असाही ऊपदेश

Primary tabs

शाली's picture
शाली in जे न देखे रवी...
2 May 2018 - 4:43 pm

फार पुर्वी माबो वर टाकली होती ही कविता. आता हे परत वेगवेगळे विषय घेऊन पुढे वाढवावे असे वाटतेय. ही कविता मित्राचे लग्न ठरले होते तेंव्हा त्याला सल्ला देण्यासाठी लिहिली होती. नंतर सासरे मंडळींची बाजू घेऊनही याच कवितेचा दुसरा भागही लिहिला होता. हळू हळू पुढेही लिहिलच. (गमतित घ्यावे)

काव्य शक्तीची कराया जोखणी | कैक दिसांनी स्पर्शली लेखणी |
मित्र लज्जेची मात्र राखणी | हेतु इतुकाची असे ||

नृपाविन जैसा प्रदेशू | यौवनाविन आवेशू|
पात्रता नसता उपदेशू | तैसाची जान ||

हा विषयू अवघा अगम्य | बाष्फळ तरीही सुरम्य |
गर्दभापुढील गीतेशी साम्य | उपदेशाचे तुम्हाप्रती ||

आपण तो व्यासंगमुर्ती | सांगणे काय तुम्हाप्रती |
मित्रवर्गाची किर्ती | सांभाळली पाहीजे ||

तुमचे साठी कष्ट केले | परंतू दखलेस ना घेतले |
ऋणानूबंधे विस्मरन जाले | काय कारणे ||

लग्न एकच अवघा शब्द | आपणा सारीखा होय निर्बुद्ध |
गर्दभ जातीची ही लक्षणे शुद्ध | थोडी शरम पाहीजे ||

श्वसुर स्थानी दाखवावा स्वाभीमान | नाहीतो त्याहूनी बरा श्वान |
स्वजनात कसला मानापमान | मनी बाळगावा ||

जैसा हरिणकळपा माजी केसरी | सर्पराजा सामोरी बासरी |
तैसा जामात श्वसुर घरी | शोभला पाहिजे ||

सागराने देखीता अगस्ती | परशूरामे देखता क्षत्रीयवस्ती |
जामाते पाहूनीया स्थिती | श्वसुराची व्हावी ||

सदैव ध्यानी ठेवावे | मुठ झाकोनीया रहावे |
सत्यस्थिती कळो न द्यावे | दारा पित्याशी || (दारा: पत्नी)

वेळू असूनही पावा | काक असूनही रावा |
गर्दभ असूनही उच्चैश्रवा | जामात श्वसूरघरी || (उच्चैश्रवा = ईंद्राचा घोडा)

पाटातील तुंब होऊनी रहावे | पाणी चालोच न द्यावे |
विचार करुनी घसरावे | श्वसूरावरी ||

आधी गाजवावे तडाखे | तरी मग श्वसूरस्थान धाके |
ऐसे न होता धक्के | संसारास बसती ||

या मित्रमंडळाच्या ठायी | लज्जा रक्षी ऐसा नाही |
त्या पुरता राहीलो मी काही | तुम्हा कारणे ||

अंती एकच सांगणे तुम्हा प्रती | मित्र, माता आणिक मती |
यावीन नाही कधीही गती | मनूष्य देहा ||

कटू वचने तुम्हा दुखावले | यातून अंती काय साधले |
योग्यता नसता सर्व लिहिले | क्षमा केली पाहिजे ||

|| इती श्री मित्रदास रचितम्, श्वसूर संकट निरसनम्, अक्कल वृध्दी स्त्रोत्रम्, संपुर्णम् ||

कविता