कार्यकर्ता

आकाश५०८९'s picture
आकाश५०८९ in जनातलं, मनातलं
8 Sep 2018 - 2:11 pm

कार्यकर्ता

’कार्यकर्ता काय म्हनला? दिलं का?’
धापा टाकत हॉटेलात दाखल झालेल्या रमेशने सुरेशला विचारलं.
’आरं मग! मला देत नाई व्हय. आपली वटच तशी हाय.’ सुरेश म्हणाला आणि ’ ए! चा आनी दोन मिर्ची दी रे’ अशी हॉटेलवाल्या पोराला ऑर्डरही सोडली.
’कसं जमतं हो तुम्हाला?’

’ह्ये बग, तुला पटणार न्हाई, परत्येकाला काय ना काय तरी खाज असतीच. कुनाला सवताला बरं म्हून घ्यायची खाज, तर कुनाला दुसर्‍याला नाव ठिवायची खाज. आत्ता हाच कार्यकर्ता बग. ह्येला अडलं नडलं त्येला पैसं देयाची लई खाज. प्रवचनं ठोकायची खाज. हितं तत्वज्ञानं ऐकायची होस कुनाला हाय? पन गावतात ना पैसं. आपण खाजवत र्‍हायचं. कार्यकर्ता बी जोरात आपन बी जोरात.’
यथावकाश आलेल्या मिर्चीवर असलेला पिठाचा कुरकुरीत पापुद्रा बाजूला करून तो खात सुरेश म्हणाला,
’कार्यकर्ता ह्या तळलेल्या मिर्चीगत आसतो बग. आख्खी मिर्ची तोंडात घालशीला तर तीख लागते. वरचं कुरकुरीत खायचं बग. तेला बी बरं आन आपल्यालाबी बरं.’
’किती दिलं?’
’काय जास्त न्हाय राव! दीड हजारच गावलं. ते बेनं बी आपल्यासारकच नोकरी करतय. भन कोमात हाय. बायकू बेकार. वरनं दोन पोरी हायत पदराला. जास्त कापायचं न्हाय बगा. गरज भागली, काम झालं.’
’रातच्याला बसायचं का?’
’मंग. होऊन जाव दे.’

रात्रीचा बेत ठरवून दोघेही आपापल्या मार्गाने निघूनही गेले. रमेश आणि सुरेश हे दोघेही नोकरी करतात. दोघांचे स्वत:चे संसार आहेत. बायका पोरं आहेत. नोकरी करणार्‍या प्रत्येकासारखा महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत खिसा भरलेला. वीस पंचवीस तारखेला खाका वर. पैसे संपतात तेव्हाच गरजा डोकं वर काढतात. मग मित्रमंडळींच्याकडे हात पसरण्याशिवाय काहीच पर्याय शिल्लक राहत नाही. मित्रांच्या उदारीवर ह्या दोघांचीही उधारी चालते. आयुष्याचा गाडा कसातरी रेटावाच लागतो. गरजा संपता संपत नाहीत.

सुरेशला पुन्हा गरज लागली, तेव्हा आठवला तो सुहासचा चेहरा. त्यानं ठरवलं. काहीही झालं तरी पुन्हा सुहासला गाठायचंच. दोन चार वर्षांची चांगली मैत्री होती. अनेकदा मदत केलीही होती. पण, एक अडचण होती. आधी घेतलेले पैसे परत केलेच नव्हते. पुन्हा मागणं जिवावर येत होतं. त्याहीपुढची समस्या म्हणजे कारण काय सांगायचं. कारण पटणं फार महत्त्वाचं असतं. आपलं कारण हेच समोरच्या माणसाचा अनुभव असेल तर त्याला आपलं म्हणणं लगेच पटतं, हा सुरेशचा आजपर्यंतचा अनुभव. सुहासची बहीण कोमात होती. त्यामुळे आजारपण म्हणजे काय, किती हाल होतात, याचा त्याला पुरेपूर अनुभव होता. तो नाही म्हणणं शक्यच नव्हतं. मुलगी आजारी आहे, हे कारण त्याला पटण्यासारखं होतं. मुलीला डॉक्टरकडे अर्जंट घेऊन जायचं आहे, असं सांगायचं त्यानं ठरवलं. सुहासला नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये चहाला बोलावलं. एकदम विषय काढणं उचित वाटेना.

’बहीण कशी आहे तुमची?’ या प्रश्‍नाने सुरेशने सुरुवात केली.
’आहे. कोमातच आहे त्यामुळे फक्त पाहणे एवढंच हातात आहे. महिन्याकाठी फार खर्च होतो हो. पण, बहीणच आहे.’ सुहास म्हणाला.
’मानलं राव तुम्हाला. न्हाईतर आजच्या जगात कोण कुणाला बघतो? आमच्या पोरीचं आंग तापलय. आजारही नेमके पंचवीस तारखेनंतर येतात. काय करावं काही कळेना.’
’किती हवेत?’ सुहासनं विचारलं. एवढ्यात मोठमोठ्यानं ओरडत रस्त्यावरचा एक माणूस धावत सुटला.
’कांय ना रे! आवटो तो. लोकाच्या आंगार धावोन वता. लोक आयकता तुकां.’ हॉटेलमध्ये प्रवेश करणार्‍या गृहस्थाने माहिती वाटली. ’पैशे दिता म्हणोन कोण आंगार धावोन वता? दिवनी मरे ताका. हाज्या बापायलें किदें वता. पूण ना. हे आवटे अशेच’.

सुरेशचं आणि सुहासचं लक्ष रस्त्यावर गेलं. दोन माणसं पैशांची देवाणघेवाण करताना दिसली. धावत जाऊन देणाऱ्याचे पाय धरून नको देऊ म्हणून सांगणारा वेडाही दिसला. पैसे घेणार्‍या माणसाने वेड्याच्या पेकाटात लाथ हाणली. तो खाली कोसळला. लाथ घालणार्‍याने पैसे दुसर्‍या हातात घेत, अर्धवट खाल्लेला सँडविच वेड्याच्या अंगावर भिरकावला. वेड्याने खाली पडलेले ब्रेडचे अर्धे तुकडे गोळा केले. मळकट फाटक्या शर्टाला पुसले आणि खाऊ लागला. त्या दोघांनी त्याला हाकलला. तो वेडा रस्त्यावरचा कचरा गोळा करत वेडावाकडा चालू लागला.

’शहाणपणा आणि वेडेपणा याचे अर्थच बदलून गेले आहेत आजकाल. कुणी बघत नाही ना याच अंदाज घेत रात्रीच्या वेळी प्लास्टिकच्या पिशवीत भरून भर रस्त्यावर कचरा टाकणारे, बाटल्या फेकणारे शहाणे असतात आणि त्या फेकलेल्या बाटल्या, पिशव्या उचलून दररोज कचराकुंडीत टाकणारा वेडा असतो.’ सुहास खिन्नपणे म्हणाला.

त्या वेड्यानं गोळा केलेल्या सगळ्या बाटल्या एव्हाना कचरापेटीत टाकल्या होत्या. सुरेश डोळे विस्फारून पाहतच राहिला.

’त्या वेड्याचं नाव कर्ण.’
सुहासच्या वाक्याने सुरेश भानावर आला.
’माझा चांगला मित्र होता एकेकाळी. आता मला काय स्वत:लाच ओळखण्याच्या पलीकडे गेलाय. मी ओळख दाखवणं कधीच सोडून दिलं होतं. पाच हजार रुपये पगार होता तेव्हाही त्याला पैसे पुरत नसत आणि पंचवीस हजार झाले तरीही पुरत नाहीसे झाले. मला कायम प्रश्‍न पडे हा पैशांचं करतो तरी काय? जिथे माझं पंधरा हजारात भागतं, तिथे त्याचं पंचवीस हजारात का नाही भागत? का हात पसरावे लागतात?’
’नाही हो! तुम्हाला नाही कळणार. लई कटकटी असतात. गावाकडं पैसे पाठवायचे असतात, मुलीचं आजारपण. हात पसरायला बरं वाटतं का कुणाला? नाइलाज होतो तेव्हाच मित्रांची आठवण येते. तुम्ही तर काय कुबेर आहात हो आमचे’.
’तुझी गोष्ट वेगळी आहे रे सुरेश. त्याचं तसं नव्हतं. मलाही सुरुवातीला वाटायचं खरंच गरज असेल त्याची. पण, नंतर कळालं. त्याला गरजेपेक्षाही समोरच्याला ’कसं मामा बनवलं’ याचा आनंद मिळवणं जास्त मोठं होतं. त्याला स्वत:च्या बुद्धिमत्तेचा तो विजय वाटे. तशा फुशारक्याही तो मारू लागला. पैसे दिलेल्याकडूनच पुन्हा पैसे उकळले की, मोठ्ठी लढाई जिंकल्याचा आनंद त्याला होत असे. त्या आनंदात मिळालेले पैसे दारूवर उधळले जायचे. संसारासाठी काही नाही. बायको लंकेची पार्वती. इतरांकडून नवर्‍यावरून टोमणे ऐकत, सहन करत ती कसाबसा संसार चालवायची तो मुलीच्या तोंडाकडे पाहून. त्याचंही घराकडे लक्ष नसलं तरी मुलीवर प्रचंड जीव होता. तिच्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी त्याची होती. मुलीचे प्रत्येक हट्ट तो पुरवायचा. मुलगी जीव की प्राण होती. कधी स्वत:च्या चैनीसाठी, कधी क्वचितप्रसंगी मुलीसाठीही तो उसने घेत राहिला. दिलेले पैसे परत करणे हे त्याच्या गावीच नव्हतं. असं वारंवार होऊ लागलं तेव्हा मित्र दुरावू लागले. अनेकांनी आपल्या पैशावर पाणी सोडलं. अनेकांनी मैत्री तोडली. जे शिल्लक होते ते नाइलाजास्तव त्याला सहन करत होते. एके दिवशी मुलगी खूप आजारी पडली. हॉस्पिटलला घेऊन जाणार तर पैसे नाहीत. औषधांसाठी पैसे नव्हते. मित्रांना जीव तोडून सांगितलं, तरी ते त्यांना पटेना. त्यांना त्या भूलथापाच वाटल्या. माझ्याकडे तो आलाच नाही. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरू केले. पण, औषधं तर हवीच होती. जिथे जिथे तो गेला तिथे तिथे नकारच मिळाला. हताश होऊन धावत पळत रिकाम्या हाताने हॉस्पिटलकडे गेला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी मुलीला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. शेवटी व्हायचं तेच झालं....

’सोन्याऽऽऽऽऽ’

मेलेल्या पोरीचं प्रेत घेऊन त्यानं एवढ्या मोठ्यांदा किंकाळी फोडली. त्याच्या आक्रोशानं एका क्षणासाठी सर्वत्र शांतता पसरली. त्या आर्त किंकाळीमुळे आजूबाजूची माणसं स्वत:ची वेदना विसरली, सांगत असलेला विनोद विसरली, धावपळ विसरली, सगळ्या नजरा आवाजाच्या दिशेने पाहू लागल्या. त्याच्या डोळ्यात अश्रू आणि हातात प्रेत होतं. अचानक तो मोठमोठ्याने हसू लागला. ताठ उभा राहिला. हातातून प्रेत जमिनीवर पडलं. तो निघाला. मागे वळून पाहिलंही नाही. त्यादिवशी अंगावर असलेले कपडे आजपर्यंत तसेच आहेत. मळले आहेत, फाटले आहेत. जेव्हा व्यवहारी वेडेपणात आयुष्यच मळतं, फाटतं, तेव्हा मळके, फाटके कपडे बदलण्याचा शहाणपणा करण्याचं भानच राहत नाही. जाऊ दे! तुला किती हवेत?’
’जाऊ द्या ना! तुमची बहीण कोमात आहे. त्यासाठी तुम्हालाही पैसे लागतील. जाऊ द्या.’ सुरेश म्हणाला.
’अरे नाही यार! तुझी पोरगी बरी नाही ना? तिला आधी डॉक्टरकडे घेऊन जा. हे पैसे घे.‘

सुहासने बळजबरीनेच सुरेशच्या खिशात पैसे कोंबले. सुरेशला कसतरीच झालं. ज्या कारणासाठी त्यानं पैसे घेतले ते खरं नव्हतं, याची ती टोचणी होती की त्या वेड्याची हकिकत सुन्न करून गेली, हे काही सुरेशला कळेना. पण, कसलीतरी अनामिक टोचणी लागली होती हे खरं होतं. भरलेल्या खिशापेक्षा मनावरचं ओझं जास्त जड झालं होतं. रात्रभर सुरेशच्या डोळ्याला डोळा नाही लागला. त्या वेड्या माणसाच्या हातातून घरंगळलेल्या प्रेताच्या जागी आपली मुलगी दिसू लागली.

घेतलेल्या पैशातले थोडे रमेशला द्यायचे होते. त्याला खरीच गरज होती. आपण करतोय ते बरोबर आहे की चूक असा प्रश्‍न कधी सुरेशला पडलाच नव्हता. कारण चूक की बरोबर हे तो ठरवतच नव्हता, ठरवत होती त्याची गरज. गरज प्रत्येक वेळेला त्याला हेच सांगत होती, पैसा मिळणं महत्त्वाचं आहे, तो घाम गाळून मिळतो की फसवून मिळतो, हे गौण आहे.

रमेशला त्यानं हॉटेलमध्ये बोलावलं खरं, पण पैसे घ्यावे की घेऊ नये, याच संभ्रमात रात्रभर जागलेला सुरेश खुर्चीत तसाच बसून होता. शेवटी काय होतं ते होवो, असं म्हणत हॉटेल गाठलं. चहाची ऑर्डर ठोकली. समोर सहज नजर गेली तर सुहास दिसला.

’तुम्ही इथं, सकाळी सकाळी’
’हो! रात्रभर हॉस्पिटलमध्ये जागरण झालं. हॉस्पिटलचं बिल प्रचंड आलय. ती कोमातून बाहेर येण्याची कुठलीच चिन्हे नाहीत. होईल कसं तरी, पाहू. तुझी पोरगी कशी आहे?’
सुरेशनं खिशातून पैसे काढले. ’हे घ्या. माझ्यापेक्षा तुम्हालाच त्याची जास्त गरज आहे. रात्रभर मलाही झोप नाही. तुम्हाला पटणार न्हाई, तुमच्या मित्राच्या पोरीच्या जागी येकसारखी माझी पोरगी दिसायला लागली. आजाराचं खोटं कारण सांगून तुमच्याकडून पैसे घेतले. तुम्हाला गरज असतानाही तुम्ही मला दिलेत. मागचे द्यायचे असतानाही दिलेत. खोटं बोलून पैसे घेतले. फार लागलं. घ्या हे, नको मला.’
’ठेव, तुझ्याचकडे. हे पैसे तुला सतत आठवण देत राहतील. तुझ्याच आतल्या चांगुलपणाची. आपलं बरं वाईट आपणच ठरवत असतो. निवड करणे आपल्याच हातात असतं. सुरेश, आपल्या प्रत्येकासमोर पर्याय असतो. कर्ण व्हायचं की अर्जुन! कर्ण झालो तर आयुष्यभर आपलं सारथ्य आपलंच एखादं शल्य करीत राहतं. आपण रणात असतानाही टोचत राहतं आणि मेल्यावरही गिधाडासारखं टोचतं. आपण अर्जुन झालो तर आपलं सारथ्य कृष्ण करतो. रणापासून मरणापर्यंत सारथ्य करत राहतो. त्यानंतरही आपल्यासोबत घेऊन जातो. कर्ण होण्याचं आणखी एक दु:ख सांगतो. कर्णाजवळ अर्जुनापेक्षाही चांगली शस्त्रविद्या होती, अस्त्रविद्या होती. पण, जेव्हा कर्णाला सर्वांत जास्त गरज त्या विद्येची होती, तेव्हा तिचा उपयोग त्याला झाला नाही. जे महाभारतातल्या कर्णाचं झालं, तेच या कर्णाचंही झालं. समोरच्याला फसवण्याची विद्या, टोप्या घालण्याची कला, मुलगी जगते की मरते अशा अवस्थेत पोहोचली, त्या क्षणी नाही कामाला आली.‘
’त्याच्या बायकोचं काय झालं? ती नाही बघत या येड्याला? न राहवून सुरेशनं विचारलं.
’त्याची पोरगी गेली त्यादिवशी एकाचवेळी अनेकांचं नुकसान झालं. त्याचं, त्याच्या बायकोचं आणि माझंही‘ सुहास खिन्नपणे म्हणाला.
’तुमचं हो कसं?’
’पोरगी गेली, या धक्क्याने तो वेडा झाला आणि त्याच धक्क्याने त्याची बायको कोमात गेली. त्याच्यासाठी तिला कितीही दूर लोटलं तरी शेवटी बहीणच होती माझी. बोलू नको कुठे. आमची दु:खं आमच्या जवळच बरी.’ सुहासच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पण, अश्रूंनी पापण्यांचा किनारा सोडला नाही. सुरेश पुरता हादरला होता. हातात पैसे होते, डोळ्यात आसू. भिजलेल्या डोळ्यांना सुहास कधी निघून गेला हे समजलंच नाही.

धापा टाकत हॉटेलात दाखल झालेल्या रमेशने सुरेशला विचारलं.
’कार्यकर्ता काय म्हनला? दिलं का?’

--आकाश

कथा

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

8 Sep 2018 - 2:25 pm | उगा काहितरीच

कथा (???) आवडली. :-(

छान कथा आहे,मध्ये मध्ये जरा बाळबोध वाटली.

शलभ's picture

10 Sep 2018 - 2:48 pm | शलभ

कथा खूप छान लिहिलीय.

सिरुसेरि's picture

10 Sep 2018 - 4:33 pm | सिरुसेरि

सुन्न करणारी कथा .

श्वेता२४'s picture

10 Sep 2018 - 6:05 pm | श्वेता२४

आवडली.

आकाश५०८९'s picture

10 May 2019 - 11:10 am | आकाश५०८९

धन्यवाद मित्रांनो!