एखाद्या देशात जर एक असा कलाकार असेल ज्याचे चित्रपट नेहमीच आंतरराष्ट्रीय स्थरावर नावाजले गेले आहेत आणि जातात. त्याला आतापर्यंत जवळपास २५ हून अधिक अतिशय प्रतिष्ठेचे पुरस्कार किंवा सन्मान मिळाले आहेत, ज्याचे चित्रपट जगातल्या सर्व मोठ्या चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवले जातात, तर त्या कलाकाराचं त्याच्या देशात काय स्थान असेल? देशातल्या सरकार कडून त्याला मिळणारी वागणूक कशी असेल? ते त्याच्या चित्रपट बनवण्यावर किंवा लिखाण करण्यावर २० वर्ष बंदी नक्कीच घालणार नाहीत… पण समजा हा कलाकार इराण सारख्या कट्टर मुस्लीम राष्ट्रातला असेल तर? वरचं विधान शक्य आहे.
जफर पनाही, इराणी भूमीनं जगाला दिलेल्या काही हि-यांमधलं एक नाव. अब्बास किरोत्सामी, मजीद माजिदी सारख्यांबरोबर आदरानं घेतलं जाणारं नाव. आंतरराष्ट्रीय चित्रपट वर्तुळात आपल्या साध्या साध्या पण वैशिष्ठ्यपूर्ण मांडणीच्या चित्रपटांद्वारे सामाजिक समस्यांवर काम करण्यासाठी जफर नावाजला जातो . पण त्याच्या देशात उलटी गंगा वाहते आहे. बर्लिन सारख्या अतिशय प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवात परिक्षक म्हणून नावाजल्या जाणा-या जफरला त्याच्या ५० व्या वाढदिवशी त्याच्या देशानं एक अतिशय बहुमूल्य भेट दिली, ६ वर्षांची कैद आणि २० वर्ष चित्रपट बनवण्यावर, लिखाण करण्यावर, जाहीर भाषण करण्यावरआणि देश सोडण्यावर बंदी……कारण काय तर जफरने आपल्या चित्रपटांद्वारे केलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार…! आपल्या कलाकृतीतून राजासत्तेविरुद्ध जनतेला भडकवण्याचा ठपका त्याच्यावर ठेवला गेला आहे . असं जफर पनाहींने त्यांच्या कलाकृतीतून काय मांडलं कि राजसत्तेनं त्यांच्यावर राजद्रोहाचा ठपका ठेवला? त्याच्या कलाकृती अशी कोणती परिस्थिती दाखवतात, अशी कोणती मतं मांडतात कि जी जगासमोर येऊ नयेत असं इराणी कट्टर राजसत्तेला वाटतं ?
१९९५ च्या ‘ द व्हाईट बलून’ या चित्रपटामुळे लाईमलाईट मध्ये आलेल्या जफरने कधीकाळी सैन्यात नोकरी केली होती हे ब-याच जणांना ठाऊक नाही. वयाच्या विसाव्या वर्षी, १९८० साली तो इराण-इराक या युद्धात इराणी सैन्यात फोटोग्राफर म्हणून रुजू झाला . पुढच्याच वर्षी त्याचं कुर्दिश च्या दहशतवाद्यांनी अपहरण केलं आणि ७६ दिवसासाठी ओलीस ठेवलं. लहानपणापासून प्रत्येक घटनेकडे नाट्यात्मक कथा म्हणून पाहणा-या जफरला हि घटना खूप काही शिकवून गेली.
“ ते ७६ दिवस खूप वेगळे होते. भीती वाटत होती, कुठेतरी आपण लवकरच सुटू हि अशा सुद्धा होती. पण घटना म्हणून त्याच्याकडून मी कथेचं बीज उचललं. आज जो काही मी आहे त्यात जितका मझ्या लहानपणाचा वाट आहे तितकाच या घटनेचा..”
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी आपल्याकडे एक प्रचलित म्हण आहे जी जफरला अगदी तंतोतंत जुळते. जफरचा जन्म १९६० ला ४ बहिणी आणि २ भाऊ अशा मोठ्या कुटुंबात झाला. त्याचे वडील स्वत: चित्रपट प्रेमी होते आणि हे तत्कालिक इराणी समाज रचनेच्या अगदी विरुद्ध असं होतं. जफर ९-१० वर्षांचा असल्यापासून त्याला त्याच्या बहिणी चित्रपट बघायला पैसे देत असतं. चित्रपट पाहून घरी आल्यानंतर तो त्यांना साभिनय त्या चित्रपटाची कथा सांगत असे. त्याच्या बहिणी चित्रपट पहायला किंवा महत्वाच्या कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू शकत नव्हत्या, मुळात इराणमध्ये महिलांना सामुहिक ठिकाणी जमान्याची असलेली बंदी हे त्यामागचं कारण होतं. त्याचे वडील चित्रपट प्रेमी असले तरी त्यांना जफरने किंवा आपल्या मुलांनी चित्रपट बघणं मंजूर नव्हतं.
“ ते मला कायम सांगत कि आताचे चित्रपट तुम्ही बघावेत असे नाहीत. तुझ्यासाठी चांगले नाहीत पण मला तेच बघायचं होतं असं काय आहे जे माझ्यासाठी चांगलं नाही. म्हणून अजून चित्रपट पाहू लागलो.”
पण हे फार दिवस चाललं नाही. एके दिवशी वडिलांनी त्याला पकडलं नि मारलंसुद्धा. पण जफरचं चित्रपट प्रेम काही कमी झालं नाही. १० वर्षांचा असताना जफर ने शालेय जीवनात त्याच्यातल्या लेखन कौशल्याची चुणूक दाखवली. त्या वर्षी शाळेत स्वरचित कथालेखन स्पर्धा होती. जफरनं त्यात एका मुलाची कथा लिहिली होती. एक मुलगा जो शाळेत परिक्षेमध्ये यशस्वीरित्या कोपी करतो, नंतर त्याला पश्चाताप होतो नि माफी मागतो अशी ती कथा होती. पण त्याला पहिल पारितोषिक मिळालं. त्याच्यातल्या लेखकाची हि सुरुवात होती. पुढे तो ‘कानून (Institute for the Intellectual Development of Children and Adult)) मध्ये जाऊ लागला. तिथे त्याला जागतिक सिनेमा पाहता येऊ लागला. अब्बास किरोत्सामी त्याला इथेच भेटले. चित्रपटाविषयीची पायाभरणी इथेच झाली. Vittorio De Sic च्या ‘द बायसिकल थीफ ‘या अजरामर कलाकृतीनं जफरवर प्रचंड प्रभाव टाकला..
“कानुनच्या काळात मी खूप सिनेमे पहिले. सर (अब्बास किरोस्तमी) आणि त्यांचे सिनेमे मला तिथेच भेटले. तिथला बराचसा भाग आता विस्मृतीत गेलाय पण बायसिकल थीफ चा प्रभाव मात्र तसाच आहे जसा तेव्हा होता. ती एक अशी फिल्म होती जी अस्सल होती, खरी होती. मला ती फेक नाही वाटली म्हणूनच तिचा माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव पडला…”
याच काळात कॅमेरा त्याच्या अगदी जवळ येऊ लागला. तो ते यंत्र शिकला आणि त्यावर नानाविध प्रयोग करू लागला. सुरुवातीच्या काळात काही छोटे चोत्र विडीओज त्यानं ८ मिमी च्या कॅमेरानं बनवले. दरम्यान त्यानं एका चित्रपटात कामही केलं. कानुन मधल्या एका ग्रंथापालान्म विद्यार्थ्यांनी कॅमेरा कसा चालवावा यासाठी प्रत्यक्षिक देणारा लघुपट बनवला होता त्यात १२-१३ वर्षांचे पनाही आपल्याला पहायला मिळतात. या सगळ्या पोषक वातावरणामुळे त्याचं चित्रपट प्रेम इतकं वाढलं कि त्याला वयाच्या १३ व्या वर्षी शाळेनंतर अर्धवेळ काम करावं लागत होतं. चित्रपट पाहण्यासाठी पैसे मिळावेत हे त्यामागचं कारण होतं.
पुढे कुर्दिश दहशतवाद्यांच्या ताब्यातून सुटल्यानंतर त्यानं त्यावर एक लघुपट बनवला जो तिथल्या प्रादेशिक वाहिनीवर दाखवला गेला. ख-या अर्थाने जाहीररित्या रिलीज झालेला हा एकमेव चित्रपट. त्यानंतर त्याला असं निर्भेळ वातावरण मिळालच नाही. पुढे आपली दोन वर्षांची मिलीटरि सेवा संपवून त्यानं Collage of Cinema and TV, तेहरान ला प्रवेश केला. तिथे त्याला चित्रपटाविषयाचं तांत्रिक अंगाचं शिक्षण मिळू लागलं. त्याही पेक्षा जफरला इथे उत्तोमत्तम दिग्दर्शकांचे चित्रपट पाहता येऊ लागले नि त्याबाबत व्यवस्थितपणे अभ्यासता येऊ लागलं. जफरच्या सुरुवातीच्या काळातला जे काही मोजके लघुपट आहेत त्यातले बहुतांश इथे किंवा पर्शियन गोल्फ कोस्टच्या ‘बंदर अब्बास’ इथेच चित्रित केले गेले आहेत. पनाहीनं काही माहितीपट इराणच्या राष्ट्रीय वाहिनीसाठी याच काळात केले. त्याचे विषय आपण पहिले तर पनाहिच्या भविष्यातला प्रवासाचा आपण अंदाज बांधू शकतो. इरानमधल्या डोकं फोडण्याच्या अनैतिक प्रथेवर त्याने १९८८ साली ‘ यारली बशर” हि फिल्म केली. त्यानंत १९८९ त्यानं प्रसिद्ध इराणीअन चित्रपटकार काम्बुझिया पर्तोवी च्या गोलनर या चित्रपटाच्या मेकिंग वर ‘ द सेकंड लूक’ हि फिल्म बनवली. ज्यात मुल कथेतला कळसूत्री बाहुल्या बनवणारा माणूस आणि त्याच्या बाहुल्या यांच्यातलं राजकीय अंगानं जाणारं नातं कसं खुलतं असा विषय होता. १९८९ ची हि फिल्म १९९२ पर्यंत बन होती यातच बराच काही आलं. अब्बास किरोत्सामिन्म त्याला आपला सहय्यक म्हणून रुजू करून घेतलं नि त्याच्या प्रतिभेला अजून पैलू पडायला सुरुवात झाली. त्याचे इतके सगळे प्रयोग चालू असतानाही जफर पनाही हे नाव जगासमोर यायला यायला १९९५ उजाडावं लागलं. त्या साली द व्हाईट बलून रिलीज झाला अन एका अजून प्रतिभावंत इराणीअन दिग्दर्शकाची ओळख जगाला झाली….!!
क्रमश:
अनिरुद्ध प्रभू
(पूर्वप्रसिद्धी : वास्तव रूपवाणी, जून २०१८)
प्रतिक्रिया
9 Jul 2018 - 4:12 pm | श्वेता२४
पुभाप्र
9 Jul 2018 - 4:39 pm | यशोधरा
लेख आवडला.
9 Jul 2018 - 5:07 pm | मंदार कात्रे
लेख आवडला.
9 Jul 2018 - 6:43 pm | शुभां म.
सहीच...
जगप्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शकां विषयी वाचायला फार आवडते. वाचल्यावर (तेही मराठीतून ) त्यांचे सिनेमा पाहायला अजून मजा येते.
पुढील भागासाठी खुप शुभेच्छा ..
अजून खूप सारे दिग्दर्शक आहेत त्यांच्या बदल नक्की लिहा, नक्कीच आवडेल वाचायला.
10 Jul 2018 - 10:00 am | एस
पूर्वार्ध जमला आहे. संपूर्ण लेख एकाच धाग्यात टाकला असता तरी चाललं असतं असं वाटलं. पुभाप्र.
10 Jul 2018 - 10:30 pm | ज्योति अळवणी
आवडला