शीर्षक सुचले नाही ...सुचलं तर कळवा

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
29 May 2018 - 3:21 pm

मिपाकरांनो, या कवितेला शीर्षक सुचले नाही मला. कुणाला सुचलं तर कळवा.

--------------------------------------------------------------------------------------

एक कविता कुठूनही वाचता येऊ शकते
पहिल्या ओळीपासून वाचावी हवं तर
आणि धाड धाड वाचत पोचावं शेवटच्या शब्दापर्यंत
एका दमात
.
.
किंवा कधी वाचता वाचता
रेंगाळावं जरास्सं
एखाद्या कमनीय कडव्यावर
हाताने हळुवार स्पर्श करून पहावा
त्या कडव्याला
......कविता नुसती डोळ्यांनीच वाचायची असते, असं काही नाही.
.
.
कधी एखाद्या
आवडत्या कडव्याभोवती हात घालून
ओढून घ्यावी कविता आपल्याजवळ
आणि वाचावी परत सुरूवातीपासून
तिच्या अगदी जवळ जाऊन
......कविता एका रेषेत वाचायची असते, असा काही नियम नाहीये.
.
.
कधी वाटलं तर सुरू करावी मधूनच
कवितेला असतातच
तिचे स्वतःचे असे चढ-उतार
आणि काही खास जागाही
थेट तिथेच पोचावं मग
आणि झोकून द्यावं स्वतःला
......एखाद्या धबधब्यासारखं.
.
.
कधी एखादी कविता
निसटू पाहते हातातून
पण नाही जाऊ द्यायची तिला अशी
निसटता हात धरून ठेवायचा तिचा
एक पाऊल पुढे जायचं
आणि अलगद उचलून घ्यायचं
त्या कवितेला
मग वेळ मिळेल तेव्हा
नीssssट बघायचं तिला
वरपासून.....खालपर्यंत.
.
.
कधी एखाद्या ओळीला घेऊन
बाहेर पडायचं तडक
शहरातल्या गर्दी पसा-यात फिरून झालं
की बसायचं एखाद्या नदीकाठी
त्या ओळीला खेटून
काहीतरी उत्कट वाटू द्यायचं स्वतःला
बराच वेळ वगैरे
आणि पाऊस असला नसला तरीही
......चिंब भिजून यायचं परत.
.
.
एखादी कविता असते नखरेल
सरळ सांगत नाही काही
तुम्ही लाख जाल तिच्याशी बोलायला
मान फिरवून घेईल
फिरवू द्या...
अश्यावेळी कवितेत नाही अडकायचं
दुर्लक्ष करायचं तिच्याकडे सरळ
ईमेजेस शोधायच्या तिच्यातल्या,
किंवा काही आवाज, काही गंध, काही जीवघेणे विभ्रम
आणि गर्द धुक्यात लपेटून घ्यायचं सगळं
......कविता अशी पाठमोरीही लोभस दिसते
.
.
एक कविता कुठूनही वाचता येऊ शकते....
..........खरोखर, कुठूनही वाचता येऊ शकते

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

29 May 2018 - 3:55 pm | यशोधरा

सुरेख.

वाचनव्रत.

दुर्गविहारी's picture

29 May 2018 - 4:54 pm | दुर्गविहारी

मस्तच लिहीताय कि अजय भौ. बाकी शीर्षक मलाही नाही सुचले. एखादया कवितेलाच विचारुन पहा. ;-)

सत्यजित...'s picture

29 May 2018 - 8:19 pm | सत्यजित...

खूप आवडली!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
लिहीत रहा...

'आस्वाद!' किंवा 'रसपान','रसग्रहण' ई. शीर्षके सुचवतो!

कविता, मला समजलेली....!

ओळख गवसलेली कविता...!

शैलेन्द्र's picture

30 May 2018 - 8:20 am | शैलेन्द्र

छान,

"असं किंवा तसं"

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 May 2018 - 9:01 am | ज्ञानोबाचे पैजार

कुणाचे काय तर कुणाचे काय....
आम्हाला कविता दिसली की आमचे हात शिवशिवायला लागतात आणि मग....
जाऊ दे सध्या इतकेच...
पैजारबुवा,

टवाळ कार्टा's picture

30 May 2018 - 11:10 am | टवाळ कार्टा

भारी

यशवंत पाटील's picture

30 May 2018 - 11:28 am | यशवंत पाटील

वाचावी कविता कुठुनही, कशिही....
किंवा
एक कविता

रातराणी's picture

30 May 2018 - 11:31 am | रातराणी

अप्रतिम!!

मनिष's picture

30 May 2018 - 11:58 am | मनिष

'कविता, अशीही, तशीही....'

नाखु's picture

30 May 2018 - 1:03 pm | नाखु

घेणारी कविता

पुंबा's picture

30 May 2018 - 2:17 pm | पुंबा

झकास कविता..
प्रतिक्रिया सुचत नाही..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 May 2018 - 9:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कविता वाचतांना...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 May 2018 - 9:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कविता वाचतांना...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 May 2018 - 9:22 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कविता वाचतांना...

नाखु's picture

31 May 2018 - 11:21 pm | नाखु

अगदी त्रिवार मुजरा!!

वाचकांची पत्रेवाला नाखु

चाणक्य's picture

1 Jun 2018 - 12:11 pm | चाणक्य

सगळ्यांना धन्यवाद. चांगली शीर्षकं सुचवलीत. मला मिका ने सुचवलेलं 'कविता वाचताना...' विशेष आवडलं.

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Jun 2018 - 6:32 pm | राजेंद्र मेहेंदळे

किंवा मग "एक तरी ओवी अनुभवावी" सारखं "एक तरी कविता अनुभवावी"