पोरी, देतो तुला आज
माझ्या प्रेमाची शिदोरी
कर स्विकार प्रेमाने
ठेव जपून तू उरी..
जरी सांगे माय-बाप
तुला जगायची रीत
शिकशील तुझी तूही
पुढे जगाच्या शाळेत..
पोरी, अंतरी ग तुझ्या
प्रेम राहो निरंतर
थारा द्वेषाला नसावा
दूर राहुदे मत्सर
दुःख दाबून उरात
ठेव मुखावर हसू
परी नसावी शरम
कधी ढाळण्याची आसू..
पोरी,पुढे जात रहा
नको अडथळ्यांची भिती
सदा चांगल्या वाटेला
काटे कुटे खूप येती..
जरी मिळाल्या यातना
तरी ध्यानात हे ठेव
घाव सोसूनी टाकीचे
होतो दगडाचा देव..
पोरी, मिळाली आयती
पंच पक्वाने ही जरी
जाणिवेल तुझी तुला
गोड कष्टाची भाकरी..
वाट पाहावी लागते
काही मिळण्या हातात
प्रयत्नांच्या सोबतीला
धीर असुदे अंगात..
पोरी, स्वप्ने पहा मोठी
कर ठेंगणे गगन
पाय असावे भुईला
ठेव समाजाची जाण
पादाक्रांत तू करावे
जरी यशाचे शिखर
पडू नये तुला कधी
माय बापाचा विसर
✍️ -- प्रियाभि..
प्रतिक्रिया
21 Dec 2018 - 3:29 pm | श्वेता२४
खूप छान विचार मांडलेत. आवडली.
23 Dec 2018 - 2:38 pm | प्रियाभि..
23 Dec 2018 - 2:38 pm | प्रियाभि..
23 Dec 2018 - 2:38 pm | प्रियाभि..
23 Dec 2018 - 2:39 pm | प्रियाभि..
धन्यवाद _/\_
22 Dec 2018 - 7:42 am | पाषाणभेद
बापाच्या हृदयाच्या अंगाने वाचली कविता अन खुप भावली. बापाचे मुलीवर जास्तच प्रेम असते. हळवा होतो बाप अशा वेळी.
16 Dec 2019 - 10:56 pm | मुक्त विहारि
भावना चांगल्या प्रकारे मांडल्या आहेत. ..