जीवनशैली ०२ : आयुर्मानावर लक्षणीय परिणाम करणारे महत्वाचे घटक

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
7 Dec 2018 - 2:30 pm

सूचना : ही लेखमाला एका शीर्षकाखाली आणण्यासाठी, प्रत्येक लेखाच्या शीर्षकात, "जीवनशैली + (अनुक्रमांक)" हे शब्दगट सामील केले आहेत.

अनुक्रमणिका :

जीवनशैली ०१ : जगातील सर्वात जास्त निरोगी व जास्त आयुर्मान असलेले लोक व्यायामशाळेत जात नाहीत !
जीवनशैली ०२ : आयुर्मानावर लक्षणीय परिणाम करणारे महत्त्वाचे घटक

***************

जागतिक सरासरी आयुर्मान (The World Factbook, २०१६), "पुरुष : ६८ वर्षे ४ महिने व स्त्रिया : ७२ वर्षे ८ महिने", असे आहे हे आपण मागच्या भागात पाहिले आहे. ही सरासरी आहे. म्हणजे, त्यापेक्षा कमी काळ आयुर्मान व जास्त काळ आयुर्मान असलेले लोक असणारच, हे सांगायला नकोच.

सरासरी अमेरिकन आयुर्मान आहे ७८.२ वर्षे आहे आणि त्याचबरोबर अमेरिकन जनतेतील ७०,००० पेक्षा जास्त लोकांनी शंभरी ओलांडली आहे. म्हणजे, नीलप्रदेशांत दीर्घायुष्याचे प्रमाण सर्वसाधारण सरासरीपेक्षा खूप जास्त आहे, पण, नीलप्रदेश सोडून इतर कोठेच दीर्घायुषी लोक आढळत नाहीत, असेही नाही. ही वस्तुस्थिती जशी अमेरिकेत आहे, तशीच ती जगातील इतर भागांतही कमी-जास्त प्रमाणात आहे. अमेरिकेतील वस्तुस्थितीचे विश्वासू आकडे मिळाले म्हणून ते उदाहरण दिले, इतकेच.

तर मग या दीर्घायुषी लोकांमध्ये असे काय आहे, ज्याचा इतर लोकांमध्ये अभाव आहे?

अनादी काळापासून अमरत्वाची आस असलेल्या मानवाने या बाबतीत सतत संशोधन चालू ठेवले नसते तरच आश्चर्य होते. :) या धडपडीत आपल्या हाती आलेल्या माहितीचा गोषवारा या भागात घेतला आहे.

अ) आपल्या नियंत्रणाबाहेर असलेला घटक, "जनुकीय वारसा" : जनुकीय वारसा हे दीर्घायुष्याचे सर्वात मोठे व सर्वात महत्त्वाचे कारण आहे, असा सर्वसाधारण समज आहे. असे असते तर समान जनुके असणार्‍या लोकांत (रोगजंतूंच्या संसर्गाने होणारे आजार, वेगळे वातावरण, इत्यादींचे परिणाम ध्यानात घेतल्यानंतर) आयुर्मानाचे प्रमाण जवळपास सारखेच असायला हवे. पण, तसे व्यवहारात लक्षणीयरीत्या आढळत नाही.

सर्वच जुळ्यांमध्ये एकसमान एकसमान जनुके नसतात. याचे एक धडधडीत उदाहरण म्हणजे जुळ्यांतील एक मुलगा व एक मुलगी असणे ! तंतोतंत एकसमान (identical) जनुके असणार्‍या जुळ्यांना, एकसमान जुळी (identical twins) म्हणतात. अश्या जुळ्यांच्या आयुर्मानातील फरकावर, केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की, माणसाच्या आयुर्मानावर जनुकांचा फक्त २०% इतकाच प्रभाव असतो. याचा अर्थ असा की मानवाचे आयुर्मान ठरविण्यात, जनुके सोडून इतर अनेक घटकांचा ८०% इतका मोठा सहभाग असतो.

ते इतर घटक शोधून काढण्यासाठी, नॅशनल जिओग्राफिक्सच्या सहकार्याने केलेल्या, जगातील दीर्घायुषी लोकांच्या (नीलप्रदेशांतील लोक आणि इतर ठिकाणच्या दीर्घायुषी लोकांचे गट) सर्वेक्षणामध्ये खालील गोष्टी आढळल्या...

आ) आपल्या नियंत्रणात येऊ शकतील असे, "इतर घटक" :

१. नैसर्गिक हालचाल : हे लोक वजन उचलणे (आयर्न पंपिंग), दीर्घ अंतराचे धावणे (मॅरॅथॉन रनिंग), किंवा व्यायामशाळेतील इतर कठीण व्यायाम करत नाहीत. त्याविरुद्ध, ते नकळत (पक्षी : खास विचार न करता, सवय/आवश्यकता म्हणून) सतत हालचाल करावी लागेल अश्या कृती करत असतात. आर्थिक सुस्थितीत असले व कष्टाचे काम करायची गरज नसली तरी ते बागकामासारख्या छंदामध्ये स्वतःला गुंतवणारे असतात. ते शक्यतो, घरात व घराबाहेरही, शारीरिक हालचाल कमी करावी लागेल अशी यांत्रिक साधने वापरण्याचे टाळतात.

२. जीवनाचा उद्येश : ओकिनावाचे लोक ज्याला "इकिगाई (Ikigai)" म्हणतात, तर निकोयातील रहिवासी "देवाची योजना (plan de vida) म्हणतात, त्या दोन्हींचा अर्थ "जीवनाचा उद्येश" असा होतो. जीवनातले ध्येय मानसिक ताकदीत भर घालते व शारीरिक कृतीला उत्साह निर्माण करते. यामुळे, आयुर्मानात सुमारे ७ वर्षांची भर पडते असे आढळले आहे. दिशाहीन जीवन बहुदा निराशेचे कारण बनते. निराशेचा सर्वसाधारण रोगप्रतिकारशक्तीवर (immunity) व म्हणून आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो, हे सर्वमान्य आहे. अर्थातच, निरुद्येश व्यक्तीच्या आयुर्मानावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो.

३. ताणतणाव : मानसिक व सामाजिक ताणतणाव आरोग्यावर, आणि म्हणून आयुर्मानावर, प्रतिकूल परिणाम करतात, हे सर्वमान्य आहे. नीलप्रदेशातील लोकही ताणतणावापासून मुक्त नसतात. मात्र, दीर्घायुषी गटांत घट्ट कौटुंबिक व सामाजिक संबंध आढळतात. हे संबंध अधिकाधिक घट्ट रहावे यासाठी अनेक कौटुंबिक व सामाजिक प्रथा/रुढी कटाक्षाने पाळल्या जातात. उदा : सर्वसाधारण सण-समारंभ, धार्मिक मेळावे, प्रार्थनासभा, इत्यादी, इकॅरियन लोकांमधील दुपारची झोप, सार्डिनियन लोकामधील "हॅपी अवर", इत्यादी. अश्या कृती माणसांमधील जवळीक वाढवत व सुखदु:खात मानसिक आधार मिळाल्यामुळे मनावरचे ओझे कमी करण्यास मदत करतात. याचा आरोग्य व आयुर्मानावर सकारात्मक परिणाम होतो.

४. ८०% नियम : ओकिनावामध्ये “Hara hachi bu” हा कन्फ्युशिअन मंत्र कटाक्षाने पाळला जातो. त्याचा अर्थ असा की ८०% पोट भरले की जेवण थांबवा. पोटाला तडस लागेपर्यंत खाणे सर्वच नीलप्रदेशांत टाळले जाते. ही सवय आणि 'सतत केली जाणारी हालचाल' यांचा संयोग, स्थूलपणा आणि त्याबरोबर येणारे अनारोग्य टाळते, हे सांगायला नकोच.

५. शाकाहाराकडे झुकाव : शाकाहार व विशेषतः भरपूर कडधान्ये असलेला आहार, सर्वच नीलप्रदेशांत सर्वसामान्यपणे आढळतो. तेथे मांसाहार आठवड्यांतून सरासरी फक्त पाच वेळाच केला जातो आणि एका वेळेस फक्त ३ ते ४ औंस (सुमारे ८५ ते ११० ग्रॅम) मांस खाल्ले जाते.

६. वारुणी(वाइन)सेवन @५ : अ‍ॅडव्हेंटीस्ट पंथाचा समाज सोडून इतर नीलप्रदेशात, नातेवाईक व मित्रांबरोबर, मर्यादित प्रमाणात (moderate, १ ते २ ग्लास/दिवस) वारूणीसेवन व जेवण केले जाते. मर्यादित प्रमाणात मद्यसेवन करण्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो हे शास्त्रीयरीत्या सिद्ध झाले आहे. मात्र, दिवसाला ६०मिली व्हिस्की किंवा समप्रमाणात इतर वारुणीची सीमा ओलांडल्यास, आरोग्यावरचे परिणाम नकारात्मक होऊ लागतात. तसेच, दिवसाला ६०मिली म्हणजे, (पहिले पाच/सहा दिवस न पिता) आठवड्याच्या शेवटी ४२० मिली मद्य पिणे नव्हे, हे सुद्धा पक्के ध्यानात ठेवायला हवे. नियमित एकत्र येण्याच्या व एकत्र भोजन करण्याच्या सवयीमुळे कौटुंबिक व सामाजिक संबंध जास्त घट्ट होतात. याचा आरोग्य व आयुर्मानावर सकारात्मक परिणाम होतो.

७. धार्मिक/पंथिक संबंध : सर्वेक्षणातील २६३ पैकी ५ सोडून इतर सर्व शंभरी पार केलेले लोक कोणत्या ना कोणत्या पंथाचे (faith-based community) अनुयायी होते. या आणि इतर संशोधनांत असे आढळून आले आहे की दर महिन्याला चार सत्संग/प्रार्थनासभांना उपस्थित लावणार्‍यांच्या आयुर्मानात ४ ते १४ वर्षांनी वाढ होते.

८. कौटुंबिक प्रेमसंबंध : नीलप्रदेशातील शतकवीरांच्या जीवनात कौटुंबिक संबंधांना (families first) अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे आढळून आले.
८.अ) वृद्धापकाळात पती/पत्नी जवळ असण्याने त्यांच्या आयुर्मानात ३ वर्षांची वाढ होते, असे आढळले आहे.
८.आ) बालपणात जवळिकीने काळजी घेतलेली मुलांमध्ये, आपल्या वृद्ध आई-वडिलांची मनःपूर्वक काळजी घेण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त असते.
'जवळिकीचे संबंध असणे' आणि 'एकत्र किंवा जवळपास राहणे' यामुळे कुटुंबांतील वृद्ध व मुले या दोन्हींच्या मनःस्वास्थ्यावर, आरोग्यावर व आयुर्मानावर, सकारात्मक परिणाम होतो.

९. योग्य गटाचे सभासदत्व : येथे, "योग्य गट" म्हणजे, (वर वर्णन केलेल्या) आरोग्यदायक सवयी असलेल्या लोकांचा गट, असे समजावे. दीर्घायुषी लोक एकतर योग्य गटात जन्मलेले असतात, आपल्याभोवती योग्य गट जमवतात किंवा योग्य गटात राहण्याची निवड करतात. उदा : ओकिनावन्समध्ये आयुष्यभर घट्ट मैत्रीचे संबंध असलेल्या पाच लोकांचे moais गट बनविण्याची प्रथा आहे. तसेही, माणूस समविचारी व समआचारी लोकांच्या संगतीत जास्त रमतो व जास्त आनंदी राहतो... असा गट जर सकारात्मक सवयी असलेल्या लोकांचा असेल तर त्याचा आरोग्य व आयुर्मानावर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल.

Framingham Studies नावाने प्रसिद्ध असलेल्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, सर्व प्रकारच्या सवयी संसर्गजन्य असतात... (अ) जश्या सिगरेट ओढणे, अतीखाणे, इत्यादी समान सवयींच्या लोकांची मैत्री होते व त्यांच्या त्या सवयींत वाढ होते, तसेच, (आ) चांगल्या सवयींमुळेही लोक एकत्र येतात व एकमेकाच्या सकारात्मक सवयींत वाढ करतात. अर्थातच, आरोग्यदायक सवयी असलेल्या लोकांच्या गटातील सभासद एकमेकाचे आरोग्य व आयुर्मान वाढवतात, हे सांगायला नकोच.

वरच्या माहितीवरून खालील गोष्टी स्पष्ट होतात...

* जनुकीय वारसा आपल्याला जनुकीय लॉटरीने मिळणारी गोष्ट आहे आणि म्हणूनच, आपल्या नियंत्रणात नसलेली गोष्ट आहे. अर्थातच, त्यामध्ये आपण काहीच बदल करू शकत नाही. मात्र, आयुर्मानावर जनुकांचा फक्त २०% परिणाम होतो.

* त्याचबरोबर, आपल्या नियंत्रणात येऊ शकणारे "इतर घटक" मानवी आरोग्य व आयुर्मानावर ८०% परिणाम करतात, ही आशादायक गोष्ट आहे. कारण, या इतर घटकासंबंधात सकारात्मक कृती करून, आपल्याला आरोग्य व आयुर्मान वाढवणे शक्य आहे. नीलप्रदेशांतील लोकांच्या अनुभवावरून, या "इतर घटकांचा" आपल्या रोजच्या व्यवहारात सकारात्मक उपयोग केल्यास, आयुर्मान १०-१२ वर्षांपर्यंत वाढू शकते.

* हे "इतर घटक", मानवी जीवनशैलीचे महत्त्वाचे अविभाज्य घटक आहेत. आपल्या जीवनशैलीचा आपल्या आनंद, आरोग्य आणि आयुर्मानावर लक्षणीय प्रभाव पडतो.

***************

या भागात, (अ) आपल्या नियंत्रणाबाहेरच्या व नियंत्रणातल्या घटकांचा आपण परिचय करून घेतला व (आ) त्या घटकांच्या आपल्या जीवनावर पडणार्‍या प्रभावाचा धावता आढावा घेतला. यापुढे, आतापर्यंत जमवलेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर, आपले जीवन व्यापणार्‍या जीवनशैलीबद्दलची अजून काही तथ्ये जाणून, तिला आपल्यासाठी जास्तीत जास्त फायदेशीर कसे बनवता येईल, हे आपण पाहूया.

***************

(क्रमश :)

धोरणआरोग्य

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

7 Dec 2018 - 2:37 pm | कुमार१

आवडले.

उत्तम विषयावर मालिका. धन्यवाद.

अनिंद्य's picture

7 Dec 2018 - 3:25 pm | अनिंद्य

डॉक्टर साहेब, लेख म्हणजे 'हेल्दी लाईफ कॅप्सूल' शब्दात मांडलंय, खूपच छान.

'इतर' घटकांचा स्वतःपुरता स्कोर काढून बघितला :-

२, ३, ९ - प्रयत्न चालले आहेत.
६ - फारच मोलाची माहिती, सुयोग्य वापर करणेत येईल.
७ - उदासीन आहे.
१, ४, ५ - जमतंय बऱ्यापैकी :-)

पु भा प्र,

अनिंद्य

शाम भागवत's picture

7 Dec 2018 - 5:42 pm | शाम भागवत

६ - फारच मोलाची माहिती, सुयोग्य वापर करणेत येईल.
म्हणजे काय?
न पिणाऱ्याने ६० एम.एल. प्यायला सुरवात करावी असा घ्यायचा का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2018 - 9:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

न पिणाऱ्याने ६० एम.एल. प्यायला सुरवात करावी असा घ्यायचा का? =))

त्यांचे म्हणणे असेही असू शकेल...
१. कुटुंब किंवा समविचारी सुहृदांबरोबर नियमितपणे एकत्र येऊन भोजन करणे.
१. दिवसात ६० एम.एल. पेक्षा जास्त असलेले प्रमाण ६० एम.एल. पर्यंत खाली आणणे.
२. विकांतात जास्त पिण्याऐवजी दिवसाला ६० एम.एल. किंवा कमी असे प्रमाण करणे.

सकारात्मक विचार करण्याने आरोग्य व आयुर्मान सुधारण्यास मदत होते. ;) :)

अनिंद्य's picture

10 Dec 2018 - 12:32 pm | अनिंद्य

रोज मद्य मिळायला आमचे पुण्य कमी पडते हो :-)

आमच्यासाठी सुरा म्हणजे मित्र-परिवारासोबत खास आनंदोत्सव साजरे करण्याचे माध्यम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Dec 2018 - 3:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

मित्र-परिवारासोबत कधी कधी आणि माफक प्रमाणात सुरापान करणे "सोशल ड्रिंकिंग" प्रकारात मोडते... या प्रकारात सुरापानाचे कोणतेच लक्षणिय फायदे अथवा तोटेही होत नाहीत.

महत्त्वाची लेखमाला.

४. भुकेपेक्षा दोन घास कमी खा असे आमच्या पारंपरिक जीवनशैली/संस्कारात म्हटले आहेच की. त्याला आता शास्त्रीय जोड मिळाली.

आता वैयक्तिक जीवनाशी मिपा थेट जोडले गेले. धन्यवाद.

महत्त्वाची लेखमाला.

४. भुकेपेक्षा दोन घास कमी खा असे आमच्या पारंपरिक जीवनशैली/संस्कारात म्हटले आहेच की. त्याला आता शास्त्रीय जोड मिळाली.

आता वैयक्तिक जीवनाशी मिपा थेट जोडले गेले. धन्यवाद.

यशोधरा's picture

7 Dec 2018 - 3:44 pm | यशोधरा

इकॅरियन लोकांमधील दुपारची झोप

बघा! इकॅरियन लोकांनी सांगितले जी चांगले आणि पुण्यातले आम्ही कधीचे सांगतोय की १ ते ४ वामकुक्षी करा, त्याला मात्र हसायचे ना!! =))

इकॅरिअन व इटली देश यांचा काही संबंध आहे का?
इटलीमधे दुपारी झोपण्याची पध्दत आहे अस ऐकल होत.

रागो's picture

7 Dec 2018 - 4:11 pm | रागो

उत्तम विषयावर मालिका

टर्मीनेटर's picture

7 Dec 2018 - 4:36 pm | टर्मीनेटर

जबरदस्त लेख...
छान माहिती ...आवडला.

शाम भागवत's picture

7 Dec 2018 - 5:48 pm | शाम भागवत

सुंदर चाललीय मालिका.
पुभाशु
_/\_

कंजूस's picture

7 Dec 2018 - 5:55 pm | कंजूस

मजेदार लेखमाला.
मुंबईतले लोकल ट्रेनने प्रवास करणारे दीर्घायु होणार॥ ज्या फलाटावर गाडीची वाट पाहत असतात ती ऐनवेळी दुसरीकडे लागेल ही घोषणा होते. मग तिकडे जातात जिने चढून.
म्हणूनच मुंबईची लाइफलाइन म्हणतात लोकल ट्रेनला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Dec 2018 - 8:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद !

पुढच्या भागात, आपण आपली जीवनशैली शक्य तेवढ्या सुयोग्यपणे कशी विकसित करू शकतो, याबद्दल विश्लेषण असेल. एखादी शंका/प्रश्न मनात असल्यास अथवा आतापर्यंतच्या माहितीत काही कमतरता वाटली तर इथल्या प्रतिसादात जरूर लिहा. त्यामुळे पुढचा भाग व्यवहारात अधिक उपयोगी बनण्यास मदत होईल.

व्वा व्वा, नंबर सहा एक नंबर !!

हो आणि सीएस्टा हि महत्वाची बर्का ! आपण त्याला चित्ळेस्टा म्हणू या का?

मारवा's picture

9 Dec 2018 - 5:36 am | मारवा

पण मस्क्युलर स्ट्रेंथ जी जसजसे वय वाढते तसतशी अत्यावश्यक होत जाते ती मिळवण्यासाठी त्याचबरोबर दुसरा घटक लवचिकता जी प्राप्त करण्यासाठी केवळ दींनंदिन
फिजीकल अ‍ॅक्टीव्हीटी पुरेशी कशी पडणार ?
वजना वा रेजीस्टन्स चे व्यायाम ( म्हणजे दिनचर्येत लाकुड फोडणे वा उचलणे या सारख्या इतर दमदार क्रियांचा समावेश नाहीये असे गृहीत धरुन म्हणतोय )
मस्क्युलर स्ट्रेंथ जो आपला सांगाडा सांभाळुन ठेवते. हाडे जी वयाबरोबर ठिसुळ होत व आक्रसु लागतात त्यांच्यासाठी स्पेसीफीक व्यायाम जो सर्वाएतत सुलभतेने जिम मध्ये करता येतो. म्हणजे इतर मार्गाने जरी साध्य झाला तरी तितकी कठोर जीवनशैली सध्या शहरी माणसाची तरी नाही. अगदी असली तरी ज्या शास्त्रीय रीतीने जिम मध्ये ( अर्थात चांगले मार्गदर्शन व मशीन्स उपलब्ध असलेल्या हे गृहीत धरुन ) हे साधणे अधिक सोपे आहे असे वाटते.

योग्यच आहे. व दिवसातुन एकदाच जोरदार व्यायाम करुन इतर २३ तासांत निष्क्रीय राहणे वा बसुन काम करणे अत्यंत चुकीचेच आहे. पण म्हणून इलॅस्टीसीटी व मस्क्युलर स्ट्रेंथ साठी किमान बेसीक व्यायाम टाळणे हे पटत नाही. दोन्ही फ्डेली फिजीकल अ‍ॅक्टीव्हीटी व स्पेसीफिक एक्सरसाईज या सर्वस्वी वेगळ्या बाबी आहेत व दोन्ही अत्यावश्यक आहेत निरनिराळ्या कारणांसाठी त्यांचे वेगवेगळे फायदे आहेत गरज आहेत.. सध्याच्या आघाडिच्या रुतुजा दिवेकर यांनीही त्यांच्या व्यायामाच्या पुस्तकातदो डोन्ट लुज वर्क आउट मध्ये याचा उत्तम उहापोह व दोन्ही बाबींची आवश्यकता व फरक व सर्वसाधारण लोकांच्या डोक्यात असलेला भ्रम की आम्ही दिवसभर भरपुर काम करतो घरकाम करतो म्हणुन आम्हास वेगळ्या स्पेसीफिक व्यायामाची गरज नाही हा उत्तम दाखवलेला आहे. तसेच एकदा व्यायाम केला दणकुन आता दिवसभर बसुन पडुन राहतो नव्हे हा हक्कच आहे. असे दोन्ही बाजुचे समज कसे चुकीचे आहेत ते दाखवलेले आहेत.
तुम्ही आग्रह केलेला मुद्दा डेली कंटिन्युअस फिजीकल अ‍ॅक्टीव्हीटी करणे त्याच्या दिवसभरातल्या छोट्या छोट्या संधी शोधणे हे अत्यंत आवश्यक व योग्यच आहे यावर मला आवडलेले अत्यंत सुंदर पुस्तक नो स्वेट हे जरी एकांगी असले तरी त्यातील फिजीकल अ‍ॅक्टीव्हीटी च्या बाजुने प्रबोधन करणारे फार च सुंदर पुस्तक आहे असे वाट्ते. ज्यांना रस असेल त्यांच्यासाठी
1

रुतुजा दिवेकरांच्या आहार पुस्तकांपेक्षा हे व्यायामावरील बेसीक कन्सेप्ट क्लीअर करण्यास मदत करणारे पुस्तक अधिक चांगले आहे यातील सिटींग इज न्यु काइंड ऑफ स्मोकींग हे वाक्य मला फार आवडले. व्यक्तीगत मी प्रामुख्याने अनेक वर्षापासुन रनींग व जिम दोन्ही भरपुर करर्तो दोन्ही कडुन अनेकोनेक फायदे मला झालेत. विशेषत: रनींग च्या पॅशन ने तर खुप काही
.2

तुर्तास सापडलेली एक लिंक जी फिजीकल अ‍ॅक्टीव्हीटी व एक्सरसाइज चा फरक दाखवते. यातला ठळक भाग
Physical activity is movement that is carried out by the skeletal muscles that requires energy. In other words, any movement one does is actually physical activity.

Exercise, however, is planned, structured, repetitive and intentional movement intended to improve or maintain physical fitness. Exercise is a subcategory of physical activity.

Research provides significant evidence that ALL physical activity positively contributes to overall health and well-being. Exercise also assists with the improvement of physical fitness, which consists of five specific components:

-Cardiorespiratory fitness

-Muscular strength fitness

-Muscular endurance fitness

-Flexibility fitness

-Body composition

As you evaluate your 24-hour activity reflection, consider making a detailed plan that includes both elements:

1. Daily increased physical activity

2. Structured, planned, intentional exercise to improve physical fitness

Omitting one or the other can have serious and detrimental consequences for your health, fitness and overall well-being. Don’t be a couch potato or an active couch potato—make the change today and add BOTH elements to your life to reap the life-changing benefits of physical activity and exercise.

https://www.acefitness.org/education-and-resources/lifestyle/blog/5460/p...

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2018 - 2:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ मारवा :

धन्यवाद !

तुम्ही मांडलेल्या मुद्यांबाबत बरेच गैरसमज आस्तित्वात आहेत. त्यांसंबंधीचे विवरण व विश्लेषण पुढच्या भागात येईल.

मराठी कथालेखक's picture

10 Dec 2018 - 6:38 pm | मराठी कथालेखक

ताणतणाव मुक्त /आनंदाने रहायचं ठरवलं...> आता आयुष्य वाढेल ...> वाढलेल्या (निवृत्त) आयुष्याकरिता वाढीव अर्थिक तजवीज करायला हवी > आला की ताण :)

चामुंडराय's picture

29 Dec 2018 - 9:17 am | चामुंडराय

डॉ. साहेब, तुम्ही क्रम शहा लिहिले आहे.
पुढचा भाग येऊंद्या बिगी बिगी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Dec 2018 - 4:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

सद्या एका मोठ्या कामात गुंतलेला असल्याने उशीर झाला, याबद्दल दिलगिर आहे. लवकरच तिसरा भाग लिहायला सुरुवात करेन.

सुबोध खरे's picture

31 Dec 2018 - 7:34 pm | सुबोध खरे

अतिशय उत्तम लेख
आयुर्मान( दीर्घायुषी /quantity) आणि आरोग्य( आरोग्यपूर्ण/ quality) यांच्यातील सांगड घालणारा हा लेख एकंदर संपूर्णतेचा विचार करणारा आहे.
बहुसंख्य आरोग्याशास्त्रावरील लेख हे एकाच अंगाचा विचार करणारे असतात ( बरेचसे तसे असावेत ही कारण एका अंगाचा व्यवस्थित परिचय होणे सुद्धा आवश्यक आहेच) .
परंतु एकंदर आयुर्मर्यादेवर आणि आरोग्यावर परिणाम होणाऱ्या अंगांबाबत संपूर्णतेने विचार करणारे लेख फारच कमी असतात.

पुढचे लेख लवकर येऊ द्या.

सचिन काळे's picture

18 Jan 2019 - 9:09 pm | सचिन काळे

पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

युयुत्सु's picture

19 Jan 2019 - 7:10 pm | युयुत्सु

एका std deviation पेक्षा जास्त मिळणारे आयुष्य विकृती (disorder) मानता येईल का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jan 2019 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्हाला "आउटलायर" ही संज्ञा माहीत असावी अशी अपेक्षा आहे (?होती). :)