जेंव्हा माझे लेख चोरीला जातात

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
8 Jun 2018 - 3:40 pm

देहूतील ब्रम्हवृंदातील 'सालोमालो' हे बऱ्यापैकी बडे प्रस्थ. छान वाडा-हुडा, पैसा-अडका असलेली व्यक्ती. साहित्याची ऊत्तम जाण. आवडही. पण या सालोमालोंना काही सरस्वती प्रसन्न होईना. त्यांना फार वाटे की संस्कृतात श्लोक रचना करावी, प्राकृतात काव्यरचना करावी. पण त्यांना काही ते साधेना. हजार प्रयत्न करुनही सालोमालोंच्या काव्यात ओढाताण केलेली जाणवे. सफाईदारपणा, सहजता काही येईना. कालांतराने सालोमालोंच्या लक्षात आले की आपल्या नशिबी काही काव्यलेखन नाही. आपल्याला फक्त लक्ष्मीच प्रसन्न करुन घेता येते, सरस्वती नाही. पण सालोमालोंचा अंतरात्मा काही त्यांना चैन पडू देईना. मग त्यांनी 'लक्ष्मीच्या' मदतीने 'सरस्वतीला' वश करायचीच असे ठरवले. त्याच काळात देहूगावात तुकाराम आंबिले नावाचे गृहस्थ विठ्ठल भक्ती करीत. विठ्ठलाचे गुणगान गाताना त्याच्या तोंडातुन अभंगा मागून अभंग बाहेर पडत. समाजातील दांभीकता पाहून त्यांचा अभंग आसुड होई, नाठाळाला पाहून त्यांचा अभंग काठी होई. फार रसाळ, गोड, अर्थपुर्ण अभंग असत त्यांचे. पण हे तुकोबा फार भोळे. अभंग लिहून मोकळे होत. मग सालोमालोंना छान कल्पना सुचली. तुकोबांनी एखादा अभंग रचला की तो येनकेन मार्गाने सालोमालो मिळवायचे. आणि जेथे 'तुका म्हणे' असे ते खोडून 'सालो म्हणे' लिहित व हा अभंग आपलाच आहे असे सांगत. आपल्या चोपडीत सुवाच्च अक्षरात लिहून ठेवीत. लोकांना काय खरे व काय खोटे हे कळे. पण सालोमालोबरोबर वैर कोण घेणार? तुकोबा तर अशा बाबतीत फार ऊदासीन. असे होता होता सालोमालो महाशयांनी तुकोबांचे असंख्य अभंग चोरले. मध्यंतरीच्या काळात तुकोबांना रामेश्वरभट्टांच्या आदेशावरुन 'गाथा' ईंद्रायणीत बुडवायची आज्ञा झाली. सालोमालोला प्रचंड आनंद झाला. यथावकाश 'गाथा' ईंद्रायणीला अर्पण झाली. तुकोबाही काही काळाने वैकुंठाला गेले. अनेक वर्षे ऊलटली. आणि मग तुकोबांच्या गाथेचे संकलन करायची कल्पना पुढे आली. काम सुरु झाले. पण तुकोबांचे अनेक अभंग काही मिळेनात. अनेक गहाळ झालेले. अनेक विस्मृतीत गेलेले. काय करावे हा प्रश्न संकलनकर्त्यांना पडला. ईतक्यात 'सालोमालोंची चोपडी' प्रकाशात आली. आणि तुकोबांचे असंख्य अभंग क्रमवारीने सापडले. जर सालोमालो नसते, त्यांनी ते अभंग चोरले नसते तर आज आपण तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांना मुकलो असतो. धन्य ते सालोमालो आणि धन्य त्यांची वाङगमयचोरी.(पहा, या त्रासातुन तुकोबा सुद्धा सुटले नाहीत. असो.)
पण आजकाल 'सालोमालो’चे नाव जरी माझ्या कानावर पडले तरी मला तुकोबांची पुढील ओळ आठवते
तुका म्हणे ऐशा नरा। मोजुनी माराव्या पैजारा॥

मांडणी

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

8 Jun 2018 - 3:45 pm | जेम्स वांड

जर का तुम्ही तुकोबारायांचे रूपक वापरून इंटरनेट वर होणाऱ्या साहित्यचौर्या बद्दल बोलत असाल तर मी एकच सांगून खाली बसतो.

ज्या क्षणी तुम्ही काहीही इंटरनेटवर टाकता त्याक्षणी तुमचा त्याच्यावरचा मालकीहक्क संपून जातो

हे ध्यानात ठेवा, जास्त त्रास होत नाही त्यामुळे.

कुमार१'s picture

8 Jun 2018 - 4:10 pm | कुमार१

+१११