मुखवटे त्याचे दिखाऊ, प्रिय तुला प्राणाहुनी
मात्र तो अपुलाच चेहेरा बघू न धजतो दर्पणी !
मृगजळाचे भरुनी पेले पाजले त्याने तुला
स्वार्थ अन भोगात त्याचा जीव पुरता गुंतला
प्रेषिताचे पाय कसले? मातीची ती ढेकळे !
पूज्य तो बनतोय केवळ आंधळ्या भक्ती मुळे
अजुनी नाही वेळ गेली, सोड त्याची संगत
सोड ते हतवीर्य जगणे, सोड उष्टी पंगत
आतला आवाज सांगे, ऐक मग ते सांगणे
"कवडीमोले विकू नको तू लाखमोलाचे जिणे"
........(स्वयंघोषित बाबा, बापू, महाराज, माताजी यांच्या अंधभक्तांस समर्पित)