हातसन डेअरीची बॅलन्सशिट चाळता चाळता
मनाला हिसका बसला आणि एकदम आठवलं-
कार्तिकातल्या पहाटे
गाय व्यालेली,
इनकॅन्डेसन्ट पिवळ्या उजेडात
कडब्यावर पडलेलं ओलसर वासरू चाटत असलेली,
सैरभैर तिच्या उष्ण उछ्वासानं,
तुझी छाती भरून गेलेली.
तेव्हा तुझ्या पाठीवर थंडीच्या चांदण्या शिरशिरल्या.
---
जोखमीचे हिशोब मांडता मांडता
जिवंत ठेवायला तुला,
त्या क्षणांची हमी कधीच पुरणार नाही
हे पक्कं ठाऊक होतं तुला,
आणि तशाच शुभ्र आठवणींमुळे
सरत्या पावसाळ्यातली एखादी सेपिया संध्याकाळ
तुझ्या डोळ्यांना जाणवते आणि तुला वठू देत नाही.
---
कॅबच्या दारातनं उतरताना तुझ्या शहरातही,
सातवीणीचा आवाहक गंध आला तुला,
मॅकार्थीच्या पिच्चरांत पाहिलास तसा एकांडा कश मारलास तुझ्या आवडत्या सिग्रेटीचा,
तरी सातविणीची नशा उतरली नाही.
म्हणजे तुझ्यात अजूनही शिल्लक आहेत
न लिहिलेल्या ओळी.
---
काचबंद ऑफिसात
तोंडाची जिम करून तावातावानं लोक तुला पटवत होते,
नोटबंदीची अत्यावशकता,
कानात हेडफोनचे गोळे घालून
"जनी जाय पाणियासी" ऐकल्यावर घसा जड झाला.
मौनाचा गैरअर्थ, संमती म्हणून काढू दिलंस लोकांना.
अंधारल्यावर नदीच्या पैलतीरी जाऊन
पुनवेचा, घाटावर दीपोत्सव पाहिलास
दूरस्थ कोलाहल पाण्यात विरत जाताना ऐकलास.
---
शब्दांची गुंतवणूक न करताही
जगता यावं इतकी कविता मिळवायची आहे.
जिच्या तळाशी सारे ताळेबंद बॅलन्स व्हावेत.
प्रतिक्रिया
4 Apr 2018 - 2:01 pm | प्राची अश्विनी
कोलटकरचे वंशज.;)
4 Apr 2018 - 3:25 pm | आदूबाळ
आवडली!
4 Apr 2018 - 3:39 pm | विशुमित
<<शब्दांची गुंतवणूक न करताही
जगता यावं इतकी कविता मिळवायची आहे.>>
==>> वाह क्या बात है.!!
4 Apr 2018 - 3:39 pm | विशुमित
<<शब्दांची गुंतवणूक न करताही
जगता यावं इतकी कविता मिळवायची आहे.>>
==>> वाह क्या बात है.!!
4 Apr 2018 - 3:52 pm | अभिजीत अवलिया
छान.
4 Apr 2018 - 5:11 pm | पुंबा
जबरदस्त..
फार आवडली
11 Apr 2018 - 12:53 am | रातराणी
सुंदर!!!
11 Apr 2018 - 11:49 am | जव्हेरगंज
ही पण भारी!!!!