मीठ, मीठा, मराठी आणि पुणे मुंबई!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
20 Jul 2018 - 8:04 pm

मला काही दिवसांपूर्वी कोळशावर कणीस भाजणारा एक जण दिसला. गाडीवाला. पावसाळयात नेहमी दिसतात तसाच एक!

मी: "एक कणीस भाजून दे!"

मला सर्दी आणि खोकला झाला असल्याने पुढे म्हणालो, "फक्त मीठ लावा, लिंबू तिखट नको!"

पण त्याचे जवळ एका भांड्यात तिखट मीठ एकत्र केलेले होते आणि एकच लिंबाची फोड त्यात अगदी मनसोक्त बुडालेली दिसत होती. बहुदा त्याचेजवळ तो एकच लिंबू असावा जो तिखट मिठात पुन्हा पुन्हा बुडवून प्रत्येक ग्राहकाच्या कणीसाला चोपडत असावा, असो पण येथे तो विषय नाही...

"फक्त मीठ लावा" असे म्हटल्यावर तो कणीस वाला निर्विकार पणे म्हणाला, "हां साब, सब मिठा ही हैं!"
(त्याला म्हणायचे होते की सगळी कणीस गोडच आहेत!)

मी म्हणालो, "मराठी मे नमक को मीठ बोलते है, मैं बोला सिर्फ नमक लगाना! निंबु मिरची नहीं! मराठी नहीं समजता क्या?"

तो, "सिरफ नमक नहीं हैं! सब मिक्स हैं!"

मी: "राहू द्या, नुसतं कणीस भाजून द्या, त्याला काहीच लावू नका!"

कणीस: "मतलब?"

मी: "उपर कुछ मत लगाना. वैसे ही देना!"

पुण्यात असूनही मी "मराठी बोलणारा एलियन" असल्याची जाणीव पुन्हा एकदा मला झाली. मराठी बोलणारे लोक महाराष्ट्रा च्या सांस्कृतिक राजधानी पुण्यात एलीयन सारखे झालेत असे वाटण्यासारखी अनेक उदाहरणे मला अस्वस्थ करतात.

मग पुन्हा तोच प्रश्न मला सतावून गेला:
वर्षानुवर्षे पुण्यात व्यवसाय करूनही मराठी विना हे लोक कसे तरून जातात? त्यांना मराठी बोलण्याची गरज का वाटत नाही?

पुन्हा तेच उत्तर डोक्यावर दणका देऊन गेलं:
मराठी माणसं स्वतःच बाहेर कुठेही संभाषणाची सुरुवात हिंदीतून करतात आणि मराठी बोलायचा कंटाळा करतात किंवा कमीपणा समजतात म्हणून समोरच्याला सुध्दा वाटतं की मराठी विना पुण्यात रहाणे सहज शक्य आहे. चूक आपली आहे, त्यांची नाही!

आपणच जर मराठीचा आग्रह धरला तर त्यांच्या व्यवसायासाठी ते मराठी शिकतीलच!!

मराठी माणसच जर का पुण्यात मराठी बोलणार नसतील तर मग दुसरं कोण बोलणार?
आपण बोलल्याशिवाय दुसरे इतर राज्यांतील लोक तरी कशाला आणि का म्हणून मराठी बोलतील?

उदाहरण घ्यायचे तर हे घेता येईल:
भाजीवाला मराठीत ओरडत असतो, "भाजी घ्या, टमाटे वांगे! लसूण, आलं घ्या!" आणि मराठी माणूस त्याला विचारतो, "भैय्या अद्रक कितने का दिया?"
काय म्हणावं याला आता?

मराठीत ताईची दीदी झालीया
आणि आल्याचं अद्रक झालंया
मराठीचं तुफान आता संपलंया
त्याचं वारं बी वाहनं बंद झालंया

तसेच इतर राज्यांतील माझ्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी किंवा मित्रांशी बोलताना मी नेहमी असे म्हणतो:

"और फिर, पुणे कब आ रहें हो?"

"When are you coming to पुणे?"

एकदा नाव बदलल्यावर परदेशातील लोक सुध्दा योग्य उच्चार करतात, मोडके तोडके का होईना पण ते "मुंबाय" म्हणतात तरी! फक्त मराठी माणसांनाच का पुणे आणि मुंबई म्हणायला लाज वाटते? जणू काही तो पर राज्यातील मित्र तुम्ही पुणे म्हटलं तर तुमच्याशी मैत्री तोडणार आहे!

पण बहुतेक मराठी माणसं स्वतःच "पूना कब आ रहें हो?" असे म्हणतात.
काय त्यांना पूना म्हणण्यात आनंद आणि भूषण वाटतं काय माहिती? हीच गोष्ट मुंबईसाठी!

हिंदी भाषिकांशी बोलताना मी नेहमी असेच बोलतो, "मुंबई में भारी बारिश हुई" पण आपली मराठी माणसंच जास्त करून बॉम्बे म्हणण्यात धन्यता मानतात!

आपणच आपल्या शहरांचा चुकीचा उच्चार करणार तर इतरांकडून कशाला बरोबर उच्चारही अपेक्षा करायची?

हाच मान मी दक्षिणेकडील राज्यांच्या शहरांना सुध्दा देतो जसे, बंगळूरू, चेन्नई याप्रमाणे उच्चार करून!

भाषाप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

कालच 'एलफिस्टन रोड' स्थानकाचं प्रभादेवी असं नामांतरण करण्यात आलं, त्यावर माझ्या पुतण्याची प्रतिक्रिया, त्याने काय फरक पडणार? मी तर एलफिस्टनच म्हणणार... या गोष्टींची गरज कशी समजावून सांगायची हा प्रश्नच आहे..

रविकिरण फडके's picture

21 Jul 2018 - 3:04 pm | रविकिरण फडके

Your response does not relate to the subject. Elphinstone is simply a name: where does language come in?

आजानुकर्ण's picture

21 Jul 2018 - 6:03 pm | आजानुकर्ण

मलाही गरज समजलेली नाही. एकदा इथे समजावून सांगितले तर आजन्म उपकृत राहीन.

गवि's picture

21 Jul 2018 - 7:54 am | गवि

भावना पोचल्या.

बाकी

पुण्यात असूनही मराठी माणूस कणीस विकायला उभा राहात नाही का? की सर्व मराठी लोक आर्थिक पातळीवर त्या लेव्हलच्यावर पोचलेत?

तो मराठी माणूस महाराष्ट्र व्यापारात मागे का? या व्याख्यानाची अथवा लेखाची तयारी करत असतो का?

;-)

मी: "राहू द्या, नुसतं कणीस भाजून द्या, त्याला काहीच लावू नका!"

कणीस: "मतलब?"

मी: "उपर कुछ मत लगाना. वैसे ही देना!"

असं त्याला भाषांतर करून देऊन मग मराठी संस्थळावर अनुभव मांडणे या क्रमापेक्षा "पुण्यात राहून कणीस नाय माहीत. ठेव तुझं कणीस आणि घे *रुन *डव्या" असं म्हणून कणीस सोडून यायचं, आणि "यशोभूमि" वगैरे दैनिकाकडे एक अस्खलित हिंदी निषेधात्मक लेख पाठवायचा.

;-)

हे सर्व हलके घ्या. मराठी कणीसवाला नसेल मिळत तर जिथे मिळतंय तिथे मस्त गरमागरम भुट्टा नमक निंबू लगाके मस्त एन्जॉय करा.

आजानुकर्ण's picture

21 Jul 2018 - 6:01 pm | आजानुकर्ण

मराठी कणीसवाला नसेल मिळत तर जिथे मिळतंय तिथे मस्त गरमागरम भुट्टा नमक निंबू लगाके मस्त एन्जॉय करा.

परफेक्ट!

ज्योति अळवणी's picture

21 Jul 2018 - 9:21 am | ज्योति अळवणी

*पुन्हा तेच उत्तर डोक्यावर दणका देऊन गेलं:
मराठी माणसं स्वतःच बाहेर कुठेही संभाषणाची सुरुवात हिंदीतून करतात आणि मराठी बोलायचा कंटाळा करतात किंवा कमीपणा समजतात म्हणून समोरच्याला सुध्दा वाटतं की मराठी विना पुण्यात रहाणे सहज शक्य आहे. चूक आपली आहे, त्यांची नाही!*

अगदी मान्य. मी नेहेमीच मराठीमध्ये बोलते . मुबाईतील लोकांना कळत. अगदीच अडचण आली तर हिंदी आहेच आपल्याला मदत करायला...

दुर्गविहारी's picture

21 Jul 2018 - 10:45 am | दुर्गविहारी

मला एक कळाले नाही, जर तो कणीसवाला हिंदीत बोलत होता आणि त्याच्या भाषेचा ठेका सोडायला तयार नव्हता तर तुम्ही तरी हिंदीत कशासाठी बोललात ? तुम्ही मराठीवर का आडून राहिला नाहीत ? आपोआप तो झक मारत मराठी बोलायला लागला असता. असले धागे काढण्याआधी मी काय करु शकतो याचा विचार करा?

श्वेता२४'s picture

21 Jul 2018 - 11:39 am | श्वेता२४

इथे मुंबईमध्ये आल्यापासून मी व माझा नवरा हट्टाने सगळीकडे मराठीतच बोलतो। सगळं कळत बरं त्यांना! आव आणतात असं वाटतं कधीकधी . एकदा share रिक्षा मधून घरी येत असताना आम्ही तिघी बायका त्याला मराठीतून सूचना देत होतो तो म्हणाला मराठी येत नाही त्यावर आम्ही मराठी येत नाही तर रिक्षा चालवायचं बंद कर जिथे धंदा करायचंय तिथली भाषा यायला नको का आम्ही तुमच्या इथे येऊन हिंदी समजत नाही मराठीत बोला म्हणलं तर ऐ कुन घ्याल का असं खूप झापल

त्यांना इथे मराठी लोकांकडून इतकं परकं आणि तिरस्करणीय समजलं जात असेल इथे की त्यांच्याशी धड कोणी प्रेमाने बोलतही नाही आणि नुसते ताशेरे झोडतात, भाषेवरून भांडतात , तर मग त्यांना मराठी कोण शिकवणार? हिंदीतून मराठी शिकवावी लागेल. कोणाकडून शिकणार?

ते स्वतःची सुरक्षित बेटं करुनच राहणार.

सतिश गावडे's picture

21 Jul 2018 - 11:57 am | सतिश गावडे

गविजी, आपके मुद्देमे दम हय. :)

श्वेता२४'s picture

21 Jul 2018 - 12:08 pm | श्वेता२४

मी बँकेत रुजू झाले त्यावेळी माझ्याबरोबर एक बिहारी मुलगी पण रुजू झाली आमच्या बॉस ने सांगितले श्वेता तुला उत्तम हिंदी बोलता आले पाहिजे व नेहा तुला उत्तम मराठी बोलता आले पाहिजे कारण सर्वच ग्राहक इंग्लिश शी comfortable नसतात
नेहाच्या हिंदीत अत्यंत अदब होती खूप छान हिंदी बोलायची ती माझी अत्यन्त चांगली मैत्रीण झाली मी तिला मराठी शब्द त्यांचे अर्थ सांगायचे तिला मराठी सगळं कळायचं पण बोलता यांचं नाही 3 महिन्यात माझं हिंदी इतकं सुधारले कि बँकेच्या हिंदी वक्तृत्व स्पर्धेत माझा दुसरा नं आला आणि 10 महिन्यांनी नेहा maternity leave वर बिहार ला निघून गेली तेव्हा दोनच वाक्य बोलता येत होती - कसे आहात? मी छान आहे!

सतिश गावडे's picture

21 Jul 2018 - 12:14 pm | सतिश गावडे

हा ही मुद्दा आहेच.

काही अपवाद सोडले तर आपले उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील देशबांधव महाराष्ट्रात येऊन कैक वर्ष राहतात, काही इथेच स्थिरावतात. मात्र ते मराठी शिकण्याची जराही उत्सुकता दाखवत नाहीत. त्यामुळे अशा लोकांशी अट्टाहासाने मराठीत बोलावे.

आजानुकर्ण's picture

21 Jul 2018 - 6:00 pm | आजानुकर्ण

वरच्या उदाहरणात श्वेताला फायदा झाला की नेहाला? अट्टाहासाने मराठीत बोलून - आपला अहंकार सुखावण्याव्यतिरिक्त - नक्की काय होणार?

श्वेता२४'s picture

21 Jul 2018 - 6:38 pm | श्वेता२४

फायदा कुणाचा हा मुद्दा नाही . त्या निमित्ताने माझं हिंदी उत्तम झालं. कारण ते शिकण्याची मनापासून इच्छा . मग या लोकांना ते जमणार नाही असे नाही मुद्दा हा कि ती शिकण्याची इच्छा नसते आणि गरजही. कारण त्यांना मराठी येत नाही हे बघून आपण हिंदीत बोलून त्यांचे काम सोपे करून देतो मग त्यांना मराठी शिकायची गरजच राहत नाही

सतिश गावडे's picture

21 Jul 2018 - 11:54 am | सतिश गावडे

मी म्हणालो, "मराठी मे नमक को मीठ बोलते है, मैं बोला सिर्फ नमक लगाना! निंबु मिरची नहीं! मराठी नहीं समजता क्या?"
मी: "उपर कुछ मत लगाना. वैसे ही देना!"

हे तुम्ही तरी कुठे मराठीत म्हटलंत? :)

आणि कणीस भाजायला सुरुवात झालेली होती म्हणून मी त्याचेच कडे राहिलो नाहीतर दुसरा मराठी येणारा कणीस वाला शोधला असता

सतिश गावडे's picture

21 Jul 2018 - 12:10 pm | सतिश गावडे

मी ते गंमतीत लिहीलं होतं.
त्या कणीसवाल्या भावाला (भैय्याला ;) ) मराठी येत नाही म्हटल्यावर तुम्हाला तुमचे विचार त्याच्यापर्यंत पोहचवण्यासाठी त्याला कळणार्‍या भाषेत बोलणे गरजेचे होते. त्यामुळे तुम्ही हिंदीत म्हणजे तुम्हा दोघांनाही अवगत असलेल्या भाषेत बोललात.

भाषा हे संवादाचे साधन आहे. मात्र लोक या साधनालाच साध्य समजतात, त्याला आपला "गर्व" वगैरे चिकटवतात आणि मग घोळ होतो.

आजानुकर्ण's picture

21 Jul 2018 - 6:04 pm | आजानुकर्ण

त्या कणीसवाल्या भावाला (भैय्याला ;) ) मराठी येत नाही म्हटल्यावर तुम्हाला तुमचे विचार त्याच्यापर्यंत पोहचवण्यासाठी त्याला कळणार्‍या भाषेत बोलणे गरजेचे होते. त्यामुळे तुम्ही हिंदीत म्हणजे तुम्हा दोघांनाही अवगत असलेल्या भाषेत बोललात.

भाषा हे संवादाचे साधन आहे. मात्र लोक या साधनालाच साध्य समजतात, त्याला आपला "गर्व" वगैरे चिकटवतात आणि मग घोळ होतो.

क्या बात है!

सही रे सई's picture

24 Jul 2018 - 11:42 pm | सही रे सई

भाषा हे संवादाचे साधन आहे. मात्र लोक या साधनालाच साध्य समजतात, त्याला आपला "गर्व" वगैरे चिकटवतात आणि मग घोळ होतो.
येव्हढच महत्वाच आहे की दोन माणसांमधे संवाद होतो आहे.
आणि मराठी भाषा संवर्धनाचा विषय असेल तर मला वाटत की मराठी माणसांनी आपल्या मुलांना उत्तम मराठी शिकवून मराठी चांगलं वाचण्याची आणि लिहण्याची सवय लावायला हवी. त्यानेच मराठी भाषा आणखीन वाढेल आणि टिकेल.

श्वेता२४'s picture

21 Jul 2018 - 12:00 pm | श्वेता२४

मी रिक्षातून येत असताना त्या रिक्षावाल्याला येथुन उजविकडे तिथून डावीकडे अशा सूचना देत घरापर्यंत आणले पैसे देताना तो मला म्हणाला ताई असं मराठीतून बोलणाऱ्या तुम्हीच भेटला बघा कानाला इतकं बरं वाटलं म्हणून सांगू आपलीच माणसं हिंदीतून बोलतात समोरचा रिक्षावाला मराठी असू शकतो याचा पण अंदाज घेत नाहीत मराठीतून संवाद होऊ शकतो हेच मुंबईतली माणसे विसारलीत का असं वाटतं आज तुमच्या बोलण्यावरून वाटलं की नाही सगळीच माणसे असा विचार नाही करत त्याच बोलणं मला खूप लागलं मनाला

राही's picture

21 Jul 2018 - 2:17 pm | राही

एकदा एका रिकशावाल्याला मराठीतून सूचना अजिबात समजेनात. हिंदीचा आश्रय घ्यावाच लागला. उतरताना त्याला विचारले की इथली भाषा थोडीतरी शिकावीशी नाही वाटत का? तर तो म्हणाला , क्या फायदा मराठी सीख के? यहाँ मराठी लोक हैं कहॉं? थोडे दिनों में मुंबई यूपीवालों की ही होनेवाली है! भर मराठी वस्तीत पूर्ण आत्मविश्वासाने तो बोलत होता.
गेल्या काही वर्षांत यांचा आत्मविश्वास खूपच वाढलाय असं जाणवतंय. काही वर्षांपूर्वी उन्हाळी सुट्टीत उत्तरेकडे जाण्यासाठी बुकिंग सुरू होताच प्रयत्न करूनही माझ्या बहिणीला तिकिटं मिळत नव्हती. यूपीवाल्याना मात्र मिळत होती. नंतरचा तिचा आटापिटा पाहून एक यूपीवाला म्हणाला की आप तो मुंबई में इतने दिनों से रहती हैं तो कोई मिनिस्टर या सेक्रेटरी या नेता से पहचान नहीं क्या?!

आजानुकर्ण's picture

21 Jul 2018 - 5:59 pm | आजानुकर्ण

समजा सगळे यूपी-बिहारवाले - अगदी अनुनासिक - मराठीत बोलताहेत असं झालं तर नक्की काय फरक पडेल?

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2018 - 10:15 am | टवाळ कार्टा

दुसऱ्या राज्यात गेल्यावर तिथली भाषा शिकायला किती त्रास होतो हे मीही अनुभवले आहे....पण निदान दुसऱ्या पिढीला मराठी यायलाच हवी

खटपट्या's picture

24 Jul 2018 - 1:01 pm | खटपट्या

सद्या मी धरून तिघे आणि एक नालासोपार्‍यात जन्माला आलेला उत्तरभारतिय रुम शेअर करतो आहोत. उत्तरभारतियाला व्यवस्थीत मराठी समजतंय आणि बोलता येतंय पण बोलत नाही.

कपिलमुनी's picture

24 Jul 2018 - 1:42 pm | कपिलमुनी

महाराष्ट्रात असलेल्या उच्चभ्रू किंवा तारांकित हॉटेलमध्ये / बारमध्ये / पब मध्ये / रिसोर्ट मध्ये कोणकोण मराठी बोलतात ??

एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये वेटरला मराठी कळत नव्ह्ता , त्याबद्दल मॅनेजरला विचारले असता तो म्हणाला ," यहा पे मराठी कस्टमर नहि आते" !

तेव्हापासून हॉटेलमध्ये मराठी मध्ये ऑर्डर देतो

मराठी कथालेखक's picture

24 Jul 2018 - 3:31 pm | मराठी कथालेखक

माझी एक सहकारी-मैत्रीण एकदा बार्बेक्यू नेशनमध्ये रेटून मराठी बोलत होती.. मस्त वाटलं.. मला तोवर वाटत होतं बार्बेक्यूमधल्या कर्मचार्‍यांना मराठी समजतच नसेल.. पण माझा समज खोटा ठरला. तर उपहारगृहांत मी ही मराठीच बोलतो.

मराठी कथालेखक's picture

24 Jul 2018 - 5:31 pm | मराठी कथालेखक

तर उपहारगृहांत

इतर*

मराठी कथालेखक's picture

24 Jul 2018 - 3:37 pm | मराठी कथालेखक

उत्तर भारतीय तर राहू देत.. अनेकदा दोन मराठी लोकही हिंदीत बोलतात (समोरचा मराठी आहे हे दोघांनाही माहीत असतं). काय करणार ? ज्याचं त्याचं स्वातंत्र्य !!

खटपट्या's picture

24 Jul 2018 - 5:20 pm | खटपट्या

स्वातंत्र्य?? _/\_

मराठी कथालेखक's picture

24 Jul 2018 - 5:30 pm | मराठी कथालेखक

मग काय तर.. अडवू तर नाही शकत ना.. दोन मराठी माणसांनी मराठी शिवाय इतर कोणत्याही भाषेतून बोलू नये असा कायदाही नाही करता येणार.
म्हणजे मी अशा बोलण्याचे समर्थन करतो आहे असे नाही तर माझी हतबलता व्यक्त करतो आहे.
आपण आपले मराठीत बोलत रहायचे इतकेच आपल्या हातात.
माझ्या इमारतीत एक मराठी माणूस राहतो. तो पुणे जिल्ह्यात वाढला आहे (म्हणजे महाराष्ट्राबाहेर दीर्घकाळ राहिला होता असंही नाही) पण तो भेटला की नेहमी हिंदीतच संभाषणाला सुरवात करतो "क्या चल रहा है.. बहोत दिनो बात ई ई".. पण मी ही रेटून मराठीतच बोलतो. मला वाटतं त्याची बंगाली बायको (पण महाराष्ट्रात वाढलेली) त्याच्यापेक्षा जास्त मराठी बोलत असावी. अनेक लोकांना मराठीपेक्षा हिंदीतून बोलणे जास्त 'कूल' वाटत असावे. आपण तरी काय करणार ?

निमिष सोनार's picture

24 Jul 2018 - 6:01 pm | निमिष सोनार

दोन मराठी, भेटल्यावर बोलतात हिंदी!

कंजूस's picture

24 Jul 2018 - 9:09 pm | कंजूस

लेख पाडा आणि चर्चा झोडा.
आता या विषयावर शोभा डे'नेही बोलायचं सोडून दिलय.