अगा वक्रतुण्डा, ध्यान जरा द्यावे
जनांसी करावे, थोडे सुज्ञ II १ II
अगा एकदंता, ध्वनी प्रदूषण
वाढविती जन, ऐकवेना II २ II
कृष्ण-पिंग-अक्षा, ऊर्जेची नासाडी
करिती आवडी, अज्ञ जन II ३ II
अगा गजवक्त्रा, बाजारू संगीत
पिडे दिनरात, धाव आता II ४ II
अगा लंबोदरा, वर्गणीची सक्ती
जुलूमाची भक्ती, थांबवावी II ५ II
अगा हे विकटा, साथ नवसाची
करी जनतेची, बुद्धी भ्रष्ट II ६ II
विघ्नराजेंद्रा रे -जल, भूमी, वात
सर्व प्रदूषित, कैसे झाले II ७ II
अगा धूम्रवर्णा, पर्यावरणाची
जाणीव जनांची, वाढवावी II ८ II
अगा भालचंद्रा, क्षुद्र भेदाभेद
निरर्थ वितंड, नष्ट करी II ९ II
अगा विनायका ,बुद्धीचा तू देव
भक्तांना वैभव , बुद्धीचे दे II १०II
अगा गणपती , थोर तुझी कीर्ती
सौहार्दाची व्याप्ती, वाढवावीII ११ II
अगा गजानना , मागतो मी दान
दुजा लोकमान्य, धाड आता II १२ II
प्रतिक्रिया
5 Sep 2018 - 5:17 pm | खिलजि
यात्री साहेब छान जमून आलीय बरं का ...
7 Sep 2018 - 4:27 pm | मनमेघ
सुंदर काव्य!
7 Sep 2018 - 4:28 pm | यशोधरा
छान जमली आहे!
7 Sep 2018 - 5:08 pm | स्वधर्म
आावडली कविता.
7 Sep 2018 - 11:52 pm | रुपी
छान! कविता आवडली.
8 Sep 2018 - 12:44 pm | अनन्त्_यात्री
सर्वाना धन्यवाद!
7 Oct 2018 - 10:44 am | नाखु
फलक करून विसर्जनाच्या मिरवणुकीत लावावी अशी.
मुकाट सभासद नाखु पांढरपेशा
7 Oct 2018 - 10:48 am | अनन्त्_यात्री
धन्यवाद!