आगळा अनुराग
रान हिरवे लाजलेले लाजल्या त्या रानवेली
निर्झराला जाग आली मेघ आले सांजवेळी
कोणता तो जलद वेडा भिजवुनी गेला धरेला
वृक्षगर्भी ओज आले तेज हिरव्या कांकणाला
अंबरावर रेखिली आरक्त नक्षी गूलबक्षी
अन नभाच्या लाजण्याला रक्तवर्णी सुर्य साक्षी
एक रस्ता कोरडासा खेळला त्या पावसाशी
पावले तेथे कळ्यांची नाचली पाण्यात खाशी
साजरी झाली धरित्री लेवुनी बेबंध वारा
वाहले रस यौवनाचे पावसाची बनुन धारा
रात्र गरती होतसे मग जाहले आरक्त डोळे
आगळा अनुराग जागे बरसती ते मेघ ओले
© विशाल कुलकर्णी