भागात येतो . मग प्राणायामावर लक्ष पुन्हा केंद्रित होते व मन श्वास आणि छातीचे श्वासांचे स्नायु यांच्या वर ताबा घेणाऱ्या संवेदी (sensory) आणि चालक (motor) बाह्यक (cortex) भागावर येते. तेथून संदेश अग्रपिंड आणि उपाग्र पिंडाच्या पार्श्व-बाह्य भागाच्या ब्रॉडमन जागा ९ आणि १० ( Brodmann area number 9 and 10) म्हणजे “ प्राणायाम केंद्र,” येथे पोहचतो. (आकृती ५ , क्रमांक 2).
आकृती ५ :
1.अग्रपिण्ड frontal lobe
2. उपाग्रपिण्ड pre frontal lobe. ...also .. प्राणायाम केंद्र
3. शङ्खपिण्ड temporal lobe .
4. भिन्तिपिण्ड parietal lobe
5. श्वसनकेंद्र respiratory center
7. बदामकेतु amygdala ( almond shape)
8. चेतक thalamus
9. अधश्चेतक hypothalamus
10. पार्श्वपिण्ड occipital lobe
11. बॉटझिंगर क्षेत्र botzinger complex.
12. गंधकोष olfactory bulb
13 . गंधपिण्ड olfactory lobe
15. चरनाडी vagus nerve (latin wandering nerve)
16. त्रिवेणी नाडी trigeminal nerve (having 3 folds)
17. रेचनग्रंथी Pituitary gland.(mucus like subsatnce produing gland- Latin)
18. सूचिग्रंथी Pineal gland…(pineal…. pine cone shaped)
19. तेजस् सेतू corpus collosum .Corpus callosum (connecting bridge
22 .सीमा व्यवस्था limbic system (from Latin -limbus- edge)
25. पूर्वमध्यपुटक Pre central gyrus.
26. मध्योत्तरपुटक or अपाचीनमध्यपुटक Post central gyrus
29 अधिसेतु पुटक cingulate gyrus (Surrounding frontal lobe)
34 संदिग्धकेंद्र nucleus ambiguus
37. वेणी (उष्णीषक) pons
38. मेरुदण्डसेतू medulla (connecting brain to spinal chord)
44. आधारवर्ग Basal ganglia
मेंदूतील प्राणायाम केंद्र आणि उपाग्रपिण्ड (prefrontal lobe) हा भाग अत्यंत दाट जाळ्याने उर्वरित सर्व मेंदूशी (बाह्यक, उपबाह्यक, मस्तिष्कदण्ड) जोडला गेलेला असतो. उपाग्रपिण्डाचा वरचा भाग हा लक्ष, ज्ञान आणि कृती यांना नियंत्रित करतो. मेंदूच्या या भागाचे अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आपल्या मनुष्यत्वाशी निगडित असलेल्या नियोजन प्रक्रियेत महत्त्वाचे काम चालते. व्यक्तीमत्त्वाचा आविष्कार, निर्णय प्रक्रिया, सार्वजनिक आयुष्यातील संयम या सर्वांवर उपाग्रपिण्डाचे नियंत्रण असते. वेगळ्या तर्हेने सांगायचे झाले तर आपली ध्येये आणि विचार, कृती यांच्यामध्ये सुसंवाद ठेवण्याचे (ज्याला आपण विवेक म्हणतो) कार्य उपाग्रपिंड करतो. उपाग्रपिण्ड खऱ्या अर्थाने “कर्म योगाच्या उगमाचे केंद्र” आहे. जसे आपल्या वचनांचे केंद्र "ब्रोका क्षेत्र", आणि भाषा कळण्याचे " वरनिके क्षेत्र" (Broca’s area and Wernicke’s area) ही दोन्ही क्षेत्रे जशी फक्त मेंदूच्या एकाच बाजूला म्हणजे डाव्या बाजूच्या मेंदूच्या भिंती आणि शंख पिंडाच्या बाह्यकात लपलेली सतत, तसेच, “प्राणायामाचे केंद्र” फक्त उजव्या बाजूच्या उपाग्रपिण्डाच्या पार्श्व्-बाह्य भागात असते. (आकृती ५ क्रमांक २ ) प्राणायाम करत असताना परंतु दोन्ही भागाच्या उपाग्रपिण्डाच्या रक्त आणि प्राणवायूच्या प्रमाणात वाढ होते आणि मेंदूचे दोन्ही गोलार्ध सर्जनशीलता आणि विवेक यांना आपापल्या तर्हेने मदत करतात.
रोज २० ते ३० मि.च्या नित्यक्रमाने प्राणायामाची ही प्रक्रिया अधिकाधिक परिणामकारक होऊ लागते आणि मग या अवस्थेची चटक लागते. हे म्हणजे रोज जोर बैठका मारून किंवा गाण्याची तालीम करून सराव करण्यासारखे आहे. हळुहळु तयारीसाठी लागणारा सुरूवातीचा वेळ कमी होऊन कौशल्याने विशेष प्रयत्न न करता उपाग्रपिण्डाच्या बाजूच्या आणि वरील भागाचे (dorsolateral) प्राणायाम केंद्राचे उत्तेजन सहज शक्य होते. या भागाची हळुहळु खरोखर हात आणि पायांच्या स्नायुंप्रमाणे वाढ व्हायला सुरुवात होते. या भागात चेतापेशींची नवी जाळी आणि जोडण्या निर्माण होतात. ही चेतापेशींची वाढ BDNF (Brain derived nerve growth factor) ह्या मेंदू वाढीच्या स्त्रावात प्राणायामामुळे वाढ झाल्यामुळे होते. बदामकेतूच्या (amygdala) आकारात घट होऊन हितकारक अधिजनुकीय बदल घडू लागतात. हृद्रोग, कर्करोग सारख्या व्याधी निर्माण करणार्या घातक स्रावांची निर्मिती कमी होते किंवा थांबते. इतकंच नव्हे तर पेशीय वार्धक्याचे निदर्शक असलेल्या टेलोमिअरची पुनर्रचना होते (याचे अधिक विवेचन पुढील प्रकरणात आहे).
एकाग्र संथ श्वसनातला मुख्य अडथळा म्हणजे मन विचलित होणे हा आहे. प्राणायाम करताना मनाला एखाद्या लहान दोरीने घट्ट बांधता आले पाहिजे (ध्यानमार्गातल्या अधिकारी व्यक्ती याच मताचा पुरस्कार करतात). सस्तन प्राण्यांच्या दृक्जाणीवा या एका ठिकाणी स्थिर राहण्यासाठी निसर्गाने निर्माण केलेल्या नाहीत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आपले डोळे आणि मेंदू हे कोणत्याही दृश्यातील होणारे बदल पाहण्यासाठी निसर्गाने बनवले आहेत. नुसत्या एका दृष्याकडे रोखून धरण्यासाठी नाहीत. एकाग्र करायचा काहीवेळ प्रयत्न केल्यावर मन कंटाळते आणि मग नव्या प्रतिमा तयार करून त्यांच्याकडे भरकटते आ्णि वेगळे विचार सुरु होतात. पण प्राणायाम करताना जर डोळ्यांची हालचाल २-३ फुटांच्या क्षेत्रापर्यंत मर्यादित एखादया चित्रांवर, किना पुतळ्याच्या विविध भागावर ठेवून मग फक्त श्वासावर लक्ष ठेवले, तर डोक्यात इतर विचार येत नाहीत, मन कुठेतरी भटकत नाही, आणि प्राणायाम यशस्वी होऊन मन शांत होते. मन भरकटणे किंवा विचलित होणे या विषयाची अधिक चर्चा ब्रिदिंग झोन (Breathing zone app) चा परिचय करून देताना केली आहे.
उपाग्रपिण्डाचे सर्वात ठळकपणे चालणारे कार्य म्हणजे अधिकारी कार्य. उपाग्रपिण्ड ’ऊर्ध्वमूलमधः शाखम्’ या उक्तीप्रमाणे हेतूत: किंवा अंतर्गत गोंधळाच्या अवस्थेत व्यवस्थापनाचे कार्य करतो. परस्पर विरोधी विचार किंवा कृती जाणणे, चांगले किंवा वाईट यांच्यातील फरक, साधर्म्य आणि वैधर्म्य यातला फरक, एखाद्या निर्णयाचे किंवा चालु कृतीचे भविष्यातले निष्पन्न, ध्येयाच्या दिशेने प्रवास या सर्वांवर उपाग्रपिंडाचा प्रभाव असतो. अग्रपिंड नियमांचे ज्ञान ग्रहण करतो. अग्रपिंडाचा पुढचा भाग (along the rostro-caudal axis) अमूर्त पातळीवरील (abstract) नियमांचे ज्ञान ग्रहण करतो. योग्य रीतीने काम करणारा उपाग्रपिंड वास्तवाचे भान देतो आणि अपराधी किंवा पश्चात्तापाची भावना पण देतो. स्वप्नात सृजनशीलता जरी जागी असली आणि काही वेळा ती लाभकारी असली तरी तर्कसंगती नसते. म्हणून स्वप्नात जे काही वेळा वाटते ते दिवसा प्रत्यक्ष शक्य नसते. झोपेत उपाग्रपिंड फारसा कार्य करत नसल्याने स्वप्नांमध्ये पश्चात्तापाची भावना नसते.
प्राणायामा मुळे यामुळे शांत झोप लागायला मदत होते. आत्तापर्येंत डॉक्टरांची अशी समजूत होती कि मेंदूमध्ये दुग्धलसीका (Lymphatics) नसतात. परंतु गेल्या फक्त दोन वर्षांत असा शोध लागला आहे की मेंदूत सुद्धा ह्या लसीका असतात आणि त्या फक्त रात्रीच जागृत असतात म्हणून दिवसा त्या दिसत नाहीत. रात्री चेतापेशींचा आकार आणि त्यांची प्राणवायूची गरज ४० टक्के कमी होते, म्हणून दुग्ध लसीका प्रसारण पावतात आणि मळ साफ होण्यास मदत होते. चेतापेशींचा कचरा म्हणजे अनावश्यक प्रथिने, मृत जिवाणू व विषाणू, जड धातू, प्रदूषणजन्य घातकद्रव्ये , इत्यादी रसायने पेशी बाहेर टाकतात. हा कचरा जर पेशीबाहेर तुंबला तर मज्जाक्षय, स्मृती्क्षय, कर्करोग, इत्यादी रोगांचे प्रमाण वाढते. शांत झोपेत ऍनाबोलिक (anabolic) यंत्रणा कार्यान्वित होऊन, तसेच शरीराच्या प्रतिकार शक्तीला आणि पेशीय मलोत्सर्गाला म्हणजे दुग्धलसीकांना ( glymphatic system of brain ) चालना मिळून आपण दूस-या दिवशी ताजेतवाने होतो. आयुष्याचा जमाखर्च केवळ जगलेल्या वर्षांच्या आकड्यांमध्ये न बघता गुणात्मक (साफल्याच्या) दृष्टीकोनातून पण बघायचा असेल तर प्राणायामाचे महत्त्व समजायला अडचण येणार नाही.
आकृती ६: ताणाचे दुष्परिणाम आणि प्राणायामाचे फायदे
11. प्राणायामाचे फायदे
1. काही फायदे आणि त्यामागची यंत्रणा अगोदरच्या काही प्रकरणात विशद केली आहे, तर काही फायदे प्राणायामासंबंधी प्रवाहचित्रात (flowchart)- आकृती ६ मध्ये स्पष्ट केले आहेत. इथे प्राणायामाचे फायदे सारांशरुपाने संकलित केले आहेत.पूर्वी खुलासा केल्याप्रमाणे प्राणायाम आणि ध्यानाचे फायदे वेगळे करता येत नाहीत. त्यामुळे पहिली वीस मि. प्राणायाम करणे योग्य, पण नंतरचा वेळ अथांग अबोधमनाचा ठाव घेताना ध्यानाचे फायदे आणि तोटे यांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
2. आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे प्राणायामाचा प्राणवायु, फुफ्फुस आणि श्वसन यांच्याशी प्रचलित समजुतीनुसार फारसा संबंध नसतो. प्राणायामाचा संबंध फक्त श्वसनकेंद्रातील बदलामुळे निर्माण होणा-या आणि कार्यान्वित होणा-या चेतापेशींच्या जोडण्यांशी असतो. ह्या जोडण्यांमुळे तणाव निर्मूलनाचे काम सोपे होते. सर्वसाधारण स्वायत्त श्वसनात हे काम तशा जोडण्या नसल्याने होऊ शकत नाही.
3. प्राणायामाने शरीराची स्वायत्त कार्ये सुधारतात. दम्याचा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो. प्रज्वालक (oxidative) ताणाने होणारे शरीराचे नुकसान, झीज आणि अकाली वृद्धत्व थोपवता येते. प्राणायामाच्या नियमित सरावाने मन स्थिर ठेवण्यास, इच्छाशक्ती मजबूत होण्यास, तसेच निर्णयक्षमता सुधारण्यास मदत होते. कोणतेही दूरगामी निर्णय घेताना सर्वंकष विचार करता येण्यासाठी भावनिक स्थैर्याची गरज असते. प्राणायामाने उपाग्रपिण्डाचे कार्य वाढत असल्याने भावनिक स्थैर्य लाभून निर्णयक्षमता सुधारते. तणावपूर्ण परिस्थितीमध्ये तणावाचे आकलन आणि शरीराचा प्रतिसाद व त्यातुन निर्माण होणारे त्रास वेळीच रोखायला मदत होते. जीवनविषयक दृष्टीकोन बदलण्यात आणि आयुर्मान वाढविण्यात प्राणायाम महत्त्वाची भूमिका बजावतो.
4. अनेक शास्त्रीय अभ्यासातून प्राणायामाचे रक्तदाबाच्या विकारातील फायदे अधोरेखित झाले आहेतच, पण हृदयगतीची अनियमितता आणि हृदयाच्या ठोक्यांचे उगमस्थान बदलले जाणे (ectopic beats) इत्यादि लक्षणे प्राणायामाने सुधारू शकतात. तणावजनक स्रावांवर होणारा परिणाम एखाद्या औषधाप्रमाणे काही तासांप्रमाणे टिकतो. दीर्घ काळ फायद्यासाठी दररोज प्राणायामाचा अभ्यास करावा. रक्तदाबावर कायम स्वरूपी परिणाम होण्यासाठी नियमित अभ्यासाची आवश्यकता असते. लहान वयात प्राणायाम सुरु केल्यास आरोग्य नियंत्रणास जास्त चांगली मदत होते. परानुकम्पी नाडीसंस्था उत्तेजित झाल्याने ऍसिटीलकोलाईन हा स्राव रक्तवाहिन्यांचे प्रसरण करण्यास मदत करतो. ऍसिटीलकोलाईन रक्तवाहिन्यांच्या अंत:त्वचेच्या पेशीवर असलेल्या संग्राहकांना (receptor) चिकटते. मग या पेशी नायट्रीक ऑक्साईडची निर्मिती करतात आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या स्नायुंना संदेश मिळून ते सैल पडतात आणि रक्तवाहिन्या प्रसरण पावतात.
5.श्वास आत घेताना हृदयाचे ठोके जलद गतीने पडतात आणी सोडताना ते संथ गतीने पडतात. यामुळे साधारण हृदयगतीमध्ये बदल होतो. हा बदल अगदी सूक्ष्म असतो आणि हा फरक काही मिलिसेकंद असतो म्हणून सहज लक्षात येऊ शकत नाही. परंतु आता यंत्रामुळे हे शोधणे शक्यस झाले आहे. हा बदल कमी होणे हे काही तरी हृदयाच्या तक्रारीचे म्हणजे हार्ट अटॅक, हृदय बंद पडणे (heart failure ), यकृत विकार (liver cirrhosis ) वगैरेची शक्यता दाखवतो. प्राणायामाने हृदयाच्या तालनियंत्रकाच्या (Pacemaker ) कार्याला चालना देऊन रक्तदाब कमी होतो आणि हृदयगतीची लवचिकता (Heart rate variability) पुन:स्थापित करता येते.
6. प्राणायामाच्या वेळी सूचक कल्पनाचित्रणाचा सराव हृदयविकारात अधिक फायद्याचा ठरतो, पण या फायद्यांचे प्रमुख कारण प्राणायामच आहे. काही प्रयोगात प्राणायामाने वजन कमी करून स्थूलता कमी झाल्याची नोंद आहे. प्राणायाम आणि त्यानंतर काही काळ ध्यान केल्यास वेदना निवारण, कंबर आणि पाठ्दूखी, पोटशूळ, (irritable bowel syndrome and ulcerativ colitis - हे चर नाडीचे दोष ), निद्रानाश, नैराश्य, चिंता आणि धसका घेण्याची प्रवृत्ती, भावनिक स्थैर्य (mood stability), क्रोध नियंत्रण, तुरुंगातील काही कैद्यांमध्ये आणि शाळकरी मुलांमध्ये दिसणारी आक्रमकता, व्यसनाधीनता असे अनेक त्रास कमी होऊ शकतात.
7. प्लेटलेटची (platelets) निर्मिती करणा-या मेगाकॅरिओसाइट (megakaryocytes) नावाच्या पेशी सस्तन प्राण्यांच्या फुफ्फुसात अलिकडेच आढळुन आल्या आहेत. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना प्राणायामाने प्लेटलेटची संख्या स्थिर ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. एका सुदर्शन प्रकारच्या प्राणायाम पद्धतीने (जलद आणि मंद गतीने प्राणायाम ) प्रयोगात जे विद्यार्थी दीर्घकाळ किंवा तीव्र ताणात होते त्यांना प्राणायामाचा उपयोग रक्तशर्करा, कोलेस्टेरॉल आणि प्लेटलेटची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी झाल्याचे लक्षात आले.
8. बंधुभाव, करूणा, मातृत्व इत्यादि भावना वाढीस लागतात. हे ओक्सयटॉसिन (oxytocin) च्या स्रावाने होते. स्वास्थ्याची भावना, आनंद आणि उत्साह या भावना काही एण्डॉर्फिन, आनन्दामाईड चेतापेप्टाईडच्या (neuropeptides) विसर्गामुळे निर्माण होतात. हे परिणाम काही मिनीटे ते काही तास टिकतात. सिरोटॊनिनच्या पातळीत इष्ट बदल झाल्याने नैराश्य आणि ताण नाहीसा होण्यास मदत होते. सीआरेच आणि एसीटीएच ( (CRH corticotropin releasing hormone and ACTH adrenocorticotropin hormone from anterior pituitary) या स्रावांची पातळी घटल्याने दाहजन्य आजारांपासून म्हणजे संधीवात, हृदयविकार, कर्करोग, मज्जाक्षय वगैरे पासून त्रास कमी होतो. प्रतिकारशक्ति सुधारते. रजोनिवृत्तीच्या (menapause) काळात हृदयगतीची लवचिकता कमी झालेली दिसते. अशा स्त्रियांनी प्राणायामाचा सराव केल्यास फायदेशीर ठरू शकेल.
9.अधश्चेतक-रेचनग्रंथीचे सुधारलेले कार्य, रेनिन-व्हॅसोप्रेसिन-ऍंजिओटेन्सिन (renin -vasopressin- angiotensin )याकडून मिळणारा जैवप्रतिसाद (Bio feedback) यामुळे रक्तवाहिन्यांचे संतुलन प्राणायामाने सुधारते. अनुकंपी नाड्यांचे स्तंभन झाल्याने एपिनेफ्राईन आणि नॉरएपिनेफ्राईनचा प्रभाव कमी होतो आणि रक्तवाहिन्यांचा कठीणपणा कमी होतो. रक्त पातळ व्हायला मदत होते. रक्ताच्या गुठळ्या बनायची प्रवृत्ती कमी होते. ग्लुकगॉन- इन्सुलिन जैवप्रतिसाद (bio feedback) सुधारतो. इन्शुलिन प्रतिसाद सुधारल्यामुळे रक्तशर्करेत सुधारणा होते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना प्राणायाम लाभदायक आहे.
10. पुरुषांमध्ये काही प्रयोगात प्राणायामाने शुक्रजंतूंचा दर्जा सुधारतो. प्राणायामाने डोपामाईनची पातळी वाढते असे पूर्वी पाहिलेले आहे. जांभई येते तेव्हा डोपामाईनची पातळी वाढल्याची खूण आहे. डोपामाईन हा स्राव सुख आणि आपुलकीची भावना निर्माण करण्यास मदत करतो. झोपेत सुधारणा, स्मृती आणि मेलॅटोनिनच्या स्रवणात सुधारणा, तसेच मेदसंचयाची प्रवृत्ती कमी होणे इत्यादि फायदे प्राणायामाने होऊ शकतात. काही जणांमध्ये कोलेस्टेरॉल कमी झाल्याचे दिसून आले आहे. अनेक चेतारसायने प्राणायामात सहभागी होतात. यात डोपामाईन, उद्दीपक अमायनो आम्ले, लघुशृंखला पेप्टाईड, ऍसिटिलकोलाईन, सेरोटोनिन, नायट्रीक ऑक्साईड, ऍड्रैनोकॉर्टीकोट्रॉपिक स्रावाशी संबंधित पेप्टाईड आणि ऑक्सिटॉसिन ( dopamine, excitatory amino acids, several small peptide chains, acetylcholine, serotonin, nitric oxide, adrenocorticotropic hormone-related peptides and oxytocin, that facilitate yawning and opioid like peptides.) सारखी जांभयांमध्ये सहभागी असणारी चेतारसायने असतात.
11. पेशींमध्ये संदेशवहनाचे कार्य करणारी चेतारसायने प्राणायामात प्रभावीपणे काम करताना दिसून आली आहेत. ध्यानाचा अपस्मार, मासिक पाळीच्या सुरुवातीच्या तक्रारी, तसेच रजोनिवृत्तीच्या काळातील तक्रारी कमी करण्यासाठी उपयोग होतो. शरीराच्या स्वयंप्रतिकाराचे (auto-immune) आजार, पेशींची असाधारण/असंतुलित वाढीचे मानसिक ताण हे पण एक कारण असते आणि प्राणायाम आणि ध्यान यांचा त्यासाठी प्रभावी उपयोग होतो.
प्राणायाम आणि अधिजनुकशास्त्र
12. मानवी शरीरात सरासरी ३७.२ लक्ष कोटी (trillion) वेगवेगळ्या पेशी असतात आणि १०० लक्ष कोटी (trillion) इतके जीवाणु वास्तव्य करून असतात. यातले बहुतेक जीवाणु उपकारक असतात. त्यांचे वास्तव्य तोंड, नाक, घसा, अन्नमार्ग आणि कातडी अशा अनेक ठिकाणी असते. थोडक्यात सांगायचे झाले तर जीवाणुंची संख्या आपल्या शरीरांच्या पेशींच्या संख्येपेक्षा जास्त असते. त्याला जिवाणुसमूह (microbiome) असे म्हणतात. शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये एक केंद्रक असते (तांबड्यापेशी सोडून) आणि त्यात ४६ गुणसूत्रांच्या (chromosomes) २३ जोड्या असतात. याला अपवाद फक्त शुक्राणु आणि बीजांडे. केंद्रकाम्लाची (DNA) गुंफलेली माला म्हणजे गुणसूत्रे .ही गुणसूत्रे केंद्रकातून पेशीच्या सर्व व्यवहारांवर नियंत्रण ठेवतात. गुणसूत्रे २५००० जनुकांची बनलेली असतात, त्या जनुकांमध्ये आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचा कार्यक्रम दडलेला असतो. त्याला जनुककोष्ठ (genome) असे म्हणतात. आपण किती उंची गाठणार ते दात कधी येणार अथवा पडणार, भूक कधी लागणार किंवा कोणते आजार आपल्याला होऊ शकतील हे सर्व जनुकांकडून ठरवले जाते. थोडक्यात आपला सर्व जीवनपट जनुकांमध्ये साठवलेला असतो. हे जनुक कसे कार्यान्वित होतात किंवा शांत होतात हे अलिकडेच विज्ञानाला समजले आहे. ह्याला अधिजनुकशास्त्र (epigenetics), आणि बदललेल्या जनुककोष्टाला, अधिजनुककोष्ठ (epigenome ) असे म्हणतात. जनुकांचे शांत होणे अथवा व्यक्त होणे, हे आहार, विहार, विचार, व्यायाम व सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असते. त्याला "एक्स्पोसम" जनुककोष्ठवर्ध (exposome) असे म्हणतात. प्रत्येक गुणसूत्राच्या टोकाला - बुटाच्या नाडीप्रमाणे - टेलोमियर नावाचा भाग असतो. त्यात कोणतीही जनुकीय माहिती नसते, पण त्यामुळे गुणसूत्राचे रक्षण होते.
13. आपले जसे वय वाढत जाते तसे टेलोमियरची लांबी कमी होत जाते (बुटाच्या नाडीची टोके उकलायला सुरुवात होते त्याप्रमाणे). मानसिक आणि शारीरिक तणाव , मधुमेह, सिगारेट पिणे इत्यादी कारणाने टेलोमियरचा ऱ्हास वाढतो. केंद्रकाम्लाच्या दूरुस्तीचे कार्य करणार-या टेलोमरेज नावाच्या वितंचकाची (एन्झाइम) परिणामकता कमी होत जाते. विज्ञानाला आता टेलोमियरची लांबी कमी होण्याचा आणि काही अर्बुदांची वाढ होण्याशी (मूत्राशय, हाडे, फुफ्पुसे, मूत्रपिण्डे) परस्पर संबंध असल्याचे लक्षात आले आहे. मधुमेहाचे, हृदयविकाराचे रुग्ण आणि अतितणावग्रस्त व्यक्तींमध्ये टेलोमियरची लांबी कमी झालेली दिसून येते. प्राणायामाने टेलोमियरची लांबी कमी होण्याच्या प्रमाणात घट होत असल्याचे लक्षात आले आहे. प्राणायामाचा टेलोमियरवर होणारा परिणाम आता प्रयोगशाळेत तपासून मिळतो. त्याची चर्चा या लेखात इतरत्र केलेली आहेच.
14. गुणसूत्रांमध्ये जनुक हिस्टोन नावाच्या अतिसूक्ष्म मण्यांसारख्या प्रथिनांवर अगदी घट्ट बांधलेले असतात. ही हिस्टोन प्रथिने मुख्यत्वेकरून तुमच्या आई कडून येतात. वडिलांकडून येणारे जनुक पेशीकेंद्रात सामावले जातात, पण वडिलांचे पुष्कळसे हिस्टोन, सर्व मायटोकाँनड्रीआ, MtDNA वगैरे नष्ट होतात. ह्या हिस्टोन प्रथिनांमध्ये कोणते जनुक उत्तेजित आणि कोणते जनुक निष्प्रभ करायचे ह्याचे सामर्थ्य असते. आई किंवा वडील ह्या दोघांमधील फक्त बलवान (dominant ) जनुक व्यक्त होतात. आपल्या शरीरात प्रत्येक सेकंदाला सुमारे १ अब्ज वेळा हे प्रत्येक पेशीतील २५००० जनुक प्रत्येक ३७.२ लक्ष कोटी (trillion) पेशींमध्ये कार्यान्वित किंवा निष्प्रभ होत असतात. काही कायम उत्तेजित असतात. उदाहरणार्थ हृदयक्रिया. काही फक्त काही सेकंद , तर काही तास, किंवा काही दिवस प्रभावित किंवा निष्क्रिय राहतात. उदा्हरणार्थ प्राणायामाचा, रक्तदाबाशी संबंधित जनुकांचा प्रभाव काही दिवस टिकतो, म्हणून प्राणायामाचा रोज अभ्यास आवश्यक आहे. प्राणायामाचे मुख्य कार्य तुमच्या चांगल्या जनुकांचे उत्तेजन आणि वाईट जनुकांचे शमन हेच आहे.
अधिजनुकशास्त्रातील नवीन संशोधनात असे दिसते की आईच्या बीजांडकोशातील ज्या बीजामुळे (ovum from the ovary ) तुमचा जन्म झाला, तो बीजांडकोश आणि बीज तुमच्या आईच्या पोटात तिच्या जन्मापूर्वी गर्भात असतांना तुमच्या आजीच्या जनुकांनी (तुमचा जनुककोश - genome ) तयार केला होता. तुमचा जन्म होई पर्यंत तुमच्या आईने फक्त तो वाढवला म्हणजे खऱ्या अर्थाने तुमची आजी (आईची आई) ही तुमची जन्मदात्री आहे. (पुरुषांमध्ये असे होत नाही- शुक्रजंतू नवीन आयुष्यभर तयार होत असतात. जन्मानंतर स्त्रियांमध्ये मध्ये नवीन बीजे तयार होत नाहीत). असे दिसते की तुमचा आत्मा, तुमचे अस्तित्व, शरीरातील इतर पेशींशी शरीराचे संबंध वगैरे गोष्टींचा उगम त्या बीजातील पेशीजलामुळे (ooplasm ) होतो. तुमच्या पित्याशी किंवा त्याच्या जनुकांशी त्यात फार भाग नसतो. सर्वसाधारपणे मेथिलीकरण (methylation) आणि असिटीलीकरण हे ब्रेक आणि ॲक्सिलेटर सारखे जनुकांचे उत्तेजन आणि शमनाचे काम करतात. प्रत्येक पेशींमध्ये डझनावारी गुंतागुंतीची HAT (Histone acetylase) and HDAC (histone deacetylase) आणि DNA methyltransferase (DNMT), वगैरे विंतचके असतात. हिस्टोन आणि क्रोमॅटिन मधील बदल, मायक्रो RNA , फोस्फोरिलेशन इत्यादी रसनक्रियांची जनुक व्यक्त होण्यासाठी जरूर असते.
15. एकाग्र श्वसनामुळे काही दाहसंबंधी जनुक निष्प्रभ होतात. उदारणार्थ RIPK2 आणि COX2 दाह जनक जनुक. प्रदीर्घ शारीरिक आणि मानसिक ताणामुळे कर्करोग, अलझ्यामर, स्थूलपणा इत्यादी रोग होऊ शकतात. हे आपण पूर्वी पाहिलेले आहे. प्राणायामामुळे जनुकांचे मेथिलीकरण झाल्याने CRP, IL6, and TNF (serum concentration of C-reactive protein (CRP), cytokine serum concentrations of interleukin 6 (IL6), and tumor necrosis factor (TNF) ह्या दाहजनक निर्देशकांचे प्रमाण घटते.
16. डॉ. डीन ऑर्निश यांनी केलेल्या संशोधनात प्राथमिक अवस्थेतील प्रोस्टेट कर्करोगाची शक्यता असलेल्या रूग्णांना रोज एक तास ध्यान आणि चालणे किंवा योग करायला सांगितले होते. याचा परिणाम असा झाला की RAS प्रकारातले कर्कजनुक (RAN, RAB14, and RAB8A) प्रभावहीन झाले. प्राणायामाने उत्तेजित झालेली HDAC हे जनुक पेशींचे विभजन, हिस्टोन मधील बदल, जनुकांच्या CpG भागाचे मेथिलीकरण, ट्रान्सक्रिप्शन. पेशींचे विभजन ह्या क्रियांवर प्रभाव पाडून व्याधी प्रक्रिया थांबवतात. अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे जनुकांवर झालेल्या ह्या क्रिया पुढच्या पिढीवर शुक्रजंतू आणि अंडजामधून मधून पोहचतात. म्हणजे ही खऱ्या अर्थाने "पूर्व पुण्याई" आहे.
17.ज्या देशांमध्ये विमा, मेडिकेयर, मेडिकेड, किंवा नॅशल हेलथ केयर सारख्या सार्वजनिक संस्थातून आरोग्यविषयीचा खर्च केला जातो, त्या खर्चात ध्यानामुळे बचत होत असल्याचे अभ्यासांती दिसून आले आहे
क्रमश:...
प्रतिक्रिया
13 Jan 2019 - 10:08 pm | कंजूस
फोटो ५
( फोटो मोठा केल्यावर शेअरिंग बाणाची खूण>> embed code link मिळते
त्यातून
https://farm5.staticflickr.com/4825/32837184518_c029d60703_m.jpg"
एवढाच भाग लिंक आहे.
हा फोटो येतो.