कोणाकडे प्रतिभेची कुंडले असतील तर,
तर ती उतरवूनच ठेवावी.
कारण ती मागणारे इंद्र,
रस्तोरस्ती उतरलेत.
तुमची प्रतिकं असतील मारे प्रत्यक्षाहून उत्कट
तुम्हीहून ती जाळा.
कारण प्रत्यक्षांच्या उरावर,
त्यांना थयाथया नाचवणारे,
तुमच्या अंगणात आलेत.
अभ्यासाचं कवच काढूनच टाकावं
रक्तबंबाळ झालात तरी.
कारण, ते देणाऱ्या सूर्याने
त्याचं तेज गहाण टाकलय.
मुळात कलेबिलेची गरज भासावीच का तुम्हाला?
नाईट लाईफची झिंग घ्यावी की उशाला!
कोण कुठले पिडीत-बिडीत, हव्या कशाला उठाठेवी
पाण्याचं इंधन होतयं आणि माणसांची आगकाडी.
लाख म्हणवाल माणसांचे कवी
पण, माणसंच कुठं उरलीत?
माणसांमाणसांना गाडून,
लिंग,जाती,धर्मांची भुतावळ उठलीय.
अस्मितेच्या वाळक्या भाकऱ्या वाटणाऱ्यां फौजा
फिरतायत जागोजागी.
रोजच्या जगण्यात मरण अनुभवणाऱ्यांना
झेंड्याच्या रंगांची देतायत हमी.
कथा,काव्य,कल्पना वगैरे त्यांना सिंधुलिपीतल्या
मुळाक्षरांएवढंच अगम्य आहे.
विवेकावर माती टाकत रान उठवून द्यायचं,
एवढंच त्यांचं काम आहे.
प्रतिक्रिया
6 Oct 2018 - 4:47 pm | श्वेता२४
प्रसंगाला साजेशी वाटते. छान आहे. आवडली
8 Oct 2018 - 7:21 am | प्राची अश्विनी
आवडली.
8 Oct 2018 - 8:52 am | अभिजीत अवलिया
उत्तम.
8 Oct 2018 - 9:16 am | ज्ञानोबाचे पैजार
वास्तव दर्शी कविता आवडली,
पैजारबुवा,
8 Oct 2018 - 5:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तम कविता..!
-दिलीप बिरुटे
10 Dec 2018 - 7:20 pm | पिंट्याराव
.