"अथातो घाटजिज्ञासा" - भाग ३ रा

दिलीप वाटवे's picture
दिलीप वाटवे in भटकंती
5 Jun 2018 - 2:02 pm

.

'घाटवाटांची प्रशासन व्यवस्था'

घाटवाटांची प्रशासन व्यवस्था बहूतेक करुन सर्वात जास्त वाहतूक असलेल्या म्हणजे व्यापारी मार्गांवरच असे. कारण राजनैतिक दृष्टीने अशा वाटा अत्यंत महत्त्वाच्या असत. एकूणच संपुर्ण व्यापारी मार्गावर घाटमार्गाचा टप्पा अवघड आणि महत्वाचा असे. जसजसा काळ गेला तसतशा व्यापारी मार्गांवरच्या घाटवाटांतील त्रुटी समजू लागल्या आणि त्यानुसार त्यात सुधारणा होत गेल्या. प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी घाटमार्गांची नियमित दुरुस्ती करणे, पिण्याच्या पाण्याच्या सोई करणे, अवघड जागी पायर्‍या खोदणे वगैरे त्यापैकीच काही सुधारणा होत.
घाटमार्गात मुक्काम करता येणे शक्य नसल्याने तो एका दिवसातच पार करावा लागे त्यामुळे घाटाखाली आणि घाटावर मुक्कामायोग्य ठिकाणांची गरज भासु लागली. व्यापार्‍यांसोबत प्रवासी, धर्मप्रसारक, राजनैतिक अधिकारी सुद्धा प्रवास करत असत. त्यामुळे अशा लोकांच्या दर्जानुसार घाटपायथ्याला आणि घाटमाथ्यावर मुक्कामायोग्य ठिकाणे तयार केली गेली. सद्य परिस्थितीत तरी अशी सरायांसारखी ठिकाणं पहायला मिळत नाहीत. घाटवाटेच्या पायथ्याशी आणि माथ्यावर बहूतेक ठिकाणी लेण्या पहायला मिळतात. सुरवातीच्या काळात या लेण्यांचा केवळ धार्मिक कामांसाठी आणि धर्मप्रसारकांच्या मुक्कामासाठीच उपयोग केला गेला, पण नंतरच्या काळात मात्र त्यांचा मुख्य उपयोग हा प्रवाशांच्या राहण्यासाठीच केला गेला. जसं मुक्कामायोग्य ठिकाणांचं तसंच अन्नछत्राचं. रायगडाच्या परीघात असलेल्या वारंगीला अन्नछत्र असल्याचे उल्लेख सापडतात त्यामुळे खानुच्या डिग्याहून वारंगीत उतरणार्‍या बोचेघोळ नाळेला 'अन्नछत्राची नाळ' असंही म्हटलं जातं.
कोकणातील बंदरे ज्या राजसत्तेच्या ताब्यात, त्यांचे व्यापार-उदीमावर नियंत्रण असे. त्यामुळे आर्थिक भरभराट होण्यासाठी बंदरे ताब्यात ठेवण्यात राजसत्तांच्यात चढाओढ सुरु झाली. घाटमाथ्यावरील राजसत्तेला बंदरे ताब्यात घेण्यासाठी घाटवाटांचाच वापर करावा लागे. त्यामुळे घाटवाटा स्वतःच्या अखत्यारीत ठेवण्यासाठी आणि घाटवाटेवर वाहतुक करणार्‍या व्यापार्‍यांच्या तांड्यांना संरक्षण देण्यासाठी राजसत्तांनी घाटावर आणि घाटाखाली मोक्याच्या जागी संरक्षणासाठी चौक्या व किल्ले बांधले. त्यायोगे ते घाटमार्गावर लक्ष ठेवू शकत होते. चंद्रराव मोरे १६५४ साली व्यापार्‍यांना घाटाच्या संरक्षणाची खात्री देताना म्हणतात, 'तागसडा गमावला तरी सोनेचा करुन देऊ' यावरुन घाटवाटेवर संरक्षणाची व्यवस्था किती सक्षम असेल याची कल्पना येते.

घाटवाटा व्यवस्थित चालु रहाव्यात याकरीता त्या वाटांच्या देघभालीसाठी एक स्वतंत्र विभाग असे. सध्याच्या भाषेत सांगायच झालं तर 'PWD' खातं किंवा 'MSRDC' जे काम करतं साधारण त्याच प्रकारचं काम हा विभाग करत असे. त्या विभागात वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या व्यक्तींची नेमणूक केलेली असे. त्यांचा एकमेकांशी उत्तमप्रकारे समन्वय देखील असे. ते कोण असत, त्यांची कामे काय असत, याविषयी थोडेसे...

घाटपांडे - शिवकालात किंवा त्यापुर्वीही घाटवाटांची व्यवस्था ठेवण्यासाठी एक मुख्य आणि सक्षम आधिकारी असे, त्यास घाटपांडे असं म्हणत. संपुर्ण घाटवाट त्याच्या अखत्यारीत असे. घाटवाटांनी जे व्यापारी माल नेत त्यांच्याकडून जकात वसुल करुन त्या बदल्यात त्यांना चोराचिलटांपासुन व दरोड्यापासुन संरक्षण देणे हे त्याचे मुख्य काम असे. त्या दृष्टीने चौक्या उभारणे, त्यावर सैनिकांची नेमणूक करणे इत्यादी कामे त्यास करावी लागत. घाटपांडे या मुख्य अधिकार्‍याच्या हाताखाली घाटवाटेत आवश्यक असणार्‍या कामांसाठी कनिष्ठ अधिकारी असत. घाटपांडेंच्या हाताखाली मोढवे, पथकदार व पानसरे, बिडवे, पथकी वा पतकी आणि सभासद असे दुय्यम अधिकारी असत आणि त्यांच्याकडून व्यवस्थितपणे काम करुन घेण्याची जबाबदारी पुर्णतः या घाटपांडेंची असे.

मोढवे - यांच्याकडे घाटदुरुस्तीची व्यवस्था असे. त्यासाठी पाथरवट नेमणे, त्यांचे पगार ठरवणे, त्यांच्याकडून योग्य प्रकारे आणि ठरलेल्या वेळेत ते काम पूर्ण करुन घेणे या सर्व गोष्टींची जबाबदारी या मोढव्यांची असे. हे शस्त्र चालवण्यात देखील पारंगत असावेत. यांचा काही ठिकाणी नाईक वा नायकवडी असा उल्लेख आढळतो.

पथकदार व पानसरे - घाटवाटेवरील व्यापार्‍यांच्या संरक्षणाची जबाबदारी यांची असे. हे देखील शस्त्र चालवण्यात चांगलेच पारंगत असत.

बिडवे - घाटपायथ्याला आणि घाटमाथ्यावर जो तळ असे, त्या तळाच्या संरक्षणाची जबाबदारी बिडवेंची असे. त्याचबरोबर त्यांना बाजारपेठेची व्यवस्थाही बघावी लागे. यांच्याकडे व्यापार्‍यांच्या कुळाची यादी असे. हीच यादी घाटपांडें यांच्याकडेही असे.

पथकी वा पतकी - यांच्याकडे जकातीचे मिरासपण असे. वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या जकातीच्या नियमांत देखील फरक असे.

सभासद - घाटामधील जकातीवर हा स्वतंत्र अधिकारी असे. शिवकाळात घाटातील मेटांवर म्हणजे चौक्यांवर वेगळी जकात घेऊ नये अशी सक्त ताकीद असे परंतु घाटातील देवतांना प्रसन्न करण्यासाठी काहीसा स्वतंत्र आकार घेतला जाई.

...शेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो.

सावधचित्ते शोधावे l
शोधोनी अचूक वेचावे ll
वेचोनी उपयोगावे l
ज्ञान काही ll

समाप्त.

संदर्भ--

१) कविराज भूषण विरचित 'श्री शिवा बावनी'
२) शिवभारत - कविंद्र परमानंद
३) ९१ कलमी बखर - मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनविस
४) जावळीकर मोर्‍यांची छोटी बखर
५) सह्याद्री - स. आ. जोगळेकर
६) राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
७) शिवराजमुद्रा - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन.
८) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स.
९) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
१०) विकीपिडीया ( List Of Peaks In The Western Ghats)

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

5 Jun 2018 - 5:20 pm | दुर्गविहारी

वा ! उत्तम माहिती. आडनावांचे हे संदर्भ माहिती नव्हते. घाटवाटांची माहिती देणार्‍या ब्लॉगच्या लिंक एकत्र देण्याचा प्रयत्न करतो. तसेच इथून माझ्या धाग्यातही घाटवाटांची माहिती देणारे ब्लॉग टाकतो.

सुंदर माहिती. यातले काहीच माहित नव्हते.

यशोधरा's picture

6 Jun 2018 - 7:02 pm | यशोधरा

वाचते आहे..

तुमचा अभ्यास आणि घेतलेले कष्ट जाणवत आहेत. पुभाप्र.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Jun 2018 - 7:08 pm | बिपिन कार्यकर्ते

वाचतो आहे..

प्रचेतस's picture

8 Jun 2018 - 8:36 am | प्रचेतस

हा लेखही खूप आवडला.
एकूणात ही मालिका अत्यंत माहितीपूर्ण आणि तपशीलवार अशी झाली.

सचिन बोकिल's picture

10 Jun 2018 - 11:22 am | सचिन बोकिल

सुंदर ! खूप नवीन माहिती मिळाली.

दिलीप वाटवे's picture

12 Jun 2018 - 9:08 pm | दिलीप वाटवे

सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद.

आणि लेखमाला पण समाप्त केलीस :(