समस्त सासरे मंडळींसाठी-
पोटी आल्या कन्येचा l योगे पिता ही ग्रहदशा भोगे l
जामाताशी उपसर्गही न पोचे l तो तर दशमग्रह ll
घेणं नास्ति, देणं नास्ति l त्या नाम जामात असती l
अहोरात्र एकच ही पुस्ती l गिरवीत जावी ll
समय प्रसंग ओळखावा l राग निपटून सांडावा l
आला तरी कळो न द्यावा l जामाताशी ll
गर्दभापुढे टांगावी गाजरे l मग तो चालो लागे साजरे l
काम करून घ्यावे l गोजरे संयमाने ll
वानराशी म्हणावे तुझीच लाल l आपली कळो न द्यावी चाल l
मग खुशाल लादावी पखाल। हल्याच्या पाठी ll
दिसामाजी शालजोडीतील हाणावी l मासामाजी ‘दे धरणी ठाय’ ताणावी l
नयनी गोनेत्रातील करुणा आणावी l हेत साधताना ll
जे पेटल्यावीन जाळीतसे l जे जळावीण क्षाळीतसे l
जे रज्जुविनाही माळीतसे l तैसे होओनी राहावे ll
जो जामात होवुनी श्वसुरासी छळी l श्वसुर होताच दशमग्रह निर्दाळी l
मग पावे कीर्ती जळीस्थळी ll तो एक चतुर पुरुष जाण ll
जामाताशी दया न ये कामा l क्रोध नये सोयर्याच्या धामा l
जेथ ज्याचा महिमा l ते तेथेच योजावे ll
खळा जमातांचे ठाई l शांती धरता पडणे अपाई l
जैसे कंटक मर्दावे पायी l तेवी जामात दंडावे ll
साधता वरीलिया युक्ती l कन्या संसारी सुखी होती l
जामाताची कुंठते मती l श्वासुरापुढती ll
देखुनी कन्येच्या दु:खा l स्नुषेचा होवुनी राहावे सखा l
तेथ दाविता क्रूरता l अध:पाता जाईजे ll
मग हरेल जामाताचे दु:ख l अवघे गोत पावती सुख l
अनित्य संसारी कौतुक l ऐसे करुनी जावे ll
या उपरीही न आकळता द्वाड l जमातासमोर न लागे पाड l
मनाचे ठोठवावे कवाड l तेथ मार्तंड असेची गा ll
प्रतिक्रिया
20 Jul 2018 - 11:46 am | Secret Stranger
शब्द-मांडणी खूप छान आहे.
20 Jul 2018 - 11:58 am | श्वेता२४
लय भारी आहे