उकाड्याची रात्र, भिजलेली दुपार

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in जे न देखे रवी...
10 Apr 2018 - 10:16 am

उकाड्याची रात्र :
एक दोन तुर्की चित्रपटांत आपल्या घराजवळचा माळ दिसेल म्हणून​ काही ऑनलाईन लिस्ट्स चाळतोय.
वारा येतोय का हे पहायला सिमेंट-पाईपच्या कोनाड्यात उगवलेल्या पिंपळाकडे नजर जायची.
स्ट्रीटलाईट्सचे पिवळट प्रकाश तेव्हढे मंदसे घरा-दारांतून वाहताहेत.
खिडकीबाहेर आपली उकाड्याची अस्वस्थता जात नाही आणि बाहेरून एखादी आठवण वाहून येत नाही.
दाराबाहेर रिकाम्या कॉरिडॉरला पावलं हवीत.
कठड्यावर रेलून राख झाडणारे हात हवेत.
विचारांबरोबरच जलद सिगारेट जाळायला वारा नाहीय, आणि विचारही, म्हणून दरवाजा ओलांडू वाटत नाही.
एखादा मेसेज, एखादे पत्र नजरेखालून घालत खालून तापणारा लॅपी मांडीवर घेत उशीवर रेललोय.
नजर अधून मधून जाईल तिथले अनावश्यक बारकावे टिपणारा रिकामा उकाडा.
रस्त्यावर कडूनिंबाच्या खाली जमीनने तिची अनाघ्रात पाकळी, पिवळ्या रेषांत सावलीच्या नक्षीने झाकून घेतलीय.
सकाळी ओवरफ्लो झालेला मॅनहोल सुकून गेलाय, आतल्या गलिच्छ विश्वाला नजरेआड करण्याची जबाबदारी उद्या झटकून देईल तो.
विंटर स्लीपला पाम दि ओर मिळालं, इतके क्षीण कनेक्शन अशा वेळेस.

भिजलेली दुपार:
दुसऱ्या काठावर गारवेल पसरलीय. पाणी त्या भागात उथळ आहे म्हणतात.
आत आत जाताना हळू हळू पावले थंडगार सायमऊ गाळात हलकीशी रुतत जाताहेत.
मागच्या काठावरून अधिक खोल न जायला बजावणारी जबाबदारीची हाक येतेय.
दुर्लक्ष.
हळूच तळपायाला एखादा काडीकाटा रुततो, हलका.
शहारा भिजल्या मानेवरून कोरड्या डोक्यापर्यंत जात असतानाच पावलं अधांतरी होतात.

दमून काठावर यावं इतक्यात समोरच्या पिवळ्या माळाची फिकट निळी पार्श्वभूमी करडीकाळी होते.
चरत्या गुरांच्या गळ्यातले घुंगुर लगबगी आणि स्पष्ट होतात.
गारवेली सळसळू लागतात.
पाण्यावर तरंग वाढतात, लाटांच्या आवाजात हलके बदल होतात.
परतण्याची गडबड होते. उरलेले मासे न साफ करता तसेच नायलॉनच्या पिशवीत घातले जातात.
प्रतिबिंबाने आणखी गडद झालेल्या पाण्यावर -
जाळ्याची ह्या काठावरून त्या काठापातोर गेलेली थर्मोकोली रेघ तशीच पाण्यात ठेवण्याचा निर्णय होतो.
एखादा थेंब तोवर नेमका पापणीवर पडतो.
लाल झालेला डोळा चुर्चुरतो.
तळे सोडण्यासाठी गाडीची किक मारल्याचा अधीर आवाज येतो.
वारा वाहू लागतो. गाडीच्या आवाजात चढ उतार होतात.
रिकाम्या डांबरी रस्त्यांवर काही मोठे ओले ठिपके दिसू लागतात.
गारवा हवासा वाटू लागतो, आणि पुलाखाली त्याच तळ्याचा सांडवा दिसतो.
आंब्याची चारपाच झाडं गर्दीने हेलकावताहेत,
फांद्याच्या उघडमिटीत एखाद्या विहिरीवरचा पंपस्टार्टर फडफडतोय.
रस्त्यावरुन कसल्याश्या कापडाची फडफड करत एखादी जीप, एसटी झर्क्कन निघून जाते.
तिथे गाडी थांबवली जातेय.
वाऱ्याने कैऱ्या पडतात.
मोठ्या थेंबांचा पाउस येतो.
माती खावीशी वाटणारा गंध पसरतो.
भिजलेले पाड उचलून घेतले जातात.
शेजारचा तारांनी ताणून बसवलेला द्राक्षाचा पसारा सैल भासू लागतो.
तसेच भिजत घरी जायचा विचार येतो. पाउस मोठाच येतो.
विचारांच्या कल्पनांच्या अनेक धारांनी तो मुक्त कोसळतो.
कलत्या उन्हाच्या साक्षीने आभाळाच्या कुठल्या तरी तुकड्याकडे पाउस सरकत जातो, आणि भिजलेली गाडी सुरु होते.
त्या गारव्याचे सुख निर्लेप भोगायची अहर्ता काय?
आश्वस्त अवलंबित मनालाच ते मिळते का?
अपेक्षा-स्वप्ने, जबाबदाऱ्या, विश्वास, माया सगळं स्व्च्छ धुऊन निघत नाही. ताजं होत नाही.
आशेने ते सुख भोगता येते, कोवळ्या ओल्या भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा तळहाताला पोळतात तसं हे सुख.
शेंगा फोडून भाजून देणाऱ्या मायेच्या पलीकडे काही उरतच नाही.
तेव्हढ्या काही काळात असं उत्कट जगणं, पावसासारखं कुठेतरी दूर निघत जात असताना जाणवते.
कसली तरी अनामिक भीती उठते, पण तेवढ्यात ओळखीचे दार दिसते.
त्या भीतीला खूप मोठा पैस आहे. ती नाकारता येते.
साऱ्यात गुंतता येतं. हे बलस्थान आहे. जगण्याची ती प्राथमिक अट आहे.
स्वतःला बजावता येतं, हाही आधार आहे.
अपार सुखाचं काहीतरी निष्ठेने निर्माणही करता येतं.
निर्मितीहून तिची प्रोसेस, सिन्थेसिस खरी. गुंतण्या न गुंतण्याचे परिमाण ठरवणारी.
पावसाला असंच काहीसं सांगायचं असावं हा मेटाफॉर मला फार प्रिय आहे.
साचलेपणाला वावच नाही. स्थितीशीलता नियमच नाहीये.
निर्मितीरत असणं.
काय की.

दुपारच्या माशाची आमटी गरम करून भाकरी कुस्कुरून खाताना सौन्यातून पडणारा सुंदर ओलासा प्रकाश.
सौन्याखाली बसून जेवू नकोस अशी पुन्हा एक आरोळी.
पण दुर्लक्ष.
भूक, जनन, पोषण, अशी न संपणारी चक्राकार गुंतवळ.
ह्या गुंतवळीत एक क्षणापरी गेलेली भिजलेली दुपार.
करल मातीच्या खाली असणाऱ्या लाकडी छतासारखी अजून अजून गडद होत जात
दिवेलागणीत मिसळत जाणारी.
कालवणाच्या वासाची,
संप्रेरकांची,
आकाशमोगऱ्याच्या-चिखलात रुतून बसलेल्या फुलांची.
टीवी-वरल्या एखाद्या आवडत्या प्रोग्रामची उत्सुकता पेरणारी, कुणाच्यातरी भेटीच्या ओढीची, वा एखाद्या ओळीची.

कविता

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

11 Apr 2018 - 10:39 am | जव्हेरगंज

अरे वा!!!

शैली जबरदस्त आहे!!!
आवडलं!

दुर्गविहारी's picture

11 Apr 2018 - 11:36 am | दुर्गविहारी

कवितेपेक्षा मुक्तक वाटतयं. पण जबरी लिहीलयं. आणि आय.डी. हि खतरनाक आहे हो. ;-)

खिलजि's picture

11 Apr 2018 - 7:02 pm | खिलजि

मस्त लिहिलय .... साहेब ...

सिद्धेश्वर

निवांत घोंघावणाऱ्या वादळाप्रमाणे स्वतःत गुंतलेले मुक्तक आवडले.

सत्यजित...'s picture

14 Apr 2018 - 4:42 am | सत्यजित...

एखाद्या बंद हवेलीत,एकल कबूतराच्या पंखांची फड-फड ऐकतोय असे झाले! खूप सुंदर!

दर्जेदार आणि स्वतंत्र,दिमाखदार शैलीच्या भरपूर कविता वाचायला मिळाल्या आज मिपावर!

सत्यजित...'s picture

14 Apr 2018 - 4:47 am | सत्यजित...

मिपावर, अश्या दर्जेदार कवितांना प्रोत्साहन मिळत रहावे.
क.लो.अ.
धन्यवाद!