कशाला हसावे कशाला जगावे
कशासाठी अन्याय हा पार्थवा
असत्यास कवटाळुनी मी जगावे
कुणाला वदू माझी ही वंचना
निशेच्या कुशीतून जन्मास यावे
मला बागडाया तमाचे रण
कधी भेट नाही स्वतःच्या पित्याची
संबोधती सूर्य नारायण
नसावे मला का कधी स्वत्व माझे
पित्याने दिले दान तेजः कण
युगे लोटली आज आहे उभा मी
निशेला करोनि स्व ला अर्पण
सभोवताली अति क्षुद्र तारे
स्व प्रकाशे आनंदात तेजाळती
कधी सर्व एकत्र येऊनि मजला
कटू बोल बोलुनी वेडावती
जरी पृथ्वी लोकी अति मूल्य माझे
स्वतःसाठी आहे अति गौण मी
आकारे ही पूर्णत्व नाहीच मजला
रवीच्या प्रकाशे सदा अर्ध मी
नको ते अलंकार तेजः कणांचे
जयावीन मी न माझा उरे
नको ती स्तुती अन नको ती प्रशंसा
मला वाटते सर्व ते उपरे
असे याचना ही तुला पार्थवा रे
युगांची असे ही खरी साधना
भूमंडलास निःशब्द करण्या स्व तेजे
नभी पेटवावे तमा एकदा
प्रतिक्रिया
14 Sep 2018 - 1:18 pm | प्रचेतस
सुरेख कविता.
ही घ्या तुम्हास एक चंद्रमूर्तीची भेट.
14 Sep 2018 - 1:50 pm | श्वेता२४
पृथ्वीचे प्रेमगीत सारखे हे चंद्राचे मनोगीत म्हणावे का
14 Sep 2018 - 1:57 pm | पद्मावति
सुरेख कल्पना.
15 Sep 2018 - 9:29 am | कलम
प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
16 Sep 2018 - 10:02 pm | दुर्गविहारी
छान ! "हा खेळ सावल्यांचा" या मराठी चित्रपटातील गाणे आठवले
" हा चंद्र ना स्वयंभु । रवीतेज वाहतो हा ।
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा। "
पु.ले.शु.
21 Sep 2018 - 10:16 am | कलम
प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
8 Oct 2018 - 7:25 am | प्राची अश्विनी
वाह!