जाणवे मज आज जेव्हा
काहीच नसे इथे आपुले,
सांगू कुणा ही व्यथाच माझी
शोधूनी आता मन हे थकले ||१||
अथांग या दुनियेमधला
जणू उपरा मी भाडेकरू,
स्वकेंद्री अशा अवनीवरती
कुणालाच मी माझे म्हणू? ||२||
मी यावे अथवा जावे
लोचनी न कुणाच्या आसवे,
कुणा न वाटे हृदयामधूनी
मन मोकळे करावे मजसवे ||३||
धावतो मी रोज आहे
काहीतरी मिळवावया,
सिनेमाच तो पडदा नुसता
वेळ लागला मज कळावया ||४||
कशापरी तू धाडीलेस मज
सुटेल का कधी कोडे देवा?
गतजन्मींच्या पापांचा वा
पुण्याईचा म्हणू हा ठेवा? ||५||
माणुसकीच्या जंगलामध्ये
मिळेल का ममतेचा झरा,
प्रत्येकाचे पाय मातीचे
कळेच ना मज कोण बरा ||६||
कलीयुगाच्या डोहामधले
आयुष्याचे पाश विणू,
माणसाचा मंडूक होता
डबके वाटे विश्व जणू ||७||
सगळे मिळूनही रिते रिते
ही जाणीव का मनी बोचतसे,
इदं न मम हे शाश्वत असूनही
आसक्ती का सुटत नसे? ||८||
अंतरीचे मेघ माझे
पिळवटोनी हसले मजला,
माझे माझे करिता करिता
देव तुझ्यातील का बरं निजला? ||९||
प्रतिक्रिया
21 Nov 2018 - 12:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहित राहा.
-दिलीप बिरुटे