कारण तू

सिक्रेटसुपरस्टार's picture
सिक्रेटसुपरस्टार in जे न देखे रवी...
31 Oct 2018 - 9:43 am

हल्ली मी कुठेच जात नाही.
कारण काय विचारतेस?
कारण तूच.

सवय लागलीये मनाला,
नको तिथे तुझे संदर्भ शोधायची..
तुझ्या पाऊलखुणा,
पुन्हा पुन्हा शोधायची.
एक दिवस उबग आला तुझा,
तुझ्या आठवणींचा,
मग ठरवलं आता जायचंच नाही कुठे..

काय म्हणालीस?
तसंही मला कुठे हौस होती फिरायची?
नव्हतीच ती, आजही नाही
मंदिरात जायची तर कधीच नव्हती हौस
पण तरी यायचो तुझ्याबरोबर..
गर्दीनं रेटून रेटून देवापुढे आणल्यावर
ते एक दोन क्षण काय तृप्त भाव असायचे तुझ्या चेहऱ्यावर
ते टिपायला म्हणून यायचो..
तिथून बाहेर पडल्यावर 'छान झालं नाही दर्शन'
असं घंटेसारख्या किणकिणत्या आवाजात
म्हणायचीस ना?
ते ऐकायला यायचो..
नाहीतर देवाचं आणि माझं कधी जुळलं होतं?

तुला आवडणारा समुद्र तर अगदी बकवास!
अर्ध्या चड्ड्या घालून खाऱ्या पाण्यात डुंबायची कसली हौस?
पण तू किनाऱ्यावरच उभी रहायचीस,
सलवार अगदी वर केली न केल्यासारखी..
तेव्हा लाटा तुझ्या पायांशी खेळताना कशी लहान व्हायचीस..
अंगावर पाण्याचा एक थेंब न उडताही,
चिंब ओलेती झालेली,शहारलेली तू दिसायचीस
ते पहायला म्हणून यायचो..
झालंच तर तू निगुतीनं केलेला, सजवलेला
वाळूचा किल्ला लाटेनं वाहून नेला तर?
हिरमुसला चेहरा करून बसायला सोबत नको तुला?
म्हणून यायचो.
नाहीतर समुद्र हा फारच ओव्हररेटेड आहे
हे माझं मत आजही आहेच..

सांगतो काय, माझ्याच घराच्या अंगणात जात नाही मी..
कमाल? कमाल माझी कसली त्यात?
ही कमालही तुझीच..
नाही वाटत ना खरं?
तुझ्याशिवाय तो प्राजक्ताचा सडा अगदीच पोरका वाटतो..
कुठे तू येऊन केलेलं त्याचं राजेशाही कौतुक,
आणि कुठे आताचा हा अगदी गरीब बिचारा
आवाजही न करता ओघळलेला दवणीय प्राजक्त..
आपलंच प्रतिबिंब दिसेल की काय
भीती वाटते,
म्हणून जातच नाही तिथे..

'असतोस कुठे तू?'
विचारलंसच शेवटी?
तुझा काय दोष म्हणा,
हेच विचारतात हल्ली सगळे.
मला वाटलं होतं तुला तरी दिसलो असेन मी,
कुठल्यातरी मंदिराच्या पायरीवर घुटमळलेला,
वाळूचा किल्ला बनवून स्वतःच मोडत असलेला,
अंगणातल्या प्राजक्ताला डोळ्यांनीच जाळणारा.
पण कसा दिसणार म्हणा?
त्यासाठी तू स्वतःला नीट पहायला हवं ना..
तू सहज गेलीस पुढे निघून..
एकदा शिकव, समजून सांग मला
इतकं सगळं कसं सोडून गेलीस मागे?

काय म्हणालीस?
"का आलायस तू इथे? जा इथून.."
तुझंही बरोबरच आहे म्हणा..
हल्ली मी कुठे जात नाही म्हणायचं,
आणि बरोबर तुझ्या घरी टपकायचं,
यात काही लॉजिक असूच शकत नाही.
काही नाही, फक्त तू कशी असशील?
म्हणजे झुरत वगैरे तर नाहीस ना?
एवढंच बघायचं होतं,
बाकी विशेष काही नाही..
आणि तुला सांगायचंही होतं,
तसं बायकोची हौस म्हणून मी तिला नेतो कुठे कुठे..
पण मी खरंतर हल्ली कुठेच जात नाही.

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

31 Oct 2018 - 9:52 am | मुक्त विहारि

मस्त...

सिक्रेटसुपरस्टार's picture

1 Nov 2018 - 9:50 am | सिक्रेटसुपरस्टार

पहिल्याच प्रतिसादासाठी धन्यवाद!

पद्मावति's picture

1 Nov 2018 - 10:39 am | पद्मावति

आवडली. सुरेख.

प्राची अश्विनी's picture

3 Nov 2018 - 8:38 am | प्राची अश्विनी

+११

सिरुसेरि's picture

3 Nov 2018 - 9:14 am | सिरुसेरि

छान . "मै और मेरी कविताएं..." ची आठवण झाली .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2018 - 9:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनापासून आवडली कविता. आपलंही असंच असतं तेव्हा कविता थेट उतरते.

सकाळ सुंदर झाली. आभार आणि लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

धनावडे's picture

4 Nov 2018 - 11:05 am | धनावडे

+1

सिक्रेटसुपरस्टार's picture

4 Nov 2018 - 10:02 am | सिक्रेटसुपरस्टार

प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Nov 2018 - 3:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त जमलिये..

प्रमोद देर्देकर's picture

5 Nov 2018 - 8:44 pm | प्रमोद देर्देकर

मस्त कविता. आवडली . पदार्पणातच सीक्सर मारलीत की.

सस्नेह's picture

5 Nov 2018 - 9:30 pm | सस्नेह

काव्याने ओथंबलेली कविता !

सिक्रेटसुपरस्टार's picture

6 Nov 2018 - 7:56 am | सिक्रेटसुपरस्टार

धन्यवाद आणि दीपावलीच्या शुभेच्छा!