मन

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
1 Oct 2018 - 7:46 pm

असे समुद्र अथांग, मन त्याहूनही खोल
हिमालय जो उत्तुंग, मन त्याहूनही थोर

वाहताना होते नदी कधी वाकडी वेल्हाळ
मन जागच्या जागीच आणि तरीही नाठाळ

लहरी वारा आणे पाण्यावरती तरंग
मनी उठता तरंग लहरते अंतरंग

वेगवान प्रकाशाला संथ काळाचीच साथ
संथ जीवनी राहून मन धावते वेगात

तारे टांगले ज्यावर त्यास म्हणती अंबर
मन टिपते विश्वाला, मन विश्र्वाचे झुंबर

मूल पाहताच मन लहानाहून लहान
तेच तन तेच मन खरे तेव्हांच महान

हाव भाव राग लोभ, मनी अगणित मिती
देव धर्म पाप पुण्य, सारी त्याचीच निर्मिती

अवकाश पोकळीत होय अंधाराची सीमा
मनाच्या पोकळीला नाही कसलीच सीमा

क्षण त्यास युगासम, युग कधी त्यास क्षण
जगण्यास प्रेरक ते मन काळास शरण

विश्व काळोखाचे घर, चांदण्याने उजळते
मन दुःखात बुडता, ज्योत ज्योतीने पेटते

मन एकटे एकटे त्यास सोबतीचा ध्यास
ज्याची मागते सोबत त्यास वेगळीच आस

ढोल आत किती शांत आणि बाहेर गोंगाट
मन आतून गोंगाट अन बाहेर बिनबोभाट

दोन घास खाऊनिया भूक पोटाची भागते
हवे नको ते मिळता भूक मनाची वाढते

भरलेल्या पोटी मन कठीण वज्रासमान
पोटी पडताच खड्डा, मन वाकली कमान

इथे तिथे नको पाहू, इतरेजनांना सांगते
कळत वा नकळत स्वतः सगळे चाखते

मन पाहते सारेच, असो मूर्त वा अमूर्त
मूर्त मानते स्वतःला पण असते अमूर्त

... संदीप लेले

कविता

प्रतिक्रिया

दोन घास खाऊनिया भूक पोटाची भागते
हवे नको ते मिळता भूक मनाची वाढते

ही कल्पना खूप आवडली. :-)

चौकस२१२'s picture

17 Mar 2020 - 5:55 am | चौकस२१२

छान.... चाल कोण लावणार? सलील कुलकर्णी कि श्रीधर फडके !

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Mar 2020 - 8:31 am | ज्ञानोबाचे पैजार

मनाचे श्लोक आवडले,
चालीचे म्हणाल तर वादळवाट ची चाल एकदम फिट बसते या गाण्याला
पैजारबुवा,

संदीप-लेले's picture

17 Mar 2020 - 10:56 am | संदीप-लेले

राघव, चौकस २१२ आणि ज्ञानोबाचे पैजार - धन्यवाद !

वादळवाट ची चाल - खरच की ! व्वा, छान कल्पना दिलीत पैजारबुवा!

संदीप-लेले's picture

17 Mar 2020 - 11:04 am | संदीप-लेले

कविता मिपा वर टाकल्यानंतर सुचलेल्या ओळी:

डोह मनाचा नितळ, त्याच्या तळात आभाळ
दिसे गढुळ डोहाच्या, पृष्ठभागीच पाताळ